गोव्याचे कृषिदूत

विवेक मराठी    18-Jul-2026   
Total Views |
krushivivek
गोव्यातील तरुणाईसाठी शेतीला नवी ओळख देणारे नाव म्हणजे वरद सामंत.  दाभाळ गावातील या युवा शेतकर्‍याने वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर नोकरीचा मार्ग न स्वीकारता मातीतच भविष्य शोधले. आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण प्रयोग आणि बाजाराभिमुख भाजीपाला शेतीच्या बळावर त्यांनी यशाचे नवे शिखर गाठले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गोवा सरकारने त्यांची राज्याचे ‘कृषी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती केली आहे. विशेषतः ‘स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पनेचे ते युवा प्रेरणास्थान बनून राज्यातील नव्या पिढीला शेतीकडे आत्मविश्वासाने वळण्याची नवी दिशा देत आहेत.
गोवा म्हटले की, डोळ्यांसमोर उभा राहतो तो निळाशार समुद्र, नारळ-सुपारींच्या बागा, काजूची झाडे आणि पारंपरिक कुळागर शेती. पण बदलत्या काळात ही कुळागर संस्कृती आणि शेती हळूहळू मागे पडत चालली आहे. त्यातच गोव्यात शेतीत भविष्य नाही आणि येथील तरुण शेतीकडे वळत नाहीत, हा समजही वर्षानुवर्षे अधिक दृढ होत गेला; मात्र हा समज आपल्या कर्तृत्वाने खोटा ठरवला आहे, कुशावती जिल्ह्यातील दाभाळ गावच्या युवा शेतकरी वरद नागेश सामंत यांनी.
 
 
वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर अनेकांप्रमाणे नोकरीची सुरक्षित वाट न निवडता त्यांनी मातीशी नाते जपण्याचा निर्णय घेतला. आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक दृष्टीकोन, नावीन्यपूर्ण प्रयोग, नियोजनबद्ध शेती आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास यांच्या बळावर त्यांनी भाजीपाला उत्पादनात उल्लेखनीय यश मिळवले. कोबी, गाजर, भेंडी, मिरची, कलिंगड यांसारख्या पिकांचे विक्रमी उत्पादन घेत त्यांनी केवळ स्वतःची आर्थिक प्रगती साधली नाही; तर गोव्यातही आधुनिक, नफ्याची आणि व्यावसायिक शेती यशस्वीपणे करता येते, हे कृतीतून सिद्ध करून दाखवले. त्यांच्या नावीन्यपूर्ण आणि उल्लेखनीय कृषी कार्याची दखल घेत गोवा सरकारने त्यांची ’गोवा कृषी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून निवड केली. त्यांच्या यशस्वी प्रयोगांमुळे आज ते केवळ गोव्यातील नव्हे, तर देशभरातील युवा शेतकर्‍यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
 
 
वडलांची प्रेरणा, मुलाची कर्तृत्वगाथा
 
“माझ्या शेतीच्या प्रवासामागे सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे माझे बाबा नागेश सामंत.“, असे वरद सामंत अभिमानाने सांगतात. “गोवा सरकारच्या प्रतिष्ठेच्या ’कृषिभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या माझ्या बाबांनी आयुष्यभर दहा एकर शेतीत नवनवे प्रयोग करत आधुनिक शेतीचा आदर्श उभा केला. नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची वृत्ती, अडचणींमध्येही संधी शोधण्याचा आत्मविश्वास आणि शेतीकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहण्याची दृष्टी मला त्यांच्याकडूनच मिळाली.“ असे वरद सांगतात.
 
“गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी राज्यातील पहिला साखर कारखाना सुरू केल्यानंतर बाबांनी ऊस शेतीत पाऊल ठेवले. त्या काळात त्यांनी ’को-265’ जातीच्या उसाची जोडओळ पद्धतीने ठिबक सिंचनावर लागवड करून परिसरात आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली. ठिबक सिंचनासह ’उसाच्या पाचटाचे आच्छादन’ या तंत्राचा प्रभावी वापर करत त्यांनी सलग दहा वर्षे एकाच क्षेत्रात शाश्वत ऊस उत्पादन घेतले. त्यांच्या प्रयोगशीलतेमुळे एकरी सुमारे 50 टनांपर्यंत उत्पादन मिळाले, हे त्या काळात उल्लेखनीय यश मानले जात होते,“ वरद वडलांच्या ऊस शेतीच्या प्रयोगाविषयी माहिती देत होते.
 
krushivivek 
 
“मात्र, काळाच्या ओघात साखर कारखाना बंद झाल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. पण बाबांनी संकटासमोर कधीही शरणागती पत्करली नाही. परिस्थिती बदलली, तर शेतीही बदलली पाहिजे, या विश्वासाने त्यांनी ऊसाऐवजी ’भाजीपाला’ आणि ’बहुपीक शेती’चा मार्ग स्वीकारला. बदल स्वीकारण्याची त्यांची तयारी आणि सातत्याने प्रयोग करण्याची वृत्तीच त्यांच्या यशाचा पाया ठरली,“ ’भाजीपाला’ आणि ’बहुपीक शेती’च्या सुरुवातीविषयी वरद सांगत होते.
 
