संग्रह सह्यांचा.. समृद्ध आठवणींचा

विवेक मराठी    31-Dec-2022   
Total Views |
आयुष्य नुसतं जगू नये, तर त्याला काहीतरी ध्येय असावं, दिशा असावी, तरच त्या जगण्याला ‘जीवन’ म्हणण्यात अर्थ आहे. जगणं जीवन व्हावं यासाठी अनेक जण कोणती ना कोणती कला, वेगवेगळे छंद जोपासतात. कोणाला वाचनाचा छंद असतो, कोणाला लेखनाचा असतो, तर कोणी पोस्टाचे स्टँप जमवतं, कोणी फ्रीज मॅग्नेट, तर कोणी देशी-परदेशी चलन. ठाण्यातले कौस्तुभ साठे गेली अनेक वर्षं विविध नामवंतांच्या स्वाक्षर्‍यांचा संग्रह करत आहेत. आज त्यांच्या संग्रहात तब्बल 4500 स्वाक्षर्‍या आहेत. आपल्या शहरातल्या सध्याच्या धकाधकीच्या आणि रुक्ष जीवनात आवश्यक असणारी मानसिक शांतता माझ्या छंदानेच मिळवून दिली, असं ते आवर्जून सांगतात.

 A collection of signatures
 
सुमारे 4500 स्वाक्षर्‍या.. भल्याथोरल्या कॅटलॉग्सनी भरलेली कपाटं.. नामवंतांच्या स्वाक्षर्‍यांनी अमूल्यत्व प्राप्त झालेल्या वस्तू.. हे चित्र आहे ठाण्याच्या कौस्तुभ साठे यांच्या घरातलं. सहज नजर टाकली तर अगदी कोणाही सर्वसाधारण मध्यमवर्गीयाचं घर वाटावं, असंच हे घर वाटतं. पण या घरात लाखमोलाचा ऐवज या स्वाक्षर्‍यांच्या रूपात संग्रहित आहे. याचबरोबर साठे यांच्या मनात संग्रहित आहेत त्यामागचे अगणित किस्से आणि कहाण्या. तब्बल 25-26 वर्षांची त्यांची ही तपश्चर्या आहे. साठे यांचं स्वाक्षरी प्रदर्शन व त्यामागचे काही रंजक किस्से सांगणारा एक कार्यक्रम नुकताच ठाण्यातील ‘सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालया’त झाला. त्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला.
 
 
 
छंद म्हणून नामवंतांच्या स्वाक्षर्‍या गोळा करण्याची आवड कशी निर्माण झाली, कोणती घटना यातला महत्त्वाचा क्षण अर्थात ‘ट्रिगर पॉइंट’ ठरली याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “माझे आजोबा नाना साठे ज्या शाळेचे विश्वस्त होते, त्या शिवसमर्थ विद्यालयात मी सहावीत असताना गीतापठण स्पर्धा झाली होती. यशस्वी होणार्‍याला बक्षीस म्हणून आजोबांच्या संकल्पनेतून भगवद्गीतेतलं कृष्णार्जुन संवादाचं चित्र असणारी ‘स्वाक्षरी वही’ भेट देण्यात आली. मुलांनी त्यावर शाळेतल्या शिक्षकांच्या सह्या घ्याव्यात व शाळा सोडल्यानंतर आठवण म्हणून आपल्या संग्रही ठेवाव्यात, अशी त्यामागची कल्पना होती. ती वही दहावीपर्यंत माझ्याकडे तशीच पडून होती. थोड्याफार स्वाक्षर्‍या सोडल्या, तर त्यात फार काही नोंद नव्हती. 1998ला दहावीत असताना सुप्रसिद्ध आणि ठाण्यातील सर्वात जुन्या लोकमान्य आळी गणेशोत्सवात डॉ. संजय उपाध्ये आले होते. बरेच लोक त्यांच्या स्वाक्षर्‍या घेत होते, हे बघून मीही ती स्वाक्षरी वही घेऊन गेलो आणि स्वाक्षरी संग्रहाचा हा प्रवास सुरू झाला.
 
 
 A collection of signatures
 
त्यानंतर हळूहळू नाटकांना, वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याच्या निमित्ताने अनेक मराठी कलाकारांच्या सह्या गोळा करण्याचा छंद लागला. तलावपाळीजवळच राहात असल्यामुळे गडकरी रंगायतनला अनेकदा फेरी होत असे. मग कधीतरी मध्यंतरात, नाटकाच्या आधी-नंतर जाऊन स्वाक्षर्‍या मिळवल्या. माझ्या संग्रहातल्या पहिल्या काही स्वाक्षर्‍या या फक्त मराठी कलाकारांच्याच होत्या. पहिल्या शंभरेक स्वाक्षर्‍यांचं संकलन झाल्यावर याबाबत थोडं गांभीर्याने विचार करायला लागलो. ‘मराठी कलाकार’ या कक्षेबाहेर जाऊन मी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने, तर कधी स्वतंत्र भेट घेऊन स्वाक्षर्‍या गोळा करायला सुरुवात केली..” कौस्तुभ साठे सांगत होते. आज त्यांच्याकडे आठ वेगवेगळ्या विभागांमध्ये या स्वाक्षर्‍यांचं विभाजन केलेलं आहे. यात मराठी कलाकार, भारतीय रागदारी गायक, संगीतकार, वादक, देशी-परदेशी खेळाडू, राजकारणी, साहित्यिक, बॉलीवूड कलाकार अशा वेगवेगळ्या विभागांत स्वाक्षर्‍यांची विभागणी केलेली आहे. या यादीत न बसणारे किंवा एकाच वेळी वेगवेगळ्या विभागात सामावू शकणारे असे काही मान्यवर स्वतंत्र विभागात एकत्र केलेले आहेत.
 
 
 
सर्वसामान्यांसाठी गौरवास्पद अशी अत्यंत मोलाची व्यक्तिमत्त्वं स्वाक्षरीच्या रूपाने कौस्तुभ यांच्या घरात कायमची वस्तीला आली आहेत. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, लता मंगेशकर, आशा भोसले, विंदा करंदीकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, रिकी पाँटिंग, लालबहादुर शास्त्री, मंगेश पाडगावकर, आर.के. लक्ष्मण, पं. रविशंकर, अ‍ॅड. उज्ज्वल निकम, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रभाकर पणशीकर, उस्ताद झाकीर हुसेन, प्रशांत दामले, नसीरुद्दीन शाह.. आपण मोजताना थकतो, पण ते सांगताना थकत नाहीत. या संग्रहकाळात आलेल्या आणि लक्षात राहिलेल्या अनुभवाबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “हा छंद जोपासताना बरे-वाईट असे अनेक अनुभव आले. मी या सगळ्या माणसांचं माणूसपण या काळात अनुभवलं. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, उस्ताद झाकीर हुसेन यांचं जमिनीला पाय टेकलेले असणं, उगाचच गॉसिपिंग न करणं, माझ्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य माणसाचा चेहराही लक्षात ठेवणं हे माझ्यासाठी खूप सुखावणारं होतं. सचिनची फोटोवर स्वाक्षरी मिळवण्यासाठी मी सकाळी सात वाजता वानखेडे गाठलं, तेव्हा 24 वर्षं इंटरनॅशनल खेळलेला हा माणूस नवोदितासारखा समर्पिततेने सराव करत होता. त्याचं हे रूप तो इतरांपेक्षा ‘वेगळा’ का आहे हे दर्शवणारं होतं. सुनील गावस्करांना भेटण्याचा क्षणही इतकाच आनंददायक होता. खरं तर मी त्यांच्या वरळीतल्या घरी आगंतुक जाऊन धडकलो होतो. पण तरीही एखाद्या पाहुण्याचं स्वागत करावं तितक्या प्रेमाने त्यांनी मला घरात घेतलं, माझ्या संग्रहाची माहिती घेतली.
 
