जनआक्रोश - राष्ट्रव्यापी लोकचळवळ होते आहे...

विवेक मराठी    09-Dec-2022   
Total Views |
 रस्ते सुरक्षा कायदे हे फक्त पोलिसांच्या उपस्थितीत पाळले जायला नकोत व फक्त पोलिसी भीतीनेही पाळले जायला नकोत, तर जनतेने मनापासून त्या कायद्यांचा स्वीकार केला पाहिजे, यासाठी जनआक्रोशने उभारलेली लोकचळवळ आता राष्ट्रव्यापी होऊ घातली आहे. नागपूरला सुरू झालेली ही लोकचळवळ विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पसरली. त्यानंतर मध्य प्रदेशात जबलपूर, इंदूर, छत्तीसगडमध्ये रायपूर, बिलासपूर आणि ओदिशा राज्यातील संबलपूर वगैरे भागांत जनआक्रोशने नागरिकांत, अधिकारिवर्गात आपले अस्तित्व दाखविणे सुरू केले.

Jan Aakrosh
 
मुळातून ही चळवळ सुरू झाली ती रवींद्र कासखेडीकर, डॉ. अनिल लद्धड व भगवान तेवानी यांच्या प्रयत्नाने. रवींद्र कासखेडीकर हे नॅशनल इन्शुरन्स कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक होते. वाहनांचा विमा काढत असल्यामुळे त्यांना होणारे अपघात व त्यातून होणारी जीवितहानी व वित्तहानी याची माहिती सहजतेने मिळत होती. जवळजवळ 61 टक्के अपघात राष्ट्रीय महामार्गावर होतात. वर्षभरात दीड लाख लोक रस्ते अपघातात आपला जीव गमवितात. सरासरीने बघायला गेले, तर दररोज 400 व्यक्ती रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. हे अपघाती मृत्यू कसे कमी होतील याची चिंता कासखेडीकर यांना त्रस्त करू लागली. त्यातून ‘जनआक्रोश’ ही स्वयंसेवी संघटना (एनजीओ) उभी झाली. 80 वर्षे पार केलेले भगवान तेवानी सुरुवातीला हातात एक काठी घेऊन सदर परिसरातील चौकाचौकात उभे राहू लागले. चुका करणार्‍या वाहनांवर हातातील काठी आपटू लागले. एक म्हातारा - वृद्धत्वाकडे वळलेला माणूस काहीतरी सांगतो, म्हणून काही जण वाहतूक नियम पाळू लागले. चौकात लाल दिवा असताना वाहने दामटण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले. भगवानदासजी तेवानी यांनी 16 जानेवारी 2022ला वयाची 90 वर्षे पूर्ण करून 91व्या वर्षात पदार्पण केले होते. या तिघांच्या मदतीला बाळ गुळकरी, करंदीकर, पोलीस उपायुक्त दाभाडे आले. बघता बघता ही चळवळ बाळसे धरू लागली. 130 सदस्य चौकात उभे राहून वाहतूक नियंत्रणाला हातभार लावू लागले. वाहतूक नियमांचे शिक्षण देणे सुरू केले. जनआक्रोशचे सदस्य होणार्‍यांत बव्हंशी वरिष्ठ नागरिक होते. निवृत्त झालेले हे सदस्य ठरवून विविध चौकांत उभे राहू लागले. चौकात लाल दिवा असताना पुढे वाहन दामटणार्‍या चुकारांना प्रतिबंध व्हावा, म्हणून 6 जण हातात दोर्‍या घेऊन उभे राहिले. ज्या ठिकाणी हिरवा दिवा सुरू राहतो, तेवढी वाहतूक सुरू ठेवू लागले, उर्वरित तीन रस्ते मात्र बंद ठेवू लागले.
 
 

त्याची संकल्पना काय?
अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा? पुस्तकाची प्रत आजच नोंदवा.
सवलत मूल्य – रु. 225/-

https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/

 
 

