डिंक (DINK) - आधुनिक विचार की धोक्याची घंटा?

विवेक मराठी    09-Jul-2026
Total Views |
@डॉ. माधवी अ. मोहरील
8380066154
 

DINK 
आजची उच्चशिक्षित तरुण पिढी आर्थिक स्थैर्य आणि व्यक्तिस्वातंत्र्यासाठी ‘मूल नको’ म्हणजेच ‘डिंक’ (DINK) जीवनशैलीकडे वेगाने आकर्षित होत आहे. पाश्चात्त्य देशांचे अंधानुकरण करून स्वीकारलेला हा पर्याय वरवर आधुनिक वाटत असला, तरी त्याचे परिणाम कौटुंबिक आणि राष्ट्रीय पातळीवर गंभीर असू शकतात. ही नवी विचारसरणी भारतीय कुटुंबव्यवस्थेला आणि लोकसंख्येच्या संतुलनाला तडे देणारी एक धोक्याची घंटा आहे, यावरच प्रस्तुत लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे.
नुकत्याच एका कार्यशाळेत, बदलत्या शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यवसायिक व कौटुंबिक संदर्भात ‘डिंक’ व ‘सिंक’ या नव्या जीवन पद्धतीबाबतचा विचार चर्चेला आला. ‘डबल इन्कम नो किड्स- डिंक’ (DINK) आणि ‘सिंगल इन्कम नो किड्स-सिंक’ (SINK). ‘झेन झी’ (1997 ते 2012 या काळात जन्मलेली पिढी जी आता 14 ते 29 या वयोगटातील आहे) आणि त्या आधीची ‘मिलेनियल्स’ (1981 ते 1996 काळात जन्मलेली आता 30 ते 45 या वयोगटातील आहे) एका वेगळ्याच विचारव्यवस्थेचे स्वागत करीत आहेत. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय अशा समाजाच्या आकाराने मोठ्या, युवा वर्गात ‘डिंक’ आणि ‘सिंक’ या संकल्पना परिचयाच्या होत आहेत. आश्चर्य म्हणजे त्याचे समर्थन होत आहे आणि येणार्‍या काळात त्या स्वीकार्य पण होऊ शकतात. नवीन पिढीला कायमच नवीन विचारांचे ‘थ्रिल’ वाटत असते. औत्सुक्य असते. परंतु काही संकल्पना आधुनिक वाटत असल्या तरी त्यांच्या स्वीकारानंतर, काही वर्षांनी दिसणारे त्याचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवर गंभीर व दूरगामी परिणाम करतात.
 
 
प्रगतीची भरारी आणि वाढती असुरक्षितता
 
भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर होताना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अनेक अंगांनी अनेक सकारात्मक बदल भारतीय समाज स्वीकारत गेला. विशिष्ट कारणांमुळे तयार झालेल्या लिंगभेदाच्या भिंती पार करून दारिद्य्ररेषेच्या वर उठून, शैक्षणिक संस्थांची उपलब्धता वाढवत, पायाभूत सुविधांचा विकास करत, वेगाने आर्थिक महासत्तांच्या तालिकेत वरच्या नंबरवर चढत आहे. अशा वेळी मागे वळून समाजात होणारे सांस्कृतिक बदल बघणे बंधनकारक ठरते. भारतीय समाजात गेल्या 75 वर्षांत दारिद्य्राच्या संकल्पना बदलल्या आहेत. गरिबाच्या झोपडीत टीव्ही, फोनच्या रूपात जग जवळ आले आणि सोशल मीडियाने अख्ख्या जगाशी कनेक्ट असूनही वैयक्तिक आयुष्याची चौकट मात्र आकुंचित केली.
 
