शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर संघघोषाचा ‘राष्ट्र स्वराधना’ प्रवास!

विवेक मराठी    10-Jul-2026
Total Views |
 
@ अशोक दवंडे
 9422104735
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रदीर्घ प्रवासात संघाच्या ‘घोष’ (बँड) पथकाचा इतिहास अत्यंत गौरवशाली राहिला आहे. याच वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या ’नागपूर महानगर घोषाच्या प्रवासातील’ एक सुवर्ण क्षण एप्रिल महिन्यात अनुभवायला मिळाला. रेशीमबाग, नागपूर येथील स्मृती भवन परिसरात या ऐतिहासिक हस्तलिखिताचा लोकार्पण सोहळा परमपूजनीय सरसंघचालक माननीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
 rss
 
या मंगलप्रसंगी घोषवादकांनी विविध रचनांचे वादन आणि उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याच्या सुरुवातीलाच हस्तलिखिताच्या शंभर वर्षांचा गौरवशाली आलेख एका देखण्या चित्रफितीच्या माध्यमातून मांडण्यात आला आणि त्यानंतर या हस्तलिखितासंबंधीची थोडक्यात माहिती देण्यात आली. या ऐतिहासिक लिखाणाचा एकूण प्रवास आणि त्यामागील भूमिका समजून घेणे अत्यंत प्रेरणादायी ठरेल.
 
 
2017 साली रायपूरला झालेल्या अखिल भारतीय घोष टोळीच्या बैठकीत ’2025च्या विजयादशमीला संघ स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या वेळपर्यंत घोषाचा इतिहास लिखित स्वरूपात असावा’, असा विषय तत्कालीन अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख सुनील कुलकर्णी यांनी बैठकीत मांडला. त्यावर चर्चा झाल्यावर घोषाचा प्रारंभ नागपूरमधून झाला. त्यामुळे इतिहास लिखाणाची जबाबदारी नागपूर घोषाकडे सोपविली. त्या अनुषंगाने विचारचक्र सुरू झाले. त्याकरिता लागणारे लेखी पुरावे, जुन्या घोष स्वयंसेवकांबरोबर संवाद, त्यांचे अनुभव त्याचप्रमाणे संघ साहित्यात घोषाबद्दल आलेला उल्लेख यापद्धतीने प्रयत्न सुरू झाले. इतिहासाचे लेखन करताना त्याचा कालखंड ठरविणे आवश्यक असते. त्यानुसार खालील कालखंड निश्चित करण्यात आले. 1926 ते 1940, 1949 ते 1952, 1953 ते 1962, 1963 ते 1982 आणि पुढे आजपर्यंतचा कालखंड ठरविण्यात आला.
 
 
कालखंड क्रमांक 1 :- संघटन
 
नागपूर घोषाचा इतिहास लिहिताना इतका मोठा कालखंड कसा लिहावा? असा विचार जेव्हा समोर आला; त्यावेळी परमपूजनीय आद्य सरसंघचालकांच्या कालखंडाचा विचार मनात आला. त्यांनी संघ स्थापनेच्या मागची भूमिका, त्यांची आवश्यकता यासाठी एकच सूत्र दिले ते म्हणजे हिंदूंचे संघटन, मनुष्यनिर्माण व त्याकरिता लागणारी कार्यपद्धती तयार केली. ती म्हणजे संघटित हिंदू शक्ती. या कालखंडात खालील बिंदूंवर लिखाण करण्यात आले.
 
