दोन रमेश - संघाने लिहिलेली दोन पुस्तके

विवेक मराठी    06-Jul-2026   
Total Views |
ramesh
‘रमेश पतंगे’ यांनी समरसता आणि संविधान या विषयांवर जगातील अनेक उदाहरणे देत स्वयंसेवकांचे आणि समाजाचे प्रबोधन केले तर ‘रमेश ओवळेकर’ यांनी आपल्या जीवनातून ती प्रेरणा आविष्कृत करून आपल्या परिसरातील अनेकांना सामाजिक कार्याची प्रेरणा देऊन विविध सामाजिक कामे आणि उपक्रम उभे केले. एकातून विचारविश्व उभे राहिले तर दुसर्‍यातून प्रत्यक्ष व्यवहारातील काम उभे राहिले. या दोघांची कार्यक्षेत्रे वेगळी असली तरी त्यांची विचारविश्वे एकच आहेत.
गेल्या रविवारी, 28 जूनला सायंकाळी चेंबूरच्या बाल विकास संघात मीना आणि रमेश ओवळेकर दांपत्याच्या लग्नाच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. तो पंचतारांकित ‘इव्हेंट‘ असण्याची शक्यताच नव्हती. त्यासाठी संघ परिवारातीलही कोणी ‘व्हीआयपी‘ आले नव्हते. अगदी साधा, मोजक्या उपस्थितीत, कौटुंबिक स्नेहपूर्ण वातावरणात झालेला तो कार्यक्रम होता. खरे तर रमेशचा जनसंपर्क एवढा अफाट आहे की, त्याने जर सरसकट निमंत्रणे दिली असती तर तो सहजपणे ‘इव्हेंट‘ करू शकला असता व आजच्या वातावरणात त्याला ‘स्पॅान्सर्स‘ही मिळाले असते. पण तसे झाले असते तर तो ‘रमेश ओवळेकर‘चा कार्यक्रम झाला नसता. त्या कार्यक्रमात मी जाऊ शकलो असतो की नाही याची मला खात्री नव्हती, पण जाऊ शकलो आणि कार्यक्रम ‘अनुभवताना‘, ‘पाहताना‘ नव्हे, मला चटकन वाटून गेले, की रमेशचे आयुष्य हे संघाचा कार्यकर्ता या विषयावरचा संघाचा ‘बौद्धिक वर्ग‘ आहे. आजच्या काळात सर्व कुटुंबियांनी मिळून एखाद्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा आपल्या खर्‍याखुर्‍या स्नेहसंबधितांसह तृप्त मनाने असा सोहळा करावा अशी उदाहरणे अपवादात्मक होत आहेत. लग्न होत असताना, मुलगी कोणत्या जबाबदार्‍या घेणार नाही याची यादी ठरवून लग्न करण्याचा हा काळ. त्यात संघाच्या कार्यकर्त्याशी लग्न म्हणजे ते केवळ त्या व्यक्तीशी किंवा कुटुंबाशी नसते. ते समाजाशी असते. अशा संसाराचे एक प्रत्यक्ष घडलेले उदाहरण रमेश ओवळेकरनेच मला पाठविले. याच लेखात त्याची स्वतंत्र चौकट केली आहे. त्यात लिहिलेल्या त्या अनुभवापेक्षा रमेशचे आयुष्य वेगळे नसेल.
 
 ‘कार्यकर्ता’ या विषयावर संघात अनेक जणांचे बौद्धिक वर्ग आहेत, पुस्तके आहेत, अनेकांनी केलेले गहन तत्वज्ञानात्मक विवेचन आहे. परंतु ‘रमेश‘सारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे जीवन हाच संघाचा समाजाला समजणारा आणि अनुभवायला येणारा खराखुरा बौद्धिक वर्ग आहे. राष्ट्रार्थ कर्मयोगातून मिळालेले आत्मिक समाधान हीच अशा व्यक्तींच्या आयुष्याची खरी कमाई असते.
संघाचे पुस्तक
 
कोल्हापूर जिल्ह्यात शेखर धर्माधिकारी यांनी गायीच्या संदर्भात एक अभिनव प्रयोग केला. गायींना एकत्र ठेवून ’गोशाळा’ निर्माण करण्यापेक्षा त्यांची शेतकर्‍यांच्या बांधावर किंवा घरात जोपासना करून त्यांचे शेण-मूत्र यांचा उपयोग करून स्वावलंबी शेतकर्‍यांची उदाहरणे त्यांनी गावोगावी उभी केली. जेव्हा हा प्रयोग पहायला अभ्यासक जात, तेव्हा स्वाभविकच या प्रयोगावर आधारित कोणते पु्स्तक आहे याची विचारणा होई. तेव्हा ते सांगत ‘हा शेतकरी हेच आमचे पुस्तक आहे.’
 
