समरसतेचे कैवारी - संत रोहिदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विवेक मराठी    18-Jul-2026
Total Views |
@डॉ. सुनिल दादोजी भंडगे
9960500827
संत रोहिदास हे सामाजिक समरसतेच्या शिल्पकारांपैकी एक महान संत. त्यांना महाराष्ट्रात संत रोहिदास तर उत्तरेकडे त्यांना संत ’रविदास’, ’रैदास’ किंवा ’संत रायदास’ असेही म्हटले जाते. ’रविदास’ किंवा ’रैदासाला’ महाराष्ट्राने खास मराठी वळणाचे ’रोहिदास चांभार’ असे नाव देऊन टाकले आहे आणि हे इतक्या सहजतेने घडले आहे की, ’रविदास’ किंवा ’रोहिदास’ दोन नव्हेतच.
 
Saint Rohidas and Dr. Babasaheb Ambedkar
 
रोहिदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या गोवर्धनपूर नावाच्या तीर्थक्षेत्री झाला. त्यांना एकूण 121 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या जन्मगावी-गोवर्धनपूर येथे आता ’श्री गुरू रविदास जन्मस्थान मंदिर’ उभारण्यात आले आहे. ते खर्‍या अर्थाने दलित ऐक्याचे, दलित जागृतीचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. संत रोहिदास आताच्या परिभाषेत अनुसूचित जातींमधील चांभार किंवा चर्मकार समाजात जन्मले. खरे तर कोणत्याही संत वा महापुरुषांना जातीचे लेबल लावणे सर्वथा चूकच आहे. म्हणूनच रोहिदासांचे गुरूबंधू संत कबीर म्हणतात,
 
”जाति न पूछो साधुकी, पूछो लीजीये ज्ञान,
 
मोल करो तलवार का, पडा रहन म्यान!”
 
संत-महापुरुषांचे थोर व्यक्तिमत्त्व कोणत्याही बंधनाच्या पलीकडचे असते. त्यांना प्रदेश, भाषा आणि जात यांची कृत्रिम बंधने बांधून ठेवू शकत नाहीत. आपल्या उच्च विचारसरणीने आणि आपल्या विपुल अशा कर्तृत्वशक्तीने समाजाने ठरवलेल्या उच्चनीचतेवर मात करणारे संत रोहिदास सदैव आदरणीय आहेत; तसेच जन्माने महार असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरही जात्याच हुशार, मूलतः विचारवंत, न्यायी, कायदाप्रेमी, अर्थतज्ज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरही प्रात:स्मरणीय आहेत. त्यांनी आपले ढहश णर्पीेींलहरलश्रश हे पुस्तक संत रोहिदासांना अर्पित केले होते.
 
 
आपल्या संतांनी तळागाळातल्या माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडली. माणूस म्हणून जगताना जात, पात, पंथ, धर्म आदी भेदांपेक्षा मानवतेचा विचार महत्त्वाचा मानला. समानता-समरसता-मानवता आणि सर्व प्रकारच्या जातीय, वर्गीय आणि आर्थिक बंधनांपासून मुक्त अशा समाजाची संकल्पना संत रोहिदासांनी मांडली. त्यांच्या कार्याचे महत्त्व असे की, तळागाळातल्या समाजाची झालेली उपेक्षा, घरचे अठराविश्व दारिद्य्र या सर्वांवर मात करत ही मंडळी समाजात ताठ मानेने उभी राहिली. वैयक्तिक सुखाची, कुटुंबाची आणि समाजाची प्रगती करत राहिली आणि समाजहिताला बाधा येईल, अशी गोष्ट आपल्या हातून घडणार नाही; किंबहुना आपल्या समाजाचे पर्यायाने देशाचे हितच साधले जाईल, याची काळजी उभे आयुष्य घेत राहिली.
 
