सरस भक्त रसखान

विवेक मराठी    22-Feb-2022   
Total Views |
रसखान म्हणजे केवळ साहित्य, प्रेमभक्ती, रसपूर्ण कविताच नाही, तर रसखान हा संघर्ष आहे, हे वास्तव आपण लक्षात घेतले पाहिजे. या पार्श्वभूमीवर रसखान यांना कोणत्या कृष्णाने मोहिनी घातली होती, ते आपण समजून घेतले पाहिजे. अन्य कृष्णभक्त कवींप्रमाणे रसखानदेखील कृष्णाच्या अलौकिक आणि लौकिक अशा दोन्ही प्रकारच्या रूपांचे वर्णन करतात. वास्तविक रसखान यांचे कृष्ण हे अलौकिकच आहेत, पण आपल्या भक्तांना अलौकिक आनंद प्रदान करण्यासाठी आणि प्रजेच्या रक्षणासाठी ते साकार रूप धारण करून अवतार घेत असतात.

DEV

सलमान हरिभक्तांच्या महिमेचे वर्णन करताना ‘भक्तमाल’ ग्रंथाच्या उत्तरार्धाचे रचनाकार बाबू हरिश्चंद्र असे वर्णन करतात की, ‘इन मुसलमान हरिजनन पें कोटि हिंदु वारिए।’ या उक्तीचा अर्थ आपल्याला असा करता येईल की, या मुसलमान हरिभक्तांवरून कोटी सर्वसाधारण हिंदू ओवाळून टाकावेत. अशा रितीने हे मुसलमान हरिभक्त किती उच्च कोटीचे आहेत, हे आपल्या लक्षात येते. या हरिभक्तांमध्ये कवी रसखान यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. हे नाव भक्त म्हणूनही आणि संतकवी म्हणूनही महत्त्वाचे आहे.
 
हे महान कवी हरिभक्तीकडे कसे वळले, ते आपण प्रथम पाहू. रसखान यांचा काळ आणि त्या वेळची इतिहासाची पाने चाळली असताना आपल्या हाती ‘रसखान यांचा विषादयोग’ हे प्रकरण लागते. आपल्याला कल्पना असेल की, श्रीमद्भगवद्गीतेचा पहिला अध्याय हा ‘अर्जुनविषादयोग’ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र अर्जुनाला झालेला विषाद वेगळा होता आणि रसखान यांना झालेला विषाद वेगळा होता. धर्माची स्थापना करण्यासाठी कौरवांचा वध करणे आवश्यक झाले होते, पण सत्ताप्राप्तीकरिता आपल्याच भाऊबंदांना कंठस्नान घालणे हे अर्जुनाला पटत नव्हते. मात्र रसखानांच्या काळात सत्ताप्राप्तीकरिता अधर्माचा अवलंब करण्यात कुणीच मागेपुढे पाहत नव्हते आणि याच सत्ताकारणाचा रसखान यांना उबग आला होता. याचे वर्णन असे आहे -
 
देखि गदर-हित साहिबी, दिल्ली नगर मसान।
 
छिनहि बादशा-बस की, ठसक छोरि रसखान॥

या दोह्यात रसखान सांगतात, ‘दिल्ली नगरीत सत्ताकारणामुळे रक्तक्रांती झाली आणि हे नगर एखाद्या स्मशानाप्रमाणे कुरूप आणि भयानक झाले. त्या वेळेेस आपल्या शाही वंशाचा गर्व सोडून आणि आपल्या प्रेयसीवरील प्रेमाचा त्याग करून रसखान व्रजभूमीत आले.’ याच व्रजभूमीत संवत 1671मध्ये त्यांनी ‘प्रेमवाटिका’ ही रचना सिद्ध केली.

