दिनांक 15 मेच्या सायंकाळी अकोल्याच्या रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय परिसरातील सभागृहात पार पडलेल्या ‘आधुनिक दधीचि’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाचा सोहळा भव्यदिव्य आणि नियोजनबद्ध होताच; पण त्याहूनही अधिक तो पथदर्शी स्वरूपाचा ठरला, याविषयी कुणाचेही दुमत होणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघर्ष अन् प्रतिकूलतेच्या काळात अकोला-बुलडाणा परिसरात बॅकांचे जाळे विणणारे आणि अनेक प्रथितयश शैक्षणिक संस्थांची मुहूर्तमेढ रोवणारे प्रचारक स्व. वसंतराव कसबेकर यांच्या प्रसिद्धीपरान्मुखतेआड दडलेल्या प्रेरणादायी जीवनचरित्राच्या प्रकाशनाचा हा सोहळा होता.

तत्पूर्वी या चरित्रग्रंथाच्या निर्मितीमागील जन्मकथा अशी की, प्रा. सुरेशराव कुळकर्णी यांनी ‘पसायदानामृत’ या दहा वर्षांपासून प्रसिद्ध होणार्या वार्षिकांकातून तसेच ’स्व. वसंतराव स्मृती व्याख्यान’ या दोन उपक्रमांमधून स्व. वसंतरावांच्या प्रेरणापुंजीचे जतन करणारी एक पणती जणू अखंड तेवत ठेवली. पुढे वसंतरावांच्या कार्यकर्तृत्वाचा आवाका लक्षात घेऊन त्यांचे निर्मोही जीवनकार्य समाजासमोर आले पाहिजे, या विचाराला मा. रवीजी भुसारी यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठी भूमिका घेतली. सुरेशराव कुळकर्णी यांच्या आठवणींना शब्दबद्ध करण्याची जबाबदारी डॉ. निशिकांत देशपांडे यांना दिली; तर अन्य साहाय्य करण्यासाठी अकोल्यातील रामेश्वर फुंडकर, विनोद देशमुख, महेश जोशी, समीर थोडगे, राम भिरड, रवी कसबेकर, संदीप निकम, अतुल ठकरे, आरती लढ्ढा व वैशाली देशपांडे या अनुभवी व नि:स्पृह कार्यकर्त्यांना या मिशनमध्ये जोडले गेले. सर्वांना एकत्र आणून ’स्व. वसंतराव कसबेकर स्मृती संकलन समिती’ची स्थापना झाली. गेल्या सुमारे वर्ष दीड वर्षांपासून समितीने निरपेक्ष भावाने केलेल्या कार्याचे प्रकट रूप म्हणजे अलीकडे झालेला अविस्मरणीय प्रकाशन सोहळा...
या सोहळ्यातून स्व. वसंतरावांविषयीचा आदर प्रकटला आणि त्यांच्या चरित्रातून अंगीकारलेली प्रेरणा दृग्गोचर झाली. कार्यक्रमासाठी कसबेकर कुटुंबीयांना आदरपूर्वक आमंत्रण देण्यात आले. त्यांच्या आजच्या पिढीतील आप्तांपैकी अनेक जण कार्यक्रमाला हजर राहिले. डॉ. अपूर्वा पालकर ह्या मुंबईतील ’रतन टाटा विद्यापीठा’च्या मा. कुलगुरू आणि वसंतराव यांची पुतणी. आपले मनोगत व्यक्त करताना त्या भारावून गेल्या होत्या. वसंतरावांच्या जाण्यानंतर जवळपास 23 वर्षांनी त्यांची आठवण ठेवणे, त्यांची माहिती गोळा करणे, पुस्तक काढणे, कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बोलावून त्यांचे आदरातिथ्य करणे यांमुळे कसबेकर कुटुंबीय आनंद, अभिमान आणि कृतार्थतेने भारावून गेले. संघकार्यात कोणतीही जबाबदारी आली तर ती आम्ही आनंदाने स्वीकारू हा हृदयातून आलेला त्यांचा कृतज्ञोद्गार सुखावून गेला.