 
संत रोहिदासांचे अनेक विचार पुढे भारतीय राज्यघटनेत उमटले. संत रोहिदासांनी ’कर्मयोगाचा’ पुरस्कार केला. प्रत्येक देहधार्‍याने कर्मे केलीच पाहिजेत. त्याने अकर्माचा किंवा दुष्कर्माचा मार्ग न चोखाळता स्वधर्माने सांगितलेली कर्मेच निष्ठेने करावीत. त्यांच्या मते कर्मप्रवृत्ती ही कर्मभक्तीच्या पातळीवर पोचते फळ मिळो वा न मिळो. आपण कर्म करत राहिले पाहिजे असे ते आग्रहाने मांडत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ’शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हाच कर्मसिद्धांत सांगत आरंभलेल्या ’महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह’, नाशिकच्या ’काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह’, पुण्याच्या ’पर्वती मंदिर सत्याग्रह’, ’अंबामाता मंदिर प्रवेश सत्याग्रह’ असे विविध सामाजिक लढे दिले.
 

ravidas 
 
संत रोहिदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समाजाविषयी कमालीची आस्था होती. ’श्रमसाधनेची प्रतिष्ठा’ ही रोहिदासांनी समाजाला दिलेली विशेष देणगी असून श्रमातच ते ईश्वराचे रूप पाहतात. म्हणूनच ते श्रमाला ईश्वरभक्ती मानतात. ’श्रमसाधना’ ही जीवनात सुखशांती मिळवण्याचे सरळ, सोपे आणि अद्वितीय साधन असल्याचे त्यांनी स्वकर्तृत्वाने दाखवून दिले. श्रम करूनच खावे. हातात घेतलेले कर्म सत्यधर्माने पूर्ण केले तरच आपले कर्म व कमाई निष्फळ ठरणार नाही. याचे मूर्तिमंत उदाहरण डॉ. आंबेडकरांनी आपल्या जगण्यातून सिद्ध केले.
 
 
संत रोहिदासांच्या कुटुंबाचा परंपरेने चालत आलेला व्यवसाय कातडे किंवा चामडे कमावण्याचा, त्यापासून पायातील चपला-जोडे किंवा पादत्राणे बनवण्याचा आणि दुरुस्त करण्याचा. ते त्यात इतके समरस झाले की,”जिकडे पहावे तिकडे मला चर्म दिसते आहे. चर्माच्याच मंदिरात जणू प्रभू राम बोलत आहेत. सार्‍या सृष्टीचा पसाराच चर्माचा बनलेला आहे. चर्मच सगळीकडे व्यापून राहिले आहे. चर्माविना देह कुणी बनवला आहे का?” असा प्रश्न ते विचारतात. मेलेल्या जनावरांची कातडी सोलून ती कमावणे हे अस्पृश्य समाजाचे काम मानले जात असे. रोहिदास त्यागी आणि तपस्वी व्यक्तींना पादत्राणे पुरवायचे. ती देण्याच्या निमित्ताने त्यांची सहजपणे त्या मंडळींमध्ये ऊठबस होत असे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे परिवर्तनवादी आणि समन्वयवादी विचार त्यांच्या कानावर नकळतच पडत असत. त्या आध्यात्मिक वातावरणात बराच वेळ ते घालवत असत. ते स्वतःला मुक्त चर्मकार म्हणवून घेत असत. त्यांच्या राहण्यावागण्यातूनही एक प्रकारचे वेगळेपण दिसत असे. ते उच्चवर्णीय ब्राह्मण समाजात नेसली जाणारी वस्त्रे नेसत असत. त्यांच्याप्रमाणेच काही विधीही करत. ते शंख फुंकत, देवळातील घंटा वाजवत आणि कपाळावर टिळा लावत. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना विरोधही होत असे; परंतु जरी कितीही विरोध झाला तरी असे विधी करण्यापासून त्यांना कुणीही रोखू शकत नसे.
 
