नाशिकच्या गणेश मंदिरांतून गानसेवा आणि समाजसेवा

विवेक मराठी    09-Sep-2026   
Total Views |

nashik
‘मेनरोडच्या गणपती’ मंदिराचा गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला संगीताचा उत्सव ही खरी इथली महत्त्वाची परंपरा आहे. तर ब्रिटिशकालीन असलेले ‘रविवार कारंजा मित्र मंडळ’ सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनार्दनसेवा करीत आहे. त्याचबरोबर असलेली शतकोत्तर गणेश मंदिरे ही नाशिकची आध्यात्मिक ओळख अधोरेखित करते.
’मेनरोडचा गणपती’ अशीच ज्याची ओळख आहे; त्या विघ्नहर्त्या गजाननाची सुबक मूर्ती, छोटासा पण प्रसन्न, गाभारा आणि शिसवी महिरपीदार खांबांनी, खास जुन्या थाटाच्या हंड्यांनी सजविलेला सभामंडप अशी या मंदिराची रचना आहे. मंदिरात शिरताच प्रसन्न वाटते. नवख्याच काय, पण खुद्द नाशिककराला देखील मेनरोडच्या धामधुमीत जाता येता पटकन लक्षात येणार नाही. पण, चांदवडकर लेनकडून रविवार कारंजाकडे चालू लागल्यावर अगदी शंभर फुटांवरच डाव्या हाताला हे नाशकातील सुप्रसिद्ध गणेश भक्त मंडळींचे गणपती मंदिर आहे.
 
 
दामोदरपंत डोंगरे, अमृत कुलकर्णी व मित्रमंडळींनी या मंदिराची स्थापना 1891 साली केली. 135 वर्षांच्या इतिहासात शहरातील असंख्य सामान्य व नामवंत मंडळींनी या मंदिराची सेवा केली. रघुनाथराव डोंगरे, विश्वस्त मंडळाची जबाबदारी मनोभावे अनेक वर्षे सांभाळणारे विनायकराव परांजपे, दत्तात्रय अष्टपुत्रे, निष्ठेने मंदिरातील पूजाअर्चा सांभाळणारे अप्पा डोंगरे, विनायक दसककरांसारखे पुजारी या सर्व मंडळींनी आपल्या निष्काम सेवेने मंदिराच्या लौकिकात भरच घातली. रात्रीचे कितीही वाजले, तरी येथे येऊन हात जोडून जाणारे असंख्य भाविक आहेत.
 
 
या मंदिराची खासियत याहून वेगळी आहे. मंदिरात निष्ठेने भाविक येतात. नित्य नवस-सायास, पूजा, अभिषेक होतात. मेनरोडच्या या मंदिरात गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला संगीताचा उत्सव ही खरी इथली महत्त्वाची परंपरा आहे.
 
 
 रघुनाथरावांना गाण्याची आवड असल्याने त्यांनी दर गुरुवारी चौदा विद्यांचा अधिपती असलेल्या गजाननासमोर सेवा म्हणून गायनाची प्रथा सुरू केली. गावातील चार हुन्नरी मंडळी हौशे-नवशे-गवशे, गानलुब्ध श्रोते या सर्वांना हळूहळू गुरुवारची बैठक अंगवळणी पडली. तेव्हापासून आजतागायत दर गुरुवारी कलाकार मंडळी कुठल्याही आमंत्रणाशिवाय रात्री जमतात. गणरायासमोर सेवा रुजू करतात आणि रात्री प्रसाद घेऊन परततात.
 
 
गानसेवेनंतरचा इथला प्रसादही अनोखा असतो. उपस्थित सर्व मंडळींना प्रसाद मिळतो तो चहाचा. ही चहाची परंपरा परांजपे परिवाराने अनेक वर्षे सांभाळली. त्यांच्या घरूनच चहासाठी दूध, साखर, चहापत्ती असे साहित्य पुरविले जाई. या प्रसादाची जबाबदारी गेली अनेक वर्षे रामकृष्ण गोडबोले आणि शंकरराव मोडकांनी सांभाळली होती. आताही चहाची ही परंपरा सुरू आहे.
गुरुवारच्या गाण्याच्या प्रथेबरोबरच गावात आलेल्या नामवंत गायक कलाकारांच्या गायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात येऊ लागले. उ. बिस्मिल्ला खान, पं. कृष्णराव पंडित, गजाननबुवा जोशी, गोविंदराव पटवर्धन, द.वि. उर्फ बापुराव पलुस्कर, मल्लिकार्जुन मन्सूर, राम मराठे, वसंतराव देशपांडे, भारतरत्न भीमसेन जोशी, कुमार गंधर्व यांसारखी ख्यातनाम मंडळी येथे गाऊन गेली आहेत. आताही शंतनू गुणे, मोहन उपासनी, महेश धोडपकर, सतीश पेंडसे, अनिल दैठणकर, नितीन वारे, सुजीत काळे, भगवान खानझोडे हे गजाननाला सेवा देतात. येथे गानसेवा करणारे अनेक कलाकार आज नावारूपाला आले आहेत. ही अर्थातच गणरायाची कृपा आहे.
 
