Wild vegetables
रानभाज्या म्हणजे निसर्गाने उधळलेला पोषणाचा अमूल्य खजिना. पावसाच्या सरींसोबत महाराष्ट्रातील रानावन, डोंगरउतार आणि शेतांचे बांध हिरव्यागार रानभाज्यांनी बहरून जातात. एकेकाळी आदिवासी आणि ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या भाज्या आज पुन्हा आरोग्यदायी आहार, जैवविविधतेचे संवर्धन आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे प्रतीक म्हणून नव्याने चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या पोषणमूल्यांपासून औषधी गुणधर्मांपर्यंत आणि थेट शेतकरी-ग्राहक उपक्रमापर्यंतचा हा समृद्ध प्रवास म्हणजे ‘रानभाज्यांचे वैभव’ उलगडणारी एक प्रेरणादायी कहाणी आहे.
कोकणासह कोल्हापूर आणि सातारा परिसरात यंदा झालेल्या समाधानकारक पावसाने धरतीला नवसंजीवनी दिली आहे. पावसाच्या पहिल्याच सरींनंतर शेतांच्या बांधावर, डोंगरउतारांवर आणि रानावनात विविध रानभाज्या डोकावू लागल्या आहेत. त्यामुळे या नैसर्गिक चवीचे चाहते आणि खाद्यसंस्कृतीचे आस्वादक यांना आता रानभाज्यांचे वेध लागले आहेत. बाजारपेठांमध्येही ’करटोली’, ’कुरडू’, ’तांदूळसा’, ’काटेमाठ’ अशा अनेक रानभाज्यांची चाहूल लागली असून, निसर्गाने उधळलेल्या या हिरव्यागार संपदेचे स्वागत करण्यासाठी रसिकांची पावले पुन्हा रानाकडे वळू लागली आहेत. पावसाळ्याच्या आगमनासोबतच रानभाज्यांचे हे वैभव जणू महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीला नव्याने उजाळा देत आहे.
शेतीची मशागत नाही, रासायनिक खते नाहीत, कीटकनाशकांची फवारणी नाही आणि कोणतीही विशेष निगाही नाही...तरीही निसर्गाच्या कुशीत स्वतःहून उगवणार्या वनस्पती म्हणजे ’रानभाज्या’. जंगल, डोंगरदर्या, शेतांचे बांध, माळराने, ओढे-नाल्यांच्या काठावर सहज उगवणार्या या भाज्या आपल्या जैवविविधतेचा अमूल्य वारसा आहेत. एकेकाळी ग्रामीण आणि आदिवासी जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या रानभाज्या आज पुन्हा आरोग्यदायी आहार म्हणून महत्त्वाच्या ठरत आहेत. रानभाज्या नैसर्गिक वातावरणात वाढत असल्यामुळे त्यामध्ये विविध खनिजे, सूक्ष्म अन्नघटक, जीवनसत्त्वे आणि शरीरासाठी उपयुक्त जैवसक्रिय रसायने मुबलक प्रमाणात आढळतात.
महाराष्ट्रात रानभाज्यांची विविधता उल्लेखनीय आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत, विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया येथे, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत रानभाज्यांचे समृद्ध वैभव अनुभवायला मिळते. स्थानिक हवामान, जंगलसंपदा आणि जैवविविधतेमुळे प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आढळतात. रानभाज्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पर्यावरणाशी असलेला जवळचा संबंध. हवामानातील बदल, पर्जन्यमान, मातीचा प्रकार आणि स्थानिक जैवविविधता यांचे प्रतिबिंब या भाज्यांमध्ये दिसून येते. म्हणूनच प्रत्येक प्रदेशातील रानभाज्या वेगळ्या असतात. कोकणातील काही भाज्या विदर्भात आढळत नाहीत, तर विदर्भातील काही रानभाज्या पश्चिम महाराष्ट्रांत दुर्मीळ असतात. ही विविधता म्हणजे महाराष्ट्राच्या जैवसंपदेची ओळख आहे.
रानभाज्यांमध्ये अनेक प्रकार आढळतात. कंदवर्गात डुक्करकंद, पंद, हलिंद, सुरण, काटेसावर, अमरकंद आणि घोरकंद यांचा समावेश होतो. वेलवर्गात करटोली, रानचवळी, चिबूड, शतावरी आणि वेलमूग आढळतात. झुडूपवर्गीय रानभाज्यांमध्ये अंबाडी, रानवळू, रानकरडई, काटेमाठ, तांदूळसा, हिरवा काटेमाठ, पाथरी, रानभेंडी, तेरडा, कुरडू, रानवांगी, राजगिरा, चिलाची भाजी, घोळू, चिघळ, लाल माठ आणि चवळाई यांचा समावेश होता; तर वृक्षांपासून मिळणार्या खाद्य वनस्पतींमध्ये मोह, उंबर, कढीपत्ता, शेवग्याची पाने, चिंच, तिवस, भोकर, हादगा, फणस, बहावा आणि आंबा यांचा उपयोग केला जातो. त्यापैकी काही प्रमुख रानभाज्यांची ओळख करून घेऊया.