 
परिणामतः शिक्षण, कौशल्य असणार्‍या तडफदार हुशार, तरुण पिढीला मोठाल्या पॅकेजच्या नोकर्‍या मोहात पाडू लागल्या. ‘मेहनत-पैसा’, ‘खूप मेहनत-खूप पैसा’ या समीकरणात ‘मी, माझा, माझ्यापुरता’ किंवा ‘मी, माझी, माझ्यापुरती’ असे विचार जोर धरू लागले. कुटुंब व सामाजिक बांधिलकी सोडून व्यक्तिकेंद्रित संस्कृती विकसित होताना, गोष्टींची सहज उपलब्धता, आभासी जगातल्या आभासी आनंदाच्या आभासाने, सुखसोयीयुक्त घर, गाडी, बँकबॅलन्स याला प्राधान्य देण्याने तरुणतरुणींची लग्नाची वये वाढली.
 
 
सारख्या पॅकेजचा सक्षम जोडीदार शोधून चारीही हातांनी भरपूर मेहनत करत जोडपी आर्थिक सुबत्तेच्या मागे धावू लागली. वेगाने धावताना आपला स्पीड कमी झाला तर नुकसान होईल, व्यवसायिक आर्थिक वेग कमी होईल आणि आपण स्वतःला सिद्ध करण्याच्या स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ या विचाराने घाबरलेल्या, असुरक्षित वाटणार्‍या, भेदरलेल्या जोडप्यांनी स्वीकारलेला पर्याय म्हणजे ‘डिंक-डबल इनकम नो किड्स’!
 
 
 
’मूल नको’चा वाढता ट्रेंड
एक आर्थिक गणित
 
नुकत्याच एका प्रतिष्ठित नियतकालिकामध्ये एका लेखाने मोठ्या वादाला तोंड फोडले, विषय होता ‘डिंक’. गुरुग्राम येथे महागड्या वस्तीत राहणार्‍या एका उच्चशिक्षित भारतीय जोडप्याचे, दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 36 लाख असणार्‍या म्हणजेच मासिक वेतन जवळपास तीन लाख रुपये महिना असतानाही, ‘मूल नको’ हा पक्का निर्णय घेण्याचे कारण त्यांच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे जर ते या पगारात एक स्वत:चा फ्लॅटही घेऊ शकत नाहीत; तर मुलाची जबाबदारी कशी पूर्ण करू शकणार? त्यांच्या विचारानुसार मूल झाल्यास प्रत्येक महिन्याला वाढणारा 30 ते 35 हजार रुपये महिना खर्च ते पेलू शकणार नाहीत. पुढे वाढत जाणार्‍या गरजांमुळे होणारा खर्च विचारात घेता, ‘डिंक’ हा पर्याय त्यांनी स्वीकारला.
 
 
सर्वेक्षणानुसार शहरी भागांमध्ये उशिरा मूल होऊ देणार्‍या वा मूल नको म्हणणार्‍या विवाहित जोडप्यांचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. वर्तविलेल्या अंदाजानुसार जागतिक स्तरावर 2050पर्यंत अनेक विकसित देशांमध्ये 45 टक्के जोडपी मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेणारी असतील. असे झाल्यास ‘डिंक’ हा विचार भारतातदेखील एक शांत, गंभीर व खोल परिणाम करणारा शास्त्रीय लोकसंख्या बदल ठरेल. लाखोंचे पॅकेज असतानादेखील स्वतःला ‘गरीब’ समजत मूल न सांभाळू शकणार्‍या विचारसरणीच्या युवकांची संख्या दरवर्षी वाढते आहे, हे विशेष. मध्यम वर्गातदेखील हा विचार येतोय, हे नुकत्याच पाहिलेल्या ‘हे काय नवीन?’ या मराठी वेब सिरीजने अधोरेखित केले आहे.
 
पालकत्वापेक्षा ‘कम्फर्ट झोन’ला प्राधान्य
 
या विचारांमागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केल्यावर ती लक्षात आली, ती अशी :
 
* लग्न झालेल्या तरुण जोडप्यांना आर्थिक साठवणूक हवी आहे, भरपूर इन्व्हेस्टमेंट, जगभर प्रवास करायचा आहे, छान घर बांधायचे आहे, आपल्या आवडी जपायच्या आहेत.
 
* या सगळ्यात मुलांची जबाबदारी घेणे हा त्यांना सगळ्यात मोठा अडथळा वाटतो आहे.
 
