डॉ. भास्कर स. बोरगांवकर 9404379383
मराठवाड्याची शान आणि महाराष्ट्राच्या देशी गोवंशाचा अमूल्य वारसा म्हणून ओळखली जाणारी ’देवणी गाय’ ही दुहेरी उपयोगाची उत्कृष्ट जात आहे. भरघोस दूध उत्पादन, शेतीकामासाठी सक्षम व कणखर बैल, स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि समृद्ध अनुवंशिक वैशिष्ट्यांमुळे या जातीने शेतकर्यांचा विश्वास संपादन केला आहे. बदलत्या काळात देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व वाढत असताना, देवणी जातीचे जतन, शुद्ध पैदास आणि वैज्ञानिक संगोपन ही काळाची गरज ठरत आहे. 22 जुलै हा दिवस ’शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवस’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हा लेख.
देवणी गोवंश महाराष्ट्रातील दुहेरी उपयोगाची म्हणजेच दूध आणि शेतीकामासाठी बैल देणारी नावाजलेली जात आहे. सतराव्या शतकापासून गीर जातीच्या जनावरांचे कळप गुजरातमधून मराठवाड्यात चार्याच्या शोधात येत असत. तत्कालीन पशुपालक त्या काळात गीर आणि स्थानिक जनावरांचे संकर घडवून आणत असत. त्यातून जन्मलेली वासरे आकर्षक बाह्य गुणांची असल्यामुळे शेतकर्यांना याबद्दल आवड निर्माण झाली. त्यातूनच ’देवणी गायींची’ निर्मिती झाली. त्या काळात या गायींना ’सुरती’ असे म्हटले जायचे.
त्यानंतर हैद्राबादचे संस्थानिक निजामाच्या राजवटीत 1930 साली देवणी गोवंशाचे सर्वेक्षण आणि संशोधनाचे काम सुरू केले. याच काळात निकृष्ट वळूंचे खच्चीकरण आणि जातीच्या वर्णनाच्या प्रमाणिकरणाच्या बाबी हाती घेण्यात आल्या. भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक उपयोगाच्या दृष्टीकोनातून निजाम राजवटीस या जातीचा विकास झाला. स्वातंत्र्यानंतर लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि पशुसंवर्धन खात्याचे माजी संचालक डॉ. मुन्सी अब्दुल रहेमान यांनी या जातीला अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर 1976 मध्ये नोंदणीकृत मान्यता मिळाविली. गुजरात मधील ’गीर’, खानदेशातील ’डांगी’ आणि स्थानिक देशी गायींच्या संकरातून ही जात विकसित झालेली आहे.
देवणी जातीचा अधिवास : देवणी गोवंशाचे मूळ उगमस्थान लातूर जिल्ह्यातील देवणी हा तालुका आहे. यामुळेच या जातीच्या गोवंशाचे नाव देवणी पडलेले आहे. या जातीची जनावरे संपूर्ण लातूर जिल्हा, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, लोहा आणि कंधार तालुक्यात, परभणी जिल्हा, धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात आढळतात. तसेच कर्नाटक राज्यातील बिदर, बसवकल्याण, भालकी या भागात आढळतात. त्याचबरोबर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक सीमेलगतच्या त्रिकोणी भागात देवणी जातीची जनावरे आढळतात. अठराव्या पशुगणनेनुसार देवणी जातीच्या जनावरांची एकूण संख्या 73.098 आहे.
देवणी गोवंशाची गुणवैशिष्ट्ये : देवणी जात गुजरातमधील ’गीर’, खानदेशातील ’डांगी’ आणि स्थानिक देशी गायींच्या संकरातून विकसित झालेली आहे. म्हणून या जातीच्या गायींचे शरीर ’गीर’सारखे आणि रंग ’डांगी’ जातीशी मिळता जुळता दिसतो.
देवणी गोवंशामध्ये तीन उपजाती आढळतात :
1) वानेरा : यांचा चेहरा आणि गाल काळ्या रंगाचे असून संपूर्ण शरीर पांढरे असते. देवणी गोवंशात यांचे प्रमाण 44 टक्के आहे.
2) शेवरा : हे काळ्या-पांढर्या (काळा बांडा) रंगाचे असतात. एकूण संख्येत यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 46 टक्के आहे.
3) बालंक्या : हे पूर्णपणे शुभ्र पांढर्या रंगाचे असतात. एकूण संख्येत हे केवळ 10 टक्के आहेत.
