@ प्रकाश एदलाबादकर
9822222115
सारा महाराष्ट्र ज्याची वाट बघत असतो ती , पावनपर्व आषाढी एकादशी हाकेच्या अंतरावर आली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात वैष्णवांची मांदियाळी एकत्र येईल. कीर्तन भजनाचा कल्लोळ उडेल. संत ज्ञानदेवांची ओवी जशी अनुभवायची असते, संत तुकोबांचे अभंग जसे आचरणात आणायचे असतात, तशीच वारी अनुभवायची असते, आचारांचे अंग व्हावी लागते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत सर्वोच्च स्थानी असलेल्या या पंढरीच्या वारी निमित्ताने एक चिंतन.
ज्येष्ठ महिन्यातील चिपचिपणारे चिडचिडे उन्ह सोसवत नाही. डोळ्यात प्राण आणून सर्व सृष्टी वाट बघते ती पाऊसधारांची. आषाढाचा पहिला दिवस येतो आणि आठवतो सर्वांना महाकवी कालिदासाचा आषाढघन. प्रियतमेच्या नगरीला यक्षाचा संदेश घेऊन जाणारा कुंजररूप आषाढ घन. परंतु मराठी मनाचे डोळे मात्र लागलेले असतात विठूमाउलीच्या पावलांकडे. आषाढी एकादशीची वाट बघत असतात सगळे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून, टाळ दिंड्या घेऊन पंढरीच्या दिशेने निघालेली असंख्य पावले मनात उमटतात. आषाढाचा पाऊस सुरु झालेला असतो. हा पाऊस म्हणजे विठुरायाच्या आठवणींचा पाऊस. त्याच्या मायेची पाखर. आषाढ आला की, लागतात पंढरीच्या वारीचे वेध. त्या सावळ्या रूपाचे दर्शन घ्यायला मन कसे असावून जाते. ही पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने अवघ्या विश्वाला दिलेली समरसतेची अमूल्य देणगी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून पंढरीच्या दिशेने निघालेल्या असंख्य लहान-मोठ्या दिंड्या आता वाटचाल करीत असतील. आपल्या प्रापंचिक आणि लौकिक आयुष्यातील सुखदुःखे घरी ठेवून ग्यानबा -तुकाराम या मंत्रघोषात असंख्य वारकरी चालत असतील, पंढरीची वाट. पांडुरंगाचे दर्शन हा एकच ध्यास मनांत!
म्हणौनि कुळे जाति वर्ण। हे आघवे चि गा अकारण। एथ अर्जुना माझेपण। सार्थक एक॥ या माउलीच्या ओळींचा जिवंत प्रत्यय देणारी ही वारी, एकात्मतेची भावना उरीपोटी बाळगत निघालेली असते. खांद्यावर भागवत धर्माची पताका, गुढी आणि डोईवर तुळशी वृंदावन घेऊन मजल दरमजल करीत चालणार्या वारकर्याच्या मनात एकच अपेक्षा असते...
माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी॥
पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधले॥
जागृती स्वप्न नाठवे। पाहता रूप आनंद आठवे॥
बाप रखुमादेवीवरू सगुण निर्गुण।
रूप विटेवरी दाविली खूण॥
वारकरी संप्रदाय आणि त्याचा भागवतधर्म हे मराठी मातीला लाभलेले अनमोल देणे आहे. चंद्रपूर-गडचिरोलीपासून ते थेट पश्चिमेकडे ठाणे-पालघरपर्यंत आणि धुळे-नंदुरबारपासून दक्षिणेला थेट कोल्हापूर-सोलापूरपर्यंत या विशाल महाराष्ट्राला एकाच धाग्यात बांधून ठेवणारा हा एक भक्तिरसपूर्ण सांस्कृतिक बंध आहे. गेल्या सातशे-आठशे वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. महाराष्ट्रातील कितीतरी राजवटी, सामाजिक आणि सांस्कृतिक चढउतार, अस्मानी-सुलतानी संकटे, यशापयशाचे आणि सुखदुःखाचे अनेक क्षण, जयपराजय, या संप्रदायाने बघितलेले आहेत. या सार्या आवर्तातून हा संप्रदाय अजूनही स्थिरपद आहे, अविचल आहे. शालशिष्ट अशा अतिउच्चशिक्षित समाज घटकांपासून ते अत्यंत निरक्षर समाजाला या पंथाने आपल्या कवेत घेतलेले आहे. प्रपंचाच्या तापाने त्रस्त झालेल्या सर्वच जीवांना शांती प्रदान करणार्या भागवत धर्मानेच खरा एकात्म महाराष्ट्र टिकवून ठेवलेला आहे. आपल्या या पारंपरिक संस्कृतीवर आज चोहोबाजूंनी होणारे हल्ले थोपवून धरण्याचे नव्हे, ते हल्ले परतवून लावण्याचे सामर्थ्य वारकरी संप्रदायातच आजही विद्यमान आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. ‘मराठी भाषा लयाला जाते आहे काय?’ अशा अर्थाचा एक परिसंवाद एका अ. भा. मराठी साहित्य संमेलनात झाला होता. मंडपात उपस्थित असलेला एक वारकरी उभा राहिला आणि उच्चविद्याविभूषित वक्त्यांसमोर आत्मविश्वासाने म्हणाला,“महाराष्ट्रात जोपर्यंत वारकरी पंथ जिवंत आहे तोपर्यंत, मायमराठीच्या केसालाही धक्का लागणार नाही.” एक त्रिकालाबाधित सत्य त्याच्या तोंडून बाहेर पडले होते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने या सर्व एकात्म परंपरेचे दर्शन अख्ख्या जगाला होते. समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या असंख्य भाविकांच्या डोळ्यातील भक्तीचे अश्रू चंद्रभागेच्या पाण्यात मिसळून जातात. विठुरायाच्या भक्तीची आणि दर्शनाची अशी ओढ प्रत्यक्ष अनुभवली पाहिजे. महाराष्ट्राच्या लोकगंगेचे खरेखुरे दर्शन या वारीत होते. अठरापगड जातींना आपल्या पंखाखाली घेणार्या या संप्रदायाला हे व्यापक आणि सर्वस्पर्शी स्वरूप दिले कुणी? असा एक प्रश्न मनात येतो. साहजिकच पहिले नाव डोळ्यासमोर येते ते योगीश्वर ज्ञानदेवांचे. मात्र इतिहास असे सांगतो की, पंढरपूरच्या या वारीची प्रथा माउलींच्या जन्मापूर्वीपासून महाराष्ट्रात होती. परंतु तिला असे व्यापक स्वरूप देण्याचे श्रेय माउलींच्या लोकसंग्रहाला आणि लोकसंवादाला जाते यात संशय नाही. महाराष्ट्राच्या भूमीत एवढ्या खोलवर रुजलेल्या या विचारधारेला माउलींच्या समकालीन आणि नंतर झालेल्या संतमंडळींनी घामाचे, अश्रूंचे व प्रसंगी रक्ताचे सिंचन करून जागृत ठेवले. त्यातूनच विठुरायाच्या भक्तीचा हा विशाल मळा रुजला, फुलला आणि बहरला. महाराष्ट्रातील सामान्य जनतेला ह्या संप्रदायाने जगण्याचे अधिष्ठान दिले. आपल्यातील स्वत्त्वाची जाणीव करून दिली. आपल्याला जगण्याचे भान दिले आणि आत्मसन्मानाची जाणीव दिली. येणार्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्याचे आत्मबल दिले. ‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे’, या संत तुकोबारायांच्या शब्दांमधील भावार्थ आपण समजून घेतला पाहिजे. कठीण वज्राला भेदायचे असेल तर ते एकट्यादुकट्याचे काम नसते. तेथे समान विचारांच्या समूहाची आवश्यकता असते. सामान प्रयत्न हवे असतात. एकाच्या शक्तीपेक्षा समूहाची शक्ती केव्हाही भारी असते.
आपल्या हिंदू धर्मात निरनिराळ्या तत्त्वज्ञानांना जन्म देणार्या आणि परमेश्वराची नानाविध प्रतीके निर्माण करणार्या या विशाल समाजाला एकाच सूत्रात बांधण्याच्या प्रयत्नांना ‘समानी व आकूति : समानः हृदयानि व: किंवा सह नौ भुनक्तु। सहवीर्यं करवावहै। तेजस्वीनावधीतमस्तु। या वचनांनी बळ दिले असेल, परंतु हे शब्द बराच काळ केवळ तात्विक पातळीवर होते. दैनंदिन व्यवहारात त्याचे अनुपालन कितीसे होत होते, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जन्मनिष्ठ जातिव्यवस्थेवर आधारलेली समाजाची उतरंड ही खरी अडचण होती. समाजातील सर्व घटकांना परस्परांपासून विलग करणार्या, दुर्लंघ्य अशा या भिंतींनी विषमता निर्माण केली. तत्कालीन, म्हणजे मध्ययुगीन स्त्रियांचे जीवनही अंधारलेले होते. या सर्व विषमतेतून समाजाला बाहेर काढणे आणि त्याला एका सूत्रात बांधणे हे सोपे काम नव्हते. परंतु प्रत्येक अंधारलेल्या रात्रीनंतर उजाडतेच तसा या प्रयत्नांचा सूत्रपात दहाव्या-अकराव्या शतकात झाला आणि त्याला नंतरच्या काळात गतिमानता आली. याचे कारण म्हणजे समाजातील सत्पुरुष आणि चिंतकांनी भक्तीला दिलेले महत्त्व. त्यावेळी उच्चवर्णीयांपुरताच मर्यादित असलेला धर्म आणि त्यातील बंदिस्त असलेले विचारधन हळूहळू सामान्यांना आपलेसे करू लागला होता. या काळात उदयाला आलेल्या संतमहात्म्यांनी, सामान्य जनतेला अगम्य असलेले भक्तीचे संस्कृतातील तत्त्वज्ञान लोकभाषेत सांगायला सुरुवात केली. या चिंतकांनी लोकभाषेचा घेतलेला आश्रय ही खरे तर त्या काळातील समाजपरिवर्तनाची नांदी होती, एक क्रांती होती, एका नव्या युगाचा उदय होता. या वेळेपासूनच उच्चवर्णीयांच्या बासनात बंदिस्त असलेला धर्म लोकाभिमुख झाला. या दिशेने महाराष्ट्राच्या मातीत जे कार्य घडले त्यात वारकरी संप्रदायाचे अत्यंत मोलाचे आणि व्यापक असे योगदान आहे. त्याचेच प्रतिबिंब म्हणजे प्रतिवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर एकत्र येणारा वैष्णवांचा अमर्याद मेळा. पंढरीची वारी.
