ट्रेंड मिनी मधुचंद्राचा

विवेक मराठी    23-Feb-2022   
Total Views |
कोविड संकटानंतरची सावधगिरी, मोठी सुट्टी मिळण्यातील अडचण, बजेटचा विचार आदी अनेक कारणांमुळे अलीकडे नवविवाहित दांपत्य मिनी मधुचंद्राचा पर्याय निवडतात. आज मिनी मधुचंद्रासाठी देश-विदेशातील अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या बजेटनुसार उत्तम प्रकारे आयोजन करून देणार्‍या आणि तुमचा मिनी मधुचंद्र अविस्मरणीय करणार्‍या अनेक पर्यटन संस्थाही आहेत. सुट्टी नाही किंवा बजेट नाही म्हणून अजिबात निराश होण्याची गरज नाही. मिनी मधुचंद्राच्या छोट्या छोट्या क्षणांमधून सहजीवनासाठी मोठ्या मोठ्या आठवणींचं संचित नक्की गोळा करता येईल.

Best Honeymoon
 
दीत राहू, मस्तीत गाऊ,
 
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा...

असं म्हणत लग्नानंतर एकमेकांना ओळखण्याचा, धुंद उन्मुक्त आनंद घेण्याचा, एकमेकांना जाणून घेण्याचा आणि आपल्या आवडत्या स्थळी आवडत्या व्यक्तीसोबत रम्य एकांतवास अनुभवण्याचा काळ म्हणजे मधुचंद्र. लग्नानंतर साधारणत: प्रत्येक जोडपं कुठे ना कुठे फिरायला जातंच. नंतर कितीही सहली केल्या, तरी मधुचंद्राचा हा काळ एकदाच येतो आयुष्यात. त्यामुळे तो अविस्मरणीय व्हावा अशी प्रत्येक नवविवाहित दांपत्याची इच्छा असते.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लग्न, मधुचंद्र अर्थात हनिमून यासाठी दीर्घकाळची सुट्टी मिळणं वा ती मिळवणं हे अत्यंत कठीण होऊन बसलं आहे. काही वेळा जबाबदारीच्या कामांमुळे एवढी दीर्घ सुट्टी काढणं शक्य नसतं, तर काही वेळा ती मिळवणं अवघड असतं. लग्नाचे चार-पाच दिवसांचे पारंपरिक विधीही जिथे सुट्टी नसल्यामुळे दोन दिवसांत शॉर्ट कटमध्ये करावे लागतात, तिथे मधुचंद्राची आठ ते दहा दिवसांची ट्रिप करणं निव्वळ अशक्य असतं. काही जणांना आर्थिकदृष्ट्या एवढ्या मोठ्या ट्रिपला जाणं शक्य नसतं. पण आनंदामध्ये पैशाची अडचण येत असेल, तर माणूस काही ना काही मार्ग काढतोच. मोठी ट्रिप तात्पुरती लांबणीवर टाकून नवविवाहित छोट्या सुट्टीचा छोटा मधुचंद्र साजरा करण्याचा प्रयत्न करतात. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या मिनी मधुचंद्राच्या, तसंच वार्षिक मिनी ट्रिपच्या रचनेबाबत, आयोजनाबाबत विश्वविहार हॉलिडेजचे संस्थापक संजय वझे यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, “साधारणत: सधन वर्ग, उच्च मध्यमवर्ग यांचा वर्षाकाठी एक छोटी तसंच एक मोठी ट्रिप करण्याकडे कल असतो. लग्नानंतर लगेचच छोट्या सुट्टीमुळे मधुचंद्राला छोटी ट्रिप करून पुढे निवांतपणे दीर्घ सुट्टीच्या सहलीला जाणारे अनेक आहेत. बजेटचा विचार करणार्‍यांसाठीही मिनी मधुचंद्र सहल हा एक चांगला पर्याय असतो. पर्यटन व्यवसायातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत पर्यटकांच्या मागणीनुसार मिनी ट्रिपचे अनेक चांगले चांगले पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. मधुचंद्र साजरा करण्याप्रमाणेच हल्ली लग्नाचा वाढदिवस, व्हॅलेंटाइन्स डे, जोडीदाराचा वाढदिवस या निमित्तानेही छोट्या ट्रिप्स करण्याचं प्रमाण वाढलं आहे. देशांतर्गत सहलींप्रमाणेच भारतातून थायलंड, बाली इथेही लाखो पर्यटक जात असतात. दुबई, टर्की (तुर्कस्तान), मालदीव बेटं इथेही जाणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे.”
 