 
Saint Rohidas and Dr. Babasaheb Ambedkar
 
एकदा एका उच्चवर्णीय पुजार्‍याने त्यांना मंदिरात जाऊन पूजा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी अतिशय प्रेमभावाने त्या पुजार्‍याला समजावले, ”मित्रा, मी कोण आहे किंवा तू कोण आहेस याला काहीच महत्त्व नाही. उच्चवर्णीय आणि नीचवर्णीय हे भेदाभेद तू निर्माण केले आहेस, परमेश्वराला भावते ती भक्ती आणि प्रेम!”
 
 
’धार्मिक उपासना ही केवळ उच्चवर्णीय समाजाची मिरासदारी नाही. तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे,’ असे मानणार्‍या मंडळींनी मागास समाजातील व्यक्तींवर भयंकर अन्याय केले, त्यांना क्रूर वागणूक दिली. त्यामुळे रोहिदास अस्वस्थ होत असत. या अन्यायाविरोधात ते ठामपणे उभे राहिले. त्यामागे त्यांना मानव जातीविषयी अनुकंपा तर होतीच आणि प्रश्नांना भिडणारा त्यांचा नेमका स्वभावही होताच. त्यांनी आपल्या अमोघ वाणीने आध्यात्मिक आणि सामाजिक संदेश देत सामान्य माणसाला जागृत करण्याचे भरपूर प्रयत्न केले. अन्याय करणार्‍यांचे आणि तो सहन करणार्‍यांचे मनःपरिवर्तन घडवून आणत रोहिदासांनी संपूर्ण समाजालाच उन्नत अवस्थेत नेऊन ठेवले.
 
 
डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महनीय पैलू म्हणजे त्यांची विलक्षण ‘अतूट ज्ञाननिष्ठा’. जन्मभर ज्ञानाची उपासना करत राहिलेले ते एक ज्ञानक्षेत्रातील प्रज्ञावंत तपस्वी होते. ज्ञानातूनच आपल्याला अभिप्रेत असलेले सामाजिक आणि वैचारिक परिवर्तन शक्य आहे ते त्यांनी जाणले होते. हिंदू समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडून यावे, अस्पृश्यता समूळ नष्ट व्हावी, जन्मजात जातिभेदावर आधारलेली विषमता, अन्याय आणि दारिद्य्र यांचा निरास व्हावा, नाश व्हावा आणि हा समाज एकजिनसी व्हावा, यासाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत लढले. दलितांच्या सामाजिक हक्कांसाठी त्यांनी न्याय्य संघर्ष केला. अन्याय-अत्याचारांविरोधात दलित समाजात आत्मप्रत्ययाची ऊर्मी निर्माण होण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मभान जागवण्यासाठी त्यांनी अविरत परिश्रम केले. सुमारे सात कोटी लोकांचा हा समाज आपल्या पायातल्या गुलामगिरीच्या बेड्या निमूटपणे वागवत होता. प्रारब्धाला दोष देऊन कित्येक वर्षे असहाय जिणे कंठीत होता.
 
 
रोहिदासांनी ’गुरुमुखी’ ही नवी लिपी तयार केली. 34 अक्षरांची ही लिपी शोधण्यामागचे कारण हे होते की, देवनागरी लिपी मागास समाजाला दुष्प्राप्य होती. तत्कालीन सामाजिक रूढी आणि नियम असे होते की, ’देवनागरी लिपी वापरण्याची परवानगी फक्त उच्चवर्णीयांनाच होती.’ केवढा हा अन्याय? ’गुरुमुखी’ ही साधी, सोपी होती आणि बोली लिपीसारखी होती.
 
