रामायण व भारतीय संस्कृती

विवेक मराठी    26-Apr-2020   
Total Views |
**शरदमणी मराठे***

प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी (डायरेक्टर, नेहरू सेंटर, लंडन) यांनी लॉकडाउनच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून भारतातील तरुणांशी संवाद साधला. सुमारे २४ हजार जणांनी हा कार्यक्रम बघितला. तासभर चाललेल्या ह्या कार्यक्रमात सुरुवातीला सुमारे २० मिनिटांची मांडणी व नंतर सुमारे ४० मिनिटे प्रश्नोत्तरे असे नियोजन केले होते. अमिश त्रिपाठी यांनी सुरुवातीला केलेल्या मांडणीचा गोषवारा खाली देत आहे.


amit_1  H x W:
भारताला अत्यंत प्राचीन संस्कृती लाभली आहे. कवी महम्मद इक्बाल यांचा एक प्रसिद्ध शेर आहे.
यूनाँ मिस्र रोमा, सब मिट गए जहां से,
बाकी मगर है अब तक, नामो निशां हमारा
कुछ बात है कि हस्ती, मिटती नहीं हमारी
सदियों रहा है दुश्मन, दौर ए जहां हमारा

ग्रीक, रोम, इजिप्त अशा संस्कृतींपासून चालत असलेली आपली संस्कृती आजही अस्तित्वात आहे, हे मला महत्त्वाचे वैशिष्ट्य वाटते. गेल्या शेकडो-हजारो वर्षांत आपल्यावर आक्रमणे झाली, तरीही तो सांस्कृतिक धागा आपण आजवर जपत आलो आहोत. श्रीरुद्रम, पुरुषसूक्त अशा विविध रचना - त्यातील श्रीरुद्रम तर वेदकालीन आहे - रोज म्हटल्या जातात अशी अनेक घरे आहेत. अशा चालत आलेल्या कथा, महाकाव्ये, तत्त्वज्ञान, वागण्याच्या, खाण्या-पिण्याच्या सवयी, वेशभूषा अशा विविध गोष्टी मिळून आपला सांस्कृतिक वारसा आकार घेत आला आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या कथा आपल्या इतिहासाचा भाग आहेत, ह्यावर भारतीय माणसाचा विश्वास आहे. अशा कथांमध्ये रामकथेचे स्थान महत्त्वाचे आहे. असे म्हटले जाते की भारतीय माणूस रामायण कधीच पहिल्यांदा ऐकत नाही. एक व्यक्ती म्हणून तो मोठा होत असतानाच तो रामाच्या गोष्टी ऐकतच मोठा होतो. हजारो वर्षे ही रामकथा आपण पिढ्यानपिढ्या ऐकत मोठे झालो आहोत.
रामायणाचे आणखी एक वैशिष्ट्य, जे रामचरितमानस ह्या ग्रंथात शब्दबद्ध केले आहे, ते म्हणजे 'प्रभू अनंत – प्रभुकथा अनंत.' देवाची जितकी रूपे आहेत, तितक्या त्या देवांच्या कथा आहेत आणि तितके त्या देवांना समजून घेण्याचे मार्ग आहेत. त्यामुळेच रामानंद सागर यांनी दूरदर्शन मालिकेमध्ये दाखवलेले रामायण ८०च्या दशकात लोकप्रिय झाले, तसे ते आजही लोकप्रिय ठरते आहे. रामनंद सागर यांनी दाखवलेले रामायण हे रामानंद सागर यांचे रामायण आहे. त्यांना जसे भावले तसे त्यांनी चित्रित केले आहे. त्यातील अनेक गोष्टी ना वाल्मिकी रामायणात आहेत, ना रामचरितमानसमध्ये आहेत. वाल्मिकी रामायणात नसलेला, पण रामचरितमानसमध्ये असलेला लक्ष्मणरेषेचा प्रसंग आहे. वाल्मिकी रामायण, रामचरितमानस ह्या दोन्ही ग्रंथात व रामायणाच्या आणखीही अन्य आवृत्त्यांत राम-रावण युद्ध होते आणि रामाच्या हातून रावणाचा वध होतो अशी आपल्याला माहीत असलेली मांडणी आहे; पण जैनपंथीय कवीने रचलेल्या जैन रामायणात नायक राम हे अहिंसक असल्यामुळे रावणाचा वध लक्ष्मणाच्या हातून होतो असे वर्णन आहे. रामायणाची आणखी एक आवृत्ती आहे, ‘अद्भुत रामायण’ ह्या नावाची. असे मानले जाते की ही रचनादेखील वाल्मिकी ऋषींनीच लिहिली आहे. त्या रामायणात दोन रावण आहेत, एक छोटा रावण आणि एक मोठा रावण. मोठा रावण अधिक शक्तिशाली आहे असे दाखवले आहे. त्यात त्या मोठ्या रावणाचा वध सीतेच्या हातून होतो, असे वर्णन आहे. त्यात सीतेला एका योद्ध्याच्या रूपात दाखवली आहे आणि सीता कालीमातेच्या रूपात रावणाचा वध करते, असे वर्णन आहे.
अशा विविध रामकथांत दिसणारा एक समान धागा म्हणजे 'एक आदर्श नायक' असेच श्रीरामाचे वर्णन केले आहे. कंब ऋषींनी लिहिलेली 'कंब रामायण' नावाची रामायणाची एक प्राचीन आवृत्ती तामिळ भाषेत आहे. त्यातही रामच नायक आहे. एका प्रसंगात राम रावणाच्या चांगल्या गुणांचा उल्लेख करून स्तुती करतो, तर रावणही रामाची तशी स्तुती करतो, असे वर्णन आहे. पुढे ते एकमेकाशी युद्धही करतात. एकाच रामकथेच्या इतक्या वैविध्यपूर्ण आवृत्त्या आहेत. अशा विविधतेतही रामाला आदर्श व आराध्य मानले आहे, हा समान धागा आहे. मला वाटते की भारताच्या संस्कृतीचे हे वैशिष्ट्य आहे की अशा विविध रूपांत रामकथा येउनही त्यांत कुठेही परस्परविरोध नाही. हे वैविध्य लोकांनी स्वीकारलेले आहे. ह्या कथा जुन्या मूळ कथेच्या तत्त्वाला धक्का न लावता काही नवे स्वीकारत पुढे चालत राहिल्या आहेत.
ह्या मोकळेपणामुळेच भारतीय संस्कृती गेली हजारो वर्षे चालत आली आहे आणि पुढेही हजारो वर्षे चालत राहणार आहे. आपल्या संस्कृतीच्या ह्या ताकदीचे रहस्य असे आहे की ती कुठल्या एका ‘पुस्तकावर’ आधारलेली नाही, तर तिच्या मागे अनेक ग्रंथांचा आधार आहे. म्हटले तर एका वाचनालयात मावेल इतका. एक प्रकारे हा मोठा पदवी अभ्यासक्रम आहे. ह्यातील रामायण–महाभारत हे जणू पहिल्या इयत्तेच्या अभ्यासक्रमातील ग्रंथ आहेत. ती संस्कृती समजण्याची पहिली पायरी आहे. आपल्याला ह्याच पायरीवर थांबायचे नाही. आपल्याला पुराणे, विविध गीता यांचाही अभ्यास करायला हवा. मी 'विविध गीता' म्हणालो. आपल्याला केवळ महाभारतातील कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवदगीता माहीत असते. एक अष्टावक्र गीता आहे. अशा बऱ्याच आहेत. ब्राह्मण, आरण्यके हे ग्रंथदेखील वाचले पाहिजेत. एखाद्याला पदवीच्या पातळीवर पोहोचायचे असेल तर वेदांचा आणि पदव्युत्तर पायरी गाठायची असेल उपनिषदांचा अभ्यास करायला हवा. त्या व्यतिरिक्त तत्त्वज्ञानाचे विविध ग्रंथ आहेत. प्रचंड मोठा ज्ञानसाठ्याचा वारसा आपल्याला लाभला आहे. आपण ह्या सगळ्याचा अभ्यास पुरेसा करत नाही.