 
शेतीसोबत पूरक उद्योगाची जोड देण्याचा दूरदृष्टीचा नागेश सामंत यांचा विचारही कसा महत्त्वाचा होता त्याविषयी वरद सांगतात, “सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दाभाळ येथील बागायतीसह इतर दोन ठिकाणची वडलोपार्जित जमीन बाबांनी जपली, विकसित केली आणि अधिक समृद्ध केली. दाभाळ-थातोडी परिसरातील सुपीक जमीन विकत घेण्यासाठी खाण कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांच्या ऑफर दिल्या; मात्र बाबांसाठी मातीचे मोल पैशांपेक्षा कितीतरी मोठे होते. त्यांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता जमीन जपली. आज त्याच भूमीत भात, गाजर, भेंडी, मिरची, झेंडू, कलिंगडची समृद्ध शेती डोलताना दिसते. त्यांनी सुपारी सोलण्याचे आधुनिक यंत्र सुरू करून परिसरातील बागायतदारांसाठी आवश्यक सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे स्वतःच्या शेती व्यवसायाला आर्थिक बळ मिळालेच, शिवाय अनेक शेतकर्‍यांचा वेळ, श्रम आणि खर्चही वाचला.“
 
 
krushivivek
 
“याच संस्कारांच्या आणि प्रेरणेच्या भक्कम पायावर मी वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी शेतीत उतरायचा निर्णय घेतला,“ असे वरद अभिमानाने सांगतात. “सुरुवातीला केवळ 2,000 चौरस मीटर क्षेत्रावर भेंडीची लागवड केली. पहिल्याच प्रयत्नात भेंडीच्या पिकाने चांगले यश दिले आणि माझा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर मिरची, कलिंगड, कोबी, आलसांदे यांसह विविध भाजीपाला पिकांमध्ये प्रयोग सुरू केले. प्रत्येक हंगामाने नवे अनुभव दिले, प्रत्येक प्रयोगाने नवे धडे शिकवले.“
 
 
’शेतीतील नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम’ हेच वरद सामंत यांच्या यशाचे खरे गमक आहे. दहा एकर क्षेत्रातील प्रत्येक तुकड्याचे त्यांनी पीकनिहाय नियोजन केले असून प्रत्येक प्लॉटसाठी स्वतंत्र व्यवस्थापन पद्धती विकसित केली आहे. संपूर्ण क्षेत्रात ठिबक सिंचनाची अत्याधुनिक यंत्रणा उभारून पाण्याचा काटेकोर आणि कार्यक्षम वापर केला जातो. पीक उत्पादकता वाढविणे, तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे आणि पाण्याचे बाष्पीभवन रोखणे यासाठी ते प्लास्टिक मल्चींग पेपरचा प्रभावी वापर करतात. त्यामुळे पाण्याची बचत होत असून पिकांची वाढही अधिक जोमदार होते. पीक पद्धतीतही त्यांनी संतुलित नियोजन स्वीकारले आहे. खरीप हंगामात भाताची लागवड केली जाते, तर उन्हाळी हंगामात विविध भाजीपाला आणि फळपिकांची लागवड करून वर्षभर शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे. शेतीचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, पिकांचे नुकसान टळावे आणि उत्पादन सुरक्षित राहावे, यासाठी संपूर्ण शेताभोवती आधुनिक पॉवर फेन्सिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
गोव्यात गाजर अशक्य?
वरद यांनी मोडला समज
 
गोव्यात गाजराचे उत्पादन होऊ शकत नाही, असा अनेकांचा समज होता. वरद यांनी हा समज आव्हान म्हणून स्वीकारला. अभ्यास, नियोजन आणि प्रत्यक्ष प्रयोग यांच्या जोरावर त्यांनी गोव्याच्या मातीत यशस्वी गाजर उत्पादन करून दाखवले. या यशाने त्यांच्या कृषी प्रवासाला नवी दिशा मिळाली.
 
