निवृत्तीनंतरची अनोखी पर्यावरण सेवा

विवेक मराठी    09-Jul-2026
Total Views |
@सुहास विष्णू याडकीकर, श्रीरामपूर
8888438580
 
 

Environment 
देशभक्ती केवळ शब्दांतून नव्हे, तर कृतीतून दाखवायची असते. आपल्या छोट्याशा प्रयत्नांनी देखील पर्यावरणाचे मोठे रक्षण होऊ शकते. एका सजग नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा वापर आणि वृक्षारोपण करून निसर्गरक्षणाचा एक आदर्श पायंडा पाडला आहे, त्याचाच हा प्रेरणादायी प्रवास...
देशभक्ती ही फुकट मिरवायची गोष्ट नाही, त्यासाठी त्याग करावा लागतो. हे विचार केवळ बोलण्यासाठी नसून प्रत्यक्ष जगण्यासाठी असतात. पर्यावरणाचे रक्षण करणे हीसुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे. याच विचाराने प्रेरित होऊन मी माझ्या दैनंदिन जीवनात काही छोटे पण महत्त्वाचे बदल केले.
 
 
मी आठवड्यातून एक दिवस, म्हणजेच शनिवारी, माझ्या घरापासून कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी सायकलचा वापर सुरू केला. घर ते ऑफिस हे अंतर पाच किलोमीटरचे आहे. सायकल चालवण्याच्या या निर्णयामुळे मला अनेक फायदे झाले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझी गाडी जेव्हा घरातून रस्त्यावर येते, तेव्हा त्यातून निघणारा धूर हवेत मिसळतो. सायकलमुळे हे वायू प्रदूषण पूर्णपणे टळले. पेट्रोलची मागणी कमी झाल्यामुळे देशाची आयात कमी झाली आणि मौल्यवान परकीय चलन वाचले. जुलै 2017मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून मी आता नियमित सायकल चालवतो. याचा एक गमतीशीर फायदा नुकताच झाला. इराण-अमेरिका युद्धाच्या वेळी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी झाली होती. नियमित सायकल चालवण्यामुळे मी त्या गर्दीत नव्हतो. माझे पेट्रोल आणि देशाचे परकीय चलन दोन्ही वाचले.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त ’पंचसूत्री’ जाहीर केली आहे. यामध्ये ’पर्यावरण’ या महत्त्वाच्या सूत्राचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक मा. नानासाहेब जाधव यांनी सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण 3 ’पी’मुळे करता येईल. ते म्हणजे 1) पेड (झाडे), 2) पाणी आणि 3) प्लास्टिकचा त्याग. त्यानुसार मीही काम करण्यास सुरुवात केली.
 
 
मी माझ्या घराच्या आवारातील काही फरशा काढल्या आणि तिथे छोटी रोपे लावली. सुरुवातीला तिथे फक्त फुलझाडे होती. हळूहळू मी त्यात तुळस, कढीलिंब, आंबा, नागवेली आणि कोरफड यांची भर घातली. एकदा श्रीरामपूर नगरपरिषदेने गाडगेबाबा उद्यानातून मोफत रोपे नेण्याचे आवाहन केले होते. तिथून मी पेरूचे रोप आणून लावले. आज त्या झाडाला दुसर्‍यांदा छान पेरू लगडले आहेत. एका प्रवासात वळद-उंबरगावकडून बेलापूरकडे जाताना मी एका ठिकाणी अळूचा कंद मागितला होता. त्यांनी तो आनंदाने दिला. आज आमच्या घरच्या सांडपाण्यावर तो अळू छान बहरला आहे.
 
 
या झाडांमुळे हवेतील कार्बन डायऑक्साइड कमी झाला आणि आम्हाला शुद्ध प्राणवायू (ऑक्सिजन) मिळू लागला. झाडाच्या सावलीत मांजर विसावू लागले. चिमण्यांसारखे पक्षी झाडावर येऊन पेरू खाऊ लागले. निसर्गाशी जोडले जाण्याचा हा आनंद खूप मोठा आहे.
 
 
पाणी बचतीसाठी मी एक नियम केला आहे. पाण्याची मोटार भरल्यानंतर जे पाणी वाया वाहून जाते, ते मी बादलीत भरून घेतो आणि झाडांना घालतो. अशा प्रकारे पाण्याची मोठी बचत होते.
 
 
प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी मी घराबाहेर पडताना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवतो. दुकानात वस्तू घेतली की गजरेवाला, बेकरीवाला किंवा फळवाला यांचा हात लगेच प्लास्टिक कॅरीबॅगकडे जातो. अशा वेळी मी त्यांच्याकडून नवीन कॅरीबॅग घेत नाही. मी माझ्यासोबत नेहमी जुन्याच कॅरीबॅग ठेवतो आणि नवीन प्लास्टिक घेण्यास नकार देतो.
 
 
पर्यावरण रक्षणाचा हा माझा ’खारीचा वाटा’ आहे. आपण सर्वांनी असे छोटे प्रयत्न केले, तर आपली पृथ्वी नक्कीच सुंदर आणि राहण्यायोग्य बनेल.