देवणी जातीची जनावरे मध्यम आकाराची आणि भरदार शरीराची असतात. त्यांचा डौलदारपणा उठून दिसतो. शरीराचा रंग पांढरा आणि त्यावर काळे ठिपके असतात. यांचे डोळे पाणीदार, नजर धारदार आणि डोळ्यांच्या पापण्या काळ्या असतात.
उत्पादन क्षमता : देवणी गायीची कास मोठी, धष्टपुष्ट आणि चांगली विकसित असते. तिच्या काचेवर काळ्या रंगाचे चार सड सारख्या अंतरावर असतात. या गायींच्या पहिल्या माजाचे सरासरी वय 36 महिने आणि पहिल्या विण्याचे वय 46 महिने असते. (मात्र, शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन केल्यास कालवड चोविसाव्या महिन्यात माजावर येते आणि चौतिसाव्या महिन्यात पहिले वेत देते.) या जातीची शुद्ध गाय एका वेतात सरासरी 1000 ते 1200 लीटर दूध देते. म्हणजेच दिवसाला चारे ते सहा लीटर दूध मिळते. या दुधात फॅटचे प्रमाण सरासरी 4.4 टक्के असते. देवणी गायी त्यांच्या आयुष्यात सरासरी आठ ते दहा वासरांना जन्म देतात. या गायींचे सरासरी वजन 430 किलोग्रॅम असते.
देवणी बैल : जड शेतीकाम आणि ओढकामात अत्यंत आकर्षक मजबूत भक्कम पायांचे सांधे या गुणांमुळे देवणी बैल लोकप्रिय आहेत. या जातीची बार बैल, सहा बैले नांगर काळ्या रानात सहज ओढतात. एक बैल जोडी जास्तीत जास्त 28 ते 30 क्विंटल माल 10 ते 15 किलो अंतर सहज वाहून नेतात. देवणी गोवंशातील अनुवंशीक दोष आणि अवगुण याविषयी पशुवैद्यक आणि कृषी महाविद्यालय परभणी, लातूर आणि उदगीर येथे भरपूर संशोधन झाले आहे. देवणी गोवंशात एकूण संख्येमध्ये 44 टक्के वानेरा 46 टक्के शेवरा आणि 10 टक्के बालक्या प्रकारातील जनावरे आढळतात.
कृत्रिम रेतन सेवा : देवणी गायींच्या मूळ आणि मुख्य भागात या जातीचे संवर्धन आणि संगोपन करणे गरजेचे आहे. यासाठी शुद्ध देवणी जातीच्या वळूच्या गोठवलेल्या रेतमात्रा (विर्यमात्रा) पुरवल्या जातात. शेतकर्यांच्या गोठ्यातील देवणी गाय माजावर आल्यावर, कृत्रिम रेतनासाठी ही शुद्ध विर्यमात्राच वापरावी. किंवा शुद्ध देवणी वळूद्वारेच तिचा नैसर्गिक संयोग घडवून आणावा. जवळपास असा शुद्ध वळू उपलब्ध नसेल, तर गायीला इतर वळू कडून भरवू नये; तो माज सोडून द्यावा. यानंतर शुद्ध वळूची रेतमात्रा मिळवण्यासाठी आपल्याला तीन आठवड्यांचा वेळ मिळतो. त्यामुळे पुढच्या माजाच्या वेळी कृत्रिम रेतन करून गाय भरवून घ्यावी.
देवणी गोवंशाचे जतन, संगोपन, आणि विकास : देवणी ही महाराष्ट्रातील देशी गोवंशातील दुहेरी उपयोगाची अत्यंत लोकप्रिय जात असल्यामुळे या जातीचे संवर्धन आणि अनुवंशीकरण सुधारणा होते अत्यंत आवश्यक आहे.
रेकॉर्ड किंपींग : जनावर माजावर आलेली तारीख गर्भ तापासणीची आणि हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
आरोग्य आणि व्यवस्थापन: जनावरांचे जंत आणि गोचीड निर्मूलन वेळेवर करावे. तसेच घटसर्प, फर्या आणि लाळ्या-खुरकुत या रोगांविरुद्ध प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. कालवडींना ’ब्रुसेलोसिस’ची लस वेळेत देणे गरजेचे आहे. देवणी गोवंश जतन आणि पैदासकार पशुपालक संघटना यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या संघटना शासन आणि पशुपालक यांच्यात दुवा म्हणून काम करतात, ज्यामुळे देवणी जातीच्या विकासाला मदत होत आहे.
(अध्यक्ष , देवणी गोवंश जतन व पैदासकार असोसिएशन, लातूर)