* त्यांना चढत्या व्यावसायिक शिडीवर नवीन आव्हाने पेलून अधिकाधिक व्यवसायिक पातळीवर आपले नाव, स्थान निर्माण करायचे आहे.
 
* यामध्ये मुलांच्या जबाबदार्‍या सांभाळताना त्यांना व्यावसायिक यशात तडजोड नको आहे.
 
* आपल्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये त्यांना ‘मूल’ हा मोठा व्यत्यय वाटतो.
 
* स्वत:ला वेळ द्यायचा आहे, त्याचबरोबर जोडीदाराला प्राधान्य देताना ‘पालक’ म्हणून भूमिका मात्र स्वीकारायची नाही.
 
* पालकत्वातून निर्माण होणारा ताण वाढवून घेण्यापेक्षा आराम, स्वतःची काळजी आणि आर्थिक स्थिरता या गोष्टी त्यांना जास्त महत्त्वाच्या ठेवायच्या आहेत.
 
* काही जोडप्यांना बदललेल्या जीवनपद्धतीत बाळाची जबाबदारी घेतल्यास, ‘आर्थिक दृष्टीने त्याला चांगले शिक्षण, आरोग्य, सुविधा देऊ शकू की नाही’ ही शाश्वती नाही.
 
* बदलते पर्यावरण, वाढते प्रदूषण, ढासळती मूल्यव्यवस्था, असुरक्षितता यांसारख्या समस्यांमध्ये आपण आपले मूल सुरक्षितरीत्या मोठे करू शकू की नाही बाबतही काहींना भीती वाटत असल्याचे जाणवते.
 
* उच्च शिक्षण व उच्च उत्पन्न याची वाढ अशी होते की कमी उत्पन्न आणि स्पर्धेत हरवण्याची भीती पिढीची वंशवृद्धीचा विचार संपवून टाकते.
 
‘डिंक’चे समर्थन करणारी ही व अशी अनेक कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर समाजातील सांस्कृतिक बदलांबाबत विचार करता मोठा बदल होईल तो नवीन पिढीच्या मानसिक आरोग्यात व देशाच्या लोकसंख्या असंतुलनामध्ये हे लक्षात येते.
 

DINK 
 
कुटुंबव्यवस्थेचा आधार आणि नात्यांची वीण
 
सृजनाच्या सुंदर जबाबदारीसाठी निसर्गाने स्त्रीची निवड केली. मूल जन्माच्या प्रक्रियेत केंद्रबिंदू ठरते ती ’आई’. बाळाच्या अस्तित्वापासून त्याला आपल्या गर्भात धारण करणारी आई, बाळ झाल्या क्षणी तिचे आईपण जन्माला येते आणि बाळाच्या वयाबरोबर तीदेखील मोठी होत जाते. आईपणाच्या वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध होत जाते. गर्भात बाळ आकार घेताना तिचा भावनिक कोषदेखील रुंदावत जातो. इवल्या इवल्या हातापायांच्या हालचालींनी, छोट्या छोट्या डोळ्यांच्या स्वप्नांनी जेव्हा बाळ जग बघते, बाळाचे असणे, दिसणे, बघणे, हसणे, रडणे या गोष्टींनी तिचे सगळे आयुष्य व्यापते.
 
आपली बौद्धिक, मानसिक, भावनिक क्षमता घेऊन जन्माला येणारे मूल जसेजसे वाढत जाते; तसे तसे आई आपल्या क्षमतेच्या कक्षा विस्तारत जाते. स्त्री ही ‘आई’ म्हणून मोठी होताना आपसूकच तिच्यात निर्णयक्षमता, समस्या निवारण कौशल्य, संयम, भावनिक बुद्धिमत्ता, काळजी घेण्याचे कौशल्य, संरक्षण कौशल्य विकसित होत जातात. स्वतःच्या संपूर्ण क्षमतेने आई ही आपल्या लेकरांना घडवत असते.
 