Jan Aakrosh
 
रवींद्र कासखेडीकर हे 2012 साली सुरू झालेल्या या लोकचळवळीचे सुरुवातीपासून सचिव आहेत. यातून अपघातांचा अभ्यास सुरू झाला. अपघातात बळी पडणारे बाइक चालविणारे, बाइकवर मागे बसणारे किंवा चारचाकी वाहनात बसणारे वा चालक किंवा अधिक टायर लावलेल्या ‘मल्टी अ‍ॅक्सेल’ हेवी वाहनांचे ड्रायव्हर, रस्त्याने पायी जाणारे किंवा रस्त्याच्या बाजूला उभे असलेले - ही सर्व श्रेणीतील मंडळी असतात. क्वचितच एखादा दिवस असा उजाडतो, ज्या दिवशी वृत्तपत्रात कोणत्याही अपघाताचे वृत्त नसते वा अपघात बळीची बातमी नसते. हे अपघात होण्यासाठी तीन मुख्य घटक कारणीभूत असतात - 1) मानवी चुका, 2) रस्ते स्थिती व 3) वाहनांची स्थिती. पण यापैकी मानवी चुका हेच मुख्य कारण आहे. 81.4 टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. हे अपघात टाळायचे, तर 4 ‘ई’ महत्त्वाचे ठरतात -
 
 
1) Engineering - इंजीनियरिंग
 
2) Enforcement - कायद्याचा दणका
 
3) Education -वाहतूक कायद्याबाबत शिक्षण
 
4) Environment and Emergency - रस्ते स्थिती
 
यात जनआक्रोशने तिसर्‍या ‘ई’वर - म्हणजे शिक्षणावर भर द्यायचा निर्णय घेतला. वाहनचालक, वाहनधारक, रस्त्यावरील पादचारी, शाळा-महाविद्यालये, शिकवणी वर्ग यातील विद्यार्थी, संस्थांमधील कर्मचारी यांना रस्ता सुरक्षा, रस्ता सुरक्षाविषयक नियम याबाबत शिक्षित करण्याचा निर्णय झाला. विशेषत: जे विद्यार्थी लवकरच वयाची 18 वर्षे पूर्ण करून वाहने चालवू लागतील, अशांवर जनआक्रोशने लक्ष केंद्रित केले. पिवळ्या रंगाचे टी-शर्ट व त्यावर ‘जनआक्रोश’ ही नागपूर शहरात ओळखीची खूण झाली. पिवळ्या रंगाचे टी-शर्ट घालून कुठलेही मानधन न घेता, फक्त सेवाभावाने जनआक्रोशचे कार्यकर्ते काम करतात.
 

Jan Aakrosh 
 
जनआक्रोशतर्फे होणारे जनप्रबोधनाचे सर्व विविध कार्यक्रम विनामूल्य असतात. कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी जनआक्रोशची कामे पूर्ण वेगाने सुरू होती. 2019पर्यंत आम्ही 1 तासाचे पॉवर पॉइंट सादरीकरण तयार केले होते. ते नागपूर आर.टी.ओ.त चारचाकी वाहनांचा परवाना घेणार्‍यांना दाखविले जात असे. या कार्यक्रमाशिवाय कुठल्याही वाहनचालकाच्या परवान्याचे नूतनीकरण होत नसे. मागील 6 वर्षांत आम्ही 500 सादरीकरणे केली. त्यातून 40,000वर वाहनचालकांचे प्रबोधन झाले.
 
 
 
जनआक्रोशचे एक सूत्र आहे - ‘कॅच देम यंग.’ जनआक्रोशने विविध शाळांमध्ये जाऊन नागपूर जिल्ह्यात व आजूबाजूला वाहतूक नियम प्रशिक्षण कार्यक्रम राबविला. याशिवाय शहर बस वाहतुकीचे चालक, वाहक व शालेय बसेसचे वाहनचालक यांच्या प्रशिक्षणाचा व प्रबोधनाचा कार्यक्रम राबविला. त्यातून वाहतूक, रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याची वृत्ती वाढीला लागली व ते सर्व जण सुरक्षित वाहन चालवू लागलेत. याशिवाय जनआक्रोशने आपल्या सदस्यांसाठी, वाहन रस्ता सुरक्षा संदेश वितरित करण्यासाठी एक गुणवत्ता मंडळ (Quality Circle) स्थापन केले. जनआक्रोशचे हे काम बघून, त्याचा विस्तार व्हावा म्हणून नॅशनल इन्शुरन्स कंपनीने आम्हाला एक ‘मिनी बस’ देणगी म्हणून दिली. त्यामुळे अधिकाधिक शाळा-महाविद्यालयांत आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम राबवू शकलो. याशिवाय नागपूर शहर पोलिसांच्या मदतीने आम्ही नागपूर शहरातील अपघातप्रवण स्थळांचा शोध घेऊन त्यांचा अभ्यास केला.
 
