‘साप्ताहिक विवेक’ ने 2007 साली हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले. वृत्तपत्राच्या इतिहासात साठ वर्षांचा कालखंड लहान नाही. साप्ताहिकाच्या इतिहासात हा कालखंड तसा खूप मोठा समजला पाहिजे. विवेकपूर्वी सुरू झालेली आणि नंतर सुरू झालेली अनेक साप्ताहिके काल-प्रवासात लुप्त झाली आहेत. काळ बदलत असतो, तसे तंत्रज्ञान बदलते. लोकांच्या आवडीनिवडीसुद्धा बदलतात. कालानुरूप बदल करण्यात ज्यांना यश येते, ते कालप्रवाहात टिकून राहतात. साप्ताहिक विवेक पूर्वी मोठ्या आकारात (ब्लॉइड फॉर्म) निघत असे. आता तो मासिकाच्या आकारात निघतो. 1996 पर्यंत विवेकचे मुखपृष्ठ कधी कृष्णधवल तर कधी दुरंगी असे. आत्ताचे मुखपृष्ठ पूर्णपणे रंगीत असते. पूर्वी विवेक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वैचारिक लेखांनी भरलेला असे; आता माहिती देणारी आणि रंजन करणारी विविध सदरे ‘विवेक’मध्ये द्यावी लागतात. काळानुरूप काही बदल ‘विवेक’मध्ये झाले असले, तरी काही बाबतीत अजिबात बदल झालेले नाहीत. ‘विवेक’ कशासाठी चालवायचा हे स्पष्ट आहे. विवेक केवळ माहिती देण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी चालवायचा नसून लोकजागृती करण्यासाठी चालवायचा, हा ‘विवेक’चा उद्देश आहे. तो साठ वर्षांपूर्वीही होता आणि आजही आहे.

लोकजागृतीचे काही विषय कालनिरपेक्ष असतात आणि काही कालसापेक्ष असतात. हिंदू समाजाचे प्रश्न, हिंदू समाजावर होत असलेली आक‘मणे, हिंदू माणसाची उदासीनता, हिंदुहिताच्या बाबतीत नसलेली जागरूकता, हिंदू समाजातील जातीय कलह, अस्पृश्यतेचे प्रश्न असे अनेक विषय साठ वर्षांपूर्वीही होते आणि आजही आहेत. याबाबतीत न थकता, न कंटाळता, आळस न करता सतत जागृती करत राहावे लागते. हे व्रत आहे आणि एकदा व्रत स्वीकारले की व्रताचे यमनियम पाळावे लागतात.

काही प्रश्न परिस्थितीसापेक्ष असतात. नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना, बॉंबस्फोटासार‘या दहशतवादी घटना, आर्थिक-सामाजिक-धार्मिक आंदोलने इत्यादी विषय परिस्थितीसापेक्ष असतात. त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार भूमिका घ्यावी लागते आणि विचार मांडावे लागतात. जे समाजहिताचे तेच परखडपणे मांडायचे, ही ‘विवेक’ची भूमिका आजवर राहिलेली आहे. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात प्रकाशित झालेले ‘विवेक’चे वेगवेगळे विशेषांक याची साक्ष देतील. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घटनांची माहिती गोळा करण्याचे काम या कालखंडात ‘विवेक’ने केले. यामुळे बाबरी ढाचा कोसळतानाची जी छायाचित्रे अन्यत्र कोठेही प्रकाशित झाली नाहीत, ती ‘विवेक’मध्ये आली. याच कालखंडात सुरू झालेल्या मंडल आयोग आंदोलनातही निश्चित आणि सुस्पष्ट भूमिका मांडणारे लेखन ‘विवेक’मध्ये प्रकाशित झाले. ‘राखीव जागा- का व कशासाठी?’ आणि ‘मंडल आयोग’ या भि.रा. इदाते यांच्या दोन पुस्तिका याच काळात प्रकाशित झाल्या. ‘विवेक’चे संपादक दिलीप करंबेळकर यांची अयोध्या आंदोलनाची मीमांसा करणारी पुस्तिका याच काळात प्रकाशित झाली.

