निष्काम कर्मयोगिनी

विवेक मराठी    14-Feb-2022   
Total Views |
@राजदत्त
 मी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मालिका करत होतो. त्याचं शीर्षकगीत लतादीदींनी गायलं. ज्या वेळी मानधनाचं पाकीट त्यांना द्यायला गेलो, तेव्हा त्यांनी ते घेतलं नाही. एकीकडे जिथे मदत करताना त्या मदतीपेक्षाही आपलं नाव येण्यासाठी अहमहमिका लागलेली असते, तिथे सावरकरांवरील प्रेमापायी मानधनाचे पैसेही न घेण्याची वृत्ती दीदींमध्ये होती. इतकंच नव्हे, तर “शीर्षकात माझं नावही घालू नका” असंही त्यांनी आवर्जून सांगितलं होतं.

lata mangeshkar
रविवार, 6 फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. जीवनभर कृष्णाच्या बासरीप्रमाणे आपल्या स्वरांनी त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध तर केलंच, त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यांत, देशहिताच्या कार्यातही सहभाग घेतला. पण एखादं कार्य हातून घडलं की, लतादीदी त्यापासून मुक्त होत असत - मग ते गाणं असो, अर्थसाहाय्य असो, एखाद्याला ममत्वाने केलेली मदत असो वा देशासाठी दिलेले योगदान असो. फळाची अपेक्षा न ठेवता आणि कर्तृत्वाबद्दल प्रौढी न मिरवता निरंतर कार्यरत राहिलेल्या लता मंगेशकर या निष्काम कर्मयोगिनी होत्या, प्रखर व समर्पित राष्ट्रप्रेमी होत्या.

वर्ध्यातून पुण्यात आलो आणि दैनिक भारत वर्तमानपत्राच्या संपादकीय विभागात साहाय्यक म्हणून मी रुजू झालो. तिथे असताना मी संघाच्या कार्यालयात राहत असल्यामुळे, जिवलग म्हणून अनेकांशी ऋणानुबंध प्रस्थापित होत गेले, त्यातलेच एक सुधीर फडके अर्थात बाबूजी. त्यांना भेटायला मी सिल्वासा, नगरहवेलीला गेलो. तेव्हा दादरा-नगरहवेली मुक्तिसंग्रामाचे वारे वाहत होते आणि बाबूजी तिकडे सांगीतिक कार्यक्रमासाठी नव्हे, एका वेगळ्याच ध्येयासाठी गेले होते. त्या काळात जनसंपर्क, कार्यक्रम, भेटीगाठी, दळणवळणाची व्यवस्था, चहापान अशा अनेक गोष्टींसाठी खर्च येत असे. यासाठी जो पैसा लागेल, तो सगळा आपण देऊ असं लतादिदींनी सांगितलं असल्याचं मला बाबूजींकडून समजलं आणि आपलं वचन त्यांनी पाळलं. विशेष म्हणजे यात आर्थिक साहाय्य केल्याबद्दल कुठेही आपलं नाव येऊ नये हेही त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. वास्तविक, या काळात आमची प्रत्यक्ष भेट झाली नाही, मात्र लता मंगेशकर यांची राष्ट्रनिष्ठा प्रकट करणारा हा प्रसंग मला आजही लख्ख आठवतो.


