गुरूच्या परीसस्पर्शाने प्रतिभेला झळाळी

विवेक मराठी    23-Jul-2016   
Total Views |

कलावंताच्या आयुष्यात गुरूंचं योगदान अतिशय मोलाचं असतं. ज्ञानदान करता करता त्याच्या जगण्यालाच दिशा देण्याचं काम गुरू करतात. कलाकाराची प्रतिभा निःसंशय महत्त्वाची असते, पण योग्य वयात चांगला गुरू मिळणंही तितकंच महत्त्वाचं. आदित्य ओक हे सध्याचे आघाडीचे हामोर्निअम वादक आणि संगीत संयोजक. आदित्य यांचे वडील डॉ. विद्याधर ओक हे स्वतः उत्कृष्ट हार्मोनिअम वादक. वडलांचे गुरू ऋषितुल्य  पं. गोविंदराव पटवर्धन यांच्याकडे शिकण्याचा योग आदित्य ओक यांना आला. आपल्या गुरूंची शिकवण, त्यांचं आयुष्यातील स्थान यावर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने टाकलेला प्रकाश...


आज संगीत क्षेत्रात अनेक तरुण गायकांची, वादकांची नवी फळी तयार होतेय. अनेक तरुण करिअर म्हणून या क्षेत्राचा विचार करताना आणि सिध्द करताना दिसतात. आदित्य ओक हे वादन क्षेत्रातलं असंच आघाडीचं नाव. हार्मोनिअम, ऑर्गन वादनात यांचा हातखंडा आहे. अनेक सिनेमांचं संगीत संयोजनही त्यांनी केलं आहे. खूप लहान वयात पं. गोविंदराव पटवर्धन या हार्मोनिअम वादन क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीकडून शिकण्याचं भाग्य ओक यांना लाभलं. याविषयी ते सांगतात,

''वयाच्या एखाद्या टप्प्यावर गुरू म्हणून एखादी व्यक्ती पर्वतासारखी आपल्यासमोर उभी राहते. पण माझ्या बाबतीत मात्र थोडं वेगळं घडलं. माझ्या जन्माच्याही आधीपासून गोविंदरावांचं आमच्याकडे येणं-जाणं होतं. माझे बाबा डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते आमच्याकडे यायचे. मला आजोबांसारखेच वाटायचे आणि लहान मुलं खेळण्याशी खेळतात तसा मी त्यांच्या पेटीशी खेळायचो. तिच्यावर उडयासुध्दा मारायचो. त्यांनीही कधी मला त्यापासून परावृत्त केलं नाही. मला वाटतं त्यामुळेच पेटीबद्दल मला भीती कधीही वाटली नाही. थोडक्यात, गुरू म्हणजे काय याची जाणीव होण्याच्या आधीच माझं आणि त्याचं अतिशय अकृत्रिम असं नातं तयार झालं.''

वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली. गुरुजींच्या शिकवणीबद्दल आदित्य अगदी भरभरून सांगत होते. ''बाबांच्या इच्छेमुळे मी पेटी शिकायला लागलो. वादनाच्या क्षेत्रातलं गुरुजींचं ज्ञान, त्यांची शैली, त्यांचा आवाका संपूर्ण जगाला माहितीये. पण शिक्षक म्हणूनही तितकेच श्रेष्ठ होते. त्यांनी मला शाळेत शिकवतात तसं पुस्तकी पध्दतीने कधी शिकवलंच नाही. ते स्वतः एखादी सुरावट पेटीवर वाजवून दाखवायचे. नाही समजली तर पुन्हा पुन्हा आपल्याला समजेपर्यंत वाजवून दाखवायचे. ती विशिष्ट सुरावटीची जागा त्यांच्यासारखी येईपर्यंत आपण वाजवायची. यामुळे एखादी जागा वाजवून बघायची सवय आपोआप लागली. पुन्हा पुन्हा वाजवायचा कधीतरी फारच कंटाळा यायचा, तेव्हा ते म्हणायचे - ''येईपर्यंत वाजव, म्हणजे कंटाळा निघून जाईल.'' यामुळे न कंटाळता रियाज करायची मला सवय लागली. माझं शिकण्यातलं कुतूहल कायम टिकून राहण्यात या सवयीचा भाग मोठा होता. एखादी सुरावट येईपर्यंत मला तिच्याविषयी कुतूहल वाटत राहायचं.

