काळाचा महिमा...

विवेक मराठी    18-Jul-2026   
Total Views |
 
shivsena
 
रामरक्षा आंदोलनात सरसंघचालकांनी सामील व्हावे, मुख्यमंत्र्यांनी सामील व्हावे. त्यांच्या या वक्तव्याला राजकीय विनोद म्हणायचे की अतिमूर्खपणाचे विधान म्हणायचे हे वाचकांनी ठरवायचे. डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान, रशियाचे पुतीन यांना आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण द्यायला ते कसे विसरले? असाही प्रश्न पडू शकतो. शिवसेनेचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ते कसे विसरले, याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेले शरदचंद्र पवार यांनाही ते निमंत्रण द्यायला विसरले, हे तर नवलच. 
 
काळाचा महिमा अगाध असतो. महाभारतातील‘ कालः सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रमः।’ असे हे वचन आहे. त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही झोपलेले असाल तरी काळ जागा असतो आणि तो कार्यरत असतो. काळाच्या महिम्यावर अतिक्रमण करता येणे शक्य नाही. काळाचे परिणाम कोणालाही सुटत नाही. महाभारतातील हे वचन उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लावले असता काय दिसतं?
 
 
मित्रपक्षाचा विश्वासघात करून अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद त्यांनी भोगले. मुख्यमंत्रीपदाच्या काळात पालघर जिल्ह्यात चार साधुंच्या हत्या झाल्या. उद्धव ठाकरे यांची कृती शून्य. नवनीत राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली, उद्धव साहेबांनी त्यांना अटक करून तुरूंगात टाकले. रामजन्मस्थानावर भव्य मंदिर बांधले गेले. देशाचे वातावरण राममय झाले. तेव्हा उद्धवजी म्हणाले,“सध्या जो तो जय श्रीराम जय श्रीराम म्हणतो, मी त्यांना हरामखोर म्हणतो’.
 
 
जय श्रीराम म्हणणार्‍यांना हरामखोर म्हणणारे उद्धव ठाकरे अयोध्या मंदिरातील दानचोरीबद्दल रामरक्षा आंदोलन करायला निघाले आहेत. मुंबईत एक कार्यक्रम झाला. नागपुरात दुसरा झाला. हरामखोर, दानचोर, आणि आता स्वतःला वाचविण्याचा घोर चालला आहे. मुस्लीम मते मिळविण्यासाठी हरामखोर आणि आता स्वतःला वाचविण्यासाठी रामरक्षा. याचे दुसरे नाव आहे,‘राजकारण’. येथे राम आस्थेचा काही संबंध नाही आणि राम अनास्थेचादेखील संबंध नाही. विषय फक्त एकच,‘राजकारणात टिकून राहायचे आहे’. जेव्हा सोयीचे असेल तेव्हा जय श्रीराम आणि गैरसोयीचे असेल तेव्हा ह‘राम’खोर.
 
 
मुंबईनंतर आंदोलनासाठी नागपूर हे ठिकाण निवडण्याचे कारण काय? रामायणात राम नागपुरात येऊन गेल्याचा उल्लेख नाही. रामाचे निवासस्थान पंचवटीत होते. पंचवटी नाशकात आहे. तेथे रामाचे भव्य मंदिर आहे. रामाची आस्था असेल तर तिथे आंदोलन करायला हवे होते, पण उद्धव यांनी नागपूर निवडले. याचे कारण, ‘राजकारण’.
 
 
नागपुरात राम मंदिरे खूप आहेत. पण त्यांनी रामनगरमधील राम मंदिर निवडले. देवेंद्र फडणवीस यांचे घर तेथून जवळच आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरचे. त्यांनी राजकारणात असा काही डाव टाकला की, उद्धवजींचे सरकार गडगडले. त्यांचा पक्ष फुटला. पक्षचिन्ह गेले आणि नावही गेले. नको त्या माणसासी पंगा घेतला. आणि त्याने कर्जाची सव्याज परतफेड केली. उद्धव हतबल झाले. असे होईल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुम्ही झोपला असला तरी काळ जागा असतो आणि तो कार्यरत असतो, त्याचे उल्लंघन करणे कोणालाही शक्य नाही. आणि उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला तर काय होते, त्याचे उत्तर आहे, त्याचा उद्धव ठाकरे होतो.
 