टाकळा : या रानभाजीची कोवळी पाने आणि शेंडे भाजीसाठी वापरले जातात. लोह, कॅल्शियम आणि तंतुमय घटकांनी युक्त असल्याने ती पचन सुधारते, शरीराला पोषण देते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.
फोडशी : पावसाळ्यात शेतांच्या बांधावर, माळरानावर आणि ओलसर भागात नैसर्गिकरीत्या उगवणारी फोडशी ही पारंपरिक रानभाजी आहे. तिची कोवळी पाने, शेंडे आणि देठ भाजीसाठी वापरले जातात. या भाजीमध्ये जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम आणि तंतुमय घटक मुबलक प्रमाणात आढळतात. ही भाजी पचनासाठी उत्तम असून सर्दी, खोकला आणि कफ कमी करण्यास मदत करते. याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
आघाडा ः पावसाळ्यात ओसाड जमिनीवर आणि शेताच्या कडेला आघाड्याची झाडे उगवतात. याची पाने आणि कोवळे कोंब भाजीसाठी वापरले जातात. आघाड्याची भाजी मूळव्याध, मूतखडा आणि पोटाच्या विकारांवर गुणकारी मानली जाते. तसेच हाडे मजबूत करण्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते.
तेलापाटाची गाबोळी ः पावसाळ्यात रानावनात उगवणारी चविष्ट आणि पौष्टिक रानभाजी आहे. तिची कोवळी पाने व गाबोळीची भाजी खास ग्रामीण व शहरी भागात आवडीने केली जाते. या भाजीच्या दाण्यांची चविष्ट भाजी केली जाते. जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय घटकांनी समृद्ध असल्याने ती आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते.
शेवळ : ही भाजी प्रामुख्याने पावसाळ्यात महाराष्ट्रातील (विशेषतः कोकण, ठाणे, पालघर आणि सह्याद्रीच्या पट्ट्यांत) मिळणारी एक अत्यंत लोकप्रिय व चवदार रानभाजी आहारशास्त्रज्ञांच्या मते या भाजीला ’ड्रॅगन स्टॉल्क याम’ (ऊीरसेप डींरश्रज्ञ धरा) किंवा ’जंगली सुरण’ असेही म्हणतात.
घोरकंद : हा पोषणमूल्यांनी समृद्ध रानकंद असून कोकणासह मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. मध्य प्रदेशात तो ’गोराडू’ या नावाने प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात ’गोराडू चाट’ हा तेथील लोकप्रिय रस्त्यावरील खाद्यपदार्थ असून अनेक चाट सेंटरवर तो विशेष आकर्षण ठरतो. महाराष्ट्रातही घोरकंदाची भाजी केली जाते.
करटोली : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळणारी ही वेलवर्गीय रानभाजी आहे. कोकण, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि रायगड भागात ती मुबलक प्रमाणात मिळते. कडवट चवीमुळे तिचे विशेष महत्त्व असून तंतुमय पदार्थ, लोह आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मानली जाते.
कुरडू ः शेतांच्या बांधावर आणि ओलसर माळरानावर सहज उगवणारी ही पालेभाजी आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ती मोठ्या प्रमाणात आढळते. लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असलेली ही भाजी ग्रामीण भागात विशेष आवडीने खाल्ली जाते.
तांदूळसा : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागांत आढळणारी ही रानभाजी आहे. कोवळी पाने भाजी म्हणून वापरली जातात. लोह आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असल्याने अशक्तपणा दूर करण्यासाठी तिचा उपयोग होतो.
काटेमाठ : काटेरी देठ असलेली ही वनस्पती पावसाळ्यात रानात आणि बांधावर उगवते. हिरवा व लाल अशा दोन्ही प्रकारांत ती आढळते. लोह, कॅल्शियम आणि तंतुमय पदार्थांनी समृद्ध असल्याने तिचा आहारात समावेश फायदेशीर ठरतो.
रानचवळी ः ही वेलवर्गीय वनस्पती असून तिची कोवळी पाने आणि शेंगा खाल्ल्या जातात. नाशिक, नंदुरबार, धुळे तसेच विदर्भातील जंगल परिसरात ती आढळते. प्रथिने आणि तंतुमय पदार्थांचा हा चांगला स्रोत आहे.