सुरुवातीस ‘आधुनिक दधीचि’ या चरित्रग्रंथास सन्मानपूर्वक विराजमान करून त्यांची पालखी खांद्यावरुन मिरवणारी दिंडी काढण्यात आली. निर्मोही अन् निरपेक्ष समाजसेवेत जीवन व्यतित केलेल्या ’एका अनोख्या जीवनचरित्राची पालखी आपल्या संस्कारक्षम खांद्यांवर वाहणारे बालगोपाल’ हे चित्र खूप सूचक आणि संदेशात्मक होते. सुनील महाराज कराळे यांच्या वारकरी पथकाने या ग्रंथदिंडीचे नियोजन केले होते. विनायकराव पांडे यांच्या दमदार शंखनादाने अधिक अनुरूप अशी वातावरणनिर्मिती झाली.
वसंतरावांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या अकोला, बुलडाणा, देवलापार, नागभीड आदि ठिकाणच्या बँका तसेच शैक्षणिक क्षेत्रातील एकंदर 12 संस्थांचे संचालक मंडळ या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. या सर्व संचालकांना वसंतराव कसबेकर यांची प्रतिमा भेट देऊन आयोजकांनी त्यांचा सत्कार केला.
वयोज्येष्ठता आणि कर्तृत्व लक्षात घेऊन ज्येष्ठांचा त्यांच्याजवळ जाऊन केलेला सन्मान हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. ’आधुनिक दधीचि’ या चरित्रग्रंथाची प्रत प्रत्येकाला भेट देण्यात आली.
अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांचे भाषण वसंतरावांविषयी मनात जपलेल्या अकृत्रिम आदरभावाने ओथंबलेले होते. कोणताही राजकीय अभिनिवेष नसलेले त्यांचे मनोगत उपस्थितांना भावले. वसंतराव किती निर्मोही आहेत याचे दाखले देताना ते म्हणाले,”वसंतरावांच्या हातून अनेक बँका, शाळांचे, संस्थांचे बीजारोपण झाले; पण ते कोणत्याही कार्यकारिणीत नव्हते, कोणत्याही बँकेत त्यांचे शेअर्स नव्हते, कोणत्याही बँकेत त्यांचे साधे खातेसुद्धा नव्हते तसेच त्यांनी त्यांच्या कोणत्याही नातेवाइकांना कोणत्याही संस्थेत लावण्यासाठी ना शिफारस केली ना कधी कोणाला सांगितले. हा ईश्वरीय गुण आहे.” या भाषणाने आकाश यांनी वेगळी छाप पाडली आणि स्व. भाऊसाहेबांचा समाजाधिष्ठित राजकारणाचा वारसा त्यांनी जपला असल्याचा साक्षात्कार उपस्थितांना आनंद देणारा ठरला.
1950 ते 1968 या दीर्घ कालखंडात वसंतराव हे अकोल्यात विभाग प्रचारक होते. त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी म्हणजे 1998च्या सुमारास विभाग प्रचारक म्हणून दायित्व पार पाडलेले मा. प्रदीप जोशी हे या सोहळ्याचे मार्गदर्शक वक्ता होते. ‘वसंतरावांचे कार्य म्हणजे केवळ बँका अथवा शैक्षणिक संस्था स्थापन करणे एवढ्या मर्यादित अर्थाचे नसून प्राप्त परिस्थितीची गरज द्रष्टेपणाने ओळखून त्यानुसार समाजहिताचे काम उभे करणे यात त्यांच्या कर्तृत्वाचे अनोखेपण सामावले आहे’, हे त्यांचे विश्लेषण भावणारे होते.’आजच्या काळात वसंतराव असते तर कोणत्या विषयांची चिंता केली असती आणि त्यांनी काळाची गरज म्हणून कोणती कामे उभी केली असती? याचे चिंतन सर्वांनी केले पाहिजे. सध्या देशाच्या व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उभे करून देशविरोधी नॅरेटीव्ह समाजात रूजविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या विषयी जागरूकतेने सकारात्मकता निर्माण करणारी कामे त्यांनी उभी केली असती. वसंतरावांचा हा दृष्टीकोन आपण आज घेतला पाहिजे.” हे मा. प्रदीप जोशी यांचे आवाहन सर्वांच्या अंत:करणाला स्पर्शून गेले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मा. प्रांत कार्यवाह प्रा. अतुल मोघे यांनी पुस्तकाचा सुंदर शब्दांत मागोवा घेतला. ‘’प्रचारकांवर निर्माण होत असलेली पुस्तके ही अमूल्य आहेत, ती आजच्या पिढीसमोर काम कसे केले पाहिजे याचा वस्तुपाठ आहेत” असे सांगून अतुल मोघे यांनी वसंतरावांसोबतचे काही अनुभव उपस्थितांना सांगितले. वसंतराव महाल संघ कार्यालयातील रोजची वर्तमानपत्रे त्यांच्या कक्षात जपून ठेवत. एकदा आम्ही काही स्वयंसेवकांनी शाखा संपल्यानंतर कच्चा चिवडा बनविला. हा चिवडा खाण्यासाठी म्हणून रद्दी पेपर घेण्यासाठी मी वसंतरावांच्या कक्षात गेलो तर ते माझ्यावर रागावले. ‘’रद्दी पेपरसुद्धा संघाची प्रॉपर्टी आहे, ती असे कच्चे चिवडे खाण्यासाठी नव्हेत, ते घेऊ नकोस, असे स्पष्ट शब्दांत मला बजावले,” या छोट्या गोष्टीवरून वसंतरावांनी फार मोठा धडा आम्हाला दिला.
मंचावर एलईडी स्क्रीनवरून प्रदर्शित केले गेलेले ग्रंथाचे मुखपृष्ठ आणि त्याविषयीची समीर थोडगे यांच्या कल्पकतेतून साकारलेली संक्षिप्त मांडणी आकर्षक होती. प.पू.सरसंघचालकांच्या शुभसंदेशाचे अतुल ठकरे यांनी केलेले वाचन यथार्थ असेच होते. महेश जोशी यांचे सूत्रसंचालन प्रभावी होते. रामेश्वर फुंडकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. लेखक प्रा. सुरेशराव कुळकर्णी यांनी आभार व्यक्त केले. या पुस्तकाचे लेखक डॉ. निशिकांत देशपांडे यांनी भावस्पर्शी आणि नेमक्या शब्दांत पुस्तकामागील प्रवास प्रास्ताविकातून मांडला.
या पुस्तक प्रकाशनाचा संपूर्ण खर्च पुणेनिवासी सुधीरराव अलकरी आणि डॉ. अपूर्वा पालकर यांनी स्वयंस्फूर्तीने उचलला. त्यांनी व्यक्त केलेला हा कृतिशील आदरभाव अनुकरणीय स्वरुपाचा आहे. प्रकाशन सोहळ्याच्या आयोजनाचे संपूर्ण आर्थिक दायित्व दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अकोला आणि शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला यांनी आपल्याकडे घेतले होते. आपल्या परिसरातील सभागृह कार्यक्रमाकरिता निःशुल्क उपलब्ध करुन देऊन ‘बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी’ने समाजभान जपण्याची आपली परंपरा अधोरेखित केली.
आयोजकांनी उपस्थितांना ग्रंथाची प्रत विनाशुल्क भेट दिली. प्रकाशनापूर्वी ग्रंथाची प्रत ग्रामदैवत श्रीराजराजेश्वराला अर्पण करण्यात आली. नंदू देशपांडे, गोपाल खंडेलवाल, जैनेंद्र लुंकड यांची उपस्थिती आणि कार्यक्रमातील वावर स्नेहपूर्ण होता.
सोशल मीडियातल्या रील्सवर आपलं पालनपोषण करवून घेण्याच्या या युगात समाजकार्याचा मानदंड स्थापित करणार्या चरित्राच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आणि तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणारे सभागृह.. बसायला जागा नाही म्हणून बाहेर परिसरात उभे असलेले लोक...हे एकंदर चित्र आपल्या सरासरी समाजभानाविषयी आश्वस्त करणारे आहे. आदर्श निर्माणाच्या प्रक्रियेत ‘आधुनिक दधीचि’ मैलाचा दगड ठरणार, हा दिलासा देणारा प्रस्तुत प्रकाशन सोहळा होता.
- डॉ. निशिकांत देशपांडे
9850342404