'नदी वाहते'च्या निमित्ताने...

विवेक मराठी    03-Oct-2017   
Total Views |


***शरदमणी मराठे****

काय सांगायचे आहे संदीप आणि त्याच्या टीमला ह्या चित्रपटातून? तसे थेटपणे हा चित्रपट काहीच सांगत नाही. संदीप, त्याची टीम आपल्याला त्या गावात, त्या छोटया नदीत भरपूर फिरवते. ती नदी, तो भूभाग, ती माणसे, त्यांचे आनंद, त्यांचे दु:ख, त्यांची धडपड, तिथे घडणारे राजकारण, उद्योगधंदे, शेती अशा सर्व गोष्टींचे आणि आपले जिव्हाळयाचे नाते दृढ होत जाते. असे वाटते की जणू काही आपण ह्याच गावाचे आहोत मूळचे, सध्या फक्त शहरात असतो. ह्या साध्या टुमदार गावाचा आणि साध्याशा माणसांचा आणि ह्या सर्वांची साथसोबत वाहणाऱ्या नदीचा एकात्म संबंध आपल्यासमोर हळूहळू उलगडत जातो.

 राठी चित्रपटच्या चतु:सीमा रुंदावणारा 'श्वास' चित्रपट आपल्याला आठवत असेल. देशातील, जगातील अनेकानेक पुरस्कार मिळालेला व प्रेक्षकांना बांधून ठेवणारा, अस्वस्थ करणारा तो चित्रपट होता. त्या वर्षीच्या ऑॅस्कर पुरस्कारासाठी भारताकडून श्वास पाठवला होता. त्या चित्रपटाचे निर्माते संदीप सावंत यांनी श्वासनंतर जवळपास बारा वर्षांनी 'नदी वाहते' नावाचा एक चित्रपट सादर केला आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक चित्रगृहांत तो दाखवला जात आहे. दिग्दर्शनाबरोबरच ह्या चित्रपटाचे निर्मातेही संदीप सावंतच आहेत. एक कथानक व पार्श्वभूमी म्हणून ह्या चित्रपटाचा आणि श्वासचा तसा थेट संबंध काही नाही. तरी प्रेक्षकांना बांधून ठेवण्याची आणि अस्वस्थ करत विचार करण्याला प्रेरित करण्याची श्वासच्या दिग्दर्शकाची सवय सुटलेली नाही आणि त्याकरिता हा चित्रपट अवश्य पहिला पाहिजे.

नदी असते आणि ती वाहते, हे आपण सगळेच जाणतो. देशोदेशीच्या विविध संस्कृती नदीच्या काठांवर विकसित झाल्या. सिंधू संस्कृती, नाइल संस्कृती अशी नावे पडण्याइतके मानवी विकासाचे आणि नदीचे तादात्म्य होते. पुढे जशीजशी कृषिप्रधानतेकडून उद्योगप्रधानतेकडे माणसाची प्रगती झाली, जसेजसे शहरीकरण वेगाने घडले, तसेतसे नदीशी असलेले नाते विरळ होत गेले. 'नदी वाहते' हा चित्रपट आपल्याला ह्या विरळ झालेल्या नात्याचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतो. हा चित्रपट सर्वांनी बघावा हे सुचवण्यामागे हेदेखील एक प्रमुख कारण आहे.

चित्रपटाबद्दल थोडे सांगायचे, तर दक्षिण सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'अंती' नावाची एक नदी आहे. छोटी नदी. ह्या चित्रपटाच्या मध्यवर्ती ही नदीच आहे. त्या नदीच्या काठाने जी अनेक गावे वसली आहेत, त्यापैकी एका गावाच्या परिसरात हे चित्रपट घडतो. एका शांत आणि छोटेखानी गावात चार समवयीन तरुणांना सुगावा लागतो की अंती नदीच्या वरच्या भागावर एक कंपनी छोटे धरण बांधून पर्यटन केंद्र विकसित करणार आहे. त्यानंतर काहीतरी करायचे असे ठरवून प्रेरित झालेल्या, धडपडणाऱ्या ह्या तरुणांचा घेतलेला मागोवा म्हणजे हा चित्रपट. पण वर सांगितलेली 2-3 वाक्यांतील घटना मालिका म्हणजेच हा चित्रपट आहे असे नव्हे. ती घटना मालिका हे निमित्त आहे नदीच्या आणि काठांवर वसलेल्या लोकांबद्दल काही सांगायचे.