वारकरी संप्रदाय हे शब्द उच्चारल्याबरोबर अपरिहार्यपणे सर्वप्रथम आठवण येते ती ज्ञानदेवांची! गीतेमधील तत्त्वज्ञान लोकभाषेत सांगून त्यांनी त्या काळी सामान्य प्रापंचिकाच्या मनाला फार मोठा आधार दिला. त्यांच्या मनातील धर्मश्रद्धेला एक निश्चित आकार दिला. ज्ञानेश्वरीसारखा एक अनुपमेय-अपूर्व ग्रंथ संप्रदायाच्या हाती दिला. ज्ञानदेवांचे मन हे आईचे मन होते. हा योगीश्वर म्हणजे संप्रदायाला आणि एकूणच मानवी जीवनाला एका विशिष्ट उंचीवर नेणारा महापुरुष ठरला. वारकरी संप्रदायाचा कळस म्हणवणारे जगद्गुरू संत तुकोबाराय म्हणजे समाजशील सत्पुरुष. तुकोबारायांच्या अभंगातून त्यांना लागलेली विठ्ठलभेटीची तळमळ जाणवते.
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव। मी भक्त तू देव ऐसे करी॥
दावी मज रूप गोपिकारमणा। ठेवू दे चरणावरी माथा॥
पाहेन श्रीमुख देईन आलिंगन। जीवे लिंबलोण उतरीन॥
पुसता सांगेन हितगुजमात। बैसोनि एकांत सुखगोष्टी॥
तुका म्हणे यासी न लावी उशीर। माझे अभ्यंतर जाणोनिया॥
तुकोबारायांना लागलेली विठ्ठलभेटीची ही तळमळ हळूहळू समाजात झिरपत गेली. ’कानडा वो विठ्ठलु, कर्नाटकू तेणे मज लावियेला वेधू’ अशी अवस्था अख्ख्या महाराष्ट्राची झाली. आणि चंद्रभागेच्या तीरावर भक्तांची मांदियाळी फुलू लागली. सारे आकाश आपल्या प्रकाशाने भारून टाकणारा सूर्य आकाशातून आपल्या मार्गाने जात असतो. धरित्रीवरील जीवनाशी तसा त्याचा प्रत्यक्ष संबंध नसतो. तरीही पृथ्वीतलावरील प्रत्येक वस्तुजाताचे, प्राणिसृष्टीचे, वृक्षवेलींचे जीवन सूर्यामुळेच फुलते-फळते. संतांचेही तसेच असते. त्यांच्या केवळ असण्याने, सान्निध्याने सामान्यांच्या जीवनाला प्रकाशाच्या वाटा दृगोचर होतात. वारकरी संप्रदायातील संत-सत्पुरुषांनी अशा प्रकाशवाटा दाखविल्या.
