स्पोर्ट्स फोटोग्राफी

Total Views |

sportssports photography
 
 
आजच्या डिजिटल युगात स्पोर्ट्स फोटोग्राफी हे फक्त फोटो काढण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. क्रीडा छायाचित्रणासाठी आज विविध माध्यमं उपलब्ध आहेत. योग्य माध्यम (Medium) निवडणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक माध्यम वेगवेगळ्या प्रकारच्या संधी निर्माण करतं.
आतापर्यंतच्या खेळावर बोलू काही ह्या लेखमालेतून आपल्या लक्षात आलं असेल की आजच्या युवा पिढी समोर क्रीडा क्षेत्रातील किती तरी व्यवसायाचे पर्याय आहेत.
 
अशाच अजून एका अतिशय महत्त्वाच्या आणि काळानुसार बदलणार्‍या विषयाबद्दल आपण जाणून घेणार आहोत-आपल्या मुलांच्या करिअरच्या नव्या संधींबद्दल.
 
पूर्वी करिअर म्हटलं की डॉक्टर, इंजिनिअर, CA असे काही ठरलेले पर्याय आपल्यासमोर असायचे. पण आजचा काळ वेगळा आहे. आज कौशल्य, आवड आणि संधी यांचा संगम म्हणजे करिअर बनत आहे आणि, अशाच एका उदयोन्मुख क्षेत्राबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत - स्पोर्ट्स फोटोग्राफी.
 
 
खेळातील एखादा महत्त्वाचा क्षण-जिंकण्याचा आनंद, पराभवाची वेदना, प्रेक्षकांचा उत्साह-हे सगळं एका फोटोमध्ये जिवंत ठेवण्याची कला म्हणजे स्पोर्ट्स फोटोग्राफी. आज प्रत्येक क्रीडा स्पर्धा, प्रत्येक टुर्नामेंट, प्रत्येक इव्हेंटला एक चांगला फोटोग्राफर आवश्यक असतो. आज सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि क्रीडा पर्यटन (Sports Tourism) यांमुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत आहेत.
 
आपण एखादा सामना पाहायला जायचा की नाही? एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं की नाही? हे आपण फोटो आणि व्हिडिओ पाहूनच ठरवतो. म्हणजेच, एक फोटोग्राफर अनेक लोकांच्या निर्णयावर प्रभाव टाकतो.
 
हे क्षेत्र मुलांसाठी का महत्त्वाचं आहे?
 
* आवडीला दिशा मिळते : ज्यांना खेळ आणि फोटो काढण्याची आवड आहे, त्यांना योग्य व्यासपीठ मिळतं.
 
* करिअरच्या नवीन संधी : फक्त खेळाडूच नव्हे, तर खेळाशी संबंधित इतर क्षेत्रांतही भविष्य आहे.
 
* आत्मविश्वास आणि कौशल्य विकास : निरीक्षण, क्रिएटिव्हिटी, जबाबदारी वाढते.
 
जर युवा पिढीला ह्या क्षेत्रात यायचं असेल तर, अगदी सोप्या पद्धतीने सुरुवात करू शकतात;
 
* मोबाईलनं फोटो काढण्यापासून सुरुवात करणं.
 
* शाळा/स्थानिक स्पर्धा कव्हर करणं.
 
* Instagram वर फोटो शेअर करणं.
 
सुरुवातीला महागडा कॅमेरा आवश्यक नाही.
 
उदा. - एक विद्यार्थी सुरुवातीला शाळेतील क्रिकेट सामन्यांचे साधे फोटो काढायला लागला. त्याच्या फोटोमधली मेहनत आणि वेगळेपण लोकांच्या लक्षात येऊ लागलं. हळूहळू त्याला स्थानिक क्लबकडून फोटो काढण्याची संधी मिळाली. जस जसा अनुभव वाढत गेला, तस तसा पुढे तो मोठ्या स्पर्धांमध्येही काम करू लागला.
 
अशा प्रकारे एक छोटीशी आवड, योग्य प्रयत्न आणि सातत्य यांमुळे कौशल्यात बदल झाले आणि पुढे त्याचं यशस्वी करिअरमध्ये रूपांतर व्हायला सोपं गेलं.
 
ह्या ठिकाणी पालक म्हणून आपली भूमिका खूप महत्त्वाची ठरते.
 
*मुलांच्या आवडी समजून घेणं.
 
* त्यांना प्रोत्साहन देणं.
 
* शिक्षण आणि कौशल्य यांचा समतोल ठेवणं.
* योग्य मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देणं.
ह्या क्षेत्रात येण्यासाठी काही आवश्यक कौशल्ये लागतात.
* वेळ आणि निरीक्षण कौशल्य - योग्य क्षणी फोटो क्लिक करणे. (जसे की विकेटचे क्षण)
 
* तांत्रिक ज्ञान - कॅमेरा सेटिंग्ज (शटर स्पीड, लाइटिंग, अँगल)
 
* क्रीडा समज - खेळाची समज असल्यास योग्य क्षण ओळखता येतो.
 
* सर्जनशीलता आणि कथाकथन - फोटो फक्त सुंदर नसावा, तो एक कथा सांगणारा असावा.
 
* संयम आणि सातत्य - प्रत्येक क्लिक परफेक्ट नसतो; पण सातत्य महत्त्वाचं.
 