 
संघ काय करतो हे सांगण्यासाठी पूर्वीच्या महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संघचालक बाबाराव भिडे सांगत,“संघ म्हणजे शाखा, आणि शाखा म्हणजे कार्यक्रम‘. पण या विषयावर ’संघापाशी कोणती पुस्तके आहेत का,‘ या प्रश्नाचे उत्तर मला त्या कार्यक्रमात मिळाले.
 
 
मी तिथे म्हणालो की,‘’माझ्या सहवासात आलेले दोन रमेश, एक जिथे मी राहतो तिथे-’रमेश ओवळेकर’ आणि मी जिथे काम करतो तिथे ’रमेश पतंगे’ ही दोन पुस्तके माझ्या माहितीची आहेत. ती एकाच विषयावर लिहिली गेली असली तरी ती दोन भिन्न पार्श्वभूमीवर लिहिली गेली आहेत.”
 
 
त्याच कार्यक्रमात मी पुढे म्हणालो,“आपल्याकडे शिव-पार्वती आणि कार्तिकेय-गणेशाची कथा आहे. जगाची प्रदक्षिणा लवकर कोण पूर्ण करतो याची कार्तिकेय आणि गणेश यांच्यात स्पर्धा लागते. कार्तिकेय लगेच आपल्या वाहनावर, मोरावर बसून जगाची प्रदक्षिणा करायला निघतो तर आपल्या मात्यापित्यांनाच विश्व समजून गणेश त्यांनाच प्रदक्षिणा घालून ती स्पर्धा जिंकतो. तसे, एका कार्यकर्त्याच्याच प्रेरणेतून ’रमेश पतंगे’ यांनी जग धुंडाळून समरसता आणि संविधान या विषयांवर जगातील अनेक उदाहरणे देत स्वयंसेवकांचे आणि समाजाचे प्रबोधन केले तर ’रमेश ओवळेकरांनी’ आपल्या जीवनातून ती प्रेरणा आविष्कृत करून आपल्या परिसरातील अनेकांना सामाजिक कार्याची प्रेरणा देऊन विविध सामाजिक कामे आणि उपक्रम उभे केले. एकातून विचारविश्व उभे राहिले तर दुसर्‍यातून प्रत्यक्ष व्यवहारातील काम उभे राहिले. इथले कार्तिकेय आणि गणेश हे स्पर्धक नाहीत, तर परस्परपूरक आहेत.”
 
 
याचे कारण या दोघांची कार्यक्षेत्रे वेगळी असली तरी त्यांची विचारविश्वे एकच आहेत. रमेश ओवळेकरचा कार्यक्रम त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम असला तरी तो किंवा मीना वहिनी दोघेही व्यासपीठावर बसले नव्हते. याचे कारण रमेशच्या विनम्रतेत नाही. जेव्हा संघहिताचा विषय येतो तेव्हा रमेश कोणापुढेही, किती आग्रही होऊ शकतो, याची त्याच्या परिचितांना कल्पना आहे आणि त्याच्या स्पष्टवक्तेपणाचे अनुभवही अनेकांनी घेतले आहेत. तो तिथे बसला नाही; कारण आपल्या लोकांना आपले अस्तित्व आणि महत्त्व कळण्याकरिता व्यासपीठावर बसले पाहिजे याची गरज त्याला वाटत नाही. ‘असू आम्ही सुखाने पत्थर पायातील‘, या पद्यात वर्णन केल्याप्रमाणे संघटनेला दृढतेचा पाया देणार्‍या असंख्यामधले आपण एक आहोत यातून आलेला तो आत्मविश्वास होता. सहजपणे वावरणारा परंतु आपल्या कार्यक्षेत्राबाहेर न दिसणारा ’रमेश ओवळेकर’सारखा कार्यकर्ता असो किंवा सर्वदृश्यमान ’रमेश पतंगे’ यांच्यासारखा कार्यकर्ता असो, त्यांचा कार्यकर्तेपणाचा पोत एकच असतो.
 