 

य सांगायचे आहे संदीप आणि त्याच्या टीमला ह्या चित्रपटातून? तसे थेटपणे हा चित्रपट काहीच सांगत नाही. संदीप, त्याची टीम आपल्याला त्या गावात, त्या छोटया नदीत भरपूर फिरवते. ती नदी, तो भूभाग, ती माणसे, त्यांचे आनंद, त्यांचे दु:ख, त्यांची धडपड, तिथे घडणारे राजकारण, उद्योगधंदे, शेती अशा सर्व गोष्टींचे आणि आपले जिव्हाळयाचे नाते दृढ होत जाते. असे वाटते की जणू काही आपण ह्याच गावाचे आहोत मूळचे, सध्या फक्त शहरात असतो. ह्या साध्या टुमदार गावाचा आणि साध्याशा माणसांचा आणि ह्या सर्वांची साथसोबत वाहणाऱ्या नदीचा एकात्म संबंध आपल्यासमोर हळूहळू उलगडत जातो. ती नदी, तिच्यामुळे मिळणारे पाणी, शेतीवाडी, बागायत, शेतीपूरक व्यवसाय, निसर्गत:च येत चालणारे शहरीकरणाचे वारे आणि परिणाम, सरकारी योजनांच्या अंमलबजावणीच्या चर्चा, वार्ता हे सगळे आपण चित्रपटाच्या ओघात बघत जातो. छोटे बंधारे, त्यातून साध्य होणारे जलसंधारण, त्याचा विहिरींना, मासेमारीसाठी, शेतीसाठी होणारा उपयोग, त्यातून वाढणाऱ्या चिरंजीवी विकासाच्या, पर्यावरणकेंद्री पर्यटनाच्या संधी असे अनेक विषय आपल्याला चित्रपट बघताना जाणवतात. त्या अर्थाने हा चित्रपट ह्या सर्व जाणिवांचा चित्रपट आहे. आजूबाजूला घडणाऱ्या काहुरात एखादा कार्यकर्ता जसा हे मुद्दे शांतपणे पण निग्रहाने मांडेल, व्यवहारात आचरेल तशाच पध्दतीने मसाला-मनोरंजनाच्या चित्रपटंच्या भाऊगर्दीत आपले म्हणणे हा चित्रपट शांतपणे पण निश्चयाने मांडतो, हे त्या चित्रपटाचे यश आहे.

'श्वास'च्या निर्मितीनंतर तब्बल दहा-बारा वर्षांनी संदीप सावंत यांनी हा चित्रपट आणला आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण सिंधुदुर्ग ह्या नयनरम्य आणि वनसंपदेने नटलेल्या देखण्या प्रदेशात ह्या चित्रपटाचे चित्रण झाले आहे. एकंदरीतच छायाचित्रण, निर्मितिमूल्ये, तांत्रिक अंगे उच्च दर्जाची व संदीप सावंत यांच्या आग्रहाला साजेशी आहेत. एकही लोकेशन आपल्याला ह्यापूर्वी बघितल्याचे आठवणार नाही इतकी ही सर्व ठिकाणे नवीन व टवटवीत आहेत. लहान लहान नद्यांच्या प्रवाहाचे चित्रण, अनेक प्रसंगांत पार्श्वभूमीवर सुरू असलेला त्याचा कलरव, गाज आपल्याला खिळवून ठेवेल इतकी झपाटणारी आहे. पार्श्वसंगीत व ध्वनिसंयोजन हे खूपच उजवे पण घट्टपणे समोर उभे न ठाकता कलाकृतीमध्ये मिसळून जाणारे आहे. (इतके, की केवळ त्याचा नीट प्रत्यय घेता यावा, म्हणून मी पुन्हा एकदा हा चित्रपट पाहणार आहे!)

कलावंताची निवड हा ह्या चित्रपटचा असाच विलक्षण प्रकार आहेत. दूरदर्शनवर दिसणारे दोन-तीन चेहरे सोडले, तर सर्व अगदी नवे चेहरे, बहुसंख्य त्याच भौगोलिक परिसरातले, संगीतकार जोडीही तशी अप्रसिध्द; पण तरीही नदी वाहते हा चित्रपट मनाचा ठाव तर घेतोच, तसेच आपली शहरी आत्ममग्नता सोडायला भाग पाडतो आणि कधीकाळी नदीच्या काठाकाठांवर रुजलेल्या आपल्या मुळांना सर्जनाचे, संयमाचे आणि पर्यावरणपूरक जगण्याचे आवाहन करतो.

