‘वस्त्र पर्यटन’ सांस्कृतिक पर्यटनाची नवी दिशा

विवेक मराठी    23-Feb-2022   
Total Views |
आजकाल पर्यटन क्षेत्रात सगळीकडे शाश्वत पर्यटन (सस्टेनेबल टूरिझम) ह्या संकल्पनेची चलती आहे. पर्यटन स्थळाच्या नैसर्गिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थितीवर पर्यटनाचा कमीत कमी वाईट परिणाम झाला पाहिजे. स्थानिक लोकांच्या जीवनशैलीचा, त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचा, त्यांच्या कलेचा योग्य आदर करत, त्यांना कमवायची योग्य संधी मिळेल, त्यांचे जीवनमान उंचावेल याची खबरदारी घेऊन पर्यटन करणे म्हणजेच शाश्वत पर्यटन होय. वस्त्र पर्यटन हा शाश्वत सांस्कृतिक पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

‘Textile Tourism’ New direction of cultural tourism
 
भारताचा समृद्ध इतिहास, इथले निसर्गसौंदर्य, इथले आध्यात्मिक संचित, सुंदर हस्तकला आणि हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा यामुळे परदेशी पर्यटक सदैव भारताकडे आकर्षित होत गेलेले आहेत. बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी अगदी प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणात परकीय प्रवासी भारतात येत होते. युआन चांग, फा-हीयेन हे बौद्ध भिक्खू बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी, मार्को पोलो आणि तावेरनिये यासारखे युरोपीय प्रवासी इथली कला परंपरा जाणून घेण्यासाठी आणि ईब्न बतुता, अल-बेरुनी हे अरबी पर्यटक मुसलमानी सल्तनतीच्या काळात नोकरीसाठी वेळोवेळी भारतात येऊन दीर्घकाळ प्रवास करून गेलेले आहेत. ह्या सर्वांचा भारतात फिरण्याचा प्रमुख उद्देश एकमेकांहून पूर्णपणे वेगळा असला, तरी त्यांनी भारताविषयी जे प्रवासवर्णनपर लेखन करून ठेवलेले आहे, त्यात प्रत्येकाच्याच लेखनात एक गोष्ट ठळकपणे दिसून येते, ती म्हणजे भारतातल्या समृद्ध हस्तकला, इथला प्रगत वस्त्रोद्योग आणि भारतात विविध ठिकाणी हातमागावर विणल्या जाणार्‍या कपड्यांबद्दल त्यांनी काढलेले गौरवोद्गार.
भारतीय वस्त्रोद्योगाचा इतिहास हा पार सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या काळापासूनचा आहे. हडप्पा आणि मोहंजोदडो येथील उत्खननात जनावरांच्या हाडांपासून बनवलेल्या सुया आणि लाकडापासून बनवलेली रिळे व हातमागाचे भाग सापडले आहेत. इथल्याच उत्खननांत रंगवलेले कापसाचे आणि तागाचे धागेही सापडलेले आहेत. ह्यावरून समजते की सहा-सात हजार वर्षांपूर्वीदेखील भारतीयांना कापसापासून वस्त्रे विणण्याची व ती रंगवण्याची कला अवगत होती. भारतात विणला गेलेला कपडा इतका तलम आणि उच्च दर्जाचा होता की लोथल, ताम्रलिप्ती यासारख्या बंदरांमधून तो निर्यात केला जायचा आणि परदेशात भारतीय कपड्याला प्रचंड मागणी होती. रोमन इतिहासकार प्लिनी म्हणतो की ‘रोममधला पैसा रोममध्ये टिकतच नाही.’ भारतीय कापडाच्या हव्यासापायी रोमचा पैसा भारतात जातो, ही प्लिनीची तक्रार होती.