 
 A collection of signatures
 
माझ्या स्वाक्षर्‍यांच्या संग्रहातला सर्वोच्च क्षण होता भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडून स्वाक्षरी मिळाली, तो. पंडितजींच्या एका कार्यक्रमात मी स्वाक्षरीसाठी आवर्जून उपस्थित राहिलो. त्या वेळी ते स्वत:, उस्ताद झाकीर हुसेन, पं. भवानीशंकर हे सगळेच कलाकार इतके दमले होते की आयोजकांनी आता कोणा रसिकाला त्यांना भेटू द्यायचं नाही असा निर्णय घेतला. त्या वेळी पंडितजी मुळातच खूप वयस्कर होते. त्यामुळे त्यांना परत भेटून स्वाक्षरी घेता येईल या आशेवर मी जवळपास पाणी सोडलं होतं. पण त्यानंतर काही वर्षांनी प्रभाकर पणशीकरांमुळे मला अण्णांना पुण्यात ‘कलाश्री’त भेटून त्यांची स्वाक्षरी घेता आली. असाच एकदा आगंतुकपणे मी साहित्य सहवासातल्या विंदांच्या घरीही धडकलो होतो. प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण हे अमुक ठिकाणी राहतात एवढ्या नाममात्र पत्त्यावर मी एका बाइकवाल्या मित्राला सोबत घेऊन शोधाशोध करून त्यांचं घर गाठलं होतं. त्या वेळेस त्यांचं खूप वय झालं होतं. पण त्यांच्या पत्नीने आम्हाला घरात घेतलं आणि त्यांची स्वाक्षरी मिळवून दिली. मला न मिळालेली आणि ज्याची खंत मला आयुष्यभर जाणवत राहिली, ती स्वाक्षरी होती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलामांची. प्रयत्न करूनही मला ती मिळाली नाही.
 
 
 
जसे अनेक अनुभव आनंददायक होते, तसेच काही घाबरवून सोडणारेही होते. 2006 साली भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती. मी आणि माझा मित्र रोलचा कॅमेरा घेऊन वानखेडेवर गेलो. तिथे न्यूझीलंडची टीम सराव करत होती. तिथे फोटो काढले. तिथून सीसीआयला आलो. आम्हाला याची अजिबात कल्पना नव्हती की ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड टीमला त्यांच्या देशाने, मुंबई पोलिसांव्यतिरिक्त स्वत:कडून विशेष सुरक्षा दिली होती. कारण त्यांना दहशतवाद्यांकडून जिवाला धोका असल्याची धमकी घालण्यात आली होती. याची काहीच कल्पना नसल्याने आम्ही थेट आत घुसलो. त्यांच्या सुरक्षा यंत्रणेकडून आमची विचारणा करण्यात आली. आम्हाला दोघांना पोलीस व्हॅनमधून मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकात नेण्यात आलं. चौकशीनंतर आम्ही खरोखरच स्वाक्षरी संग्राहक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं व ते आम्हाला सोडायला तयार झाले. पण, गोष्ट इथे संपली नव्हती. त्यांनी एका कागदावर आमची माहिती आणि घडलेला प्रसंग लिहून घेतला. वर म्हणाले की, भारतात असताना खेळाडूंना खरोखरच काही झालं तर प्राथमिक संशयित म्हणून तुमचा कागद वर काढला जाईल. सुदैवाने तसं काही झालं नाही. स्पर्धा संपेपर्यंत सुमारे आम्ही दीड महिना गॅसवर होतो आणि देवाकडे प्रार्थना करत होतो. ऑस्ट्रेलियाने ती ट्रॉफी जिंकली व ते मायदेशी परतले आणि आमचा जीव भांड्यात पडला.“
 
  

 A collection of signatures
सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात शिक्षण, नोकरी, करिअर यालाच प्राधान्य दिलं जातं. त्यातही स्वाक्षरी संग्रह हा स्वान्तसुखाय म्हणता येईल असा छंद. कारण यात लेखन, वादन अशा कला किंवा छंदांप्रमाणे अर्थार्जन करता येण्याची, फेसव्हॅल्यू मिळण्याची शक्यता अगदी कमी. संग्रह करताना शिक्षण आणि घरच्यांचा पाठिंबा याचा तोल कसा सांभाळला? असं विचारल्यावर कौस्तुभ साठे म्हणाले की, “माझ्या या छंदाला घरातून विरोधच होता. कारण मी अनेकदा लेक्चर्स बुडवून रणजीला, काही कार्यक्रमांना स्वाक्षर्‍या मिळवण्यासाठी जायचो. त्यामुळे घरच्यांच्या विरोधामागे माझ्या शिक्षणावर परिणाम होऊ नये असाच उद्देश होता. पण मी बीएस्सीला कॉलेजमधून दुसरा आलो, एमएस्सीला कॉलेजमधून पहिला आलो आणि त्यांचा विरोध मावळला. हा अभ्यास सांभाळून हे उद्योग करतोय यावर त्यांचा विश्वास बसला असावा. मी स्वत:देखील जेव्हा कधी लेक्चर्स देतो, तेव्हा हे तरुणांना आवर्जून सांगतो की तुमच्या प्राधान्यक्रमांना तिलांजली देऊन छंद जोपासू नका. छंद छंदासारखा ठेवा. त्या वेळी सगळ्यात मोठा प्रश्न होता तो पैशांचा. कारण कार्यक्रमांना जाण्याइतके पैसे माझ्याकडे नसायचे. घरात कॅमेरा असला, तरी तो मला छंदांसाठी मिळत नव्हता. जेवढे पैसे मिळत होते, त्यात कॉलेजमध्ये जाण्यायेण्याचा खर्च सांभाळून स्वाक्षर्‍यांचे उद्योग करावे लागायचे. दुसरीकडे नातेवाइकांना, मित्रांना वेळ देता येत नव्हता, कारण मी सुट्टी असली की संग्रहासाठी वेळ द्यायचो, त्यामुळे ते नाराज असायचे. पण आज या सगळ्या समस्यांवर मात करून एवढा संग्रह केल्यावर तेच नातेवाईक, मित्र आपलं कौतुक करतात किंवा कोणाची तरी भेट घडवून दे अशी इच्छा व्यक्त करतात, हे पाहून ‘कालाय तस्मै नम:’ म्हणावंसं वाटतं. माझा संग्रह पाहून अनेकांनी तर स्वत:कडे असलेल्या स्वाक्षर्‍यादेखील मला आणून दिल्या आहेत. या छंदामुळे मला वेगवेगळ्या क्षेत्रांतले अनेक मित्रमैत्रिणीही मिळाल्या.“
 