इतिहासाचे थोर अभ्यासक डॉ. भवानीशंकर याज्ञिक यांनी या हिडीस सत्ताकारणाचे वर्णन केले आहे. पायर्‍यांवरून घसरून पडून 23 जानेवारी 1556 रोजी हुमायूँ याचा अचानक मृत्यू झाला. अकबर याचे 14 फेब्रुवारी 1556 रोजी सत्तारोहण झाले. त्याने पठाणांना सळो की पळो करून सोडले आणि थोड्याच कालावधीत सूर वंशाचे नावनिशाण मिटवून टाकले. अकबराकडे आपल्या प्राणाची भिक्षा मागून सिकंदरशाह सूर याने बंगालकडे प्रयाण केले आणि तीन वर्षांत तो मृत्युमुखी पडला. हुमायूँच्या मृत्यूची बातमी ऐकून हेमूने मुगल सेनेवर हल्ला चढविला आणि दिल्लीवर कब्जा केला. नंतर अकबराचा प्रधान बैरामखान याने त्याची हत्या केली. खरा गृहकलह याच काळात माजला होता. रसखान हे पठाण वंशाचे होते. सत्तापिपासेने आपल्याच भाऊबंदात होणारा कलह पाहून ते व्याकूळ झाले. सलीमशाह याने आपल्या भावाचे राज्य गिळंकृत केल्यामुळे या कलहाचे बीजारोपण झाले आणि त्यानंतर दोन वर्षे दिल्ली शहर युद्धमान झाले होते आणि त्याचे जणू स्मशानातच रूपांतर झाले होते.

आजही ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ असा आग्रह सर्वत्र दिसतो. रसखान यांनी कृष्णाच्या प्रेमभक्तीत विश्वशांतीचे उत्तर शोधले. इतिहासातील ही कलाटणी महत्त्वाची आहे, पण काही अभ्यासक केवळ मुसलमान हरिभक्तांचा महिमा मंडन करण्याच्या प्रेमात या इतिहासाकडे दुर्लक्ष करतात. कोण जिहादी भावनेने प्रेरित होतात आणि कोण प्रेमभावनेने प्रेरित होतात, कोणता धर्म सर्व जगाला प्रेमभावनेची आणि शांतीची शिकवण देतो, त्याचा हा ऐतिहासिक दाखला आहे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात, याचा खेद वाटतो.

सत्तालालसेचे युद्ध पाहून रसखान विषण्ण झाले आणि मग त्यांनी विरक्त होऊन तीन वर्षांपर्यंत यमुनेच्या तिरावर होणार्‍या रामकथेचे श्रवण केले, असा उल्लेख ‘मूल गुसाई चरित’ या ग्रंथात आढळतो. एका पठाणालाही इतकी मोहिनी घालण्याचे सामर्थ्य ज्या प्रभू रामचंद्राच्या कथेत आहे, तोच खरा आपल्या राष्ट्राचा राष्ट्रपुरुष आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. रसखान यांना इतिहासाच्या अभ्यासकांच्या मते 95 वर्षांचे दीर्घायुष्य लाभले होते. या बाबतीत आणि त्यांच्या प्रेमभक्तीबाबतीतही आपण संत नामदेव यांच्याशी त्यांची तुलना करू शकतो.
 
रसखान यांनी श्रीमद्भागवत ग्रंथाचे मनापासून अध्ययन केले. त्यांच्या मनात कृष्णभक्तीचे बीज अंकुरले आणि यथावकाश गोस्वामी विठ्ठलनाथ यांच्याशी त्यांची भेट झाली. गोस्वामीजी हे श्री वल्लभाचार्यांचे पुत्र आणि उत्तराधिकारी होते. रसखान यांनी विठ्ठलनाथांच्या चरणी लोटांगण घातले आणि ते म्हणाले, “महाराज, भगवान कृष्णाने माझ्या मनावर मोहिनी घातली आहे. मला त्याच्याशिवाय काहीच आवडत नाही. तेच माझे आराध्य दैवत आहे. तेच माझे सर्व काही आहेत. त्यांची आराधना आणि उपासना कशी करावी हे मी जाणत नाही. कृपया, मला आपला शिष्य बनवून दीक्षा द्यावी!”

भक्तिरंगात रंगलेला हा पठाण पाहून गोस्वामींचे मन द्रवले आणि त्यांनी रसखानाला वैष्णवमार्गाची दीक्षा प्रदान केली. रसखान यांच्या चरित्रातील एक गमतीदार प्रसंग येथे कथन करण्याचा मोह होतो. हा प्रसंग ऐकल्यानंतर रामनामामुळे दगडसुद्धा पाण्यावर कसे तरंगले, हे आपल्या लक्षात येईल.
 