 
पृथ्वीवरील सगळ्यात सुंदर गोष्ट, ‘प्रेम’, बाळ आपल्या निरागसतेने फक्त आईलाच नाही तर अख्ख्या घराला देत असते. लहान मूल असणारे घर आपोआप लहान होते, हसते, गाणी म्हणते, गोष्टी सांगते, अगदी नाचतेसुद्धा!
 
 
आई-बाळासोबत जन्म घेतो तो ‘बाबा’. घरी येणारे बाळ बाबाला जबाबदार बनवते, घरात बांधून ठेवते, त्याच्यातला ओलावा अधिक घट्ट करते, काळजी शिकवते. बाळासोबत बाबादेखील मोठा होत असतो आणि आईसारखीच त्याच्याही क्षमता कौशल्यांची ओळख त्याला बाळाच्या येण्याने आपसूकच होत जाते. अनेक सुंदर नात्यांना सुख देणारे घरातील लहान मूल असते. लहान मुले असणारी घरे जास्त खेळती आणि उत्साही असतात. आजीआजोबा लहान होतात, मुलांचे लहानपण पुन्हा नव्या रूपात अनुभवतात. मुला-मुलींच्या पिढीतले मतभेद नातवांच्या आगमनाने लोप पावतात.
 
 
आत्या, काका, मावशी, मामा, दादा, ताई कितीतरी सुंदर नाती मुले आपल्यासोबत घेऊन येतात. कुटुंबातील टवटवीतपणा जिवंत ठेवतात, आपल्या जन्माने अनेक अंगाने कुटुंब समृद्ध करत असतात. भारतीय संस्कृतीचा पाया, कुटुंबव्यवस्था मजबूत करतात. त्यांच्या आगमनाच्या चाहुलीनेच आयुष्यातील मरगळ, रटाळपणा, तोचतोपणा नष्ट होऊन उत्स्फूर्तपणे जगण्याला कारण मिळते.
‘डिंक’ या संकल्पनेचा विचार येताच समाजाला पुनरुज्जीवित करणारी, सृजनाचे सातत्य टिकवणारी प्रक्रिया थांबू शकते आणि त्याचे भयावह परिणाम फक्त जोडप्यांपुरते मर्यादित न राहता कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था आणि पर्यायाने राष्ट्रव्यवस्था उद्ध्वस्त करू शकते.
 
जागतिक दुष्परिणाम : पाश्चात्त्य देशांमधील वास्तव
 
युरोपियन देशांनी अनेक वर्षांपूर्वी व्यक्तिस्वातंत्र्याच्या पुरस्काराला सुरुवात केली. कुटुंबव्यवस्था नाकारली. 1995ला प्रकाशित झालेल्या डेव्हिड ब्लँकेनहॉर्न यांच्या ‘फादरलेस अमेरिका’ या पुस्तकाने कुटुंबव्यवस्था नाकारल्याचे गंभीर परिणाम जगासमोर आणले. मुलांची जबाबदारी एकट्या आईने स्वीकारल्याने त्यांचा संपूर्ण भावनिक विकास न होता समाजात असुरक्षितता, अपराध आणि वाढत्या मानसिक समस्यांचा सुकाळ झाला.
 
 
या पुढचे धोकादायक पाऊल म्हणजे ‘संपूर्ण व्यक्ती स्वातंत्र्य’. जेथे ‘मूल नको’ तेथे हा पर्याय व्यवस्थेने निवडला. या निर्णयाचे स्वागत करताना याच प्रगत म्हणविल्या जाणार्‍या अमेरिकेतील 20% महिला आता वयाच्या अशा टप्प्यांवर पोहोचल्या आहेत की जेथे आई होण्याचा पर्याय त्यांच्यासाठी संपून गेलाय. जर्मनी आणि इटली यांसारख्या देशातही हेच चित्र समोर येतेय. जपानमध्ये 25% विवाहित जोडपी ‘डिंक’चा पर्याय स्वीकारताना दिसतात.
 