 
आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही देऊन जाते. जगावेगळे अनुभव, भावनांचं सुपोषण असं काहीतरी आपल्या गाठोड्यात सामावतंच. याबाबत विचारल्यावर साठे म्हणाले, “मी आयटीसारख्या रुक्ष, अत्यंत ताणयुक्त वातावरण असणार्‍या क्षेत्रात मोठ्या पदावर नोकरी करतो. माझ्या स्वाक्षरी गोळा करण्याच्या छंदाने ठरावीक काळ का असेना, पण मला जबाबदारीच्या ताणातून मुक्त केलं. कामामुळे थकलो की मी माझा हा पसारा उलगडून त्यात बसतो. त्यासाठी केलेल्या धडपडीच्या, त्या संस्मरणीय भेटींच्या आठवणींची पुनरानुभूती घेतो. तेवढा वेळ मी त्या त्या काळात रमून जातो, ताणामुळे थकलेल्या मनाला शांतता मिळते. असो.
 
 
 A collection of signatures
 
जसजसं माझ्या या छंदाबद्दल लोकांना समजू लागलं, तसतसा आपोआप माझा लोकसंग्रह वाढला. सह्या हे माझ्यासाठी एक निमित्त होतं. यामुळे मला भारतीय रागदारी संगीत मनसोक्त ऐकता आलं. ऐकून ऐकून त्यातली मजा येऊ लागली. असंख्य मुलाखती, भाषणं ऐकता आली, मॅचेस बघता आल्या. माणसं यशाच्या शिखरावर गेली तरीही त्यांचे पाय मातीचेच असतात, हे अनुभवलं. तसाच काही माणसांतला अनपेक्षित विक्षिप्तपणाही अनुभवला. अनुभवातून स्वाक्षर्‍या गोळा करण्याबाबत काही गोष्टीही माझ्या लक्षात आल्या आणि मी त्या पाळल्या. उदाहरणार्थ, कलाकाराला कार्यक्रमाच्या, शोच्या आधी कधीही स्वाक्षरीसाठी त्रास द्यायचा नाही. कारण तो आपल्या सादरीकरणाच्या टेन्शनमध्ये असतो. त्यामुळे तो चिडू शकतो, त्याच्या सादरीकरणावर परिणाम होऊ शकतो.
 
 
 
या छंदाबाबत मी स्वत:साठी काही पथ्यं ठरवली आहेत व ती मी पाळतोच. मी ऑफिसचा, अन्य जबाबदार्‍यांचा वेळ कधीही छंदासाठी देत नाही. छंद छंदाच्या जागी आणि काम कामाच्या जागी. कामाच्या ठिकाणी सुट्ट्या घेऊन, अनावश्यक धावपळ करून, अकारण पैसे खर्च करून मी हे साधण्याचा प्रयत्न करत नाही. माझं वेळापत्रक सांभाळून हे सगळं करतो. मी माझ्या छंदामुळे वेळेचं व्यवस्थापन ही महत्त्वाची गोष्ट शिकलो.” साठे सांगत होते.
 