वैष्णवदास यांच्या ‘भक्तमाल प्रसंग’ या ग्रंथात या घटनेचा उल्लेख आहे. वैष्णवांप्रमाणे काही तुर्कसुद्धा कंठात माळ घालू लागलेले पाहून पातशहाने रसखान यांना आपल्या दरबारात बोलावले.
 
“अरे, तू मुसलमान असून गळ्यात ही माळ कशाला धारण करतोस?” असे पातशहाने विचारले.

 
रसखान नम्रपणे उत्तरले, “हजरत! लाकडाच्या नौकेत दगडांनाही वाहून नेण्याची शक्ती असते. ही तुळशीच्या लाकडाची माळ आहे आणि मी एक दगड आहे.”
 
तेव्हा पातशहाने अत्यंत महत्त्वपूर्ण शंका विचारली, “अरे, सर्वसामान्य हिंदूसुद्धा ही माळ धारण करीत नाही. मग तू कशाला ही उचापत करतोस?”
 
रसखान म्हणाले, “जी, ते हलके आहेत. मी तर जड असा मोठा दगड आहे.”
 
आपल्याला हा प्रसंग म्हणजे एक विनोद वाटेल. पण हा नियतीचा क्रूर विनोद म्हणावा लागेल. या घटनेवरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, हिंदूंप्रमाणे माला आणि तिलक धारण करणार्‍या मुसलमानास अन्य मुसलमान हीन दृष्टीने पाहत असत.  त्याचप्रमाणे, हिंदूंनी सार्वजनिक ठिकाणी माला आणि तिलक धारण करण्यास या काळात मनाई होती. गोस्वामी गोकुलनाथ यांच्या प्रयत्नांमुळे जहाँगीराच्या काळात हा मनाई हुकूम रद्द करण्यात आला, असे काव्यमय इतिहास सांगतो. केवळ माला आणि तिलक धारण केल्यामुळे रसखान यांना बादशहाच्या आणि कट्टरपंथी मुसलमानांच्या रोषाचा सामना करावा लागला असेलच, हे आपण नाकारू शकत नाही. रसखानासारख्या भक्तांमुळे सामान्य हिंदूही हे धाडस करू शकले, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आज एखाद्या जाहिरातीत महिलांच्या कपाळावरील मांगल्यतिलक सहज पुसून टाकला जातो आणि याकरिता मोहीम छेडावी लागते, तसेच आधुनिक पोशाखावर शोभून दिसत नाही, म्हणून कित्येक तरुण ही ओळख सहज हातरुमालाने पुसून टाकतात, त्यांना हा संघर्ष कळणे अवघड आहे.
 
रसखान म्हणजे केवळ साहित्य, प्रेमभक्ती, रसपूर्ण कविताच नाही, तर रसखान हा संघर्ष आहे, हे वास्तव आपण लक्षात घेतले पाहिजे. या पार्श्वभूमीवर रसखान यांना कोणत्या कृष्णाने मोहिनी घातली होती, ते आपण समजून घेतले पाहिजे. रसखान यांच्या साहित्यावर नजर टाकल्यास आपल्याला असे कळते की, रसखान यांनी कृष्णाच्या स्वरूपात पुढील वैशिष्ट्ये प्रामुख्याने पाहिली आहेत - सगुण आणि निर्गुण अशी श्रीकृष्णाची दोन रूपे आहेत. सगुण कृष्णाचे सौंदर्य अवर्णनीय आहे. कृष्ण आणि गोपी हे प्रेमभक्तीचे साक्षात रूप आहे. भगवान श्रीकृष्ण हे लीलावतारी आहेत.
 
सर्व कृष्णभक्त हे सैद्धान्तिक दृष्टीने भगवान श्रीकृष्णाचे निर्गुण निराकार रूप स्वीकारतात, पण व्यावहारिक दृष्टीने त्यांना भगवान श्रीकृष्णाचे सगुण आणि साकार रूपच मान्य आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे निराकार आराध्यावर आपले मन एकाग्र करणे भक्तांना खूप कठीण जाते, त्यामुळे भक्तीसाठी सगुण साकार रूपाची खरेच आवश्यकता असते. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथात यावर विस्तृत भाष्य केले आहे.
 