 
चांदीचा सिद्धिविनायक
 
नाशिकची धार्मिक, आध्यात्मिक शहर म्हणून ओळख आहे. नाशिक शहरात शेकडो अधिक लहान मोठी मंदिरे असून, यात अनेक मंदिरे ही पुरातन आहे. नाशिक शहरात सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यातीलच एक मंडळ म्हणजे ’रविवार कारंजा मित्र मंडळ’. हे मंडळ ब्रिटिशकालीन असून या भागात 100 पेक्षा अधिक वर्षांपासून एक गणपती मंदिर आहे. 1978साली या मंदिरात चांदीची मूर्ती बसविण्यात आली.
 
 
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यात रविवार कारंजा मित्रमंडळानेही सक्रिय भाग घेतला होता. गंगाप्रसाद हलवाई हे व्यायामपटू व राष्ट्रभक्त होते. त्यांनी येथे गणेशोत्सव सुरू केला. रविवार कारंजा मित्रमंडळाचा चांदीचा गणपती नाशिककरांचे आकर्षण आहे. हा गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. रविवार कारंजा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव काळात भव्य देखावा साकारण्यात येतो. हा देखावा बघण्यासाठी जिल्हाभरातून भाविक या ठिकाणी येत असतात.
 
मंडळाच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. त्यासोबतच सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप, गरिबांना अन्नदान, रक्तदान, तसेच कोरोना काळात नागरिकांची मोफत अँटीजंट टेस्ट करण्यात आली. गरजूंना मदतीचा हात देण्यात आला. अशीच समाजोपयोगी कामे वर्षभर सुरू असतात.
 
 
याशिवाय गोदावरी तीरावरील मोदकेश्वर, हिंगणे यांचा मदनमदोत्कट, उपनगरचा इच्छामणी, गंगापूर रोडवरील आनंदवल्ली येथील नवशा गणपती, अशोकस्तंभ येथील ढोल्या गणपती, गणेशवाडीतील तिळ्या गणेश ही पूर्वापार श्रद्धास्थाने आहेत.

संजय दामोदर देवधर

  • ज्येष्ठ पत्रकार, आणि आदिवासी वारली चित्रशैली अभ्यासक.

  • नाशिक येथे दैनिक गावकरीमध्ये 34 वर्षे कलाविभाग प्रमुख, वार्ताहर, कलासमीक्षक व उपसंपादक पदावर काम करून निवृत्त. सध्या फ्रिलान्स पत्रकारिता सुरु.

  • शैक्षणिक अर्हता - जी.डी.आर्ट ( ऍप्लाईड ) 1982 साली जे जे स्कुल ऑफ आर्ट येथून अव्वल श्रेणीत उत्तीर्ण.

  • अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांशी निकटचे संबंध व पदाधिकारी म्हणून कार्य. विविध स्पर्धांच्या परीक्षणाचा अनुभव.

  • संशोधनपर कार्य- आदिवासी वारली चित्रशैलीविषयी विशेष संशोधन. कार्यशाळांचे आयोजन करुन अनेकांना वारली कला शिकविण्याचा उपक्रम सुरु. आत्तापर्यंत ५ ते ७५ वयोगटातील हजारो कलाप्रेमींना वारली चित्रकलेचे मार्गदर्शन. परदेशी पर्यटक देखील येऊन वारली कलेचे धडे गिरवतात.

  • वारली चित्रकलेच्या प्रसार व प्रचारासाठी वारली चित्रसृष्टी हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. त्याच्या चार आवृत्त्या लोकप्रिय झाल्या आहेत. Warli Art World या इंग्लिश पुस्तकाच्या दोन आवृत्ती परदेशातही पोहोचल्या आहेत. रसिक वाचकांचा या पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.

  • चित्रसहल या आगळ्यावेगळ्या उपक्रमात आदिवासी पाड्यांवर शहरी कलाप्रेमींना नेऊन वारली जीवनशैली, त्यांची कला यांचे सुरेख दर्शन घडवले जाते. आतापर्यंत अनेकजण सहकुटुंब सहलीत सहभागी झाले.

  • विश्वविक्रम - ऑगस्ट 2018 मध्ये 1100 पेक्षा अधिक स्पर्धकांची ऑन द स्पॉट वारली चित्रस्पर्धा घेतली व दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले. सर्वाधिक सहभागाबद्दल जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड तर चित्रांद्वारे सामाजिक संदेश दिल्याने वंडरबुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले.

  • पत्रकारितेत विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारने सन 2019 मध्ये वारली कलेतील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.