1. संघ कार्याचा शुभारंभ
 
2. स्वर्गीय मार्तंडराव जोग
 
3. शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सव
 
4. परमपूजनीय डॉक्टरांचा घोषाबद्दलचा दृष्टीकोन
 
5. इंग्रजी रचना आणि प्रणाम
 
6. अखिल भारतीय स्तरावर नागपूर घोषाचे योगदान
 
कालखंड क्रमांक 2 :- विस्तार व विकास
 
दुसरा कालखंड म्हणजे परमपूजनीय श्रीगुरुजी यांचा. परमपूजनीय डॉक्टरांनी जे सूत्र दिले, त्याचा संपूर्ण देशात भारतभर भ्रमण करून संघ शाखांच्या माध्यमातून विस्तार केला. या कालखंडात ’पहिली स्वदेशी वेणू’, ’बासरी’, ’वाद्य’, ’वादन’, ’शिक्षणपद्धती’, ’अखिल भारतीय स्तरावर वादन समानता’, ’रचना आणि रचनाकार’, ’गणवेश’ आणि ’शिबिरे’ यांवर लिखाण करण्यात आले.
 

rss 
 
 
कालखंड क्रमांक 3 :- सामाजिक समरसता
 
परमपूजनीय बाळासाहेब देवरस यांनी हिंदूंचे संघटन करीत असताना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचायचे असेल तर समरसता हा विषय संघटनेला जोडून संघाच्या कामाला अधिक मजबूत केले आणि सर्वसमावेशक विस्तार केला. यात विविध धार्मिक सामाजिक उपक्रमातील सहभाग, निधी संकलन, अयोध्या बाबरी मशीद ढाचा पतन, आद्य सरसंघचालक प.पू. डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनावरील चित्रपट, आणीबाणीतील कार्य या मुद्द्यांवर लिखाण केले आहे.
 
कालखंड क्रमांक 4 :- दृढिकरण
 
परमपूजनीय रज्जूभैयांनी त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून या संघटन कार्याला अधिक मजबुती देण्याचा प्रयत्न केला व संघाच्या कार्यविस्ताराचे दृढिकरण केले. यात परमपूजनीय सरसंघचालकांचे मार्गदर्शन, अखिल भारतीय शारीरिक प्रमुखांचे मार्गदर्शन, घोषातून निघालेल्या प्रचारकांसंबंधी आणि ज्येष्ठ संशोधकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन हे विषय घेऊन लिखाण आहे.
 
कालखंड क्रमांक 5:- स्वावलंबन आणि विशेष कार्यक्रम
(घोष दैनंदिनीतील सुवर्ण पान)
 
स्वरसम्मोहिनी, स्वराभिषेक (कन्याकुमारी), नवोन्मेष (समता सम्यक सहभाग), बाल आणि तरुण घोषवादक यांचा कार्यक्रम (चिटणीस पार्क), 300वा हिंदू साम्राज्य दिन, कक्ष प्रबंधन आणि घोष परिवार यावर लिखाण करण्यात आले आहे.
 
वरील कालखंडांनुसार लिखाण करण्याकरता माहिती संकलन, संपादन आणि लिखाण अशा तीन स्तरावर कामाला प्रारंभ झाला. सर्व घोष प्रमुखांची माहिती, हयात असलेल्यांची प्रत्यक्ष मुलाखत, माननीय प्रचारकांची माहिती, तसेच माननीय ज्येष्ठ स्वयंसेवकांची माहिती एकूण 78 ज्येष्ठ स्वयंसेवकांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली. छायाचित्र संकलन करण्याकरता दहा गट आणि दहा गट प्रमुख जोमाने कामाला लागले. प्रत्यक्ष नागपूरच्या अभिलेखागारात जाऊन ग्रंथालयात बसून माहितीचे संकलन केले. संपादनाचे कार्य घोष परिवारातील सदस्य आणि काही प्रमुख कार्यकर्ते यांच्या प्रत्यक्ष बैठकांतून चर्चा करून उपयुक्त माहितीचे संपादन करण्यात आले. डॉक्युमेंटेशन नसल्यामुळे बरीचशी माहिती स्मरणाच्या आधारावर आलेल्या मुलाखतींवरून, ती तपासून मगच स्वीकारली गेली. या सर्व कामाकरता परमपूजनीय सरसंघचालक माननीय मोहनजींचे अमोल मार्गदर्शन मिळाले.
 