‘Textile Tourism’ New direction of cultural tourism
 
प्राचीन काळात जगात सगळीकडेच भारतीय कापडाला मागणी होती. रोममध्ये भारतीय रेशमी आणि सुती तलम वस्त्रे लोकप्रिय होती. जेव्हा रेशीममार्ग सक्रियपणे व्यापारमार्ग म्हणून वापरला जात होता, तेव्हा भारतातील वस्त्रे चीनमध्ये पोहोचली, तर दक्षिण भारतातील बंदरांद्वारे भारतीय कापड इंडोनेशिया, थायलँडसह आग्नेय आशियातील आणि सुदूर पूर्वेच्या अनेक देशांमध्ये निर्यात केले जात होते. भारतीय वस्त्रांच्या मोहाने अनेक परदेशी पर्यटक भारतात आले, त्यांनी इथल्या विणकरांचे काम पाहून भारतीय वस्त्रांविषयी भरभरून लिहिले, इथले कापड खरेदी करून ते त्यांच्या देशात नेले, हे भारतातले पहिले ‘टेक्स्टाइल टूरिझम’ किंवा वस्त्र पर्यटन.
आज 2022मध्ये भारतातला पर्यटन उद्योग नव्या वाटा धुंडाळू पाहतोय. भारतीय पर्यटकांच्या अपेक्षाही बदलत आहेत. समाज जसा बदलतोय, आपल्या इतिहासाविषयी, संस्कृतीविषयी जागरूक होतोय, तसतसे पर्यटन म्हणजे निव्वळ मौज-मजा हे समीकरण हळूहळू का होईना, पण बदलतेय. खिशात पैसा खुळखुळतोय म्हणून कुठेतरी फिरायला जायचे, हॉटेलात राहायचे, चार-दोन सुंदर ठिकाणे बघून, भरपूर फोटो काढून, मजेत खाऊन-पिऊन घरी परत यायचे म्हणजेच पर्यटन हे आता बर्‍याच भारतीय पर्यटकांना मान्य नाही. त्यांना वेगळे अनुभव हवेत, भारताच्या अत्यंत समृद्ध संस्कृतीविषयी, आपल्या वारशाविषयी त्यांना जाणून घ्यायचेय. भारताची शिल्पकला, संस्कृती, हस्तकला, विविध भागांमधले खाद्यजीवन, नृत्यसंगीत, स्थानिक संस्कृती ह्या सर्व आयामांची ओळख करून देणारे सांस्कृतिक पर्यटन त्यांना हवेय आणि त्यासाठी खर्च करण्याची बर्‍याच जणांची तयारी आहे.
 

‘Textile Tourism’ New direction of cultural tourism
 
प्रवास माणसाला मुळापासून बदलू शकतो. पर्यटक म्हणून आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून वेगळ्या गोष्टी बघण्याने, शिकण्याने, अनुभवण्याने जाणिवांचा परीघ विस्तारतो, जगण्याची नवी ऊर्जा मिळते. नेहमीच्या रुटीनमधून वेळ काढून भटकण्याची गरज यासाठीच तर आपल्याला भासते. त्यातही आपल्या संस्कृतीमधल्या, परंपरेमधल्या चांगल्या गोष्टी समजून घेणे हा अनुभव खरोखरच आनंददायक असतो. टेक्स्टाइल टूरिझमचा - वस्त्र पर्यटनाचा नेमका हाच उद्देश आहे.
 
आजकाल पर्यटन क्षेत्रात सगळीकडे शाश्वत पर्यटन (सस्टेनेबल टूरिझम) ह्या संकल्पनेची चलती आहे. पर्यटन स्थळाच्या नैसर्गिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थितीवर पर्यटनाचा कमीत कमी वाईट परिणाम झाला पाहिजे. स्थानिक लोकांच्या जीवनशैलीचा, त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचा, त्यांच्या कलेचा योग्य आदर करत, त्यांना कमवायची योग्य संधी मिळेल, त्यांचे जीवनमान उंचावेल याची खबरदारी घेऊन पर्यटन करणे म्हणजेच शाश्वत पर्यटन होय. वस्त्र पर्यटन हा शाश्वत सांस्कृतिक पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.