आपल्या देशात सामाजिक आंदोलने प्रबळ होत जाणार, सामाजिक न्यायाचे विषय ऐरणीवर येत जाणार, हे रामजन्मभूमी आंदोलनापासूनच निश्चित झाले होते. ‘विवेक’नेही सामाजिक आंदोलनांशी बांधिलकी स्वीकारली. सामाजिक समरसतेचे अनेक विषय स्वीकारले. 1987 साली महाराष्ट्रात ‘रिडल्स ऑफ राम अॅीन्ड कृष्ण’ या विषयावरून वादंग उठले. दलित आणि दलितेतर अशी समाजाची विभागणी अधिक तीव्र झाली. शिवसेनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित रिडल्सविरोधात भूमिका घेतली. दलित संघटनांनी समर्थनाची भूमिका घेतली. साप्ताहिक ‘विवेक’ने समन्वयाची भूमिका घेतली. याच काळात ‘राम विरुद्ध आंबेडकरि समाज पोखरणारा वाद’ ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. तसेच ‘विवेक’च्या अथक प्रयत्नांमुळे रा. स्व. संघ, महाराष्ट्रानेही रिडल्सवादात समाजाला जोडणारी भूमिका घेतली. रिडल्सवादात सन्मानाने जो तोडगा निघाला, त्यात ‘विवेक’ची भूमिका महत्त्वाची ठरली.

या काळात बाळासाहेब गायकवाड यांचे ‘ख्रिस्ती महार’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाची मुखपृष्ठकथा ‘विवेक’ने केली होती. या मुखपृष्ठकथेमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ख्रिस्ती महार हा विषय उचलून धरला आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय विषयसूचीवर एक वर्ष हा विषय गाजत राहिला. 1987 साली डॉ. गंगाधर पानतावणे समरसता परिषदेला आले म्हणून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीने त्यांना बहिष्कृत केले. त्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी ‘विवेक’ने उपलब्ध करून दिली.

1990 पासून महाराष्ट्रात भटके-विमुक्त विकास परिषदेच्या कामाला सुरुवात झाली. भटके-विमुक्त समाजाचे प्रश्न विविध प्रकारे समाजापुढे आणण्याचे काम ‘विवेक’ने स्वीकारले. 1993 सालापासून यमगरवाडीचा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पाच्या मागेही ‘विवेक’ ठामपणे उभा राहिला. 1993 सालापासूनच गिरीश प्रभुणे यांचे लेखन ‘विवेक’मध्ये प्रकाशित होऊ लागले. दर दिवाळी अंकात एकेका भटक्या-विमुक्त जमातीचा परिचय त्यांनी कथारूपाने करून दिला. या लेखांचे पुढे ‘पालावरचं जिणं’ या नावाने पुस्तक प्रकाशित झाले. त्याचा महाराष्ट्रात विक्रमी खप झाला. 1995 साली ‘विवेक’चे कार्यकारी संपादक रमेश पतंगे यांचे ‘मी, मनू आणि संघ’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाची हिंदी, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड अशा विविध भाषांत भाषांतरे झाली. पुस्तकाचा मुख्य आशय हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आणि व्यवहार यांत विषमतेला कणमात्रही थारा नाही, हे स्वतःच्या अनुभवातून मांडणे असा आहे.

यमगरवाडी प्रकल्पापाठोपाठ मगरसांगवी, अनसरवाडा, नेरले या गावी आणखी काही प्रमुख प्रकल्प उभे राहिले. या प्रकल्पांची पैशाची गरज फार मोठी आहे. सुरुवातीला एक प्रयोग करण्यात आला. ‘विवेक’च्या वाचकांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी वर्गणीसोबत महिन्याला एक रुपया याप्रमाणे 12/- रुपये प्रकल्पाला दान द्यावेत. या आवाहनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता दर वर्षी भटके-विमुक्त विकास प्रकल्पासाठी सहा ते सात लाख रुपये उभे केले जातात. सा. विवेक या सर्व प्रकल्पांचा एक प्रमुख आधारस्तंभ झाला आहे. ‘विवेक’च्या विविध लेखांमधून भटके-विमुक्त समाजाच्या दैन्य-दुखि बरोबर प्रगतीच्या कथाही वारंवार प्रकाशित केल्या जातात.