padmaja
काही काळानंतर मी चित्रपट क्षेत्रात आलो. प्रख्यात दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचा साहाय्यक म्हणून अनेक चित्रपटांसाठी काम केल्यानंतर 1967 साली माझा दिग्दर्शकीय पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, तो म्हणजे ‘मधुचंद्र’. लतादीदींना मी प्रत्यक्ष आणि जवळून पाहिलं ते कोल्हापूरला जयप्रभा स्टुडिओत. मुंबईच्या धबडग्यातून चार घटका मोकळा श्वास घेता यावा, म्हणून तिथे त्या भालजी पेंढारकरांकडे येऊन राहत. एकदा अचानक पावसामुळे आमचं चित्रीकरण रद्द झालं. तिकडे फेरफटका मारत असताना एका झाडाला आंबे लगडलेले दिसले. मी एक रसरशीत आंबा तोडला आणि अचानक नजर गेली ती समोर उभ्या दीदींकडे. मी तिथलेच काही आंबे घेतले व त्यांना दिले. त्यातलाच एक त्यांनी मला खाऊ म्हणून दिला. दिला तोही इतका सहज की, त्या देण्यामागे कोणतीही भावना नसावी. त्यांच्या त्या भावनेचा गोडपणा त्या खाऊत उतरला होता. नंतर कामाच्या निमित्ताने वेळोवेळी आमच्या गाठीभेटी होत राहिल्या.

मधुचंद्र सिनेमा चांगलाच गाजला. आता पुढे काय हा प्रश्न होता. सुलोचनाताईंच्या सुचनेनुसार मी कोल्हापूरला भालजींकडे गेलो. भालजी म्हणाले, “मी तुला साहाय्यक म्हणून घेणार नाही. स्वतःचा दिग्दर्शकीय सिनेमा केल्यानंतर पुन्हा साहाय्यक म्हणून काम केलंस, तर आयुष्यभर तेच करशील.” त्यांनी त्यांच्या शंभरेक संहितांचं बंडल मला दिलं आणि त्या वाचून टिपणं काढायला सांगितलं. काही दिवसांनी त्यांच्या घरी गेलो, तेव्हा लतादीदीही तिथे होत्या. भालजी मला म्हणाले, “कोणती आवडली?” मी म्हणालो की, “घरची राणी’ ही संहिता मला आवडली.” पण ते घरची राणीसाठी तयार नव्हते. पण लतादीदी म्हणाल्या, “त्याला ती कथा आवडली असेल तर करू दे दिग्दर्शन.” भालजी निर्मितीला तयार झाले आणि तो चित्रपट आकाराला आला.

भालजींचा, राजाभाऊंचा, दत्ता धर्माधिकारींचा चित्रपट स्पर्धेत असताना त्या चित्रपटाला राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. निकाल समजला आणि मी तडक कोल्हापूरला भालजींचे आशीर्वाद घ्यायला गेलो. त्या वेळी त्यांनी जे सांगितलं, ते ऐकून मी विलक्षण हेलावलो. भालजी म्हणाले, “तुला नमस्कारच करायचा असेल, तर लताला कर. मी निर्मितीला होकार दिला, कारण तेव्हा लता मला म्हणाली की बाबा, या सिनेमासाठी लागेल तो खर्च मी देईन. फक्त माझं नाव कुठे येता कामा नये. हे पैसे मी तुमच्या हवाली केले आहेत. तिथे निर्माता म्हणून तुमचंच नाव राहू द्या. तुला आशीर्वादच घ्यायचे असतील तर लताचे घे.” भालजींकडून लतादीदींचा पत्ता घेऊन मी मुंबईला गेलो. पण आपण काहीतरी वेगळं केल्याचा अभिनिवेश किंवा माझ्यामुळे चित्रपट झाला, अशी प्रौढी लतादीदींच्या वागण्यात नव्हती.

माझ्या अनेक सिनेमांसाठी, मालिकांसाठी लतादीदींनी पार्श्वगायन केलं. खरं तर दिदी त्या काळात प्रचंड व्यग्र असत. कोणताही निर्माता म्हणून त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी कधीही गायला नकार दिला असेल असं कधी होत नसे. तेव्हा वास्तविक दोन-तीन महिन्यांचं त्यांचं वेळापत्रक लागलेलं असायचं. पण तरीही त्यात कुठे जमवता येतं का ते पाहते, इतकं सौम्य उत्तर त्या देत. घरची राणी प्रदर्शित झाला, त्या वेळी त्या प्लाझाला बघायला आल्या. चित्रपटानंतर मी त्यांना “कसा वाटला चित्रपट?” असं विचारलं. त्यावर त्यांनी मला जे उत्तर दिलं, तो माझ्यासाठी कानमंत्र ठरला. त्या म्हणाल्या, “मला कसा वाटला त्यापेक्षा लोकांना तो चित्रपट कसा वाटला हे अधिक महत्त्वाचं आहे. समाजाला आवडेल, भावेल, त्यांचं मन बांधून ठेवेल असे चित्रपट येत राहिले पाहिजेत.” त्यांचे ते शब्द माझ्या मनात कायमचे घर करून राहिले.
 
मी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मालिका करत होतो. त्याचं शीर्षकगीत लतादीदींनी गायलं. ज्या वेळी मानधनाचं पाकीट त्यांना द्यायला गेलो, तेव्हा त्यांनी ते घेतलं नाही. “हे तुमच्याकडेच राहू दे. मालिका करताना तुमचा जो काही खर्च होईल, त्यात हे जमा करा” असं त्या म्हणाल्या. सावरकरांवरील प्रेमापोटी त्यांनी शीर्षकगीताचे पैसे घेतले नाहीत. एकीकडे जिथे मदत करताना त्या मदतीपेक्षाही आपलं नाव येण्यासाठी अहमहमिका लागलेली असते, तिथे सावरकरांवरील प्रेमापायी मानधनाचे पैसेही न घेण्याची वृत्ती दीदींमध्ये होती. इतकंच नव्हे, तर “शीर्षकात माझं नावही घालू नका” असंही त्यांनी आवर्जून सांगितलं होतं.
 
लतादीदींच्या मनात आपल्या देशाबद्दल विलक्षण तळमळ होती. भारत स्वतंत्र होऊनही गोव्यातील आपला मंगेशी हा देव, आपला मूळ प्रदेश आजही पारतंत्र्यात आहे. तो पारतंत्र्यात आहे, याची त्यांना अतिशय खंत वाटत असे. गोवा मुक्त झाला पाहिजे, त्यासाठी आपण काम केलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे, खर्चाचा आधार दिला पाहिजे याची त्यांना ओढ होती. आणि मुख्य म्हणजे हे सारं करताना आपलं नाव कुठेही येऊ नये, याची खबरदारीही त्यांनी वेळोवेळी घेतली. सुधीर फडक्यांना त्यांनी तसं स्पष्ट केलं होतं. “मी जे करू शकते, ते आणि तितकं मी केलं आहे, हेच माझ्या मनात राहील. कारण गोवा, मंगेशी, त्याचं मंदिर हे माझं प्रेरणास्थान आहे. यातूनच मला प्रेरणा मिळते” ही त्यांची भावना होती. अहंभावाला त्यांच्या मनात अजिबात स्थान नव्हतं. अगदी त्यांच्या गाण्याबद्दलही कोणी भावना व्यक्त केली, प्रतिक्रिया दिली तर त्या स्तुतीपासून त्या सावधपणे दूर राहत.
 
 
कौतुकाच्या शब्दांपेक्षा त्यांच्यासाठी मोलाची होती ती त्यांची आवड. त्यांना जे आवडत होतं ते त्यांनी आयुष्यभर केलं, ते म्हणजे गाणं. श्रीकृष्णाची बासरीच्या निवळशंख सुरांनी पुरातन काळात गोकुळातला प्रत्येक मनुष्य जसा भारावला, ते सूर जसे माणसाच्या हृदयात खोलवर जाऊन बसले, श्रीकृष्णांनी आपल्या बासरीच्या सुरांनी त्यांना जसं प्रेरित केलं, तसेच सूर लता मंगेशकरांमुळे आपल्याला ऐकायला मिळाले. आपण भाग्यवान आहोत.
 
(लेखक सुप्रसिद्ध दिग्दर्शक व संस्कार भारतीचे अखिल भारतीय संरक्षक आहेत.)

शब्दांकन - मृदुला राजवाडे
 

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.