असे सरसकटपणे म्हटले जाते की आपल्या पूर्वजांचे एक न्यून होते, ते म्हणजे ते काही लिहीत नसत. जे ज्ञान–साहित्य होते, ते सगळे मौखिक होते. पण हे सर्वस्वी खरे नाही. वेदांच्या प्राचीन काळात ते खरेही असेल, पण त्यानंतरच्या काळातील लिखित साहित्यदेखील काही कमी नाही. गेल्या हजार वर्षांत भारतावर आक्रमणे झाली. आपली ग्रंथालये जाळली गेली. नालंदा, तक्षशीला ही नावे आपल्याला माहीत आहेत, त्या व्यतिरिक्त उज्जैन, बहोदयपुरम, त्रिची ह्या ठिकाणचीदेखील ग्रंथालये नष्ट केली गेली. त्यात किती ग्रंथ जळले, किती हस्तलिखिते नाश पावली ह्याची गणतीच नाही. तरीदेखील शिल्लक राहिलेला हस्तलिखितांचा साठा प्रचंड आहे. National Manuscript Mission नावाचा केंद्र सरकारचा एक प्रकल्प आहे. त्याच्या आधारे सांगायचे तर ३० ते ३५ लाख न छापले गेलेले हस्तलिखित कागद आजही शिल्लक आहेत. उर्वरित जगाच्या प्राचीन हस्तलिखितांच्या एकत्रित आकड्यापेक्षा हा आकडा मोठा आहे. ग्रीस देशाला संपूर्ण युरोपच्या संस्कृतीची जननी म्हटले जाते. त्या ग्रीसमध्ये अशी केवळ २० हजार हस्तलिखिते आहेत. पण आपल्याकडल्या हस्तलिखितांचा अभ्यास तर सोडाच, त्या संग्रहातील ९९% हस्तलिखितांचे अजून भाषांतरदेखील झालेले नाही. भारतावर झालेल्या आक्रमकांमुळे नुकसान झाले हे मान्यच आहे. अगदी तुर्की, अन्य युरोपीय आक्रमकांमुळेदेखील नुकसान झाले हेदेखील मान्य आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी हे काम व्हायला हवे होते. निदान आता तरी आपल्याला काही सबब सांगता येणार नाही. आपण समजा हे अध्ययनाचे विषय आपल्या अभ्यासक्रमात अंतर्भूत केले, तर आपल्याला कुठला परकीय देश जाब विचारणार आहे? त्यामुळे दोष आपलाच आहे. ह्या हस्तलिखितांचे भाषांतर करणे, त्याचा अभ्यास करणे, त्यावर सखोल संशोधन होणे हे आता तरी करायलाच हवे. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेला हा ज्ञानाचा अमूल्य वारसा आहे.
 

शरदमणी मराठे

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक