वास्तव आणि अपेक्षा

विवेक मराठी    10-Nov-2022   
Total Views |
अनेक वर्षे संमेलनाध्यक्षपदाची थेट निवडणूक होत होती. मात्र ती प्रथा अनिष्ट आणि त्यामुळे मराठी सारस्वत विश्वात चालणारे राजकारण ज्येष्ठ साहित्यिकांसाठी, साहित्य रसिकांसाठी क्लेशकारक असे. अशा निवडणुकीऐवजी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या व्यक्तीला हे पद सन्मानाने दिले जावे, ही मागणी प्रदीर्घ काळ होत होती. अखेर ती मान्य झाली. सर्वसहमतीने योग्य व्यक्ती अध्यक्षस्थानी निवडणे, हा बदल स्वागतार्ह म्हणावा असाच आहे. त्या पदाचा सन्मान आहे. चपळगावकरांसारखी व्यक्ती अध्यक्षपदी येणे हे त्या बदलाचेच फलित आहे.

vivek
 
 
 
येत्या फेब्रुवारीमध्ये वर्धा येथे होत असलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची झालेली निवड ही अनेकार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आणि या पदाचा उचित सन्मान करणारी आहे. या निवडीमुळे, वैचारिक लेखन करणारी व्यक्ती अनेक वर्षांनी अध्यक्षपदी असणार आहे. अशा प्रकारचे लेखन वाचणारे तुलनेने कमी असले, तरी प्रामुख्याने वैचारिक साहित्यच समाजाला दिशा देणारे, त्याचे भरणपोषण करणारे असते. एक विचारवंत लेखक अध्यक्षपदी आल्याने एकूणच मराठी भाषा व्यवहारालाही एक नवी दिशा मिळेल आणि सकस साहित्यनिर्मिती होण्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, अशी आशा आहे. आपल्या योगदानाने मराठी साहित्यविश्वाचे वैचारिक दालन समृद्ध करणार्‍या नरेंद्र चपळगावकर यांचे या नव्या सन्मानासाठी विवेक परिवारातर्फे अभिनंदन आणि या अध्यक्षीय कारकिर्दीसाठी त्यांना अनेक शुभेच्छा.
 
 
 
गेली काही वर्षे पडलेल्या पायंड्याप्रमाणे या साहित्य संमेलनालाही सुरू होण्याआधीच साहित्यबाह्य मुद्द्यावरून वादाचे गालबोट लागले असले, तरी चपळगावकर यांच्या निवडीनंतर या निरर्थक वादांना पूर्णविराम मिळेल, अशी आशा आहे.
 
 
 
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही मराठी भाषेची एक गौरवशाली परंपरा. मराठीजनांच्या स्वभाषेवरील प्रेमाचा हा कौतुकास्पद, अभिमानास्पद आविष्कार. त्यामुळेच मराठी साहित्यवर्तुळात आणि साहित्य रसिक-वाचकांच्या मनात या संमेलनाला आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे स्वरूप अधिकाधिक उत्सवी, दिखाऊ होत असले आणि त्याविषयी अनेकांच्या मनात नाराजी असली, तरीही या संमेलनासाठीचा उत्साह अद्याप मराठी मनात टिकून आहे. आणि म्हणूनच संमेलनाध्यक्ष हे पद केवळ मानाचे पद असले, तरी दर वर्षी संमेलनाध्यक्षपदी योग्य व्यक्ती निवडली जावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांच्या आणि साहित्य व्यवहाराशी संबंधित असलेल्या प्रत्येकाच्या मनात असते. संमेलनाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे मराठी सारस्वताचे लक्ष लागलेले असते, ते त्यामुळेच.
 
 
 
अनेक वर्षे संमेलनाध्यक्षपदाची थेट निवडणूक होत होती. मात्र ती प्रथा अनिष्ट आणि त्यामुळे मराठी सारस्वत विश्वात चालणारे राजकारण ज्येष्ठ साहित्यिकांसाठी, साहित्य रसिकांसाठी क्लेशकारक असे. अशा निवडणुकीऐवजी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या व्यक्तीला हे पद सन्मानाने दिले जावे, ही मागणी प्रदीर्घ काळ होत होती. अखेर ती मान्य झाली. सर्वसहमतीने योग्य व्यक्ती अध्यक्षस्थानी निवडणे, हा बदल स्वागतार्ह म्हणावा असाच आहे. त्या पदाचा सन्मान आहे. चपळगावकरांसारखी व्यक्ती अध्यक्षपदी येणे हे त्या बदलाचेच फलित आहे.
 
