@नयना विश्वास बागुल
माहेरची कोणतीही पार्श्वभूमी नसताना चाळीस वर्षांपूर्वी एका संघ स्वयंसेवकाच्या घरात सून म्हणून आलेल्या बँकेतील नोकरदार महिलेचा हा कौटुंबिक अनुभव. पतीच्या सोबतीने पूर्वांचलच्या लहान मुलांमध्ये मायेचे छत्र शोधत सुरू झालेला हा प्रवास पुढच्या पिढीत अमेरिका आणि हडपसरपर्यंत संघविचारांचे बीज पेरून गेला. बागुल कुटुंबाने निवृत्तीनंतरही स्वतःला समाजकार्यात कसे झोकून दिले, याचे दर्शन घडवणारे हे प्रेरणादायी कथन...
मी 40 वर्षांपूर्वी लग्न होऊन संघ स्वयंसेवकाच्या घरात आले. तेव्हा मला संघ काय करतो, प्रचारकांचे कार्य काय असते, शाखा कशासाठी भरते याबद्दल काहीही माहिती नव्हती. माझ्या माहेरची संघ पार्श्वभूमी नसल्यामुळे कोरी पाटी होती. पण माझ्या माहेरचे संस्कार मी घेऊन आले होते की, कोणत्याही कार्याचा, संघटनेचा द्वेष करायचा नाही.
मी बँकेत नोकरी करत होते. माझ्या पतीने मला सांगितले होते, “प्रचारक घरी आल्यावर त्यांना जेवण दिल्याशिवाय कधीही पाठवायचे नाही. त्यांच्यासाठी पिठलं भाकरी केलंस तरीसुद्धा चालेल.” प्रचारकांची जीवनपद्धती त्यांनी मला समजून सांगितली. पण माझ्या नोकरीच्या व्यस्ततेमुळे फारसे प्रचारक त्यावेळी घरी आल्याचे मला आठवत नाही.
दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला माझे पती जात असत. एकदा मीही जेव्हा त्यांच्यासोबत गेले, तेव्हा ध्वजाला गुरू मानतात आणि ध्वजापुढे समर्पण करतात हे समजलं. संघाचे शिबिर असले की घरातून दहा पोळ्या मी देत असे. हळूहळू मला संघ विचारांची ओळख होऊ लागली. माझे सासरे विठ्ठल बागुल यांनी पालघर जिल्ह्यातील केळवा-माहीम येथे 1960मध्ये शाखा सुरू केली. त्यामुळे घरात संघविचार कानावर पडत होतेच.
2002मध्ये चिंचवड येथील वसतिगृहात पूर्वांचलची 15 मुले राहायला आली. उत्सुकतेने मी हा प्रकल्प बघायला गेले. अगदी पाच वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यंत मुलं वसतिगृहात आली होती. गोरी गोरी, मिचमिच्या डोळ्यांची ही मुलं आपल्या घरापासून तीन हजार किलोमीटर दूर आली होती. माझे पती विश्वास बागुल या वसतिगृहाचे भोजन प्रमुख होते. मुलांना हिंदी, मराठी भाषा बोलता येत नव्हती. त्यामुळे संवाद साधायला अडचण यायची. पण हळूहळू मुलं हिंदी भाषा शिकली. आम्ही शनिवार-रविवार दोन मुलांना घरी राहायला आणत असू. आमच्या मुलांबरोबर ही मुलं जेवायची. झोपायची. टीव्ही बघायची. या मुलांचे पालक दूर आहेत तेव्हा या मुलांसाठी काहीतरी करावं अशी भावना निर्माण झाली. दर महिन्याला एका तरी मुलाचा वाढदिवस असायचा; मग मी वसतिगृहावर जाऊन औक्षण करून मुलांना खाऊ द्यायची. वसतिगृहातल्या कार्यकर्त्यांच्या आम्ही पत्नी सर्वजणी मिळून मुलांसाठी चिवडा लाडू बनवत असू. मुलांना शिवरायांचे महत्त्व कळावं म्हणून त्यांची शिवनेरी किल्ल्यावर सहल नेली होती. तसंच ‘जाणता राजा’ हे नाटक बघायला मुलांना आम्ही घेऊन गेलो होतो. आता ही मुलं मोठी झाली आहेत. आणि मुख्य म्हणजे न चुकता आम्हाला फोन करतात. आमची आपुलकीने विचारपूस करतात.
यथावकाश माझ्या मुलीला स्थळ बघणं सुरू होतं. तिला संघ विचारांचाच मुलगा हवा होता. लगेच चांगलं स्थळ मिळाल्यामुळे तिचं लग्न जमलं आणि आता आमचे जावई ऋषिकेश गद्रे हे हडपसर विभागाचे बौद्धिक प्रमुख आहेत. आमचा नातू घोष पथकात आहे. आमचा मुलगा शाखेमध्ये मुख्य शिक्षक होता. पुणे जिल्ह्यात विस्तारक म्हणून तो दोन वेळा गेला होता. आता सध्या तो अमेरिकेत आहे. तिथेही तो शाखेत मुख्य शिक्षक आहे. आम्ही मुलाकडे अमेरिकेत जाऊन आलो. तिथल्या संघाच्या उत्सवात सामील झालो. अमेरिकेतल्या संघ कार्यकर्त्यांची ओळख झाली. दोन प्रचारक घरी येऊन गेले. संघ विचारांचं बीज पुढच्या पिढीतही रुजलं आहे, हे पाहून समाधान वाटतं.
’अलौकिक कर्मयोगी’ भय्याजी काणे, ’ग्रामविकासाचे नेते’ नानाजी देशमुख, ’संघ प्रचारक’ दामूअण्णा दाते यांचं चरित्र मी वाचलं. आणि प्रचारकांचं, स्वयंसेवकांचं कार्य वाचून मी भारावून गेले. तसंच मनोहर पर्रीकर यांचं चरित्रही वाचलं आणि विलक्षण ध्येयवाद, नि:स्वार्थी भावना यांची ओळख झाली. सर्वात भावलं ते सेवा कार्य आणि समरसता. माझे पती गेली दहा वर्षं रुग्ण सेवा करतात. त्यासाठी चिंचवडमध्ये त्यांनी रुग्णसेवा केंद्र उभं केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक कामासाठी स्वेच्छा निवृत्ती घेऊन पुणे जिल्ह्यातल्या साडेसहाशे शाळांमध्ये स्वखर्चातून त्यांनी विज्ञानाचा प्रसार केला आहे. हे संघाचे संस्कार आहेत. या सर्व कार्यात माझा त्यांना पाठिंबा आहे आणि आता अनेक सामाजिक उपक्रमात माझाही सहभाग असतो.