9833573927
मध्ययुगीन काळात परकीय आक्रमणे आणि तीव्र जातिभेद यामुळे हिंदू समाज संकटात होता. अशा काळात संत रोहिदास यांनी ‘माणसाची ओळख जन्मावरून नव्हे, तर त्याच्या कर्मावरून ठरते’ हा मोलाचा विचार दिला. त्यांनी विषमतेविरुद्ध लढा देत, तळागाळातील लोकांना आत्मसन्मान मिळवून दिला आणि धर्मांतर रोखले. कर्म, ज्ञान आणि भक्तीचा समन्वय साधत हिंदू अस्मिता आणि सामाजिक एकता टिकवून ठेवण्यात संत रोहिदासांचे योगदान कसे मोलाचे होते, हे उलगडून दाखवणारा हा लेख.
संत हे कुठल्यातरी संप्रदायाशी निगडित असतात. मात्र त्या सांप्रदायिक चौकटीतून त्यांच्याकडे पाहणे बरोबर नाही. संत हे स्वतः सार्या विश्वाकडे प्रेमाने, बंधुभावाने पाहणारे आणि व्यक्तिगत जीवनात कोणत्याही भौतिक गोष्टीसंबंधी आग्रह नसणारे असतात, त्यांचा आचार शुद्ध आणि सदाचार संपन्न आचरणातून आलेला असतो. त्यांचा विचार आणि त्यामुळे त्यांच्या उच्चाराला मंत्रासारखे सामर्थ्य प्राप्त झालेले असते.
लोकांशी संवाद साधत, धर्म नीतितत्त्वांचा आशय सोप्या लोकभाषेत समजावून सांगणारे, प्रतिकूलतेतही वैयक्तिक आणि सामाजिक सदाचाराचा उद्घोष करणारे, सामाजिक अस्मितेचे भान असणारे त्याप्रमाणे आचरण करणारे, माणसातील देवत्व जागृत करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे हेच संत मानले गेले पाहिजेत. लोकभाषेचा जागर करीत आणि जनमानसातील लोकशक्तीला जागृत करीत, मानवता धर्माचा उद्घोष करणारे, सामान्यांमधील असामान्य म्हणजेच ’संत’ होत. सर्व तर्हेच्या प्रतिकूलतेला शांतपणाने, संयमाने सामोरे जाणारे आणि लोकांना विवेकाचा मार्ग दाखवणारे हे खरे संत होत.
सगळ्याच संतांनी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा विचार केला. जो समर्थांच्या काव्यामध्ये दृश्य स्वरूपात आपल्याला दिसतो तो म्हणजे, खरा सार्वकालिक विचार आहे की,
’मुख्य ते हरिकथा निरुपण। दुसरे ते राजकारण।
तिसरे ते सावधपण। सर्व काहीं॥’ (दासबोध 11.05.04)
ईश्वराचे नामसंकीर्तन आणि त्याच्याशी एकरूप होण्याची उत्कट ओढ. या गोष्टीला संतांनी प्रथम स्थान दिले. त्याबरोबरच राजकारण संतांनी प्रत्यक्षात केले नाही; पण समकालीन राजकारणाचा, समाजकारणाचा विचार करीत त्यावर आपल्या परीने परखड असे भाष्य त्यांनी केलेले आहे. संतांचे हे सावधपण वेगवेगळ्या प्रकारचे आहे. सुसंपन्न स्थितीतील लोकांप्रमाणे परिस्थितीने पिचलेल्या, बावरलेल्या लोकांना भौतिकतेचे आकर्षण असते हे ध्यानात घेऊन त्यांना आत्मिक समाधानाची जाण संतांनी दिली.
संतांनी केलेल्या प्रबोधनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे लोकजीवनाच्या आणि लोकमानसाच्या ज्या मर्यादा किंवा मर्मबिंदू आहेत; त्यांना बाह्यतः धक्का न लावता नैतिकदृष्ट्या त्यांची अंतर्शुद्धी घडवून आणणे हा आहे.