आपल्याला भरतमुनींच्या पठडीतील नाटक-चित्रपट बघण्याची तशी सवय असते. भारतात बनणाऱ्या अशा कलाकृती साधारणपणे सुखान्त असतात. एखादा मुद्दा, प्रश्न थेटपणे भिडावा व चिरंतन परिणाम करणारा ठरावा म्हणून (बहुधा ग्रीक परंपरेतून) ट्रॅजेडी किंवा दु:खान्त कलाकृतीही सादर होत असतात. दोन्हीचे त्याचे त्याचे म्हणून महत्त्व आहेच. 'नदी वाहते' हा चित्रपट ह्यापैकी कुठलाच नाही. पण तरीही तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. विचारात पाडतो. प्रयोग संपल्यावरही मूकपणे आणि विचारमग्न होत शांतपणे चित्रगृहातून प्रेक्षक बाहेर पडतात, ह्याचा अनुभव मी घेतला आहे.

ह्या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ह्या चित्रपटचे निर्माते-दिग्दर्शक संदीप सावंत यांच्याशी ह्या चित्रपटाबद्दल बोलण्याची संधी मिळाली. ते म्हणाले, ''नदी व नदीकाठच्या माणसांचे, त्यांच्या आयुष्याचे, त्यांच्या गरजांचे, लोभाचे, इच्छांचे नदीशी असलेले नाते ही ह्या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. गावागावातून वाहणाऱ्या छोटया नद्या वाचवायला हव्यात. ह्या नद्यांच्या पाण्यावरच शाश्वत विकास अवलंबून आहे.'' मात्र दिग्दर्शक मोठया कौशल्याने आणि देखणेपणाने नदीबरोबरच प्रवाहित झालेल्या एका कथानकातून आणि एका प्रवाही अवकाशातून हा विचार मांडतो, हे ह्या चित्रपटचे वैशिष्टय आहे.

अपरिचित तरीही कसलेले आणि अनुभवी कलाकार - ज्यांनी गोवा कला अकादमी, ललित कला केंद्र ह्या संस्थाच्या माध्यमांतून सातत्याने चांगले काम केले आहे, दक्षिण सिंधुदुर्गातील लोक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था व निसर्गसंपन्न परिसर ह्याच्या सान्निध्यात जवळपास पाच-सहा वर्षे अध्ययन-संशोधन करीत केलेले संपन्न संहिता लेखन, संजय मेमाणे यांचे नेत्रसुखद छायाचित्रण, मंदार कमलापूरकर यांचे उत्कृष्ट ध्वनिसंयोजन, नीरजा पटवर्धन यांचे कला दिग्दर्शन व वेषभूषा आणि मुख्य म्हणजे निर्मिती, दिग्दर्शन, संकल्पना, पटकथा, संवाद ह्या सर्व आघाडया सांभाळताना स्वत: संदीप सावंत यांनी जीव ओतून केलेले भरीव काम ह्या सगळया ह्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

तसेही श्वासच्या निमित्ताने मराठी चित्रपटाला एका वेगळया उंचीवर नेणारा प्रयोग आपण संदीप सावंत यांच्याकडून अनुभवला आहे. ज्यांनी श्वास चित्रपट पहिला असेल, तर दृष्टी गेलेला लहानगा नातू त्यांच्या आजोबांच्या बरोबर शहर सोडून आपल्या गावात परततो, तेव्हा सिंधुदुर्गातील एका नदीच्या (किंवा बॅक वॉटरच्या) पात्रात त्या चित्रपटचा अखेरचा शॉट आहे, हे आपल्याला आठवत असेल. त्यानंतर प्रेक्षक निघून गेल्यावर जणू काही आजपर्यंत संदीप सावंत त्याच परिसरात रममाण झाले आणि आपल्यासाठी हा जिवंत आणि सकस अनुभव दृश्यमय करूनच परतले, असे मनोमन वाटते.

अवश्य बघा. पटगृहाच्या मोठया पडद्यावरच बघा. नदी वाहते.

sharadmani@gmail.com

 

शरदमणी मराठे

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक