@मधुकर कांबळे
राजाबाजार परिसरातील ‘श्री संस्थान गणपती मंदिर’ हे छत्रपती संभाजीनगर शहराचे प्रमुख धार्मिक केंद्र आहे. सुमारे 350 वर्षांपूर्वी एका पिंपळाच्या झाडाखाली श्री संस्थान गणेशाची काळ्या पाषाणातील स्वयंभू मूर्ती सापडली. मूर्ती स्थापनेनंतर काही वर्षांतच सुरू झालेला मंदिरातील गणेशोत्सव पाहता पाहता लोकप्रियही झाला. शहराचे ग्रामदैवत मानल्या जाणार्या या गणरायाच्या साक्षीने इथल्या प्रत्येक सार्वजनिक उत्सवाची नांदी होते.
छत्रपती संभाजीनगर हे शहर ऐतिहासिक आणि पर्यटननगरी म्हणून जितके वैभवशाली आहे तितकेच ते धार्मिक परंपरेनेही समृद्ध आहे. जुन्या शहराच्या मध्यवर्ती राजाबाजार परिसरात वसलेले ’श्री संस्थान गणपती मंदिर’ हे या धार्मिक वारशाचे प्रमुख प्रतीक आहे. शहरातील कोणत्याही उत्सवाची किंवा शोभायात्रेची सुरुवात येथे गणरायाच्या साक्षीने होते. त्यामुळेच या गणपतीला शहराचे ग्रामदैवत मानले जाते.
स्वयंभू मूर्तीचे ओंकारमय स्वरूप
मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू असून काळ्या पाषाणात साकारलेली आहे. पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची आणि सुमारे दोन फूट उंचीची ही मूर्ती गणपतीच्या ओंकार स्वरूपाशी साधर्म्य दर्शवते. चांदीच्या पत्र्याने मढविलेल्या मखरात विराजमान असलेली ही मूर्ती अत्यंत प्रसन्न व तेजस्वी आहे. मुकुट, कान, डोळे आणि दात चांदीचे असल्यामुळे तिच्या दिव्यतेत अधिक भर पडते. या मूर्तीचे दर्शन घेताच भक्तांच्या मनात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्थानिक आख्यायिकेनुसार, सुमारे 350 वर्षांपूर्वी एका पिंपळाच्या झाडाखाली ही मूर्ती सापडली. मूर्ती नवव्या ते दहाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. प्रारंभी त्या ठिकाणी एक लहान मंदिर उभारण्यात आले. पुढे भक्तांची संख्या वाढत गेल्याने मंदिराचा विस्तार झाला आणि ते आजच्या भव्य स्वरूपात विकसित झाले. 1930साली दादासाहेब गणोरकर यांच्या पुढाकाराने येथे शहरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. तेव्हापासून या गणपतीला शहरातील सर्व सार्वजनिक मंडळांमध्ये पहिले मानाचे स्थान मिळाले आहे. आजही गणेशोत्सवाची सुरुवात या मंदिरातूनच होते.
लोकमान्य टिळक दर्शनासाठी येत
या मंदिराला ऐतिहासिक महत्त्वही लाभले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे छत्रपती संभाजीनगरामध्ये जेव्हा येत असत तेव्हा सर्वप्रथम संस्थान गणपतीचे दर्शन घेत असत. तसेच 1988मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही येथे येऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि नवस फेडताना सुमारे 23 तोळ्यांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला. या घटनांनी मंदिराचे महत्त्व अधिक अधोरेखित केले.