रानभेंडी ः भेंडीसारख्या दिसणार्या या वनस्पतीची कोवळी फळे आणि पाने खाद्य असतात. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ती आढळते. पचनक्रिया सुधारण्यासाठी तिचा उपयोग होतो.
तेरडा ः पावसाळ्यात ही उगवणारी लोकप्रिय रानभाजी आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तिचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. लोह आणि खनिजांनी समृद्ध असलेली ही भाजी ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
राजगिरा (रानमाठ) ः राजगिर्याच्या अनेक रानजाती महाराष्ट्रभर आढळतात. हिरवा आणि लाल अशा दोन्ही प्रकारच्या पानांची भाजी केली जाते. कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांचा उत्तम स्रोत असल्याने आहारतज्ज्ञही तिचे महत्त्व सांगतात.
बांबूचे कोवळे कोंब ः गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नंदुरबार आणि कोकणातील जंगल परिसरात पावसाळ्यात बांबूचे कोवळे कोंब उपलब्ध होतात. योग्य प्रक्रियेनंतर त्यांची भाजी, लोणचे आणि विविध पदार्थ तयार केले जातात. तंतुमय पदार्थांनी समृद्ध असलेले हे कोंब आदिवासी आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत.
घोळू ः गुणधर्माने शीतल मानली जाणारी घोळू ही रानभाजी आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात तिचे सेवन विशेष लाभदायक मानले जाते. या वनस्पतीला लहान पिवळी फुले येतात. फुले गळून गेल्यानंतर त्यामध्ये असंख्य बारीक बिया तयार होतात. लांबट-गोल आकाराची, किंचित आंबट चव असलेली पाने ही तिची खास ओळख आहे. चणा डाळ भिजवून वाटून, बेसन किंवा ज्वारीच्या पिठासह, तसेच लसूण-मिरचीची फोडणी देऊन तयार केलेली घोळूची भाजी अतिशय रुचकर लागते.
रानभाज्यांचा खरा आस्वाद घ्यायचा असेल, तर त्या ऋतुनुसार ताज्या आणि थेट शेतातून मिळणे आवश्यक आहे. रानावनांतून सकाळी काढलेली भाजी काही तासांतच ग्राहकांच्या ताटात पोहोचली, तर तिची चव, ताजेपणा आणि पोषणमूल्ये अधिक चांगल्या प्रकारे टिकून राहतात. या विचारातून आम्ही आणि आमच्या मित्रपरिवाराने सुमारे दहा वर्षांपूर्वी पुण्यात ’शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेवर आधारित एक शोषणमुक्त विनिमय व्यवस्था उभी केली.
या उपक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये कोणताही मध्यस्थ नाही. एका संवाद गटाच्या माध्यमातून ग्राहक थेट शेतकरी ताई-दादांशी संपर्क साधतात. त्याच गटावर ग्राहक आपल्या गरजेनुसार आगाऊ ऑर्डर देतात. त्यानुसार शेतकरी ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळेत ताजी भाजी, फळे, धान्य किंवा इतर कृषी उत्पादने घेऊन येतात. अवघ्या एका तासात ग्राहक आपापल्या ऑर्डर घेऊन जातात.
या व्यवस्थेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ऑर्डर मिळाल्यानंतरच शेतातून काढणी केली जाते. त्यामुळे उत्पादन ताजे राहते, काढलेला माल वाया जात नाही आणि शिल्लक राहण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. अन्नाची नासाडी टळते आणि शेतकर्यालाही त्याच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळतो.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षभराचे पीक नियोजन ग्राहकांच्या सहभागातून केले जाते. कोणत्या ऋतूत कोणती भाजी, कोणते धान्य किंवा फळ हवे, याबाबत शेतकरी आणि ग्राहक एकत्रितपणे नियोजन करतात. त्यानुसारच लागवड केली जाते. परिणामी, अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न निर्माण होत नाही आणि ग्राहकांनाही त्यांच्या गरजेनुसार ताजे, स्थानिक आणि ऋतुनिष्ठ अन्न उपलब्ध होते.
या उपक्रमाचा पाया आहे विषमुक्त आणि स्वावलंबी शेती. शेतीसाठी कोणत्याही बाह्य रासायनिक निविष्ठांवर अवलंबून न राहता, शेतात उपलब्ध असलेल्या सेंद्रिय साधनसामग्रीचाच वापर केला जातो. देशी बियाण्यांपासून ऋतुनुसार भाजीपाला, फळे आणि धान्याची लागवड केली जाते. त्यामुळे उत्पादने केवळ सुरक्षित आणि पौष्टिकच नसतात, तर स्थानिक जैवविविधतेचे संवर्धनही होते.