संस्कारातून व्यक्ती, आणि समाज राष्ट्राचा शाश्वत विकास

संस्कारगाथा

विवेक मराठी    06-Jun-2026   
Total Views |
‘संस्कार गाथा’ म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर आयुष्य सुंदर जगण्याची कला आहे. जन्मापूर्वीपासून ते मृत्यूपर्यंतचे सोळा संस्कार माणसाचे चारित्र्य घडवून शाश्वत विकासाचा पाया रचतात. पाश्चिमात्य जगाची धाव भौतिक सुखाकडे असताना, आपली संस्कार व्यवस्था मनाची शुद्धी आणि कौटुंबिक जिव्हाळा जपायला शिकवते. या लेखमालेच्या अंतिम भागात हाच संदेश दिला आहे की, संस्कारांची हीच शिदोरी उद्याचा सशक्त समाज आणि समर्थ राष्ट्र घडवू शकते.

sanskar 
 
आज शाश्वत विकास (Sustainable Development) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आर्थिक प्रगती, मोठ्या इमारती, रस्ते, या गोष्टी येतात. पण या सगळ्यांच्या मुळाशी असलेली एक महत्त्वाची गोष्ट आपण अनेकदा विसरतो-ती म्हणजे ’संस्कृती आणि मूल्यव्यवस्था’.
 
 
संस्कार ही सांस्कृतिक मूल्यांचे शिकवण देणारी पद्धती असून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राचा शाश्वत विकास साधते. संस्कार म्हणजे केवळ विधी नाहीत; त्यामधून मानवाच्या शरीर, मन, भावना, बुद्धी आणि चारित्र्याचा विकास घडवण्याची पद्धत आहे.
 
गर्भावस्थेपासून ते मृत्यूपर्यंत चालणार्‍या या प्रक्रियेतून व्यक्ती घडते, कुटुंब सशक्त होते, समाजात समरसता निर्माण होते आणि राष्ट्राची संस्कृती टिकून राहते.
 
चूक झाल्यावर दुरुस्ती करण्यापेक्षा किंवा त्यावेळी शिक्षा देण्यापेक्षा चांगली व्यक्ती घडवण्यावर संस्कार भर देते. संस्कार व्यक्तींवर बाहेरून नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्यामध्ये आंतरिक सुधारणा घडावी यासाठी काम करतात. तसेच क्षणिक फायद्यांपेक्षा दीर्घकालीन विकास साधण्याचे काम संस्कार करतात.
 
संस्कार हे वेगवेगळे आणि तुटक विधी नाहीत, तर ती आयुष्यभर चालणारी एक सुसंगत प्रक्रिया आहे. जन्माच्या आधीपासून ते मृत्यूपश्चात ते व्यक्तीच्या जीवनाला दिशा देतात.
 
परंपरेने सांगितलेले सोळा संस्कार हे मानवी जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांशी जोडलेले आहेत.
 
1. गर्भपूर्व संस्कार
 
जीवन सुरू होण्यापूर्वीच घरातील वातावरण सकारात्मक आणि बाळाच्या स्वागतासाठी सज्ज करण्यावर भर
 
* गर्भाधान - चांगल्या संततीसाठी प्रार्थना.
 
* पुंसवन - गर्भाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना.
 
* सीमंतोन्नयन - आईचा आनंद आणि आरोग्य जपणे.
 
2. बाल्यावस्थेतील संस्कार
 
बाळाच्या ओळखीची आणि सुरक्षिततेची पायाभरणी
 
* जातकर्म - जन्मावेळी प्रार्थना.
 
* नामकरण - नाव देऊन ओळख निर्माण.
 
* निष्क्रमण - बाहेरच्या जगाशी पहिला संपर्क.
 
* कर्णवेध, अन्नप्राशन, चूडाकर्म - आरोग्य आणि वाढ.
 
* अब्दपूर्ती - पहिला वाढदिवस.
 
3. शिक्षणाशी संबंधित संस्कार
 
बुद्धी, शिस्त आणि जबाबदारी यांचा विकास
 
* विद्यारंभ - शिक्षणाची सुरुवात.
 
* उपनयन - शिस्तबद्ध जीवनाची दीक्षा.
 
* समावर्तन - शिक्षण पूर्ण करून समाजात प्रवेश.
 
4. विवाह आणि नंतरचे संस्कार
 
* गृहस्थाश्रमाची सुरुवात - कुटुंब आणि समाजाची जबाबदारी स्वीकारणे
 
* विवाह
 
* पंचमहायज्ञ - सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, कौटुंबिक जबाबदर्‍या पार पाडणे
 
5. वृद्धापकाळातील संस्कार
 
* विनावेतन, मानद म्हणून सामाजिक जबाबदारी स्वीकारणे.
 
* एकसष्ठी, पंच्याहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन -वयाचे मोठे टप्पे पार केल्याचा उत्सव.
 
* वानप्रस्थ आश्रम प्रवेश-निवृत्ती.
 
6. अंत्येष्टी
 
जीवनाचा सन्मानपूर्वक समारोप आणि परंपरेचा पुढचा प्रवाह.
 
हे सर्व संस्कार केवळ व्यक्ती नाही तर एक संस्कृती घडवतात.
 
शाश्वत विकास म्हणजे काय?
 
शाश्वत विकासाची आजची व्याख्या सांगते - जो विकास आजच्या गरजा पूर्ण करताना पुढच्या पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता कमी करत नाही (Brundtland, 1987). म्हणजेच असा विकास, जो टिकाऊ आहे, जो सर्वांना सामावून घेतो आणि दीर्घकालीन असतो.
 
शाश्वत विकासाचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. हे एकमेकांवर अवलंबून असून सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत.
 
1. आर्थिक शाश्वतता - संसाधनांचा योग्य वापर करून रोजगार आणि समृद्धी निर्माण करणे; कर्जबाजारीपणा, असमानता किंवा अचानक वाढ-घट टाळणे.
 
2. सामाजिक शाश्वतता - समता, न्याय आणि सुसंवाद यांना प्रोत्साहन देणे; कुटुंब, समाज, संस्था, आरोग्य, शिक्षण आणि सन्मान यांना बळकटी देणे.
 
3. पर्यावरणीय शाश्वतता - नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि पृथ्वीचे प्रदूषण व र्‍हास टाळणे.
 
खरा शाश्वत विकास तेव्हाच साध्य होतो, जेव्हा हे तिन्ही आधारस्तंभ एकत्र काम करतात-आर्थिक प्रगती होते, पण समाजात तणाव निर्माण होत नाही आणि पर्यावरणाचे नुकसान होत नाही.
 
मात्र, जागतिक पातळीवर अनेकदा आर्थिक आणि पर्यावरणीय बाबींवर जास्त भर दिला जातो, आणि सामाजिक क्षेत्रातील संस्कृतीचा पाया दुर्लक्षित राहतो. त्यामुळेच संस्कारांसारख्या, काळाच्या कसोटीवर उतरलेल्या चौकटींची गरज अधोरेखित होते.
संस्कार प्रणाली कशी कार्य करते?
 
पाश्चिमात्य विकासपद्धतींमध्ये ॠऊझ किंवा साक्षरता यांसारख्या मोजता येणार्‍या गोष्टींवर भर दिला जातो. त्याच्या तुलनेत संस्कार व्यवस्था अंतःकरण शुद्धीला प्राधान्य देते. हार्वर्डमधील दीर्घकालीन संशोधन दाखवते की, लहानपणीची भावनिक सुरक्षितता आणि कुटुंबातील प्रेमळ वातावरण हे आयुष्यभराच्या आनंदासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. हेच तत्त्व संस्कारांमध्ये अंतर्भूत आहे.
 