जीर्णोद्धारातून मिळाले आधुनिक स्वरूप
प्रारंभी लाकडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा 1960मध्ये पहिला जीर्णोद्धार झाला. त्यानंतर 1985मध्ये मंदिराचे संगमरवरी बांधकाम करण्यात आले व प्रदक्षिणा मार्गाची सोय करण्यात आली. 2021मध्ये मूर्तीवरील शेंदुराचे जुने थर काढून वज्रलेपन करण्यात आले, ज्यामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप अधिक स्पष्ट झाले. मंदिरात दररोज सकाळी सात वाजता अथर्वशीर्ष पठण केले जाते. चतुर्थीच्या दिवशी विशेष गर्दी असते. गणेशोत्सव, कोजागिरी, जन्माष्टमी, होळी, दिवाळी आदी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात या मंदिरापासूनच होते, ही परंपरा आजही अखंड सुरू आहे. हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून मोफत वाचनालय, दवाखाना आणि विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. त्यामुळे हे मंदिर समाजजीवनाशी घट्ट जोडले गेले आहे. राज्याचे अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, भीकचंद चिचाणी, चंद्रकांत खैरे, किशनचंद तनवाणी, पृथ्वीराज पवार, शंकरलाल जयस्वाल हे मंदिराचे संरक्षक आहेत; तर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संतोष चिचाणी आहेत. याशिवाय सचिव प्रफुल मालानी, उपाध्यक्ष नंदकुमार घोडेले, कोषाध्यक्ष अनिल चव्हाण, सहसचिव सुनिल अजमेरा, तर कन्हैयालाल शहा, जुगल वर्मा, जयेश पुरवार, डॉ. प्रशांत शिंदे, मनोज पराती हे सदस्य आहेत. शहारातील नागरिकांसाठी मंगल कार्याकरिता भव्य व सुविधायुक्त समाज-वास्तू बांधण्याचा विश्वस्त मंडळाचा मानस असल्याचे सांगण्यात आले.
श्रद्धा, संस्कृती,समाजसेवेचा संगम
’श्री संस्थान गणपती’ नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते. श्रद्धेने केलेली प्रार्थना येथे नक्की पूर्ण होते, असा अनुभव अनेक भक्तांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच दूरदूरहून भाविक येथे येऊन आपल्या मनातील भावना गणरायासमोर व्यक्त करतात. गणेशोत्सवाच्या काळात गणरायाच्या मूर्तीला दररोज सुवर्ण अलंकारांनी सजवले जाते. तसेच संपूर्ण मंदिर दररोज आकर्षक ताज्या फुलांनी सजवण्यात येते. ’श्री संस्थान गणपती मंदिर’ हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून श्रद्धा, संस्कृती आणि समाजसेवेचा सुंदर संगम आहे. येथे येणार्या प्रत्येक भक्ताला आत्मिक शांती, मानसिक समाधान आणि जीवनाला नवी दिशा मिळते. म्हणूनच, आयुष्यात किमान एकदा तरी या पवित्र स्थळाला भेट देऊन श्री गणपतींचे दर्शन घ्यावे.
अन्नदान ते गोसेवा
श्री संस्थान गणपती ट्रस्टचा सामाजिक वसा
छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत असलेल्या श्री संस्थान गणपती मंदिराने केवळ धार्मिक परंपरा जपण्यावर भर न देता, नेहमीच व्यापक सामाजिक बांधिलकी जपली आहे. भक्तीसोबतच समाजसेवेचा आदर्श घालून देत मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.
* संस्थान गणपती मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी केवळ धार्मिक नव्हे; तर सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा व अन्य राष्ट्रीय कार्यातही सक्रिय योगदान आहे. मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.
* गणेशोत्सवाच्या काळात संस्थान गणपती मंदिर परिसरात पूर्ण दहा दिवस महाप्रसादाचे आयोजन केले जाते. रोज दुपारी अडीच ते चार या वेळेमध्ये अन्नदान केले जाते. सुमारे 2500-3000 हजार भाविक पंगतीत प्रसाद ग्रहण करतात. अशाप्रकारे दहा दिवस अन्नदान करणार्या मंदिरांपैकी ‘श्री संस्थान गणेश’ हे एक आहे.
* मंदिराच्या वतीने शाळकरी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी चित्रकला स्पर्धा घेतली जाते.
* मंदिर विश्वस्त मंडळातर्फे रुग्णांना मदत, आरोग्य शिबिरे अशा वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात.
* दुष्काळसदृश्य परिस्थितीमध्ये चारा टंचाई उद्भवल्यानंतर यापूर्वी अनेकदा गोशाळांना विश्वस्त मंडळातर्फे चारा वाटप करण्यात आले.
* गणेशोत्सवाच्या काळात भव्य स्वरुपात सामुदायिक गणपती अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ज्यामध्ये शेकडो श्रद्धाळू, विद्यार्थी सहभागी होऊन गणपती अथर्वशीर्षाचे पठण करतात.