 
अलीकडेच एका सकाळी मी पतंगेंना फोन केला तेव्हा ते टिटवाळा स्टेशनवर होते. त्यांनीच सांगितले की,“तिथल्या शाळेत 26 जानेवारीच्या कार्यक्रमात संविधानावर भाषण करण्याची आज्ञा ’साप्ताहिक विवेक’चे कार्यवाह डॉ. नंदकुमार जोशी यांनी केली आणि ती कशी मोडणार? म्हणून मी आलो.” ऐंशीच्या वयात, ज्यांचे भाषण दिल्लीतील पं.नेहरूंचे निवासस्थान असलेल्या तीन मूर्ती भवनापासून देशभरातील अनेक विद्यापीठे, संस्था आदी ठिकाणी झाले आहे आणि माजी न्यायमूर्ती, विद्यमान कुलगुरूंपर्यंत श्रोतृवर्ग लाभला आहे, अशा पतंगेंना, लोकलने जाऊन एखाद्या शाळेत व्याख्यान देण्यात आपले ‘स्टेटस‘ कमी झाले असे वाटत नाही. उलट, एका दुसर्‍या कार्यकर्त्याची आज्ञा पाळण्याचे समाधान त्याहून मोठे वाटते. हे दोघांचे ’देवदुर्लभ मूलभूत कार्यकर्तेपण’ ही संघाची देणगी आहे.
 
 
या मूलभूत कार्यकर्तेपणापुढे संघाला दिल्या जाणार्‍या धमक्या हास्यास्पद ठरतात. सरकारी दप्तरात नोंदणी करून संस्थांना असे कार्यकर्ते तयार करता येत नाहीत. राष्ट्रप्रेरणेचा हा प्रवाह जिवंत आणि प्रेरक ठेवण्यासाठी संस्थेतील वातावरण तसे पूरक असावे लागते. शंभर वर्षे तसे वातावरण टिकवून ठेवण्यात संघ यशस्वी झाला आहे, ही संघाची विशेषता आहे. दर्शन शिखराचे असले तरी माथा पायावरच ठेवला जातो आणि शिखर कितीही आकर्षक असले तरी मंदिराचा टिकाऊपणा पायाच्या भक्कमतेवरच अवलंबून असतो. हा एकात्मभाव समजण्याची जाणीव कायम ठेवावी लागते. त्यातही कार्तिकेयाचे दर्शन देवळात जाऊन घ्यायचे असल्याने कष्टसाध्य आहे. घरच्या सुपारीचा गणपती बनवून त्याची पूजा करून काम सुरू करावे एवढा तो सहजसाध्य आणि नित्य जीवनाशी निगडीत आहे.
 
 
प्रत्येक जिवंत कार्यक्रम आपणाला काही ना काही नवे शिकवत असतो. या दोन्ही रमेशांना मी किमान पंचेचाळीस वर्षे ओळखतो. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या दोघांच्या पुस्तकातील आजवर न वाचलेली पाने स्पष्टपणे वाचता आली आणि त्यांच्यातील साम्य आणि वेेगळेपण याचा नव्याने परिचय झाला.
------------

