कर्णबधिर व दिव्यांगांमध्ये अस्तित्वाच्या शोधाची ठिणगी चेतवणारी ‘दिव्यांगधारा’

विवेक मराठी    10-Feb-2022   
Total Views |
‘दिव्यांगधारा’ या संस्थेने कर्णबधिर मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी 2021च्या जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा 12 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता समर्थ व्यायामशाळा, शिवाजी पार्क, दादर येथे झाला. ‘पथदर्शिका’ या दिव्यांगधाराच्या दिनदर्शिकेचेही नुकतेच प्रकाशन झाले. कर्णबधिरांच्या व अन्य दिव्यांगांच्याही समस्या, त्यावरील दूरगामी तोडगे व त्यांचा विकास या दृष्टीने स्थापन झालेल्या या संस्थेच्या संस्थापक शुभदा ओक-सातपुते यांच्याशी या सोहळ्याच्या निमित्ताने संवाद साधला. त्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा हा आढावा.

NGO

आपल्यापैकी काही जण जन्माला येतानाच शारीरिक दोषांसह जन्म घेतात. कोणामध्ये हाताचा, कोणामध्ये पायाचा, कोणामध्ये डोळ्यांचा तर कोणामध्ये मज्जारज्जूचा दोष असतो. अशांपैकीच आणखी एक प्रकार असतो तो कर्णबधिरत्वाचा. जन्मत:च पूर्णपणे किंवा अंशत: बहिरेपण असल्याने ही मुले ऐकू शकत नाहीत म्हणून बोलूही शकत नाहीत. त्यामुळे संवाद तुटतो आणि भाषा खुंटते. कर्णबधिरपणामुळे मूलभूत शिक्षण, करिअर यांच्यावर अनेक मर्यादा येतात. ह्या मुलांच्या आपल्या आकांक्षांनाच, प्रगतीच्या अवकाशाला बालपणापासूनच मर्यादा पडतात. देशाच्या आणि या मुलांच्या भवितव्याचा विचार केला, तर ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे. कमीपणाच्या भावनेतून, न्यूनगंडातून बाहेर पडायचे असेल, तर त्यासाठी त्यांच्या क्षमता वाढवणे, योग्य व आवश्यक भाषाविकास वयाप्रमाणे होतोय ना ह्यावर लक्ष देणे व त्यांच्या पालकांच्या मनात पाल्याच्या प्रगतीचे स्फुल्लिंग फुलवणे, अस्तित्वाच्या शोधाची ठिणगी चेतवणे यासाठी ‘दिव्यांगधारा’ या संस्थेची स्थापना झाली.
चेंबूर कॉलनी युवक मंडळ संचालित ‘रोचिराम थधानी हायस्कूल फॉर हिअरिंग हँडिकॅप’ या शाळेच्या निवृत्त उपमुख्याध्यापिका शुभदा ओक-सातपुते यांनी या संस्थेची स्थापना केली. कर्णबधिरांना नियमितपणे जाणवणार्‍या समस्यांबद्दल त्या म्हणाल्या, की “सामान्यांच्या मुलांसाठी पूर्वप्राथमिक स्तराचा अवधी तीन वर्षांचा असतो, तर कर्णबधिरांसाठी पाच वर्षांचा. कारण जेव्हा ही मुले शाळेत येतात, किंबहुना त्यांना श्रवणयंत्र मिळते, प्रशिक्षण सुरू होते, तो बोली-लेखी भाषेच्या दृष्टीने त्यांचा जन्म असतो. त्यांच्या मर्यादांच्या विचारांनी पूर्वप्राथमिक स्तरासाठी तयार केलेली क्रमिक पुस्तके खूप कमी आहेत. त्यामुळे त्यानंतर येणारे प्राथमिक, माध्यमिक हे स्तर त्यांना विशेष कठीण जातात. कारण पूर्वप्राथमिक स्तराकरिता पालक, शैक्षणिक व्यवस्था आणि प्रत्यक्ष विद्यार्थी या तिघांमध्येही एकवाक्यता, निश्चितता, मुलाला त्याच्या क्षमतेनुसार समजेल अशी शिकवण्याची पद्धत, प्रस्तावित अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके असणे गरजेचे आहे. हे सर्व पैलू जर जुळून आले नाहीत, तर पुढे क्लिष्ट भाषा, अमूर्त संकल्पना समजणे अशक्य आणि कठीण होते. अशा वेळी ही मुले फार तर सातवीपर्यंतच शिक्षण घेतात. कारण पुढील शिक्षण हे सामान्य मुलांप्रमाणे घेणे त्यांना अशक्य होते. कर्णबधिरांसाठी प्रमाणित कल चाचणी (अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट) नाही, त्यामुळे भविष्याच्या शिक्षण व व्यवसाय या दृष्टीने योग्य दिशा कळत नाही.”
काहींचे कर्णबधिरत्व अंशत: असते, तर काहींचे पूर्ण असते. त्यानुसार त्यांचा ऐकण्याचा आणि आकलनाचा स्तर बदलत जातो. त्यांना त्यांच्या प्रकारानुसार संकेतभाषा वापरून शिकवावे लागते. त्यांना शिकवलेले कळते आहे की नाही ते पाहावे लागते. त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे हे त्यांना स्वयंरोजगाराशी जोडण्यासाठी किंवा उद्योजकांपर्यंत नेण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते. अशा अनेक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी दिव्यांगधाराची स्थापना करण्यात आली असल्याचे शुभदाताई यांनी सांगितले.