अन्य कृष्णभक्त कवींप्रमाणे रसखानदेखील कृष्णाच्या अलौकिक आणि लौकिक अशा दोन्ही प्रकारच्या रूपांचे वर्णन करतात. वास्तविक रसखान यांचे कृष्ण हे अलौकिकच आहेत, पण आपल्या भक्तांना अलौकिक आनंद प्रदान करण्यासाठी आणि प्रजेच्या रक्षणासाठी ते साकार रूप धारण करून अवतार घेत असतात.

रसखान अगदी ठामपणे आणि स्पष्टपणे भगवान कृष्णाच्या अलौकिकत्वाचे वर्णन करतात. ते सांगतात - ‘ज्या कृष्णाचा जप शंकरासारखा महादेव करतो, ज्यांचे ध्यान करून ब्रह्मदेव आपल्या धर्माची वृद्धी करतो, ज्यांचे अल्पसे ध्यान केल्यामुळे एखादा महामूर्खसुद्धा गुणनिधी होतो, ज्याला देव आणि किन्नरच नव्हे, तर पृथ्वीवरील स्त्रिया आपला जीव ओवाळून टाकत संजीवन प्राप्ती करतात, त्याच कृष्णाला गोकुळातील गोपी थोड्याशा ताकासाठीसुद्धा नाच करण्यास भाग पाडतात.’

 
संकर से सुर जाहि जपै, चतुरानन ध्यानन धर्म बढावै।

नैक हिये जिहि आवत ही जड मूढ महा रसखानि कहावै।

जा पर देव अदेव भू-अंगना वारत प्रानन प्रानन पावै।

ताहि अहीर की छोहरियाँ छछिया भरि छाछ पै नाच नचावै।

असे संत रसखान देवाकडे असे मागणे मागतात -
 
मानुष हौं तो वहाँ रसखानि
 
वसौं व्रज गोकुल गाँव के ग्वारन।

जो पशु हौं तौ कहा वस मेरा

चरौं नित नन्द की धेनु मँझारन॥

पाहन हौं तो वही गिरि को

जो धरयो कर छत्र पुरन्दर धारन।

जो खग हौं तौ वसेरो करौं मिलि

कालिंदी कूल कदंब की डारन॥

आश्चर्याची गोष्ट म्हणजे संत नामदेवदेखील पांडुरंगाकडे असेच मागणे मागतात -

मनुष्य करिसी तरी भक्तीचेनि मिषे

तुझें द्वारी वसें सें करी ॥1॥

श्वान करिसी तरी उच्छिष्टाचेनि मिषें


तुझें द्वारी वसें सें करी ॥2॥

पक्षी करिसी तरी चारियाचेनि मिषे

तुझें द्वारी वसें सें करी ॥3॥

पाषाण करिसी तरी रंग शिलेचेनि मिषें

तुझें द्वारी वसें सें करी ॥6॥

नामा म्हणे विठो कीर्तनाचेनि मिषें

तुझे द्वारीं वसें सें करीं ॥8॥

यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. रसखानांच्या रसमाधुर्याचे पैलू आपल्याला अन्यत्र वाचायला मिळतात. पण येथे एक उपेक्षित पैलू दर्शविण्याचा प्रयास केला आहे, तो म्हणजे भक्तिकाव्याने म्हणा, रामकथेने म्हणा अथवा कृष्णलीलेने म्हणा, या सांसारिक दुःखाने गांजलेल्या जिवांना धैर्याने जीवन जगण्याचे वैचारिक पाथेय सदैव प्रदान केले आहे. भारतीय मातीचे हे वैशिष्ट्य आहे की, या मातीत जन्मलेल्या धर्मविचारांनी आणि धार्मिक तत्त्वज्ञानांनी केवळ भारतीयांनाच नव्हे, तर अखिल मानवजातीला जीवनाचे लक्ष्य काय असावे याची सुस्पष्ट संकल्पना प्रदान केली आहे. रसखानाच्या मानवजातीसाठीच्या योगदानाचा याच कसोटीवर विचार करायला हवा.