लांगूलचालनाची परिसीमा

विवेक मराठी    31-Jan-2022   
Total Views |
 
मुंबई महापालिकेच्या निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. इतकी वर्षं जी सत्ता सुखेनैव उपभोगली, ती टिकण्याची कोणतीही खात्री नसताना हा वाद उद्भवला आहे. टिपूचं नाव देण्यासाठी चाललेला काँग्रेसचा आग्रह आणि नवाब मलिकांसारख्या राष्ट्रवादीच्या नेत्याने त्याचं केलेलं समर्थन, यापैकी कशाचाही विरोध करण्याची ताकद सध्याच्या शिवसेना नेतृत्वात नाही. पक्षाची ही केविलवाणी अवस्था इथला हिंदू मतदारही बघतो आहे
 
sultan 
 
मुंबईच्या मालाड मालवणी येथील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचं नाव देण्यावरून सुरू झालेला वादंग आणि या प्रकरणात शिवसेनेच्या वरिष्ठांनी घडवलेलं मुस्लीम लांगूलचालनाचं दर्शन हे अगतिकतेचा आणि असाहाय्यतेचा नवा विक्रम नोंदवणारं उदाहरण आहे.

 
मैसूरचा शासक असलेल्या टिपू सुलतानाची ‘दक्षिणेकडचा औरंगजेब’ अशी ख्याती होती. ती त्याने पराकोटीच्या हिंदुद्वेषातून केलेल्या कृत्यांमुळे होती. अशा हिंदुद्वेष्ट्या टिपूचं नाव क्रीडा संकुलाला देणार्‍या काँग्रेसच्या स्थानिक आमदाराची - अस्लम शेख यांची वकिली करावी लागणं हे शिवसेनेच्या अध:पतनाचं द्योतक आहे.
‘प्रखर हिंदुत्वाचा प्रकट उच्चार’ अशी बाळासाहेबांच्या काळात प्रतिमा असलेली शिवसेना खरी की सत्ताप्राप्तीसाठी सर्व राजकीय नीतिमूल्यांना तिलांजली देत राष्ट्रवादी-काँग्रेसशी स्वार्थी सोयरीक करणारी आजची शिवसेना खरी, अशा संभ्रमात सध्याचा शिवसैनिक आहे. ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ या त्याच्या मनात उमटलेल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देऊ शकेल असा एकही नेता या पक्षात नाही, हे वास्तव आहे. ते दु:खद आहे.
 
 
सध्याच्या शिवसेनेचं हिंदुत्व किती बेगडी आणि कचकड्याचं झालं आहे, याची अनेक उदाहरणं सध्या समोर येत आहेत. अजान स्पर्धेचं करण्यात आलेलं आयोजन, भायखळ्यात प्रस्तावित असलेलं उर्दू भाषा शिक्षण केंद्र (या परिसरात आधीपासूनची उर्द्ू भाषा केंद्र असतानाही) ही गेल्या वर्षभरातली ठळक उदाहरणं.
या वादंगाच्या पार्श्वभूमीवर ‘आम्हांला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही..’ अशी वल्गना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अर्थात राऊत यांच्याकडून काही शहाणपणाचं बोलणं अपेक्षितच नाही. सत्ता प्राप्त झाल्यापासूनच स्वत:च्या पक्षाच्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लावण्याचा चंग बांधला असल्यासारखं त्यांचं वर्तन आहे.
 
संजय राऊतांना खरंच इतिहास ठाऊक नाही? की सत्तांध व्यक्ती सारासार विवेक कशी हरवून बसते, याचं हे उदाहरण मानावं? मराठ्यांचा आणि हिंदूंचा कट्टर शत्रू म्हणून ज्याची इतिहासात नोंद आहे, अशा टिपू सुलतानाचा भारताबाहेरील इस्लामी राजवटींशी केलेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे. मात्र तो वाचण्यासाठी राऊतांना डोळ्यावर बांधलेली पट्टी काढावी लागेल. ज्या अहमदशाह अब्दालीशी लढताना पानिपतावर एक लाख मराठ्यांना आपले प्राण गमवावे लागले, त्या अब्दालीच्या नातवाला - झमानशाह याला दिल्लीचं तख्त मराठ्यांकडून जिंकण्यासाठी टिपूने निमंत्रण दिलं होतं. या संदर्भात 1761 साली लिहिलेल्या पत्रात टिपू म्हणतो - ‘दिल्ली ताब्यात घेतल्यावर झमानशाहने दक्षिणेत उतरावे. दक्षिणेत मी स्वत: जिहादची योजना करीत असून आपण एकत्र येत काफिर मराठ्यांचे पारिपत्य करू आणि इस्लामच्या तलवारीसमोर त्यांना गुडघे घासायला भाग पाडू.’
 
 
टिपू इंग्रजांविरुद्ध लढला, म्हणून त्याला स्वातंत्र्यसेनानी म्हणणारा एक गट आहे. स्वत:चं राज्य राखण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढलेल्या टिपूला स्वातंत्र्यसेनानी ही बिरुदावली बहाल करणं म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी आहे. कारण याच टिपूने ‘हिंदू मंदिरं उद्ध्वस्त करण्यापासून मला कोणी रोखू शकणार नाही’ अशी दर्पोक्ती केली होती. ‘फ्रीडम स्ट्रगल इन केरल’ या पुस्तकात याचे दाखले मिळतात. हिंदूंसह बिगर मुस्लिमांना बाटवण्याचा आणि संपवण्याचा इतिहास असलेल्या टिपूच्या व्यक्तिमत्त्वात, ‘मला संपूर्ण जगाचे राज्य मिळाले तरी मी हिंदू मंदिरांना उद्ध्वस्त करण्यापासून थांबू शकत नाही’ असा पराकोटीचा हिंदुद्वेष ठासून भरला होता. अशा अधिकृत आणि विश्वसनीय ऐतिहासिक नोंदींकडे जाणूनबुजून पाठ फिरवण्याचा विचार शिवसेनेचे नेते करत असतील, तर त्यांच्या पक्षाचा दारुण शेवट जवळ आला आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. सध्या त्यांना जी भाषा जवळची वाटते आहे, त्या भाषेत सांगायचं तर, ते स्वत:ची कबर स्वत:च्या हाताने आणि वेगाने खोदताहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. इतकी वर्षं जी सत्ता सुखेनैव उपभोगली, ती टिकण्याची कोणतीही खात्री नसताना हा वाद उद्भवला आहे. टिपूचं नाव देण्यासाठी चाललेला काँग्रेसचा आग्रह आणि नवाब मलिकांसारख्या राष्ट्रवादीच्या नेत्याने त्याचं केलेलं समर्थन, यापैकी कशाचाही विरोध करण्याची ताकद सध्याच्या शिवसेना नेतृत्वात नाही. पक्षाची ही केविलवाणी अवस्था इथला हिंदू मतदारही बघतो आहे, त्याविषयीची प्रतिक्रिया तो मतदानातून व्यक्त करेलच, हे लक्षात आल्याने महापालिका क्षेत्रातल्या मुस्लिमांना जवळ करण्याच्या हेतूने जर लांगूलचालन चालू असेल, तर तेही विजय मिळवण्याच्या कामी येणार नाही. ज्या दोन पक्षांच्या कुबड्या घेऊन पक्ष वाटचाल करतो आहे, ते दोन्ही पक्ष आणि राऊतांसारखे नेते या पक्षाला देशोधडीला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.
घराच्या चार भिंतींआड सुरक्षित राहून पक्ष कार्यकर्त्यांसमोर दिल्लीचं तख्त जिंकायची वल्गना करणार्‍या उद्धव ठाकरेंना उद्भवलेल्या परिस्थितीचं गांभीर्य समजलं आहे का?