 
 
जशी निवडणूक या संमेलनातून हद्दपार झाली, तसे राजकीय पक्षांचे आखाडे वा विशिष्ट विचारसरणीच्या दावणीला बांधलेले संमेलन अशी या संमेलनाची एक प्रतिमा झाली आहे, तीही बदलण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित करावीशी वाटते.
 
 
 
संमेलन नेमके कशासाठी आणि कोणासाठी याबाबतची स्पष्टता आयोजकांच्या मनात असेल, तर संमेलन राजकीय पक्षांचा आखाडा होणार नाही. मराठीच्या विविध बोलींमधील, प्रमाणभाषेतील साहित्यावर भरभरून प्रेम करणार्‍या सर्व प्रांतांतल्या मराठी साहित्यप्रेमींना एकत्र आणण्याचे, त्यातून वैचारिक आदान-प्रदान करण्याचे, लेखक-वाचक सुसंवादाचे एक माध्यम म्हणजे हे संमेलन. मात्र मूळ उद्दिष्टाला हरताळ फासत ते भपकेबाज, भव्य करण्याच्या नादात त्याचा आत्मा हरवतो. मग भपक्यासाठी लागणारी आर्थिक गरज भागवणारे राजकारणी/पक्ष यांच्या दावणीला संमेलन बांधले जाते. यातून संमेलनाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
 
 
 
गेल्या काही वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला समांतर विविध प्रकारची साहित्य संमेलने महाराष्ट्रभर आयोजित होत आहेत आणि या सर्व संमेलनांना त्या त्या विषयाशी/विचारधारेशी संबंधित लेखक-वाचकांची गर्दी होत असते. अशी संमेलने समाजाची निकड असल्याचे त्यातून अधोरेखित होते. यातून होणारी वैचारिक घुसळण साहित्यनिर्मितीला पोषक असली, तरी ही वेगळी संमेलने सुरू करण्याची गरज का वाटली, याचा विचार होणे आवश्यक आहे. या संमेलनात सहभागी होणार्‍या लेखकांना अखिल भारतीय साहित्य संमेलनात सामावून न घेणे वा सापत्न वागणूक देणे, असे काही याच्या मुळाशी नाही ना? याचा शोध घ्यायला हवा. तसे असेल, तर अखिल भारतीय साहित्य संमेलन सर्वसमावेशक कसे करता येईल यावर विचारमंथन होणे गरजेचे. प्रगल्भ समाजघडणीसाठी सर्व विचारधारांमधील लेखक-वाचकांसाठी संमेलन, हे तत्त्वत: स्वीकारले की गुणवत्तापूर्ण आणि सर्व विचारधारांमधील लेखकांना कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय संमेलनात सन्मानाने बोलवायला हवे. त्यातून घडणारी साधकबाधक चर्चा लेखकांना आणि साहित्यरसिकांना खर्‍या अर्थाने समृद्ध करेल.
 
 
 
अध्यक्षपदी निवड झाल्यावर, मराठी टिकवण्यासाठी आणि तिचे सौष्ठव राखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे मत चपळगावकर यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले आहे. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी विविध भाषांतील ज्ञान मराठीत आणणारे दर्जेदार अनुवादक हीदेखील मोठी गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. याबरोबरच, वर नमूद केल्याप्रमाणे विविध विचारधारांच्या साहित्यिकांसाठी मुक्त मंच असे सर्वसमावेशक स्वरूप या संमेलनाला येईल का? यासाठी अध्यक्ष या नात्याने चपळगावकर ठोस भूमिका, पुढाकार घेतील का? साहित्यनिर्मितीबरोबरच न्यायदानात आयुष्याचा बराच काळ व्यतीत केलेल्या एका विचारशील लेखकाकडून ही अपेक्षा आहे. असे झाले, तर मराठी साहित्यविश्वात सकारात्मक बदल घडतील, साहित्यनिर्मिती एका वेगळ्या उंचीवर जाईल आणि समाज म्हणूनही आपण प्रगल्भ होण्याची गती वाढेल.