 
अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी हे महापाप आहे. ज्यांनी हे केले ते पकडले गेलेले आहेत. कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा होईलच. परंतु काळदेखील त्यांना शिक्षा करील. हा विषय राजकारणाचा नाही. पक्षीय राजकारणाचा तर अजिबात नाही. पक्षीय राजकारणाचे महाराष्ट्रात असंख्य विषय आहेत. आत्ताचा ज्वलंत विषय आहे, पावसाचा. पाऊस लांबणीवर पडत चालला आहे. शेतकर्‍यांची अवस्था काय होणार? जनहिताचे राजकारण करायचे असेल तर त्याचा अभ्यास करून भविष्यकालीन योजना करून, त्याचे मागणीपत्र तयार करून आंदोलन करायला हवे. उद्धवजी यापैकी काहीही करणार नाहीत. तो त्यांचा पिंड नाही.
 
 
त्यांचे जीवलग सहकारी वक्तव्य देण्यात अतिशय हुशार आहेत. आतच त्यांनी वक्तव्ये केले होते की, रामरक्षा आंदोलनात सरसंघचालकांनी सामील व्हावे, मुख्यमंत्र्यांनी सामील व्हावे. त्यांच्या या वक्तव्याला राजकीय विनोद म्हणायचे की अतिमूर्खपणाचे विधान म्हणायचे हे वाचकांनी ठरवायचे. डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान, रशियाचे पुतीन यांना आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण द्यायला ते कसे विसरले? असाही प्रश्न पडू शकतो. शिवसेनेचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ते कसे विसरले, याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेले शरदचंद्र पवार यांनाही ते निमंत्रण द्यायला विसरले, हे तर नवलच.
 
 
महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता अस्तित्त्वहिन विरोधी पक्ष हे आजचे स्वरूप आहे. वाचाळ, तोंडाळ, भन्नाट, बोलणारे नेते भरपूर आहेत. त्या सर्वांची विषयसूची एकच, शासनावर सतत टीका करीत राहायची. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करीत राहायचे. पाळलेल्या पत्रकारांमार्फत बातम्या पेरायच्या. भाजपा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात तणाव वाढत चाललेला आहे, भाजपा एकनाथ शिंदेचा वापर करून घेत आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सांमजस्य नाही, वगैरे...वगैरे. आणि ढत9 वर या बातम्या चवीने ऐकायच्या असतील तर ऐकाल्या काही हरकत नाही. जनतेला याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. जनतेचे प्रश्न अतिशय वेगळे आहेत.
 
 
शेतकर्‍यांचा विषय घेऊ. कांद्याचे भाव आणि टोमॅटोचे भाव दरवर्षी पडतात. शेतकरी शेतातच कांदा नष्ट करतो. टोमॅटो रस्त्यावर टाकून देतो. त्याचे फोटो झळकतात. राजकीय पक्ष स्वस्थ बसलेले असतात. गेल्या आठ-दहा वर्षांत उद्धव सेनेने किंवा अन्य विरोधी दलाने शेतकर्‍यांचे कोणते प्रश्न घेऊन शांततामय मार्गाने आंदोलन केले आहे. त्यांचे रडगाणे चालू असते, यांनी माझा बाप पळवला, पक्ष पळवला, चिन्ह पळवले. आणि राष्ट्रवादीची चर्चा चालू आहे- दोन राष्ट्रवादीचे विलगीकरण करायचे की करायचे नाही. जनतेच्या स्तरावर प्रश्नांचा विचार केला तर महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार होत आहेत. गल्लोगल्ली मादकपदार्थांची विक्री वाढत चालली आहे. तरूण मुले त्याला बळी पडतात. भोंदू बुवाबाजीच्या कथा संपतच नाहीत. ज्या राजकीय नेत्यांनी समाजापुढे आदर्श ठेवायचा असतो, तेच अनेक प्रकारचे गैरव्यवहार करताना सापडतात. ही सर्व परिस्थिती चिंताजनक आहे.
 
 
समाजाला सुखाने आणि शांतीने परस्पर सहकार्याने, आनंदाने जगायचे असते. तशी परिस्थिती उत्पन्न करणे हे राजकीय पक्षांचे काम आहे. ती त्यांची मोठी नैतिक जबाबदारी आहे. लोकशाही म्हणजे भानगडी करून या ना त्या प्रकारे सत्ता हस्तगत करणे नव्हे. सत्तेचे राजकारण चालत राहील, पंरतु त्या राजकारणाला मूल्यांचे अधिष्ठान असले पाहिजे. त्या राजकारणाला जनहिताची आस असली पाहिजे. या गोष्टी आपण हरवत बसलो आहोत का? असा आजचा प्रश्न आहे. ज्या विषयांचा जनतेच्या जगण्याच्या प्रश्नांशी काहीही संबंध नाही, ते विषय घेऊन राजकीय स्टंटबाजी करणे, याचे दुसरे नाव रामरक्षा पठण आंदोलन असे ठेवले पाहिजे. शहाण्या जनतेने या सर्व विषयांचा राजकीयदृष्ट्या जागृत राहून विचार केला पाहिजे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.