 
आज सर्वाधिक लोकसंख्येचा म्हणून ओळखीचा असणारा चीन हा देशदेखील याच समस्येचा सामना करताना उद्या वेगळ्याच समस्यांना तोंड देईल. आजची मोठ्या लोकसंख्येची पिढी उद्या म्हातारी होताना त्यांना पर्याय असणारी नवी पिढी अर्ध्या लोकसंख्येची असली तर देशाचे कौटुंबिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, अर्थिक स्वरूप कसे राहील? आज संपूर्ण जगात सगळ्यात तरुण असणारा भारत आणखी 30 वर्षांनी वृद्धत्वाकडे वाटचाल करेल तेव्हा भारताचे चित्र कसे राहील?
 

DINK 
 
 
‘कुटुंब प्रबोधन’ ही काळाची गरज
 
आजूबाजूला पाहता भारतामध्येही आज मोठ्या शहरांमध्ये लाखोंची पॅकेजेस असणारी, सुशिक्षित म्हणवली जाणारी अनेक जोडपी या विचाराला बळी पडत असलेली दिसत आहेत. ज्या शिकलेल्या पिढीने आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊन राष्ट्रकार्यात हातभार लावावा ती सुशिक्षित पिढी कुटुंबधर्म मान्य करण्यास तयार नाही. ‘डिंक’ या जीवनशैलीचे आई-वडील, आजी-आजोबा म्हणून कुटुंबाचे अपयश ठरू नये. आज कुटुंबव्यवस्था टिकावी, मोठी व्हावी यासाठी ही जबाबदारी घेणे प्रत्येक भारतीयाची गरज आहे. कुटुंब टिकले तर समाज टिकेल आणि समाज टिकला तरच राष्ट्र सक्षम होईल. ‘डबल इन्कम नो किड्स’, ‘सिंगल इन्कम नो किड्स’ यांसारखे विचार नवीन पिढीवर हावी होण्याआधी ‘पंच परिवर्तना’तील ‘कुटुंब प्रबोधन’ हा विषय समजणे गरजेचे आहे.
 
वैचारिक युद्ध आणि बदलती मानसिकता
 
आज युद्धाची पद्धत बदलली आहे. दारूगोळ्यांशिवायचे युद्ध सायबर मंचाच्या सोबतच वैचारिक पातळीवरही खेळले जात आहे. कुटुंबव्यवस्था हा पाया असणार्‍या भारताची ओळख खोडून काढण्यासाठी, भारताशी खेळल्या जाणार्‍या युद्धाचे प्यादे, भारताचीच हुशार पिढी भारताविरुद्ध उभे करण्याची ताकद या वैचारिक बदलांची आहे. संख्येने कमी होत जाणारा समाज कुठल्याही शत्रूशिवाय आपले अस्तित्व नष्ट करू शकतो.
 
 
आधुनिकतेच्या स्वतंत्रता, व्यक्तिवादाच्या संकल्पनांच्या आड, जाणीवपूर्वक विचारात रुजवली जाणारी ‘डिंक’ वा ‘सिंक’ यांसारखी विचारपद्धती, इस्रायल-मुस्लीम समुदायात स्वीकार्य नाही. इस्रायलमधील ज्यू हे उच्चशिक्षित उच्च उत्पन्नाचे असूनही त्यांचा जन्मदर जगाच्या सरासरीच्या वर आहे. कारण त्यांची त्यांच्या देशाप्रती असणारी कटिबद्धता व सांस्कृतिक ठेवण. मुस्लीम कुठेही असोत, त्यांचा उत्पन्न व शिक्षण गट कसाही असो त्यांचा जन्मदर सरासरीच्या वर असलेला दिसतो.
 
 
या संदर्भात, भारतात सुशिक्षित अशा व्यावसायिक क्षेत्रांत यशस्वी कार्य करणार्‍या पिढीत ‘डिंक’चा विचार रुजतो आहे, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हा विचार आपोआप रुजतो आहे का? की, अजाणतेपणी नवीन पिढीला स्वातंत्र्य, व्यक्तिवाद यांचा गोड मुलामा देऊन विचित्र विचारांच्या पाशात अडकवले जात आहे? ‘वैचारिक स्लीपर सेल्स’ या वैचारिक युद्धात सक्रिय आहेत का?
 