NGO
2020मध्ये कोविडची साथ सुरू झाली, शाळा-महाविद्यालये बंद झाली आणि ऑनलाइन शिक्षण हा आयाम जोरात सुरू झाला. स्क्रीनवर पाहणे, ऐकणे, समजून घेणे हा शिक्षणाचा भाग बनला. कर्णबधिरांसाठी हा बदल अत्यंत कठीण होता, आजही आहे. ऑनलाइन माध्यमातून लिप रीडिंग करणे - म्हणजे ओठांच्या हालचालीवरून शिक्षक जे बोलले त्याचा अर्थ लावणे त्यांच्यासाठी कठीण झाले. लॉकडाउन, आर्थिक चणचण यामुळे पालक आणि मुले यांच्यामधील संवाद कमी झाला. पुढे सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने ‘टिलिमिली’ नावाची एक शैक्षणिक मालिका सुरू केली. पण त्यात संकेतभाषा आणि सबटायटल्स नसल्याने कर्णबधिर त्यापासून वंचित राहू लागले. दिव्यांगांसाठी एखादी चॅनल असावी, अथवा जो कार्यक्रम असेल त्यात चॅनलवर थोडा वेळ तरी कर्णबधिरांसाठी संकेतभाषेतून शिक्षण दिले जावे, सबटायटल्स असावीत, जेणेकरून कर्णबधिरांनाही त्यातले ज्ञान घेता येईल. शुभदाताईंनी त्यासाठी पाठपुरावा सुरू केला, परंतु यश आले नाही, म्हणून “तुम्हीच हा उपक्रम का सुरू करत नाही?” असा सहज प्रश्न एका परिचितांनी विचारला. ह्या प्रश्नाची प्रेरणा घेऊन ताईंनी स्वत:च यूट्यूब चॅनल सुरू केली. त्या काळात 24 तास मुले पालकांजवळ होती. पालकांनीच मुलांना शिकवण्यावर भर द्यावा व त्यांच्यात नियमित संवाद प्रस्थापित व्हावा, म्हणून संवादसेतू स्पर्धा आयोजित केली. पालकांना मार्गदर्शन, शैक्षणिक विषयांचे पाठ आणि यशस्वी कर्णबधिर व दिव्यांग युवकांच्या जीवनावर चित्रफिती निर्माण करून त्या माध्यमातून समाजजागृती या हेतूने यूट्यूब चॅनलद्वारे दिव्यांगधाराचे निर्मितीचे काम, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि एक सुजाण गायिका शिवांगी वालावलकर आणि त्यांची कन्या वेदांगी वालावलकर ह्यांच्यामुळे शक्य झाले. गेल्या दीड वर्षात 30हून अधिक व्हिडिओज पूर्णपणे वैयक्तिक स्तरावर निर्माण केले. अन्य चॅनल्सवर, आकाशवाणीवरदेखील दिव्यांगधारा पोहोचली.
 