या यशामागील रहस्य उलगडताना वरद सामंत म्हणतात, “गोव्यात गाजराचे पीक घेणे अवघड मानले जाते. येथील उष्ण व दमट हवामान आणि जमिनीचा प्रकार गाजरासाठी फारसा अनुकूल नाही. गाजराच्या चांगल्या वाढीसाठी थंड हवामान, भुसभुशीत व सुपीक गाळाची जमीन आवश्यक असते. मात्र माझी शेती सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांनी वेढलेल्या धारबांदोडा तालुक्यात असून येथील सुपीक माती हेच माझे सर्वात मोठे बलस्थान ठरले.“
 
krushivivek 
 
ते पुढे सांगतात, “2018च्या डिसेंबरमध्ये मी प्रथमच गाजराची लागवड केली. पहिल्याच वर्षी सुमारे एक टन उत्पादन मिळाले. 2019मध्ये उत्पादन दीड टनांपर्यंत वाढले. या यशामुळे आत्मविश्वास वाढला आणि दरवर्षी उत्पादन वाढविण्याचे ध्येय ठेवून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू ठेवले. त्याचेच फलित म्हणून 2020मध्ये सहा टन, तर 2022मध्ये तब्बल दहा टनांचे विक्रमी उत्पादन घेण्यात यश आले. त्यानंतर 2024मध्ये सात टन आणि 2026च्या हंगामात आतापर्यंत चार टन उत्पादन मिळाले आहे.“
वरद यांच्या मते, ‘उत्पादन घेणे जितके महत्त्वाचे, तितकीच बाजारपेठही महत्त्वाची‘ असते. गोवा बागायतदार संघ आणि गोवा फलोत्पादन महामंडळ यांच्या माध्यमातून गाजराची विक्री केल्यामुळे योग्य दर मिळाला आणि समाधानकारक उत्पन्नही मिळवता आले. त्यामुळे गाजरासारखे आव्हानात्मक पीकही गोव्यात यशस्वीपणे घेता येते, हा आत्मविश्वास अधिक दृढ झाला.
 
 
कलिंगडापासून कोबीपर्यंत विक्रमांची मालिका
 
वरद सामंत यांचा शेतीतील खरा भर उन्हाळी भाजीपाला पिकांवर आहे. नियोजनबद्ध शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास यांच्या बळावर त्यांनी अनेक पिकांमध्ये विक्रमी उत्पादनाची नोंद केली आहे. हमखास बाजारभाव मिळवून देणारे कलिंगड हे त्यांचे महत्त्वाचे नगदी पीक आहे. 2019पासून त्यांनी कलिंगडाची व्यावसायिक लागवड सुरू केली. पहिल्याच काही वर्षांत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवत 2019 आणि 2020 या सलग दोन हंगामांत प्रत्येकी 60 टनांचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यानंतर 2024 व 2025मध्ये प्रत्येकी 30 टन, तर 2026च्या हंगामात 25 टन उत्पादन घेतले.
 
 
’उन्हाळी काकडी’ हे आणखी एक महत्त्वाचे पीक आहे. 2015मध्ये अवघ्या 500 किलो उत्पादनापासून सुरुवात झालेला हा प्रवास सातत्याने वाढत गेला. पुढील काही वर्षांत उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. 2022 आणि 2023मध्ये प्रत्येकी 10 टन, तर 2024 आणि 2025मध्ये प्रत्येकी 20 टनांचे विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले. 2026मध्ये 10 टन काकडीचे उत्पादन मिळाले.
 
 
याशिवाय वरद सामंत कोबी, भेंडी, मिरची, आलसांदे (चवळी), गाजर आणि झेंडू या पिकांचीही यशस्वी लागवड करतात. 2019मध्ये मिरचीचे तब्बल 101 टन उत्पादन घेत त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर 2026मध्ये कोबीचे 75 टन आणि भेंडीचे 50 टन उत्पादन घेत त्यांनी उत्पादनक्षमतेचा नवा उच्चांक गाठला. 2020मध्ये झेंडूचे तीन टन उत्पादन घेऊन त्यांनी फुलशेतीतही यश मिळविले. तसेच स्थानिक जातीच्या आलसांदे (चवळी) या कडधान्याचीही ते नियमित लागवड करून पीकपद्धतीत वैविध्य जपतात.
 
प्रयोगशील शेतीला मुख्यमंत्र्यांची दाद
 
वरद सामंत यांच्या आधुनिक, नियोजनबद्ध आणि विक्रमी भाजीपाला शेतीची चर्चा 2020मध्ये संपूर्ण गोव्यात रंगू लागली होती. या यशोगाथेची दखल घेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एके दिवशी अचानक दाभाळ येथील त्यांच्या शेताला भेट दिली. शेतातील विविध पिकांची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी वरद यांच्याशी सविस्तर संवाद साधला. ठिबक सिंचन, प्लास्टिक मल्चींग, पीकनियोजन, उत्पादनवाढ आणि बाजारपेठेचे व्यवस्थापन याविषयी त्यांनी आस्थेने माहिती जाणून घेतली. ’गोव्यात भाजीपाला शेतीला अधिक चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीचा स्वीकार करण्यासाठी अशा प्रयोगशील शेतकर्‍यांची गरज असल्याचे,’ त्यांनी यावेळी नमूद केले.
 