‘Textile Tourism’ New direction of cultural tourism

भारतात जवळजवळ प्रत्येक राज्याची एक वेगळी सांस्कृतिक आणि वस्त्रोद्योग परंपरा आहे. त्या परंपरेचा योग्य तो आदर राखून पर्यटकांना प्रत्यक्ष विणकरांना काम करताना पाहायची संधी देणे, विणकरांशी गप्पा मारणे, विविध प्रकारची वस्त्रे कशी विणली जातात ह्या संपूर्ण प्रक्रियेचे प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान देणे आणि विणकरांकडून योग्य दरात थेट कापड खरेदी करायची संधी देणे ह्या सर्व गोष्टी वस्त्र पर्यटनामध्ये अनुस्यूत असतात. भारतात वाराणसी, कांचीपुरम, पैठण, पाटण यासारखी अनेक ठिकाणे अशी आहेत, जिथे हजारो वर्षांपासून अखंड विणकामाची परंपरा आहे. अशा ठिकाणी पर्यटकांना नेणे, तिथल्या निसर्गसौंदर्याबरोबरच तिथल्या ऐतिहासिक वास्तू बघणे आणि विणकरांना भेटून त्यांचे काम अनुभवणे अशी साधारण वस्त्र पर्यटनाची संकल्पना असते. पेरू, बोलिव्हिया, मेक्सिको, व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया यासारख्या अनेक देशांनी ही वस्त्र पर्यटनाची संकल्पना अत्यंत यशस्वीरित्या राबवलेली आहे. भारत तर हातमाग उद्योगाची पंढरी आहे. जगात कुठेही नाहीत इतके हातमाग भारतात चालू स्थितीत आहेत. देशी-विदेशी पर्यटकांना भारतीय वस्त्रे आजही वेड लावतात. भारतात वस्त्र पर्यटन ह्या क्षेत्रात अमाप संधी आहेत.
मी स्वत: गेल्या पाच वर्षांपासून वस्त्र पर्यटन ह्या विषयावर काम करत आहे. ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, केरळ, तेलंगण, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आदी अनेक राज्यांमधून मी वस्त्र पर्यटनाच्या निमित्ताने फिरलेली आहे आणि पर्यटकांनाही घेऊन गेलेली आहे. वस्त्र पर्यटन स्थानिक वस्त्रोद्योगाला तर चालना देतेच, त्याचबरोबर शहरी पर्यटकांना ह्या कलेकडे बघण्याची एक नवी दृष्टी देते, शिवाय योग्य दरात प्रत्यक्ष विणकराकडून थेट कापड खरेदीचा अनुभव वेगळाच असतो! हातमागावर कापड कसे तयार होते ते बघणे, स्वत: मागावर बसून दोन ओळी विणणे, विणकर त्यांच्या घरात कसे राहतात ते बघणे, वस्त्रावर एखादा मोर, कमळ किंवा पोपट हळूहळू उमटताना बघणे हा अनुभव खरोखरच पर्यटकांना भुरळ पाडणारा आहे.


‘Textile Tourism’ New direction of cultural tourism
केंद्र आणि राज्य सरकारांनाही वस्त्र पर्यटनाचे महत्त्व पटलेले आहे. 2014पासून केंद्र सरकारच्या पुढाकाराने देशात 24 टेक्स्टाइल पार्क निर्माण झालेली आहेत. ईशान्य भारतातल्या मेघालय आणि मणिपूर ह्या राज्यांमध्ये ग्राम आणि कृषी पर्यटनाबरोबरच वस्त्र पर्यटनही जोडून संपूर्ण सांस्कृतिक पर्यटन एकाच पॅकेजमध्ये देण्याचे तिथल्या सरकारांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याला केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा आहे. ओडिशा, तामिळनाडू आणि तेलंगण ही राज्ये आणि उत्तर प्रदेशमधला वाराणसी क्लस्टर ह्या बाबतीत खूप प्रगत आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाने ओडिशा राज्यात चार हातमाग क्लस्टर निवडून तिथे पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू केलेले आहे. गंजम जिल्ह्यातील बेरहामपूर क्लस्टर, कटक जिल्ह्यातील बदांबा, जाजपूर जिल्ह्यातील गोपालपूर आणि सोनपूर जिल्ह्यातील सोनपूर मेगा क्लस्टर ह्या चार हातमाग क्लस्टर्सना वस्त्र पर्यटन योजनेखाली केंद्र सरकारकडून मदत मिळालेली आहे. पर्यटकांना लागणार्‍या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी - ह्या हातमाग केंद्रांपर्यंत जाणारे रस्ते, पर्यटकांसाठी चांगली निवासी हॉटेल्स, होम स्टे, खाण्यासाठी सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचे कॅफे, स्वच्छतागृहे इत्यादी निर्माण करणे, विणकरांना पर्यटकांशी बातचीत करण्यासाठी संवादाचे प्रशिक्षण देणे, डिजिटल पेमेंट्स कसे करायचे ते शिकवणे इत्यादी सर्व गोष्टी ह्या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये येतात. तामिळनाडूमध्ये कांचीपुरम, तिरुपूर इत्यादी हातमाग क्लस्टर्समध्ये हे काम बर्‍याच प्रमाणात झालेले आहे. वेंकटेश नरसिंहन हे तामिळनाडूच्या सरकारी विणकर संस्थेचे - म्हणजे कॉऑप्टेक्सचे एम.डी. असताना त्यांनी वस्त्र पर्यटन ह्या क्षेत्रात खूप छान काम केले होते. पर्यटकांना आकर्षित करतील असे वेगवेगळे सर्किट शोधणे, त्यांची एक सलग, सुसूत्र अशी आयटेनररी तयार करणे, चांगल्या, चोखंदळ पर्यटकांना अशा ठिकाणी नेणे, त्यांची चांगल्या विणकारांशी गाठ घालून देणे आणि त्यातून विक्रीचे आकडे वाढून वस्त्रोद्योगाला चालना देणे ही सर्व कामे त्यांनी उत्तमरित्या पार पाडली होती. भारतातला पहिला ‘हँडलूम कॅफे’ही त्यांनीच चेन्नईला सुरू केला होता, ज्यात चालू स्थितीतील एक हँडलूम ठेवून वस्त्रे विणण्याचे प्रात्यक्षिक दिले जात होते. दुर्दैवाने त्या विभागातून त्यांची बदली झाल्यानंतर तामिळनाडूत वस्त्र पर्यटनात म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत.

