उमेश सुर्यकांत राणे
9930988559
जुन्या स्वयंसेवकांचे कोकणातील स्नेहमिलन हा केवळ भौगोलिक प्रवास नव्हता. तो संघसंस्कारांच्या सुगंधाचा प्रवास होता. एका पिढीने दुसर्या पिढीला दिलेल्या संस्कारांचा, कृतज्ञतेचा आणि नात्यांना जपण्याच्या भारतीय स्नेहपरंपरेचा हा प्रवास होता. आगामी काळात अनेक स्वयंसेवक वेगवेगळ्या ठिकाणी जातील, नवी पिढी संघकार्य करेल; पण अशा स्नेहमिलनातून एक संदेश निश्चितच पुढे जात राहील. माणसे दूर जातात, शाखा बदलतात, काळ बदलतो; पण संस्कारांनी जोडलेली मने कधीच दूर जात नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत घडणारे संस्कार हे केवळ शाखेच्या मैदानापुरते मर्यादित नसतात. प्रार्थना, व्यायाम, खेळ, बौद्धिक आणि शिस्त यांमधून निर्माण होणारा स्नेह स्वयंसेवकांच्या मनात आयुष्यभर रुजत जातो. काळ पुढे सरकतो, माणसे वेगवेगळ्या दिशांना जातात, वास्तव्य बदलते; पण संघाने जोडलेली मने मात्र तुटत नाहीत. अंधेरी पूर्वेतील जुन्या स्वयंसेवकांचे नुकतेच झालेले कोकणातील स्नेहमिलन हे याच संघसंस्काराचे सुंदर आणि हृदयस्पर्शी उदाहरण ठरले.
अंधेरी पूर्व, विशेषतः सहार परिसरात संघकार्य वाढविण्यात चार ज्येष्ठ स्वयंसेवकांचे मोठे योगदान राहिले. अशोक तेंडोलकर, गणपत रहाटे, केशवराव काजरेकर आणि सुधाकर बारसोडे. त्यांच्या सान्निध्यातून आणि मार्गदर्शनातून सहार भागातील शेकडो स्वयंसेवक संघाशी जोडले गेले, घडले आणि समाजजीवनात सकारात्मक योगदान देऊ लागले.
यापैकी एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व अशोक तेंडोलकर सुमारे वीस वर्षांपूर्वी कोकणातील आपल्या तेंडोली या गावी स्थायिक झाले. वृद्ध आईची सोबत आणि सेवा करण्याबरोबरच वडिलोपार्जित सुपारीची बाग सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. मुंबईपासून ते दूर गेले; पण अंधेरीतील जुन्या स्वयंसेवकांच्या मनातून ते कधीच दूर गेले नाहीत.
काळाच्या ओघात अंधेरी सोडून अनेक स्वयंसेवक वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले. मात्र जुन्या आठवणींनी त्यांना पुन्हा एकत्र आणले. दोन वर्षांपूर्वी सहार भागातील स्वयंसेवकांचे स्नेहसंमेलन संपन्न झाले होते. तेव्हा कित्येक वर्षांनी एकमेकांना भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होता. रंगलेल्या गप्पांमध्ये, जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्या आठवणींमध्ये वारंवार एक नाव येत होते, अशोक तेंडोलकर.
अशोकजींच्या आजारी आईला सोडून मुंबईपर्यंत येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आपणच कोकणात जावे, अशी कल्पना पुढे आली. मात्र कामाच्या व्यापामुळे तो बेत काही काळ पुढे ढकलला गेला. त्यानंतर आणखी दोन स्नेहसंमेलने झाली; प्रत्येक वेळी अशोकजींची आठवण झाली आणि कोकणभेटीचा विषय निघाला. शेवटी तो योग आला.