बऱ्याचदा रात्री उशिरा ते संगीत नाटकाचा प्रयोग संपवून यायचे आणि त्यानंतर मला शिकवायचे. कधीकधी इतका उशीर व्हायचा की मला झोप अनावर होत असे. मी झोपायला जायचो तेव्हा त्याचं वादन सुरू असायचं. अपरात्री कधीतरी मला जाग यायची, तेव्हाही ते वाजवतच असायचे. त्यांना निद्रानाशाचा विकार होता. पण झोप येत नाही किंवा दमलोय म्हणून त्यांना नुसतंच रिकामं बसलेलं कधी पाहिल्याचं आठवत नाही. जेव्हा जेव्हा मला कंटाळा येतो, तेव्हा गुरुजींचं हेच रूप मी डोळयासमोर आणतो.''


रागदारी संगीत क्षेत्रात ग्वाल्हेर, किराणा, आग्रा अशी अनेक घराणी आणि त्या घराण्याचे वारसदार तयार झाले. मुळात हार्मोनिअम या वाद्याला सुरुवातीच्या काळात रागदारी क्षेत्रात मानाचं स्थान मिळालं नाही. त्यामुळे हार्मोनिअम वादनाच्या क्षेत्रात घराणी फारशी विकसित झाली नाहीत. पण काही व्यक्तींनी हार्मोनिअमच्या क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंआणि त्या व्यक्तींचंच पुढे घराण तयार झालं, अशांपैकीच एक म्हणजे पं. गोविंदराव पटवर्धन आणि त्यांचे तिसऱ्या पिढीतले आपण वारसदार आहोत याचा अत्यंत अभिमान असल्याचं आदित्य ओक सांगतात. ''आपली शैली येणाऱ्या प्रत्येक पिढीकडे संक्रमित होत जाण्यातूनच पुढे घराणे तयार होतं. माझे बाबा डॉ. विद्याधर ओक, मी आणि आता माझी पुढची पिढी गोविंदराव पटवर्धन नावाच्या एका घराण्याचा वारसा पुढे नेत आहोत.''

आपल्याकडे पेटी दोनशे वर्षांपूर्वी आली. हार्मोनिअम हे मूळचं फ्रेंच वाद्य. एकीकडे रवींद्रनाथ टागोरांसह स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या अनेकांनी परदेशी वाद्य म्हणून तिच्यावर बहिष्कार घातला. दुसरीकडे पेटीच्या सुरांना भारतीयत्वाचा स्पर्श नसल्याचीही टीका झाली. त्यात ऑल इंडिया रेडिओने हार्मोनिअमवर बंदी आणली, ती आत्ता 2007 साली उठवली. मधला काही काळ फक्त 'अ' दर्जाच्या कलाकारांना नभोवाणीवर या वाद्याचा वापर करण्याला परवानगी होती. या सगळया प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला या क्षेत्रात सिध्द करणं हेच पं. गोविंदराव पटवर्धनांचं श्रेष्ठत्व असल्याचं ओक सांगतात.

''हार्मोनिअमच्या साडेतीन सप्तकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या गुरुजींनी वादनाचं कोणतंही तांत्रिक शिक्षण घेतलेलं नव्हतं.  कोणत्या स्वरासाठी कोणतं बोट वापरायचं, असं विचारलं तर ते म्हणायचे - मी फक्त वाजवतो. बाकीचं काही मला माहीत नाही. त्यातून मला आनंद मिळतो असं ते सांगायचे.