घरात भेटलेलं राष्ट्रप्रेम - कृष्णा साहेबराव मुरमे
संघ म्हणजे नेमकं काय करतो? हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. काहींच्या चेहर्‍यावर कुतूहल असतं, काहींच्या आवाजात शंका असते, तर काहींच्या मनात आधीच उत्तर तयार असतं. मी मात्र अशा वेळी कोणतंही तत्त्वज्ञान सांगत नाही. कारण संघ हा मला पुस्तकातून कळलेला नाही, तर माणसांच्या आयुष्यातून समजलेला आहे. आज सांगतो तो असाच एक अनुभव...अगदी काल परवा घडलेला डहाणू येथे एका उत्सवानिमित्त माझे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. योगायोगाने त्या दिवशी माझ्यासोबत माझी पत्नी, दोन मुली आणि माझी बहीणही होती. आम्ही कार्यक्रमस्थळी पोहोचलो, तेव्हा कार्यक्रमाला अजून बराच अवधी होता. पण तिथे एक माणूस मात्र सतत धावत होता. कधी ध्वज उभारत होता...कधी शिवरायांच्या प्रतिमेला हार चढवत होता...कधी माईक तपासत होता...कधी खुर्च्या सरळ रांगेत लावत होता... कधी एखाद्या कार्यकर्त्याला फोन करून विचारत होता,‘अरे, कुठे पोहोचलास?’ तर दुसर्‍या मिनिटाला माझ्याकडे येऊन,‘सर, चहा घेणार ना?’ आणि चहा घेईपर्यंत दुसर्‍याचा फोन..“हो... लोकेशन पाठवलं आहे... येताना फुलं आणायला विसरू नका.” मी त्याला बराच वेळ न्याहाळत होतो. शेवटी गंमतीने विचारलं,“तुम्ही आयोजक आहात की संपूर्ण समितीने आज सुट्टी घेतली आहे?” तो खळखळून हसला. “समिती आहे सर... पण कार्यक्रमाच्या दिवशी प्रत्येकाला वाटतं दुसरा कुणीतरी काम करेल. म्हणून शेवटी स्वयंसेवकच स्वयंसेवकाच्या मदतीला येतो.“ त्याच्या त्या वाक्यावर आम्ही दोघेही हसलो; पण त्यात एक वास्तव दडलं होतं.
कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता. त्याने एका कोपर्‍यात जाऊन पत्नीला फोन लावला. “आज एक पाहुणे जेवायला येतील.” बहुतेक तिकडून प्रश्न आला असावा, “एकच?” कारण तो म्हणाला, “हो... कदाचित दोनही असतील.” क्षणाचाही विलंब न करता उत्तर आलं, “ठीक आहे.” आजकाल घरात दोन पाहुणे येणार म्हटलं की आधी घरात बजेटची बैठक बसते. पण इथे फक्त एक शब्द होता... ठीक आहे. तो शब्द साधा होता; पण त्यामागे संस्कारांची मोठी परंपरा उभी होती. कार्यक्रम सुरू झाला. ठरलेले विषय पुढे सरकत गेले. सभागृहात टाळ्या वाजत होत्या; पण माझं लक्ष अधूनमधून त्या स्वयंसेवकाकडे जात होतं. तो स्वतः एका जागी बसून भाषण ऐकत नव्हता. कधी पाण्याच्या बाटल्या देत होता... कधी एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला खुर्ची आणून देत होता... कधी मुलांना शांत बसायला सांगत होता... त्याला भाषण ऐकायला वेळच नव्हता. त्याचं भाषण त्याच्या कृतीत सुरू होतं. कार्यक्रम संपला. लोक भेटायला आले. फोटो झाले. गप्पा झाल्या. आणि मग तो स्वयंसेवक माझ्याजवळ आला. “सर, चला... आता घरी जाऊ.” मी सहज उठलो. तेवढ्यात त्याची नजर माझ्या मागे गेली. माझी पत्नी... दोन मुली... आणि बहीण... त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहण्यासारखे होते. क्षणभर त्याने माझ्याकडे पाहिलं. मग स्वतःशीच हसला. मीही मुद्दाम विचारलं,“काय झालं?“ तो म्हणाला,“काही नाही सर... फक्त माझ्या घरच्या पोळ्यांनी अचानक लोकसंख्या मोजायला सुरुवात केली असेल.” त्यावर आम्ही दोघेही हसलो. पण त्या हसण्यात त्याची चिंता लपलेली होती. मी त्याची अवस्था ओळखली. शेकडो व्याख्यानांच्या प्रवासात असे प्रसंग मला नवे नव्हते. मी म्हणालो, “आमच्या जेवणाची व्यवस्था दुसरीकडे आहे. तुम्ही काळजी करू नका.” प्रत्यक्षात मात्र व्यवस्था कुठेच नव्हती. आजचा उपवास समजायचा किंवा घरी जाऊन उशिरा काहीतरी करायचं, एवढाच विचार होता. त्याने लगेच पत्नीला फोन लावला,“अगं... ते पाच जण आहेत... पण त्यांची व्यवस्था दुसरीकडे झाली आहे.” फोनवरून काय उत्तर आलं माहीत नाही; पण त्याचा चेहरा मात्र क्षणाक्षणाला बदलत होता. शेवटी तो माझ्याकडे वळला.