मी आणि मिलिंद जोशी एकदा नरेश खराडे यांच्या तारकर्ली येथील घरी भेट देण्याकरिता गेलो असताना त्यांचे अशोकजींच्या तेंडोलीतील घराला भेट देण्याचे ठरले. सुमारे 35 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही त्यांना भेटलो. निसर्गरम्य परिसरातील त्यांचे घर, साधे जीवन आणि भेट होताच चेहर्यावर उमटलेला आनंद या सगळ्याने मन भरून आले. त्या भेटीत आम्हां तिघांच्या मनात एक विचार आला. आपण तिघे जाऊन अशोकजींना भेटलो, तर ज्यांनी त्यांच्यासोबत वर्षानुवर्षे संघकार्य केलेले ते सर्व जुने स्वयंसेवक एकत्र आले तर अशोकजींना किती आनंद होईल! आणि या विचाराचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत झाले.
’अंधेरी जुने स्वयंसेवक’ या स्वयंसेवकांच्या व्हॉट्सअॅप समूहावर कोकणातील स्नेहमिलनाचा संदेश देण्यात आला. गणपत रहाटे, केशवराव काजरेकर, सुधाकरराव बारसोडे आणि ज्येष्ठ प्रचारक रमेश देसाई यांच्या उपस्थितीत 21 ते 23 ऑगस्टदरम्यान हा स्नेहप्रवास करण्याचे ठरले. संदेश जाताच अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबईहून 16 जण आणि पुण्याहून किशोर बडेकर व रमेश देसाई असे एकूण 18 स्वयंसेवक सहभागी झाले.
21 ऑगस्टच्या सकाळी 6.30 वाजता अंधेरीतील आशीर्वाद बिल्डिंगखाली सर्व जण जमू लागले. कित्येक वर्षांनी स्वयंसेवक एकमेकांना भेटत होते. एकमेकांना भेटताना जणू अनेक वर्षांचे अंतर क्षणात नाहीसे झाले. विशेष म्हणजे प्रकृती अस्वास्थ्य असूनही केशवराव काजरेकर इतक्या मोठ्या प्रवासाला आले होते. सर्वांच्या मनात एकच उत्सुकता होती, अशोकजींना कधी भेटतोय! ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात कोकण प्रवासाला सुरुवात झाली.
प्रवासात अडथळेही आले. वडखळ-नागोठणे परिसरात बसचा टायर फुटला. टायर बदलणे आणि स्टेपनीची व्यवस्था करण्यात सुमारे तीन तास गेले. पुन्हा एकदा टायरचा त्रास झाला. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा उशीर झाला; पण या विलंबाने प्रवासाचा उत्साह कमी झाला नाही. उलट हायवेवर उतरून गप्पा, आठवणी आणि विनोद करत सर्वांनी त्या प्रसंगालाही स्नेहाचा भाग बनवून टाकले.
चिपळूण-आरवलीजवळ पार्ल्यातील जुने सहकारी उदय बोडस यांना फोन करण्यात आला. आपण अशोकजींना भेटायला जात आहोत हे समजताच पायाच्या अपघातामुळे अडचण असूनही ते अण्णा बेलवलकर यांना सोबत घेऊन कारने बसच्या पुढे निघाले आणि अशोक तेंडोलकरांना भेटायला आले. हा कोणता धागा होता, जो इतक्या वर्षांनंतरही सर्वांना एकमेकांकडे खेचत होता? तो धागा होता संघसंस्कारांचा, संघ बंधुभावाचा.
रात्री जवळपास 12.00 वाजता आम्ही नरेश खराडे यांच्या गावी तारकर्लीला पोहोचलो. अशोकजी आतुरतेने तेथे आमची वाट पाहत दारात उभे होते. भेट होताच अनेकांनी त्यांना घट्ट मिठी मारली. इतक्या वर्षांचा विरह त्या एका मिठीत विरघळून गेला आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे अशोकजी लगेच सर्वांच्या व्यवस्थेत गुंतले. दुसर्या दिवशी सकाळी तारकर्ली समुद्रकिनारी प्रभात शाखा भरली. व्यायाम, योग, खेळ आणि प्रार्थनेने वातावरण भारावून गेले. शाखा सुरू असताना अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी तर सर्वांमधील बालपणच जागे केले. स्वयंसेवक समुद्रकिनारी तेच पूर्वीचे संघाचे खेळ खेळले, गोल रिंगण करून नाचले. सर्वांच्या वयाची सारी बंधने त्या क्षणी गळून पडली होती. यानंतर मालवण येथील राजकोट येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी निर्माण केलेल्या ’सुवर्ण गणपतीच्या मंदिरा’चे दर्शन घेण्यात आले.