आम्ही वैकुंठवासी। आलो याचि कारणासी।
बोलले जे ऋषी। साचभावे वर्तवया॥
हे त्यांचे ध्येय होते. हे साधेल, ते केवळ लोकाराधनेतून हे त्यांना ठाऊक होते. बाह्य अवडंबराला विरोध, पाखण्डखण्डन, लोकोद्धाराची तळमळ, लोकभाषेचा आश्रय ही वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्ये ठरली. त्या काळातील समाजव्यवस्था, जातीची उतरंड, विषमता बघता वारकरी संप्रदायाने समाजाच्या परिवर्तनासाठी केलेले प्रयत्न उठून दिसतात. दुभंगलेला-त्रिभंगलेला समाज एकत्र आला, येत राहिला. पंढरीची वारी हे त्याचे प्रसादचिन्ह ठरले. येथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्या संपूर्ण तत्त्वज्ञानाला आणि प्रयत्नांना संतांनी भक्तीची जोड दिली. परमेश्वराच्या अनुसंधानाचे अधिष्ठान दिले. विचारातले परिवर्तन आणि त्यायोगे होणारे सामाजिक परिवर्तन हे नेहमी तत्कालीन सामाजिक स्थिती, लोकसमूहांचे आपापसातील संबंध, मानसिकता यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे त्या काळाची आवश्यकताही प्राधान्याने लक्षात घ्यावी लागते. ह्या सर्वांचा विचार करूनच तत्कालीन समाजाच्या मानसिकतेची मशागत करून त्यात भक्तीचे बीज रोवावे लागेल, हे वारकरी पंथातील अध्वर्यू मंडळींनी जाणले होते. समाजाला नुसता कोरडा फुकाचा उपदेश करून भागणार नाही तर, त्याचे प्रत्यक्ष आचरण करावे लागेल हे देखील त्यांना महत्त्वाचे वाटत होते. म्हणूनच जातिवर्ण नष्ट करण्याचा केवळ उपदेश न करता संतांनी तो प्रत्यक्ष आचरणात आणला. त्याची कितीतरी उदाहरणे देता येतील. समाजातील सर्वच घटकांची जवळीक महत्त्वाची म्हणून या वारीचे प्रयोजन !!
आजच्या वारीचे स्वरूप, ज्ञानदेवांच्या काळातील वारीसारखे राहिलेले नाही. आणि ते तसे राहणार नव्हतेही! गेल्या आठशे वर्षात महाराष्ट्रातील नद्यांमधून भरपूर पाणी वाहून गेलेले आहे. समाज बदलला. व्यक्तींची मने बदलली, मतेही बदलली.
समाजपरिवर्तनाच्या संकल्पनाही बदलल्या. अत्याधुनिक ज्ञानविज्ञानाने सामाजिक जीवनाचे स्वरूपच बदलले. जगण्याची जुनी मूल्ये मोडीत निघाली, नवी मूल्ये प्रस्थापित झाली. एवढे सगळे होऊनही मानवी जीवनाला सुसंस्कृत आकार देणारी शाश्वत मूल्ये बदलली नाहीत, बदलणार नाहीत. किंबहुना ती बदलू नयेत याचे भान निदान महाराष्ट्राला राखावे लागेल. कारण विठ्ठलभक्ती आणि पंढरीची वारी ही मराठी माणसाच्या जगण्यातील शाश्वत मूल्ये आहेत. या परंपरेचे आपण जिवंत भान ठेवले पाहिजे. भूतकाळातून शिकताना, भविष्याचा वेध घेताना वर्तमानाची प्रखर जाणीव मनात ठेवूनच जगावे लागते. असे काळाचे भान साकल्याने असले, तरच समाजमनाचा कानोसा घेता येतो. समाजमनाचा असा कानोसा घेण्यासाठी द्रष्ट्या संतांनी वारीची योजना हेतुपूर्वक केली असावी. वारी ही सामाजिक चळवळीचे केंद्र ठरली. महाराष्ट्राची आजची अवस्था बघू जाता समाजातील आणि राजकीय क्षेत्रातील नेतृत्वाने, काही कारणाने, दुरावलेली मने सांधण्याचा प्रयत्न वारीच्या निमित्ताने करायला हवा. वारी हे अंतरंगात डोकावण्याचे आणि आत्मशुद्धीचे साधन असते अशी आपली श्रद्धा आहे. जनाबाई म्हणते ...
विवेकाची पेठ। उघडी पंढरीची वाट।
तेथे काही नाही धोका। उठाउठी भेट सखा॥
मारोनिया जावे। शरण विठोबासी व्हावे।
म्हणे नामयाची जनी। देव करा ऐसी ऋणी॥
आज आपला समाज संभ्रमावस्थेत आहे. जगण्या-मरण्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. एका विचित्र कालखंडातून आपण जात आहोत. अशावेळी आधार असतो परस्पर सौहार्दाचा. संतपरंपरेने हेच सौहार्द शिकविले. ’जे जे भेटे भूत। तया मानिजे भगवंत’ ही आपली परंपरा आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्राने स्वीकारलेला संतप्रेरित वारसा आहे. तो एकात्म आणि एकजिनसी आहे. समाजातील भेदाभेद विसरून एकात्म आणि समरस समाजाची निर्मिती हाच वारीचा संदेश आहे. येत्या काळात याच वाटेचे अनुसरण करू या, तरच पंढरीची वारी आणि विठ्ठलाची महापूजा सार्थक ठरेल.