1. बालकाचा शाश्वत विकास
 
(अ) जन्मापूर्वीच सुरू होणारी सर्वांगीण घडण
 
संस्कार जन्माआधीच सुरू होतात. जीवन आणि शिक्षणाची सुरुवात गर्भातच होते, ही गोष्ट आज आधुनिक विज्ञानानेही मान्य केली आहे. ’गर्भाधान’, ’सीमंतोन्नयन’ आदि गर्भपूर्व संस्कार आई आणि बाळाच्या शारीरिक आरोग्याबरोबरच भावनिक सुरक्षितता आणि जागरूक पालकत्वावर भर देतात.
 
(आ) भावनिक सुरक्षितता आणि आत्मविश्वास
 
बाल्यावस्थेतील संस्कार-जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, कर्णवेध, अन्नप्राशन, चूडाकर्म, वाढदिवस हे बाळाला कुटुंबाच्या केंद्रस्थानी ठेवतात. या विधींमुळे मुलाला वारंवार आपण महत्त्वाचे आहोत, आपल्यावर कुटुंबाचे प्रेम आहे ही भावना अधोरेखित होते. त्यामुळे आत्मविश्वास आणि आपलेपणाची जाणीव वाढते.
 
(इ) टप्प्याटप्प्याने जबाबदारीची जाणीव
 
संस्कार जीवनातील बदल स्पष्टपणे दाखवतात-विद्यारंभ, उपनयन आणि समावर्तन हे त्याचे उदाहरण आहे. प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन मिळते. त्यामुळे मुलाला पुढच्या जबाबदार्‍यांसाठी तयार होणे सोपे जाते.
 
(ई) कौशल्य आणि चारित्र्यनिर्मिती
 
आजच्या शिक्षण पद्धतीचा भर कौशल्य विकासावर असतो; पण संस्कार चारित्र्य घडवतात. इंद्रिय संयम, भावनांचा समतोल, शारीरिक क्षमता आणि नैतिक स्पष्टता देतात.
 
2. समाजाचा शाश्वत विकास
 
(अ) कुटुंब संस्थेला बळकटी
 
विवाह संस्कार ब्रह्मचारी/ब्रह्मचारिणी यांना गृहस्थ/गृहिणी करतो. यानंतर ते आपल्या मुलांच्या संस्कारांची आणि पंचमहायज्ञांची जबाबदारी स्वीकारतात.
 
* ऋषिऋण - शिकणे आणि शिकवणे.
* देवऋण - देवपूजा आणि निसर्गाची काळजी घेणे.
* पितृऋण - आई-वडील आणि संततीची जबाबदारी घेणे.
* मनुष्यऋण - गरजूंची मदत करणे.
* भूतऋण- प्राणीमात्रांची काळजी घेणे.
 
ही प्रक्रिया केवळ व्यक्तिपुरती मर्यादित नसून कुटुंब, आजी-आजोबा, नातेवाईक आणि समाज यांना एकत्र बांधते. त्यामुळे दोन पिढ्यांमधील बंध मजबूत होतात. सशक्त कुटुंबांमुळे समाजातील विघटन कमी होते, आणि वृद्धांचे एकाकीपणही कमी दिसून येते. कुटुंबाचे समाजाशी बंध जोडतात. अशा प्रकारे विवाह संस्कार समाजाचा मजबूत पाया तयार करतो.
 
(आ) नियंत्रणाऐवजी संस्कृतीतून मूल्यसंस्कार
 
संस्कारांमधून मूल्ये रुजवली जातात. ते श्रेयस (दीर्घकालीन कल्याण) आणि प्रेयस (क्षणिक सुख) यातील फरक समजावतात, जीवनाविषयी आदर आणि शिस्त शिकवतात. अशा प्रकारे समाज स्वतःच संतुलित राहतो, आणि त्याला बाह्य नियंत्रणाची गरज कमी भासते. असा समाज बदलांना आणि संकटांना अधिक समर्थपणे सामोरा जातो.
 