 
या भेटीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वरद यांच्यातील संवाद व सहकार्य अधिक दृढ होत गेले. अखेर 2025मध्ये गोवा शासनाने वरद सामंत यांची गोव्याचे कृषी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (कृषिदूत) म्हणून नियुक्ती केली. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर हा सन्मान मिळविणारे ते गोव्यातील मोजक्या तरुण शेतकर्‍यांपैकी एक ठरले.
 
कृषिदूत म्हणून परिवर्तनाची नवी चळवळ
 
“गोव्याचे कृषी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (कृषिदूत) म्हणून काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे,“ असे वरद सामंत सांगतात.
 
 
“माझे ध्येय केवळ स्वतःच्या शेतात विक्रमी उत्पादन घेणे नाही, तर गोव्यातील अधिकाधिक युवकांनी शेतीकडे आधुनिक, फायदेशीर आणि शाश्वत व्यवसाय म्हणून पाहावे, हे आहे. गोव्याला भाजीपाल्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्याच्या उद्देशाने मी सातत्याने काम करत आहे. ’स्वयंपूर्ण गोवा’ अभियानाचा भाग म्हणून शेतकर्‍यांना मार्गदर्शन, प्रात्यक्षिके आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत आहे,“ वरद सांगत होते.
 
 
’‘कृषी व फलोत्पादन विभागा’च्या सहकार्याने अवघ्या तीन महिन्यांत गोव्यातील सर्व तालुक्यांमध्ये सुमारे 12 मार्गदर्शन बैठका आयोजित करण्यात आल्या. या बैठकींमध्ये आधुनिक भाजीपाला शेती, पीकनियोजन, ठिबक सिंचन, मल्चींग, बाजारपेठेचे नियोजन आणि शाश्वत शेतीविषयी माहिती दिली,‘’ वरद यांच्या या उपक्रमाला शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
 
 
“आजपर्यंत माझ्या दाभाळ येथील शेताला सुमारे एक हजार शेतकरी आणि विविध क्षेत्रांतील अभ्यागतांनी भेट दिली आहे. त्यांनी शेतीतील प्रयोग, उत्पादन पद्धती आणि व्यवस्थापन प्रत्यक्ष पाहिले. अनेकांनी ही तंत्रे आपल्या शेतातही अवलंबली आहेत. त्याचा परिणाम म्हणून 2023पासून गोव्यात सुमारे 300 नव्या शेतकर्‍यांनी ’व्यावसायिक भाजीपाला शेती’ सुरू केली, याचा मला विशेष आनंद आहे. मी स्वतःही सतत शिकत राहण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रगत शेतीचा नियमित अभ्यास करतो. तेथील नवीन तंत्रज्ञान आणि यशस्वी प्रयोग आपल्या शेतात राबवून त्याचे अनुभव इतर शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. या संपूर्ण प्रवासात गोवा शासनाचा कृषी विभाग, फलोत्पादन विभाग आणि विशेषतः गोव्याचे मुख्यमंत्री यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ’कृषी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ ही संकल्पना राबवून त्यांनी तरुण शेतकर्‍यांवर विश्वास दाखविला.त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामुळे गोव्यातील शेतीला नवी दिशा मिळाली असून अनेक युवक आज शेतीकडे नव्या आशेने आणि आत्मविश्वासाने वळत आहेत. यासाठी मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा शासनाचा मनापासून ऋणी आहे,“ वरद कृतज्ञतापूर्वक बोलत होते.
 
संपर्क
वरद नागेश सामंत (कृषिदूत)
दाभाळ, ता. धारबांदोडा, जि. कुशावती
भ्रमणध्वनी : 8275647891
 
वरद सामंत यांची कहाणी ही केवळ एका यशस्वी शेतकर्‍याची नव्हे, तर गोव्यातील नव्या कृषी परिवर्तनाची प्रेरणादायी गाथा आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अथक परिश्रम, सातत्याने शिकण्याची वृत्ती आणि मातीशी असलेली निष्ठा यांच्या बळावर त्यांनी शेतीला नवी प्रतिष्ठा मिळवून दिली. स्वतःचे यश इतर शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याची त्यांची तळमळच त्यांना वेगळे ठरवते. आज ते गोव्यातील तरुणांसाठी आशेचा किरण, शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक आणि राज्याच्या कृषी विकासाचे सक्षम दूत बनले आहेत. शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून, नवकल्पना, समृद्धी आणि आत्मनिर्भरतेचा राजमार्ग आहे, हे वरद सामंत यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

विकास पांढरे

सध्या 'कृषी विवेक' (विवेक समूह) चे कार्यकारी संपादक. एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारी याठिकाणी वार्ताहर व उपसंपादक म्हणून अनुभव. कृषी, समाज, साहित्य व वंचित समाजाविषयी लिखाण.