 
आजचे निर्णय ‘उद्या’ घडवीत असतात. आज आर्थिक सुरक्षितता, व्यावसायिक प्रगती, जगभराचा प्रवास यांना प्राधान्य देत, ‘मूल नको’ हा विचार स्वीकारल्यास किती नवे प्रश्न ‘जेन झी’ उद्यासाठी तयार करेल??
 
‘पेट पेरेंटिंग’ आणि राष्ट्रवृद्धीचा संकोच
 
संपूर्ण जगात, साऊथ कोरिया, हाँगकाँग, सिंगापूर, जपान, युक्रेन, इटली, स्पेन, जर्मनी इत्यादी देश कमी जन्मदराच्या संकटाचा सामना करायला लागले आहेत. अमेरिकेच्या आर्थिक सत्तेला मागे टाकण्याचा प्रयत्न करणारा चीन ’लग्न नको, मूल नको’ या नव्या पिढीच्या समस्येपायी त्रस्त आहे. या देशांनी भौतिक प्रगती भरपूर साधली; परंतु राष्ट्राला राष्ट्र म्हणून टिकवून ठेवणारी जनसंख्या मात्र हळूहळू कमी होत चालली आहे. लोकसंख्येच्या वाढीने जगावर राज्य करण्याची स्वप्ने बघणार्‍या वर्गाचे हिंदू समाजातील ‘डिंक’ वा ‘सिंक’ यांसारख्या विचारांच्या अंमलबजावणीने आयतेच साधणार आहे. सुंदर संस्कृती म्हणून भारतीय समाजासाठी ही धोक्याची घंटा आहे.
 
 
भारताचा एकूण जन्मदर काही दशकात सातत्याने कमी होत असला तरी विकसित देशांच्या तुलनेत जास्त आहे. परंतु नजीकच्या भविष्यात ही चिंता भारतीय समाजाला सतावू शकते. उच्च वर्गात आणि उच्च मध्यम वर्गात या विचाराचे आगमन झाले आहे. तरुण पिढीत हा विचार ओळखीचा झाला आहे. प्रेम करणे, जीव लावणे, काळजी घेणे ह्या नैसर्गिक अभिव्यक्तींच्या गरजा कौटुंबिक जीवनात माणूस सहजतेने पूर्ण करतो. ‘मूल नको’ म्हणणार्‍या दोघांच्या घरात या नैसर्गिक अभिव्यक्तींचा पर्याय ‘पेट पेरेंटिंग’ पूर्ण करतेय. महागडी कुत्री, मांजरींची पिल्ले घरी आणून, त्यांची काळजी घेऊन, प्रेमाची गरज भागविणारी जोडपी वाढत चालली आहेत.
 
 
समाजात सर्वार्थाने विकास, शांतता नांदावी यासाठी सुशक्ती मोठ्या संख्येत राहावी ही प्राथमिक गरज असते. पितृऋण संकल्पना मानणार्‍या आपल्या देशातील या विचारवाढीचा वेग सध्या जरी कमी असला तरी देशाचे नेतृत्व करणार्‍या उच्चशिक्षित पिढीने याबाबत सजगतेने विचार करायला हवा. ‘डिंक’ वा ‘सिंक’ यांसारखे विचार नवीन पिढीत रुजण्याआधी व त्यांच्या स्वीकाराआधी सजग होणे आवश्यक आहे.
 
 
मोकळेपणाने नवीन पिढीशी बोलून, कुटुंब विस्तारताना, नवीन जिवाची जबाबदारी घेताना सक्षम आणि हुशार पिढीला व्यावसायिक प्रगतीसोबतच सकारात्मक, भावनिक पूरकत्वाची जाणीव करून द्यावी लागेल. कुटुंब म्हणून, समाज म्हणून भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे रहावे लागेल. कुटुंबवृद्धी केवळ कुटुंबापुरती मर्यादित न राहता राष्ट्रवृद्धी या दृष्टीने विचार केल्यास उद्याचे चित्र वेगळे असेल. राष्ट्र प्रगतीचा अखंड प्रवाह पुढे चालत राहण्यास सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ‘डिंक’चा स्वीकार हा मोठा धोका आहे.