 
संत रोहिदासांनी जसे सामान्य माणसाला खडबडून जागे केले त्याप्रमाणेच डॉ. बाबासाहेबांचे महनीय कार्य असे की, या कोट्यवधी जनतेच्या मनात त्यांनी अन्यायाची चीड निर्माण केली. स्वाभिमानाची ठिणगी पेटवली. शतकांचे वैचारिक साखळदंड तोडून टाकले. हे कार्य सहज घडण्यासारखे नव्हते. सर्वच दृष्टींनी नागवला गेलेला दलित समाज त्याच्या स्वतःच्या पायावर उभा करावयाचा असेल तर त्याला आत्मस्थितीचे ज्ञान दिले पाहिजे. आपले जन्मसिद्ध अधिकार कोणते, याची जाणीव त्याच्या चित्तात उत्पन्न केली पाहिजे. आपण व आपल्या भोवतीच्या जगाचे यथार्थ भान आल्याशिवाय गुलामाला आपली गुलामगिरीही कळत नाही. म्हणून डॉ. आंबेडकरांनी आपले कृतिशील विचार वृत्तपत्रांच्या माध्यमातून, भाषणांतून आणि गावोगावी पसरलेल्या अस्पृश्य वस्तीतील दीनदलितांना पोटाशी धरून वर्षानुवर्षे सांगत राहिले. जेव्हा कोणताही नेता जनतेच्या सर्व स्तरात प्रेमाने, आपुलकीने वावरतो आणि सामन्यातील सामान्य होऊन त्यांच्यातील माणूसपणाला आत्मीयतेने उदराशी धरतो, तेव्हा त्या जनसमूहाचे रूपांतर ’एकात्म समाजात’ होते. असा ’एकात्म समाज’ हा समता आणि बंधुतेच्या पायावरच उभा राहील, अशी त्यांची धारणा होती.
भारतीय राज्यघटनेमधील सामाजिक न्याय हा तत्कालीन अस्पृश्यांबरोबर अन्य सर्व शोषित, पीडित आणि दुर्बल घटकांना मूलभूत हक्कांच्या माध्यमातून संवैधानिक हक्क प्रदान करतो. अशा हक्कांमध्ये शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजनैतिक, वैचारिक आणि मानसिक सामर्थ्य निर्माण करून सामाजिक न्याय मिळवता आला, हे आज आपण म्हणू शकतो. आपल्या संविधानातील प्रस्तावनेत सामाजिक न्यायाचे ध्येय गाठण्यासाठी वेगवेगळी प्रावधाने करण्यात आली आहेत. ’कलम 17’ हे अस्पृश्यता निवारणासाठी आहे. भारतीय समाज हा चार वर्ण आणि हजारो जाती-पोटजातींमध्ये विभागला गेला आहे. जातवादी समाजव्यवस्थेला छेद द्यायचा असेल तर जातींचे उच्चाटन करताना मानवी मनांतून जातीय भेद निर्मूलन केले तरच सामाजिक न्याय प्रस्थापित होईल. म्हणूनच संविधानातील ’कलम 17’ नुसार अस्पृश्यता निवारण करता आले आहे. त्यातूनच सामाजिक न्यायाचे रक्षण होईल.
 
 
श्रमाची आणि कर्माची प्रतिष्ठा, सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून कृतिशील समरसतेचा आग्रह करणार्‍या संत रोहिदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समरस, एकात्म आणि समरस समाजनिर्मितीसाठी आपले योगदान दिले. या दोन्ही संत-महापुरुषांनी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करून आपल्या अनुभवाद्वारे समाजहितास प्राधान्य दिले. दूषित समाजजीवनामुळे त्यांचे अंगअंग पोळले होते. त्याचे चटके इतरांना बसू नयेत तर समाज सुबुद्ध व्हावा, चांगल्या-वाईटाचा सारासार विचार करत सामाजिक चेतना वाढीस लागावी, हा त्यांचा मुख्य ध्यास होता. सेवा, सहानुभूती, साहाय्य, परोपकार, भक्ती, सामाजिक सहकार्य आणि सहअस्तित्व या विचारांना दिशा दिली. सामाजिक वातावरण आनंदित राहून समस्त मानवजात सुखी व्हावी, गुण्यागोविंदाने रहावी, म्हणून त्यांनी सदैव समाज जागृती करण्यात धन्यता मानली.
 
 
- लेखक सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख आहेत.