’गृहस्थाश्रम न सांडीता कर्मरेखा न ओलांडीता
निजव्यापारी वर्तता बोधू सर्वथा न मये॥’ (संत एकनाथ - एकनाथी भागवत)
आपली विहित कर्तव्ये करीत हे कार्य साधता येते, हा विश्वास संतांनी प्रापंचिकांना दिला. कर्म, ज्ञान आणि भक्ती यांच्यातील अद्वैत, संतांच्या जीवननिष्ठेमुळे जनतेच्या लक्षात आले.
संत साहित्याचे मुख्य उद्दिष्ट व्यक्तीची व समाजाची आध्यात्मिक उन्नती साधणे आणि त्याबरोबरच सामाजिक व्यवहारामध्ये मानव धर्माचा जागर करणे, मनामनामध्ये सामाजिक एकतेचा भाव जागविणे आणि हिंदू धर्म, इथली संस्कृती, इथल्या श्रद्धा यांवर आघात करणार्या मुस्लीम राजवटीचा, त्यांच्या धर्मदृष्टीचा शांतपणे परंतु ठामपणे प्रतिकार करणे आणि हिंदुत्व भावाचे दृढीकरण करणे हेच होते. अशा या संतपरंपरेमध्ये ’संत रविदास’ उर्फ ’संत रईदास’ यांची ठळकपणे नोंद घ्यावीच लागते.
प्रभावी वाणी, जनसामान्यांबद्दल उत्कट आस्था, ईश्वराप्रती दृढ, एकनिष्ठ भक्ती, समाजाबद्दल करुणा, बंधुभाव आणि सर्व स्तरांमध्ये जातीय व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी अखंड कार्यरत असणारी समन्वयशील वृत्ती यांमुळे संत रविदास नित्य स्मरणीय ठरतात. ते ’संत रोहिदास’, ’रोहितदास’, ’रुईदास’, ’रायादास’, ’रैदास’, ’रेमदास’ इत्यादी 16 नावांनी भारतभर विख्यात असून, भारतभर त्यांचे पुतळे, स्मारके आणि त्यांच्या नावाच्या धर्मशाळा आढळतात.
वाराणसीजवळील सीर गोवर्धनपूर येथील रहिवासी होते. त्यांचा जन्म परंपरेने कुशल चर्मकार असलेल्या कुटुंबात गुरुबिनिया उर्फ ’कळसादेवी’ उर्फ ’करमा’ आणि रोहराम उर्फ ’संतोखदास’ उर्फ ’रघू’ या दांपत्याच्या पोटी झाला. रोहिदासांचा जन्म राजस्थानात, गुजरातेत, पंजाबात, मांडवगड येथे झाला अशी अनेक मते आहेत. जन्म कुठेही झाला असला तरी त्यांचे वास्तव्य मात्र काशीमध्येच होते.
आध्यात्मिकता, संतमाहात्म्यांचा सहवास, बहुश्रुततेमुळे संप्रदायांची आणि परंपरांची माहिती तसेच सात्विक धर्मशील वृत्ती यांचा पैतृक वारसा रविदासांना जन्मतःच लाभला. परंपरेच्या कथनानुसार पंडित शारदानंदांच्या गुरुकुलात काही काळ रैदासांनी वेद, उपनिषद, भागवतादी शास्त्रांचे शिक्षण घेतले. धर्मयात्रांच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांमध्ये त्यांनी केलेले परिभ्रमण, समाजाचे सूक्ष्म निरीक्षण, योगशास्त्राची बैठक, स्वामी रामानंदांनी केलेला उपदेश आणि कबीरदासांसारख्या गुरुबंधूचा सहवास यातून रविदासाचे चिंतन, मनन सिद्ध झाले आणि जवळपास 151 वर्षांच्या दीर्घायुष्याला त्यांनी अजरामर केले.
रविदासांचे बहुसंख्य अनुयायी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि पंजाब या प्रदेशात आढळतात. गुजरातेतील चर्मकार ’रविदासी’ म्हणून ओळखले जातात.