 
गुजरातमध्येही कच्छ जिल्ह्यात वस्त्र आणि कला पर्यटन जोरात चालू आहे. गुजरात सरकार दर वर्षी ‘कच्छ महोत्सव’ आयोजित करते, ज्यात स्थानिक कलाकारांना, विणकरांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. गुजरातमध्ये अनेक स्थानिक ट्रॅव्हल कंपन्या आहेत, ज्या पर्यटकांसाठी कच्छमध्ये अशा खास वस्त्र आणि कला टूर्स घेऊन जातात. उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमध्ये तर केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने कोट्यवधी रुपये खर्च करून वस्त्र पर्यटनाला चालना देण्यासाठी अतिभव्य असे ‘दीनदयाळ उपाध्याय संकुल’ उभारलेले आहे. या संकुलामध्ये राष्ट्रीय सन्मानप्राप्त विणकरांना माफक किमतीत स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत, जिथे तुम्ही प्रत्यक्ष विणकाम बघू शकता आणि खरेदीही करू शकता. इथेच एक सुंदर कला संग्रहालयही आहे, जिथे तुम्ही जुन्या बनारसी साड्यांचे सुरेख नमुने बघू शकता.


‘Textile Tourism’ New direction of cultural tourism

महाराष्ट्र मात्र ह्या क्षेत्रात अगदीच मागे आहे. पैठणी आणि विदर्भातल्या करवतकाठी टसर साड्यांची इतकी उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राला लाभूनसुद्धा वस्त्र पर्यटन लोकप्रिय करण्यासाठी सरकारी पातळीवर काहीच पावले उचलली गेलेली नाहीत. खरे तर महाराष्ट्र देशी-परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यामध्ये भारतातल्या पहिल्या पाच राज्यांपैकी एक आहे. तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र ही पाच राज्ये मिळून भारतातल्या एकूण पर्यटकांपैकी 70 टक्के पर्यटकांना आपल्याकडे खेचतात. वस्त्र पर्यटनाला चालना देण्यासाठी जर महाराष्ट्र सरकार आणि खासगी टूर कंपन्यांनी मिळून प्रयत्न केले, तर त्यातून स्थानिक लोकांना रोजगारही मिळेल आणि हातमाग उद्योगालाही ऊर्जितावस्था येईल. पर्यटन क्षेत्राचा भारताच्या जीडीपीमधील सध्याचा वाटा 6.6 टक्के असून त्यातून 7.7 टक्के रोजगाराची निर्मिती होते. मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देणारे असे हे पर्यटन क्षेत्र आहे. वस्त्र पर्यटन लोकप्रिय झाले, तर भारतातल्या ह्या अत्यंत प्राचीन आणि समृद्ध अशा कलेचे संवर्धन व्हायला मदत होईल, असे मला मनापासून वाटते. भारत देशाला इतका जुना इतिहास आणि इतका संपन्न सांस्कृतिक वारसा असूनदेखील जगातील इतर देशांच्या तुलनेत आपण सांस्कृतिक पर्यटन ह्या क्षेत्रात खूपच पिछाडीवर आहोत. कोविडमुळे सैरभैर झालेल्या ह्या क्षेत्राला नवी दिशा देण्यामध्ये वस्त्र पर्यटनाचा भविष्यात निश्चितच मोठा वाटा असू शकेल.