पुढच्या दिवशी तेंडोलीला अशोकजींच्या घरी जाण्याचा योग आला. निसर्गाच्या कुशीत वसलेले त्यांचे घर म्हणजे साधेपणा, आपुलकी आणि ग्रामीण जीवनाचा सुंदर अनुभव होता. अशोकजींनी गावातील महिलांना बोलावून कोकणी वडे आणि भोजनाची तयारी केली होती. वहिनीही भोजनाच्या लगबगीत होत्या.
पंगत बसली. केशवरावांनी ‘वदनी कवळ घेता’ म्हटले. भोजनमंत्र झाला. अशोकजी स्वतः प्रत्येकाला प्रेमाने वाढत होते. त्या भोजनात केवळ अन्न नव्हते; त्यात अनेक वर्षांच्या स्नेहाची चव होती.
निरोप घेताना अशोकजींनी सर्वांना गावची आठवण म्हणून नारळाच्या वड्या दिल्या. भेटवस्तू छोटी होती; पण त्यामागची भावना अमूल्य होती. परतीच्या प्रवासात जांभवडे गावातील काजरेकर कुटुंबाच्या सुमारे अडीचशे वर्षे जुन्या घराला भेट देण्यात आली. तेथील वयोवृद्ध भाऊ-वहिनींची प्रेमळ भेट घेतली. जुन्या घराच्या भिंतींमध्ये इतिहास होता, आणि त्या घरातील आपुलकीत संघजीवनाचा तोच स्नेह जाणवत होता. या संपूर्ण प्रवासाकडे पाहताना जाणवते की, हा केवळ ‘जुन्या मित्रांचा सहलीचा कार्यक्रम’ नव्हता. ही कृतज्ञतेची यात्रा होती. स्मृतींची पुनर्भेट होती. संस्कारांना केलेला नमस्कार होता.
संघाच्या शाखेत अनेक वर्षांपूर्वी रुजलेली मैत्री काळ, अंतर आणि परिस्थितीच्या पलीकडे जाऊन टिकून राहिली होती. अशोकराव तेंडोलकर यांसारख्या ज्येष्ठ स्वयंसेवकांनी एका पिढीला घडविले; ती पिढीने त्यांना विसरली नाही. उलट, त्यांच्या कार्याची आठवण मनात जपून त्यांना भेटण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास केला. संघकार्याचे खरे यश कदाचित याच्यात आहे. शाखा संपते, पण संस्कार संपत नाहीत; स्वयंसेवक दूर जातो, पण स्नेह दूर जात नाही; काळ बदलतो, पण संघभावना मनात कायम राहते.
अंधेरी येथून सुरू झालेला नरेश खराडे यांच्या तारकर्ली येथील घरावरून तेंडोलीपर्यंत झालेला हा प्रवास केवळ भौगोलिक प्रवास नव्हता. तो संघसंस्कारांच्या सुगंधाचा प्रवास होता. एका पिढीने दुसर्या पिढीला दिलेल्या संस्कारांचा, कृतज्ञतेचा आणि नात्यांना जपण्याच्या भारतीय स्नेह परंपरेचा हा प्रवास होता. आगामी काळात अनेक स्वयंसेवक वेगवेगळ्या ठिकाणी जातील, नवी पिढी संघकार्य करेल; पण अशा स्नेहमिलनातून एक संदेश निश्चितच पुढे जात राहील. माणसे दूर जातात, शाखा बदलतात, काळ बदलतो; पण संस्कारांनी जोडलेली मने कधीच दूर जात नाहीत.
- लेखक अंधेरीतील जुने संघ स्वयंसेवक,
पूर्व कोकण प्रांत बजरंग दल संयोजक आणि मुंबई भाजपा कार्यकारिणी सदस्य आहेत.