 
1928 साली घोषाचे स्वरूप अत्यल्पच होते. फक्त एक पणव आणि एक शंख एवढीच काय ती वाद्य होती. पुढे 1954पर्यंत त्यात काही वाद्यांची भर पडली. शंख, आनक, वंशी. 1954 ते 55च्या काळात ब्रास बँडचा प्रारंभ झाला. ज्याला ’श्रृंग वाद्य’ म्हणतात. प्रारंभी त्यात चार स्वयंसेवकांची असलेली संख्या पुढे मात्र वाढत गेली.
 

rss 
 
हे हस्तलिखित ‘राष्ट्र स्वराधना’ हे घोषाच्या प्रारंभापासूनचा प्रवास आहे. थोडक्यात इतिहास कथन करणारा असा हा प्रवास आहे. अशा प्रकारचा घोषाचा इतिहास पुस्तकरूपाने असावा अशी सात-आठ वर्षांपासून अनेक स्वयंसेवकांची इच्छा होती. परंतु त्याला गती मात्र येत नव्हती. प्रमुख कारण म्हणजे प्रारंभपासून प्रत्यक्ष कृतीलाच अधिक महत्त्व दिले गेले. वृत्तसंकलन, कार्यपद्धतीचे माहिती संकलन, डॉक्युमेंटेशन केले गेले नाही. त्यामुळे हस्तलिखितासाठी माहिती मिळविणे हे फार कठीण काम होते. यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला. त्याच्या प्रत्यक्ष कामाला 2023मध्ये प्रारंभ झाला. त्याकरिता व्यवस्था उभी केली.
 
2026 हे वर्ष संघाचे शतकपूर्तीचे वर्ष आहे. त्यापूर्वीच हे हस्तलिखित व्हावे असा मानस होता. आणि या शतक वर्षात हे हस्तलिखित लिहून तयार झाले. बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी त्याचे लोकार्पण परमपूजनीय सरसंघचालक माननीय मोहनजींच्या हस्ते झाले, ही सर्व स्वयंसेवकांसाठी अभिमानाची बाब आहे. परमपूजनीय सरसंघचालक हे घोषाबरोबर जोडलेले असल्यामुळे आम्हा स्वयंसेवकांना विशेष आस्था वाटते. याकरिता आम्हाला त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले ही आमची जमेची बाजू आहे.
 
सरसंघचालकांचा अभिप्राय
 
वर्तमानकाळाच्या कृतीतून उज्ज्वल भविष्यकाळ घडण्याकरिता भूतकाळाचे स्मरण जागृत ठेवणे आवश्यक आहे. या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर शाखेतील घोष वादकांनी मिळून तयार केलेले नागपुरातील ‘घोष दला’च्या विकासासंबंधीचे हस्तलिखित हा एक औचित्यपूर्ण उपक्रम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा एक भाग म्हणून अभिलेखागाराची सामुग्री या दृष्टीने या हस्तलिखिताचे महत्त्व तर आहेच; परंतु आजच्या वादकांना, किती कष्टातून आजच्या घोष विभागाचे सर्वांना आकर्षून घेणारे रूप उभे राहिले, किती कसोशीने अभ्यास करून प्रत्येक वाद्याच्या वादनाचे प्राविण्य हस्तगत करावे लागते, संघ कार्याविषयी आणि त्यामुळे घोष वादनाविषयी आपुलकीच्या भावनेतून विकासाचा हा क्रम कसा सिद्ध झाला, इत्यादी बोधप्रद आणि स्वयंसेवकांकरिता पथ प्रदर्शक या दृष्टीनेही त्याचे महत्त्व आहे.
 