(इ) संतुलित समाज आणि नैतिक नागरिक
 
संस्कार अहंकार, लोभ यांसारख्या दोषांवर मुळातून काम करतात. पंचमहायज्ञांच्या माध्यमातून सहवेदना, सेवा आणि जबाबदारी यांची जाणीव निर्माण होते. यामुळे गुन्हेगारी कमी होते आणि समाजात परस्पर सहकार्य वाढते. अशा नागरिकांमध्ये वैयक्तिक हक्क आणि सामूहिक हित यांचा समतोल साधण्याची क्षमता असते-जी सुसंवादी समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे.
 
3. राष्ट्राचा शाश्वत विकास
 
(अ) संस्कृती हा राष्ट्राचा पाया
 
संस्कारांमधूनच संस्कृती निर्माण होते, आणि त्यावर राष्ट्र उभे राहते. केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नसते; संस्कृतीचा आधार नसल्यास कोणतीही व्यवस्था टिकू शकत नाही. भारताने हजारो वर्षे आपली ओळख टिकवली, त्यामागे संस्कारांचीच शक्ती आहे.
(आ) अंतःशक्ती आणि नैतिक धैर्य असलेले नागरिक
 
राष्ट्रांचा र्‍हास हा साधनांच्या अभावामुळे नव्हे, तर नैतिक अधःपतनामुळे होतो. संस्कार धैर्य देतात, समत्वाची भावना जागृत करतात आणि मृत्यूची भीती दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे संकटातही न ढळणारे नागरिक घडतात.
 
(इ) तात्कालिक फायद्यांऐवजी दीर्घकालीन दृष्टी
 
संस्कार फक्त नफा किंवा तात्पुरता लाभ यावर भर देत नाहीत. ते जबाबदार नेतृत्व, संसाधनांचा योग्य वापर आणि दीर्घकालीन विचार शिकवतात. ही दृष्टी आजच्या जागतिक उद्दिष्टांशीही सुसंगत आहे.
 
निष्कर्ष
संस्कार एक प्रकारचे सांस्कृतिक तंत्रज्ञान (Civilizational Technology) आहे जे हजारो वर्षांच्या अनुभवातून निर्माण झाले आहे. संस्कार व्यक्तीचे आरोग्य, गुण, कौशल्ये आणि वर्तन विकसित करतात, तसेच सामूहिक जीवनाला दिशा देतात.
हे संस्कार मानवी जीवनाची टप्प्याटप्प्याने घडण करतात. बाल्यावस्थेपासून ते तारुण्य आणि प्रौढ अवस्थेपासून आणि वृद्धत्त्वापर्यंत प्रत्येक टप्प्यावर योग्य जबाबदारी, नैतिक शिक्षण आणि मानसिक तयारी घडवली जाते. अशा सामायिक चौकटीत युवक घडले तर समाज संतुलित राहतो आणि जबाबदार नागरिक तयार होतात.
 
समाजाच्या स्तरावरही संस्कार अनेक पद्धतींनी शाश्वततेला पोषक ठरतात. उदा. अन्नदानासारखी परंपरा परस्पर सहाय्य करते, विविध धार्मिक यात्रांमुळे आर्थिक व्यवहारांना चालना मिळते, तर सामूहिक समारंभांमुळे परस्परावलंबन आणि बांधिलकी वाढते. या सगळ्यांमुळे आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक ऐक्य निर्माण होते.
 
आजच्या काळात संस्कारांचे पुनर्जागरण म्हणजे केवळ परंपरेचे जतन नव्हे; तर ते सशक्त कुटुंब, सुसंवादी समाज आणि स्वतःला सतत नव्याने घडवू शकणारे राष्ट्रनिर्माण करण्यासाठी केलेली एक दूरदृष्टीची गुंतवणूक आहे.
 
(लेखमाला समाप्त)

दीपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

9822455650

 deepali.patwadkar@gmail.com