रविदासांची वाणी भक्तिभावाने नटलेली आहे. तिच्यात व्याकुळता आहे. ’भक्त रत्नावली’ हे त्यांचे आत्मकथनपर काव्य असून त्यामधून वेदोपनिषदे, गीताभागवत, पुराणादींच्या कथांचे मनन, चिंतन व्यक्त झाले आहे. तथाकथित खालच्या ज्ञातीतल्या मानल्या गेलेल्या चांभाराच्या घरातही विचारांचे पावित्र्य दिसून येते. रैदास विद्वान, मृदुमवाळ होते. तत्कालीन समाजाच्या मानसिकतेचा तीव्र जातिभेद मानणार्या वृत्तीचा विचार करता संत रविदासांना विषमता, जातिभेदांच्या संकटांना निश्चितच दुःखदपणे सामोरे जावे लागले असणार परंतु वेदोपनिषदांच्या श्रुतिवचनांवर दृढ विश्वास ठेवून संत रविदास जातिगत विषमतेविरुद्ध, उच्चनीच भावाविरुद्ध निडरपणे उभे राहिले आणि समाजात आत्मसामर्थ्याची प्रेरणा जागृत केली आणि विषमता पाळणार्यांना विचार करण्यास उद्युक्त केले.
रोहिदासांची चातुर्वर्ण्याची व्याख्या ही कालसापेक्ष आहे. त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, कोळी यांची कालसापेक्ष व्याख्या लोकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते ब्राह्मण कोण तर,
’ऊँचे कूल के कारनै, ब्राह्मण होय न कोय।
जउ जानहि ब्रह्म आत्मा, रैदास कही ब्राह्मन सोय॥’
अर्थात केवळ उच्च वर्ण मानल्या गेलेल्या कुळात जन्म घेतला म्हणून कोणी ब्राह्मण होत नाही. ज्याला ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान झाले आहे आणि ज्यामध्ये ब्रह्मात्मा विद्यमान असतो तो ब्राह्मण होय. क्षत्रिय कोणाला म्हणावे हे सांगताना रैदास लिहितात,
’दीन दुःखी के हेत जउ वारै अपने प्रान।
रैदास उह नर सुर कौ साँचा छत्री जान।’
अर्थात दीनदुबळ्यांच्या रक्षणासाठी जो आपले प्राण पणाला लावतो तो क्षत्रिय होय. तर सन्मानाने पैसे कमावणारा, समाजकल्याणासाठी आपली पुण्याई खर्च करणारा-देणारा, योग्य वजन करीत ग्राहकांना वस्तू देणारा तो खरा वैश्य होय. क्षुद्र कोण तर रैदास असे म्हणतात की,
’रैदास,जउ अति अपवित, सोई सूदर जान।
जउ कुकरमी असुधजन, तिन्ह ही सूदर मान॥ ’
म्हणजे काय तर,
’जन्म के कारनै, होत न कोई नीच। नर को नीच करि डारी है, ओछे करम की कीच॥’
अर्थात माणसाचे ज्येष्ठ-कनिष्ठपण त्याच्या जन्मगत जातीवर नव्हे तर त्याच्या कर्मावर ठरावे असे ते सांगतात.
संत रविदासांनी मुस्लीम आतंकवादाच्या आणि तीव्र जातिभेदाच्या काळात तळागाळातल्या लोकांना आत्मसन्मान बहाल करीत, होणार्या धर्मांतरांनाही आळा घातला. हिंदू अस्मितेचे रक्षक म्हणून भूमिका निभावली. त्यासाठी त्यांनी आपल्या चर्मकार जातीचा, तिथे कराव्या लागणार्या कर्माचा पुनःपुन्हा उल्लेख केला आहे-
’मेरी जाति कुटवांढला ढोर ढोवन्ता। नितहि बनारसी आसपासा॥
जाके कुटुंब के ढेढ सभ ढोर ढोढत । फिरहि बंनारसी आसपासा॥’
किंवा
’नागर जनाँ मेरी जाति विखियात चमार॥’
किंवा
’मेरी जाति कामिनी पाँति
कामिनी ओच्छा जनमु हमार।’
हे स्पष्टपणे सांगत परंपरेने आपल्या जातीला करावे लागत असलेल्या चर्मकाराचे कर्म, मेलेली जनावरे ओढून नेणे, त्यांची कातडी सोलणे किंवा मृत प्राण्यांचे मांस खावे लागणे हे सारे रविदास कसलाही आडपडदा न ठेवता सांगतात. मात्र त्याच वेळी ते आपल्या बनारस वास्तव्याविषयी, हृदयी राम असल्याबद्दल आणि आपण राजा रामचंद्राच्या चरणांशी शरणागत असल्याचेही पुनःपुन्हा सांगतात.