हे हस्तलिखित तयार करताना काही माहिती ही कागदपत्रांमधून उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे त्या कागदांचा खात्रीलायकपणा हस्तलिखिताला आपोआपच उपलब्ध झालेला आहे; परंतु पुष्कळ बाबतीत स्वयंसेवकांच्या आठवणींवर अवलंबून माहिती मिळवावी लागली आहे, अशी माहिती दोन-तीन ठिकाणांवरून दुजोरा मिळाल्यावरच स्वीकारली गेली असल्यामुळे हस्तलिखितातील माहितीची विश्वसनीयता राखण्यात पुस्तकाला यश मिळाले आहे. परिश्रमपूर्वक तयार केलेले हे रोचक हस्तलिखित स्वयंसेवकांना प्रेरक ठरून घोष विभागासहित संघकार्याच्या सर्व आयामांमध्ये स्वयंसेवकांची कळकळ, सक्रियता व गुणवत्ता वाढविणारे ठरो ही सदिच्छा व शुभकामना.
 
 
हस्तलिखिताबद्दल थोडक्यात आपणापुढे माहिती देण्याचा प्रयत्न केला. अधिक आणि विस्तृत माहिती हस्तलिखितातून मिळेलच.
घोष हस्तलिखिताच्या लोकार्पणाप्रसंगी प्रारंभीच्या काळात वाजविण्यात येणार्‍या इंग्रजी रचनांचे वादन केले. त्यात आनक आणि शंखावर ’निकोलस’, ’स्टडी एप्रिस’, ’फोकलँड’ त्यानंतर तीनही दलांनी भारतीय रागदारीवर आधारित रचनांचे वादन आणि प्रात्यक्षिक सादर केले. शृंगवादकांनी ’जयोस्तुते’, ’गोरखकल्याण’, ’रामरंजनी’, ’धनधान्य पुष्प भरा’, ’देशकार’ त्याचप्रमाणे इतर रचनांचे वादन सादर केले. त्यानंतर परमपूजनीय सरसंघचालकांनी हस्तलिखिताकरिता दिलेल्या अभिप्रायाचे वाचन करण्यात आले.
 
 
अभिप्राय वाचनानंतर पूजनीय सरसंघचालकांच्या हस्ते ‘राष्ट्र स्वराधना’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. वैयक्तिक गीतानंतर परमपूजनीय सरसंघचालकांनी आपल्या उद्बोधनात, ’संघाचे संपूर्ण कार्य हे कुणाच्या कृपेने उभे राहिलेले नाही आणि कुणाच्या अवकृपेने ते कधी थांबलेदेखील नाही. संघकार्य स्वयंसेवकांच्या परिश्रमातून उभे राहिले आहे. संघाला आपले म्हणून राष्ट्राच्या उभारणीत स्वयंसेवकांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली.’ असे सांगितले.
 
 
भाषणादरम्यान पुढे त्यांनी, ’संघाचा शंभर वर्षाचा इतिहास रोमांचकारी आहे. कठीण परिस्थितीत व कोणत्या उद्देशाने हे कार्य करण्यात आले याची ही हस्तलिखित पुस्तिका सतत आठवण करून देत राहील. स्वयंसेवक व्यावसायिक गायक किंवा वादक नसतानाही समोर कोणत्याही प्रकारचा कागद नसताना व दैनंदिन कामे सांभाळत, इतक्या रचना कशा सादर करतात याबद्दल लोकांना आश्चर्य वाटते. संघाचा उद्देश चमत्कार घडवणे नाही. त्या गोष्टी आपोआप घडतात. या रचनेमध्ये माजी स्वयंसेवकांचे सद्गुण प्रतिबिंबित होतात,’ असे सांगितले. या कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका मा. शांताक्का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह प्रचारक प्रमुख सुनील कुलकर्णी, अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख जगदीश प्रसाद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर कुलकर्णी यांनी केले.
 
लेखक नागपूरचे पूर्व विदर्भ प्रांत घोष प्रमुख आहेत.