‘आयपीएल‘, ‘प्रो कबड्डी मोठ्या लीग्स’, ’मॅरेथॉन स्पर्धा’, ’शालेय स्पर्धा’, ’साहसी क्रीडा पर्यटन’ (ट्रेकिंग, जलक्रीडा) यांंसारख्या इव्हेंट्सना व्यावसायिक क्रीडा छायाचित्रकारांची गरज असते. आजच्या डिजिटल युगात स्पोर्ट्स फोटोग्राफी हे फक्त फोटो काढण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. क्रीडा छायाचित्रणासाठी आज विविध माध्यमं उपलब्ध आहेत. योग्य माध्यम (Medium) निवडणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक माध्यम वेगवेगळ्या प्रकारच्या संधी निर्माण करतं.
 
मोबाईल फोटोग्राफी - आज जवळजवळ प्रत्येक मुलाकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे ही सुरुवातीची आणि सर्वात सोपी पायरी आहे.
उदा : शाळेतील क्रिकेट किंवा कबड्डी सामन्यांचे फोटो मोबाईलनं काढून व्हाट्सअँप किंवा इंस्टाग्रामवर शेअर करणं.
DSLR / Mirrorless कॅमेरा - हे प्रोफेशनल स्तरावरील फोटोग्राफीसाठी वापरले जातात.
उदा : फुटबॉल मॅचमध्ये खेळाडू धावत असताना त्याचा स्पष्ट फोटो काढण्यासाठी DSLR वापरला जातो.
 
ड्रोन फोटोग्राफी - मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये वरून घेतलेलं दृश्य खूप आकर्षक दिसतात.
 
उदा : मॅरेथॉन, सायकल रेस किंवा क्रिकेट ग्राउंडचे एरियल शॉट्स
 
अ‍ॅक्शन कॅमेरे (GoPro) - हे कॅमेरे खेळाडूंच्या अगदी जवळून अ‍ॅक्शन कॅप्चर करण्यासाठी वापरले जातात.
 
उदा : सर्फिंग, स्केटिंग, सायकलिंग करताना खेळाडूच्या दृष्टीकोनातून घेतलेले शॉट्स.
 
व्हिडिओ फ्रेम्स - आजकाल व्हिडिओ शूट करून त्यातून सर्वोत्कृष्ट क्षणाचे फोटो काढले जातात. उदा : क्रिकेटमध्ये बॉल बॅटला लागण्याचा अचूक क्षण व्हिडिओमधून कॅप्चर करणं.
 
एडिटिंग आणि सॉफ्टवेअर साधनं - फोटो काढल्यानंतर त्याला आकर्षक बनवण्यासाठी एडिटिंग खूप महत्त्वाचं असतं. उदा : गडद फोटोला ब्राइटनेस देणं, त्यातील रंग वाढवणं, ज्या अर्थी अंतिम आउटपूट अधिक आकर्षक आणि व्यावसायिक बनू शकतो.
सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म - फोटो काढल्यानंतर त्याला योग्य प्लॅटफॉर्मवर पोहोचवणं महत्त्वाचं आहे. उदा : एखाद्या स्थानिक टुर्नामेंटचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होणं.
 
वृत्तपत्र / मासिकं- आजही वृत्तपत्रांमध्ये क्रीडा छायाचित्रणाला मोठं स्थान आहे. उदा : एखाद्या क्रिकेट सामन्याचा फोटो पुढच्या दिवशी पेपरमध्ये छापला जाणं.
 
थोडक्यात काय तर माध्यम बदलत जातील; पण तुमची आवड आणि सातत्य तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आज स्पोर्ट्स फोटोग्राफी ही फक्त एक छंद किंवा साइड स्किल राहिलेली नाही. ती मोठ्या स्पोर्ट्स इंडस्ट्रीचा एक महत्त्वाचा आणि वाढता भाग बनली आहे.
 
काही सर्व्हेनुसार;
 
2024मध्ये जागतिक क्रीडा उद्योगाची किंमत अंदाजे 477+ अब्ज होती आणि पुढील काही वर्षांत ती 600+ अब्जपेक्षा जास्त जाण्याची अपेक्षा आहे.
 
 
2030पर्यंत भारतातच, स्पोर्ट्स मार्केट 130 अब्ज पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
 
स्पोर्ट्स मीडिया इंडस्ट्री (ज्यात फोटोग्राफी समाविष्ट आहे) 12-17% CAGR वाढत आहे.
 
याचाच अर्थ : जिथे एवढा मोठा पैसा आणि व्यावसायिक वाढ आहे, तिथे फोटोग्राफीसारख्या स्पोर्टींग करिअरची मागणी प्रचंड वाढण्याची अपेक्षा आहे.
 
खेळ मैदानावर जिंकला जातो; पण त्याची कहाणी जगभर पोहोचवणारा फोटोग्राफर असतो.
 
- लेखिका क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि मेंटॉर आहेत आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स अ‍ॅडव्हायझरीच्या संचालिका आहेत.

वैशाली भिडे बर्वे / अ‍ॅड. रुपाली ठाकूर

- लेखिका क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि मेंटॉर आहेत आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स अ‍ॅडव्हायझरीच्या संचालिका आहेत.