वादनातला सफाईदारपणा हे त्यांच्या वादनाचं वैशिष्टय होतं. अतिशय जलद आणि सफाईदार पलटे ते वाजवत असत. पेटीवादन हे दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे प्रत्येक स्वर सुटासुटा वाजवणं आणि दुसरा म्हणजे जोडून वाजवणं. गोविंदराव या दोन्ही पध्दतींनी वाजवायचे. त्यांची दुसरी खासियत म्हणजे ते पद वाजवताना त्यातले शब्द ऐकू आले पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. त्यामुळे शिकवतानाही ते त्याच पध्दतीने शिकवायचे. या सगळयाचा मला आज साथ करताना किंवा संगीत संयोजन करताना खूप उपयोग होतो.


ते बाराही पट्टयांमध्ये पेटी वाजवू शकायचे. एकदा मी त्यांना त्याबद्दल विचारलं, तेव्हा म्हणाले - पट्टया पेटीवर नाही, मनगटात असतात. गोविंदरावांबरोबर मी 150हून अधिक संगीत नाटकं पाहिली. नाटकात साथ करताना वादकानेही संहितेचं भान ठेवावं लागतं. संहिता लक्षात घेऊन नेमका केव्हा सूर द्यायचा हे समजलं पाहिजे, असं ते सांगायचे. एक ज्येष्ठ वादक असूनही साथ करताना स्वतःचा अभिनिवेश बाजूला ठेवून गायकाला पूरक अशा पध्दतीने ते त्याला साथ देत होते. गायकाची वैगुण्यं झाकत गाणं अधिकाधिक श्राव्य करण्याचा त्यांचा हातखंडा होता. पेटीवर साथ करताना लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे वादकाने गायकाला पूरक अशा पध्दतीने वादन केलं पाहिजे. साथ करताना गायकाइतकाच वादकानेही तो कार्यक्रम स्वतःचा समजला पाहिजे. आपण केवळ साथ करतो आहोत हे सतत भान ठेवूनच स्वतःची कला सादर करायची असते. एकल वादन करताना पूर्ण मंचाचा ताबा तुमच्याकडे असतो. तेव्हा मात्र आपल्या प्रतिभेला पूर्ण वाव द्यायचा असंही ते सांगायचं.''

आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. 'बालगंधर्व'सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन करताना गोविंदरावांनी शिकवलेल्या पदांचा आणि त्यांच्या रेकॉर्डिंग्जचा आपल्याला खूप फायदा झाला. जे जे त्यांनी शिकवलं, ते सगळं मला या चित्रपटात ओतता आलं, असं ते सांगतात.

आज अनेक विद्यार्थी आदित्य यांच्याकडे शिकायला येतात. रागदारी शिकायला बराच मोठा काळ जावा लागतो. पण आजच्या मुलांकडे शिकण्याची इच्छा असली, तरी तेवढी चिकाटी नाही. अशा वेळी त्याचं कुतूहल जागृत ठेवण्याचा गोविंदरावांचा फंडा मी हमखास वापरतो, असं ते सांगतात. कारण एकदा कुतूहल संपलं की रसही संपतो, असं त्यांना वाटतं. येईपर्यंत वाजव म्हटलं की ती सुरावट येईपर्यंत मुलांना तिचं आकर्षण वाटतंच राहतं, असंही त्यांना वाटतं.

अजून काही काळानंतर पूर्णवेळ शिक्षक म्हणून काम करणार असल्याचं आदित्य यांनी सांगितलं. ''बालपणापासून गोविंदरावांच्या निधनापर्यंत, गुरू म्हणून मला त्यांचा सहवास मिळाला. आज माझ्याकडे संगीताचं जे ज्ञान आणि भान आहे, हा मला त्यांच्याकडून मिळालेला वारसा आहे. हे ज्ञान पुढच्या पिढीकडे संक्रमित करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. यामुळेच पं. गोविंदराव पटवर्धन नावाचं घराणं अधिक नावारूपाला येईल आणि हीच त्यांना गुरुदक्षिणा ठरेल, असं मला वाटतं.''

9920450065

mrudula.rajwade@gmail.com

 

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.