मुले व पालक यांच्यात संवाद प्रस्थापित व्हावा, म्हणून दिव्यांगधाराच्या वतीने 2020मध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात पालकांनीच मुलांना शिकवायचे होते. यासाठी त्यांना काही विषय व स्पर्धेचे नियम दिले गेले व त्याचे व्हिडिओ तयार करून पाठवण्यास सांगण्यात आले. पहिल्याच वर्षी तब्बल 65 जणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. दुसर्‍या वर्षी वेगवेगळ्या गटांत आणि वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा घेण्यात आली. मुलांचे चार गट केले - 4 ते 6, 7 ते 10, 11 ते 13 आणि 14 ते 18. वेशभूषा स्पर्धा, मुलांनी आपल्यासारख्याच दुसर्‍या सर्वसामान्य मुलाला शिकवण्याची स्पर्धा, आपल्या अभ्यासक्रमावर आधारित मॉडेल तयार करणे, विद्यार्थ्यांचे छंद व कलागुणप्रदर्शन अशा चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे पालकांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमुळे आपण शिकलो त्या ज्ञानाचा, भाषेचा संकेतभाषेचा, शिक्षणाचा वापर करण्याची या मुलांना संधी मिळाली. या स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. 100च्या आसपास विशेष शाळांतील स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा 12 फेब्रुवारी रोजी झाला. तसेच क्रीडाभारतीतर्फे दिव्यांग खेळाडूंच्या मातांना जिजामाता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.


NGO
दिव्यांगधाराचा आणखी एक पदर म्हणजे अक्षरसुधा प्रकाशनाचा जन्म. या प्रकाशनाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी, कर्णबधिरांसाठी पूर्वप्राथमिक स्तरासाठी भाषांकुर व अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
 
दिव्यांगधारा व क्रीडाभारती यांच्या वतीने 2022च्या पथदर्शिकेचेही नुकतेच प्रकाशन करण्यात आले. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अव्वल कामगिरी करणार्‍या भारतीय खेळाडूंच्या कर्तृत्वावर या पथदर्शिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी क्रीडाक्षेत्रातील संधींची माहितीही देण्यात आली आहे. अनिकेत राजाराम बुधारप, किशोर राममूर्ती गुप्ता आणि हरिश दयाराम यादव या तीन कर्णबधिर मुलांनी या पथदर्शिकेचे डिझाइन, अक्षरजुळणी व कलात्मक रचना केली आहे.
आपणही सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण घेऊ शकतो, करिअर करू शकतो व आपल्याला सुयोग्य संधी मिळू शकतात, ही आशेची ठिणगी त्यांच्या मनात प्रज्ज्वलित होणे अत्यंत आवश्यक आहे. ही भावना निर्माण करण्यासाठी दिव्यांगधारा या संस्थेच्या माध्यमातून कर्णबधिर विद्यार्थ्यांना मोठ्या संस्थांशी जोडणे, त्यांच्यात समन्वय घडवणे, त्यांचे शिक्षण तसेच रोजगार यांच्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे यावर आपला भर असल्याचे शुभदाताई सांगतात. सक्षम, क्रीडाभारती, संस्कार भारती यांच्याशी आपण जोडले गेलो असून विद्यार्थ्यांना त्याद्वारे प्रगतीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होतील अशी आशाही त्या व्यक्त करतात. पथदर्शिका आणि दिव्यांगधारा आयोजित स्पर्धा ही त्यातील महत्त्वाची पावले आहेत, असेही त्या स्पष्ट करतात. संस्थेच्या माध्यमातून यापुढेही अशा पथदर्शिकेची निर्मिती करण्यात येणार आहे.

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.