“सर... तुम्हाला यावंच लागेल. घरून आदेश आलाय... सर, आता माझं काही चालणार नाही. संघाच्या स्वयंसेवकापेक्षा घरात माझ्या पत्नीचा आदेश जास्त कडक असतो.” यावेळी आम्ही सगळेच हसलो. घरी पोहोचलो. साधंसं घर. दारात तुळस. भिंतीवर भगवा ध्वज आणि शिवरायांचा फोटो. वहिनींनी हसतमुखाने स्वागत केलं. मी संकोचून म्हणालो,“वहिनी, एवढा त्रास कशाला घेतलात?“ त्या क्षणाचं त्यांचं उत्तर आजही कानात घुमतं. त्या म्हणाल्या, “त्रास? अहो, संघाचा स्वयंसेवक होणं म्हणजे राष्ट्राचा त्रास आपल्या घरी आणणं. आणि स्वयंसेवकाची पत्नी होणं हे काही सोपं व्रत नसतं. एकदा ते स्वीकारलं की आनंदाने निभवायचं असतं. तुम्ही तर फक्त पाच जण आलात. महिन्यातून दोन-चार वेळा असे पाहुणे येतातच. कधी दोन असतात, कधी दहा. आम्ही माणसं मोजत नाही; देवाने दिलेला घास वाटतो.” माझ्याकडे त्यावर उत्तरच नव्हतं. थोड्याच वेळात सुग्रास जेवण ताटांमधून समोर आलं. मी विचारलं, “वहिनी, तुम्ही जेवलात ना?“ त्या अगदी सहज म्हणाल्या, “हो... यांचं जेवण सहा वाजताच होतं. त्यांना मधुमेह आहे. बाकी सगळ्यांचं झालंय. तुम्ही निर्धास्तपणे जेवा.” त्यांच्या बोलण्यात इतका सहजपणा होता की आम्हीही निर्धास्त झालो. आम्ही मनसोक्त जेवलो. गप्पा झाल्या. मुलींनी घरभर धुमाकूळ घातला. स्वयंसेवक हसत म्हणाला, “सर, आता पुढच्या वेळी आधी लोकसंख्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा.“ मीही हसत म्हणालो, “पुढच्या वेळी आधी पोळ्यांची संख्या विचारा.“ घरात पुन्हा एकदा हशा पिकला. जेवण झालं. निरोपाची वेळ आली. तो मला गाडीपर्यंत सोडायला आला. मी सहज म्हणालो,“वहिनींचं खरंच कौतुक वाटलं.” तृप्त मनाने गाडीत बसलो. त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर ते भरलेलं ताट नव्हतं... त्या ताटामागचं मन उभं होतं. त्या रात्री मला संघाची शाखा दिसली नाही... पण शाखेचे संस्कार दिसले. त्या रात्री मला मोठी इमारत दिसली नाही... पण मोठं मन दिसलं. त्या रात्री मला राष्ट्रप्रेम भाषणात ऐकायला मिळालं नाही... ते एका साध्या घरात जगताना पाहायला मिळालं. मला पूजनीय संघचालकांचे शब्द आठवले संघामध्ये स्वयंसेवक दिसो अगर न दिसो मात्र स्वयंसेवकांमध्ये संघ दिसायला हवा आणि तो संघ आज त्या घरामध्ये, त्या व्यक्तीमध्ये आणि त्या ताईमध्ये दिसून आला. आज कोणी विचारलं, ”संघ म्हणजे काय?” तर मी कोणतंही पुस्तक पुढे करत नाही... मी त्या स्वयंसेवकाचं घर आठवतो. कारण... राष्ट्रप्रेम घोषणा देऊन सिद्ध होत नाही. ते पाहुण्याच्या ताटात वाढलेल्या शेवटच्या पोळीत दिसतं आणि स्वतः उपाशी राहूनही आम्ही जेवलो आहोत असं हसत सांगणार्‍या स्वयंसेवकाच्या पत्नीच्या चेहर्‍यावर दिसतं. त्या रात्री... एका साध्या घरात मला राष्ट्रप्रेम भेटलं होतं.
 
लेखक कृष्णा मुरमे हे जव्हारचे शिवव्याख्याते, इतिहास संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

दिलीप करंबेळकर

दिलीप दामोदर करंबेळकर

मूळ गाव : पट्टणकुडी

शिक्षण    : बीएस्सी, एम.बी.ए.

 

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कोल्हापूर व गोव (1976-1980) कालावधीत होते.

मराठी साप्ताकिक विवेक, दैनिक मुंबई तरुण भारत,शिल्पकार चरित्रकोश प्रकल्प यांचे प्रबंध संपादक आहेत, तसेच त्रैमासिक ज्येष्ठपर्व, वैद्यराजचे ते सल्लागार आहेत.

विवेक व्यासपीठ व सेवाभावी आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे विश्वस्त.

सामाजिक अभ्यास आणि समाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण यासाठी कार्यरत असणाऱ्या स्पार्क या संस्थेचे संचालक

विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर या स्वयंसेवी संस्थेचे संचालक

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष.

श्रीरामजन्मभूमी  लढयाचा अन्वयार्थ विकृत मानसिकतेचा पंचनामा व भारत - पाकिस्तान: एक सांस्कृतिक युध्द ही पुस्तके प्रकाशित.