 
Jan Aakrosh
 
जनआक्रोशने रस्ते सुरक्षा नियमांवर एक लघुचित्रपट तयार केली. या लघुचित्रपटाला पुणे पोलीस व अ.भा. मराठी चित्रपट महामंडळ यांचा उत्तम लघुचित्रपट व फोटोग्राफी पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय दर महिन्याच्या तीन तारखेला आम्ही ‘नो-हॉर्न’ डे साजरा करतो. जनआक्रोशने 2020पासून दर वर्षी अतिशय परिणामकारक, प्रभावी दिनदर्शिका काढल्या आहेत व विविध संघटना, शैक्षणिक संस्था, शाळा-महाविद्यालये यांतून त्यांचे विनामूल्य वितरण केले जाते. वाहतूक मंत्रालयाच्या नॅशनल रोड सेफ्टी मेलवर जनआक्रोशचे दोन सदस्य नेमण्यात आले आहेत. 2030पर्यंत जागतिक स्तरावर होणार्‍या एकूण मृत्यूंच्या प्रमाणात रस्ते अपघातामुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण 5व्या क्रमांकावर असणार आहे. रस्ते अपघातात अधिकांश मृत्यू डोक्याला झालेल्या जखमेमुळे होतात. हेल्मेटमुळे डोक्याला होणार्‍या गंभीर दुखापतीचे प्रमाण 70 टक्के कमी होते. 50 कि.मी. प्रतितास वेगाने होणारी टक्कर पाचव्या मजल्यावरून पडणार्‍या घटनेबरोबरची असते. गाडी चालविताना सुरक्षा पट्टा (सीट बेल्ट) बांधल्याने टकरीचा प्रभाव 80 टक्के कमी होतो, मृत्यूची शक्यताही 60 टक्के कमी होते. वाहनचालकांच्या एकूण मृत्यूंमध्ये 10 टक्क्यांपेक्षा अधिक चालकांचा मृत्यू दारूच्या नशेत वाहने चालविण्याने होतात. वाहन चालविताना मोबाइलचा वापर वाहन चालविताना इंद्रिय व्यग्र करतो.
 
 

Jan Aakrosh
 
 
रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे अशी भावना लहान मुलांमध्ये निर्माण होणे आवश्यक असते. अनुभव असा येतो की, लहान मुले वाहतूक नियम पाळण्याचा आग्रह धरतात, पण त्यांचे पालक मात्र दुर्लक्ष करतात. अनेकदा शाळेत मुलांना त्याचे आई-वडील पोहोचवून देतात, त्यात शाळेला जाताना 1-4 कि.मी. वळसा घालून जावे लागते. त्या वेळी पालक रस्ता नियमांचे पालन करीत नाहीत. अनेकदा विरुद्ध दिशेने (राँगसाइड) जाऊन शाळा गाठतात. हे पालक आपल्या पाल्यांवर कोणता संस्कार करीत असतात? - वाहतूक नियम तोडले तरी चालते किंवा पोलीस नसेल तर वाहतूक नियम पाळण्याची गरज नाही, असे त्या मुलांवर बिंबवीत असतात. नागपूरला धरमपेठ भागात डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने ट्रॅफिक पार्क आहे. या ट्रॅफिक पार्कमध्ये लहान लहान मुलांना वाहतूक नियम पाळण्याचे शिक्षण दिले जाते. गेली 8-10 वर्षे हे ट्रॅफिक पार्क चांगले सुरू होते, पण मनपाचे दुर्लक्ष झाले आणि या ट्रॅफिक पार्कला उतरती कळा लागली. आता या वर्षी महापालिकेने हे ट्रॅफिक पार्क चालविण्याची जबाबदारी जनआक्रोशवर सोपविली आहे.
 
 
 
हेल्मेट घालून दुचाकी वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालवू नये, दोनपेक्षा अधिक वाहने समांतर चालवू नये, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहन न चालविणे, वाहतूक सिग्नलचा अर्थ समजून वाहन चालविणे, योग्य वेळी योग्य ठिकाणी वाहन थांबविणे वा सुरू करणे, सुरक्षा पट्टा लावणे, दारूच्या प्रभावाखाली वाहन न चालविणे, वाहन चालविताना वा रस्त्यावरून पायी जाताना मोबाइलचा वापर करू नये हे नियम पाळणे पोलिसाच्या धाकाने नव्हे, तर मानसिक सवय म्हणून व्हायला पाहिजे. मात्र हे नियम पाळतानाही अपघात झाला, तर त्यातील अपघातग्रस्ताला ‘गोल्डन अवर’मध्ये मदत मिळणे जरुरी असते. या सगळ्यांसाठी जनआक्रोश आग्रही आहे, म्हणूनच ती देशव्यापी लोकचळवळ ठरत आहे.