 
 
गेल्या काही वर्षांपासून साठे यांनी आपल्या स्वाक्षरी संग्रहाचं प्रदर्शनही भरवण्यास सुरुवात केली आहे. मुळातच स्वाक्षर्‍यांचं प्रदर्शन ही खूप आगळीवेगळी संकल्पना आहे. त्यातही स्वाक्षर्‍या केवळ छायाचित्रांपुरत्या न राहता त्यामागचे किस्से आणि आठवणीही लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशी त्यांची भावना होती. 2009मध्ये पुण्यात आणि नाशिकमध्ये त्यांची सर्वात मोठी दोन प्रदर्शनं झाली. या प्रदर्शनांना अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रदर्शनाबद्दल ते म्हणाले की, “मी संग्रहाची माहिती देणारं एक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार केलंय, ज्यात मला आलेले अनेक रोचक अनुभव, मान्यवरांच्या स्वाक्षर्‍या यांचं संकलन आहे. यामुळे पडद्यामागची कहाणीदेखील दर्शकांना ऐकायला मिळते. या प्रदर्शनांमुळे व त्याला जोडून असलेल्या व्याख्यानामुळे संग्रहाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला मदतच झाली. त्यामागची मेहनतही लोकांना समजू लागली.”
 
 
 A collection of signatures
 
कौस्तुभ साठे यांचा प्रवास हा केवळ स्वाक्षरी संग्रहापर्यंत मर्यादित नाही. आजोबांनी घेतलेलं समाजसेवेचं व्रतही त्यांनी सुरू ठेवलं आहे. त्याबद्दल ते सांगतात, “माझ्या आजोबांनी शिक्षण क्षेत्रात खूप काम केलं. येऊरच्या वनवासी क्षेत्रात शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. आम्ही त्यांच्या नावाने ‘कै. नाना साठे प्रतिष्ठान’ नावाचा ट्रस्ट सुरू केला असून तो रजिस्टरही झाला आहे. त्या माध्यमातून आम्ही शिक्षण क्षेत्रातील त्यांचं काम सुरू ठेवलं आहे. त्याव्यतिरिक्त येऊरमधील एक अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम यांच्यासाठीही हा ट्रस्ट लागेल त्या स्वरूपाची मदत करतो. त्याचप्रमाणे टाटामध्ये कर्करोगाच्या उपचारांसाठी येणार्‍या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी भोजन सेवा देणार्‍या एका संस्थेलाही नाना साठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत केली जाते. धारावीतील जय बोलमुखे हा अवघा 25 वर्षांचा मुलगा गेली आठ वर्षं दररोज 150 अन्नपाकिटं वितरित करून कर्करुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना अव्याहत भोजनसेवा देतो आहे. त्याला तांदूळ, तूरडाळ आणि तेलाचा पुरवठा आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो. यानंतरही अशाच प्रकारची वैविध्यपूर्ण सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
 
 
छंद आणि समाजसेवा ही आपल्या आयुष्यातली महत्त्वाची अंगं असल्याचं साठे आवर्जून सांगतात. स्वानंदाच्या पलीकडे स्वाक्षर्‍यांच्या माध्यमातून या घटकांची ओळख नव्या पिढीला करून देण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं ते आवर्जून नमूद करतात. आपण भीमसेन जोशींना ऐकलं, किशोरी आमोणकरांना ऐकलं, आर.के. लक्ष्मणांची कला अनुभवली, झाकीरजींचा तबला ऐकण्यात रममाण झालो, कालनिर्णय घडवणारे साळगावकर पाहिले, वाचले, रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्या पाहिल्या.. पण यातली अनेक व्यक्तिमत्त्व आजच्या तरुणांना माहीत नाहीत. मागच्या पिढ्या आणि आजची पिढी यातील सेतुबंधनाचं काम स्वाक्षरी संग्रह करू शकतो, या व्यक्तिमत्त्वांची थोडीशी तरी ओळख या स्वाक्षर्‍यांच्या व किस्से-कहाण्यांतून होऊ शकते, असं त्यांना वाटतं. कौस्तुभ साठे यांचा हा हेतू त्यांच्या प्रदर्शनांतून, व्याख्यानांतून साध्य व्हावा व तरुणांपर्यंत हे संचित पोहोचावं, ही सदिच्छा.
 

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.