2006 साली प्रकाशित केलेल्या ‘कृतिरूप समरसता’ या तथात भटके-विमुक्त समाजाच्या भावपूर्ण कथा, परिवर्तनाच्या कथा दिलेल्या आहेत. पारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारून अनन्वित अन्याय आणि अत्याचार होतात. त्यांना वाचा फोडण्याचे काम कैक वेळा ‘विवेक’ने केले आहे. दुर्योधन काळे या पारधी युवकाची पोलिसांनी हत्या केली. या हत्येची पूर्ण बातमी ‘विवेक’मध्ये प्रकाशित झाली. पुढे या हत्याप्रकरणी पोलीस निलंबित झाले. त्यांच्यावर खटला भरला गेला आणि त्यांना शिक्षाही झाली.

राष्ट्रीयदृष्ट्या अनेक महत्त्वाच्या विषयांचा पाठपुरावा ‘विवेक’ सातत्याने करीत असतो. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येविषयी गावोगावी प्रवास करून त्याची माहिती संकलित करून ‘विवेक’मध्ये वेळोवेळी प्रकाशित केली गेली आहे. पाण्याच्या प्रश्नावर माधवराव चितळे यांचे ‘भारतीय जलक्रांतीची पदचिन्हे’ हे पुस्तकच ‘विवेक’ने प्रकाशित केले आहे. भारतात धार्मिक लोकसंख्येचे संतुलन बिघडून हिंदू समाज अल्पसंख्य होण्याच्या मार्गावर आहे. या विषयावरील जनजागृती करणारा ‘तुमचा नातू हिंदू राहील का?’ हा विशेषांक केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गाजला. याच विषयावरील ‘हिंदू अल्पसंख्य होणार का?’ हे पुस्तक ‘विवेक’ने प्रकाशित केले.

गेली दहा वर्षे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथनिर्मितीच्या कामात ‘विवेक’ गुंतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख प्रचारकांचा तसेच संस्थांचा धावता इतिहास ग्रंथबद्ध करण्याचे काम ‘विवेक’ने केले आहे. आत्तापर्यंत अमृतपथ, राष्ट्रसाधना, संघगंगोत्री, राष्ट्ररत्न अटलजी, राष्ट्र-ऋषी श्रीगुरुजी, भाजपा-ध्येयपथावरील पंचवीस वर्षे, कृतिरूप समरसता, समाजसंघटक दामुअण्णा, शिवराय तेलंग स्मृतिगंध. या ग्रंथांमुळे संघअभ्यासकांना संदर्भासाठी लिखित साहित्य उपलब्ध झाले आहे. मराठी वृत्तपत्रांतून संघविषयक चर्चा जेव्हा चालते, तेव्हा वरील ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून उपयोग केला जातो.

राष्ट्रीय विषयावरील आणखी काही महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन ‘विवेक’ने सातत्याने केले आहे. संघर्ष महामानवाचा, जेव्हा गुलाम माणूस होतो, भट्टी ओतार्‍याची, इस्लामी दहशतवाद- जागतिक आणि भारतीय, वंदे मातरमची आत्मकथा, अशी काही ठळक पुस्तके आहेत. मनि सर्व शक्तीचे आगार, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या इंग्रंजी कवितांचा मराठी भावानुवाद - माझी जीवनयात्रा, सतीश हावरे यांच्यावरील आर्यक हे पुस्तक अशा काही वेगळ्या विषयांचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल.

शिल्पकार चरित्र-कोश या प्रकल्पाद्वारे ग्रंथनिर्मितीच्या प्रकल्पातील धाडसी पाऊल आम्ही टाकत आहोत. मराठी बाणा घडविणार्‍या विविध क्षेत्रीय स्त्री-पुरुषांचा परिचय करून देणारे बारा खंड प्रकाशित करण्याची योजना आहे.