रविदास जातीपाती विरुद्ध उभे राहतात आणि त्याबाबत ते त्यांची तत्त्वज्ञाची भूमिका ही मांडतात -
’रैदास एक ही बूंद सों, सब ही भयो वित्थार।
मुरिख हैं तो करत हैं, बरन अवरन विचार॥
रैदास एक ही नूर ते, जिमि उपज्यों संसार।
ऊंच-नीच किहि विध भये, ब्राह्मण और चमार॥’
म्हणजे एकाच ब्रह्मचैतन्यापासून जगाची निर्मिती झाली असेल तर वर्ण-अवर्णाचा विचार करणारे मूर्खच ठरतात. सार्या जगताचा निर्माता एकच असेल तर तेथे ’ब्राह्मण’, ’चांभार’ असा भेद करणे संभवतच नाही. इतक्या स्पष्टपणे आपले विचार मांडतात.
गोहत्या करणार्या, पाहणार्या आणि गोमांस भक्षण करणार्या समाजाला त्यांनी उपदेश केला आहे-
’एकै माही के सभै भांडे, सभं का एकै सिरजनहार।
रैदास व्यापै एकौ घट भीतर सभ को एकै घडै कुम्हार॥’
हे त्यांनी पुनःपुन्हा सांगितलेले आहे.
’ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन।
पूजिये चरण चांडाल के जो होवे गुण प्रवीण।’
असे सांगणार्या रविदासांनी हिंदुत्वाच्या विचारधारेला समृद्ध केले आहे.
’जाति-जाति में जाति हैं, जो केतन के पात।
रैदास मनुष ना जुड़ सके, तब तक जाति न जात॥’
’जोपर्यंत मनातील जात, जात नाही तोपर्यंत माणसामाणसांतील अंतर दूर होणार नाही,’असा सामाजिक एकतेचा जागर रविदासांनी केला आहे. रविदासांचा आणखी एक उल्लेखनीय विशेष म्हणजे त्यांनी स्वातंत्र्याचा केलेला उद्घोष होय.
’पराधीनता पाप है, जान लेहु रे मीत।
रविदास दास पराधीन तो, कौन करै है प्रीत॥’
रविदास समाजातील एकात्मता किती महत्त्वाची असते हे सांगताना लिहितात,
’हिल मिल चलो जगत में, फूट पडो दोनही
फूट पडी माची तो देश नष्ट हो जाई ।’
त्या काळातच नव्हे तर आजच्या परिस्थितीतही रविदासांचा हा उपदेश तितकाच लागू आहे. संत रईदासांच्या अपूर्व योगदानाचे, स्वतंत्र विचारसरणीचे त्यांच्या समकालीन संतांनी विलक्षण कौतुक केले आहे.
कबीरदासांनी-
’संतन मे रविदास संत हैं, सूपज ऋषी सो मानिया॥’
संतमंडळांमध्ये अत्युच्च स्थान मिळविलेले रविदास म्हणजे, हिन समाजात जन्मलेला सर्वश्रेष्ठ ऋषी आहे. मीराबाईंचे गुरू रईदास असल्यामुळे त्यांनी रविदासांचे माहात्म्य भरभरून गायले आहे. मीराबाईंच्या मते,’असे द्रष्टे सद्गुरू मला लाभले म्हणूनच मला ईश्वराची प्राप्ती झाली,’ हाच श्रद्धाभाव छोटा सुंदरदास, दयाबाई, दर्शनदास अशा सार्या संतांनी व्यक्त करीत संत रविदासांचे महत्त्व आणि त्यांच्या कार्याचे माहात्म्य अधोरेखित केले आहे.
संदर्भ ग्रंथ :
1. भारतीय संस्कृतिकोश खंड आठ
2. भारतीय संत आणि सामाजिक समरसता : डॉ. श्यामा घोणसे