जगभरात कोविड नावाचं संकट ठाण मांडून बसलं आणि पर्यटन क्षेत्रालाही त्याचा मोठा फटका बसला. आंतरराष्ट्रीय प्रवासावरही बंधनं आली. पर्यटन क्षेत्राने पुन्हा उभारी घेतली असली, तरी देशांतर्गत पर्यटनाकडे लोकांचा कल वाढला आहे. गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, अमृतसर, काश्मीर (कलम 370नंतर पर्यटनात विशेष वाढ), ईशान्य भारत (येथील विकासामुळे कल वाढता), मध्य प्रदेश, अंदमान अशा अनेक पर्यायांचा विचार देशांतर्गत पर्यटनामध्ये विशेषत: केला जातो. त्यातही छोट्या मधुचंद्रांसाठी गुजरात, राजस्थान, हिमाचल अशा पर्यायांवर अधिक भर असतो.


Best Honeymoon
 
‘केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार’ अशी भारतीयांची फिलॉसॉफी आहे. मुळातच पर्यटन हा प्रकार अनादिकालापासून लोकांच्या आवडीचा विषय राहिला आहे. त्यात आपल्या आवडीची व्यक्ती आपल्यासोबत फिरायला, आयुष्यातील अनमोल क्षण व्यतीत करायला आली असेल, तो और क्या चाहिये? हनिमून हा आयुष्यात एकदाच अनुभवला जात असला, तरी तो प्लॅन करताना प्रत्येकाची वेगळी वेगळी इच्छा असू शकते. कोणाला देशातील विविध ठिकाणी असणारी सौंदर्यस्थळं पाहायची असतात, कोणाला हंपी, बदामी यासारख्या भारताचं अतुल्य वैभव, पुरातन इतिहास सांगणार्‍या स्थळी जायचं असतं. एखाद्या दांपत्याला अ‍ॅडव्हेंचरस टूर करायची असते. रिव्हर राफ्टिंग, रॉक क्लाइंबिंग अशा अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये रस असतो. कोणाला एखाद्या स्थळाची संस्कृती समजून घ्यायची असते, तर काहींना एखाद्या निसर्गरम्य स्थळी जाऊन एकमेकांसोबत गप्पा मारत केवळ शांतपणे वेळ व्यतीत करायचा असतो.
 
भारतीय मानसिकतेनुसार आपल्याकडे पर्यटकांना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त स्थळं पाहण्यात रस असतो. फिरायला गेल्यावर, विशेषत: मिनी मधुचंद्रासाठी गेल्यावर काही गोष्टी आवर्जून टाळण्याचा सल्ला संजय वझे देतात. चार-पाच दिवसांच्या ट्रिपमध्ये एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचं प्लॅनिंग करू नये. कोणत्याच ट्रिपमध्ये दिवस कमी आहेत म्हणून रात्रीचा प्रवास करू नका. जिथे शक्य आहे आणि बजेटमध्ये असेल तर विमान प्रवासाचा पर्याय निवडता येईल. त्यानुसारच ट्रिपचं प्लॅनिंग करा. कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त ठिकाणं बघण्यापेक्षा निवडक ठिकाणं शांतपणे, त्या त्या स्थळाचं वैशिष्ट्य समजून घेत अनुभवणं महत्त्वाचं असतं. तुम्ही जर आराम करण्यासाठी, शांतपणे वेळ व्यतीत करण्यासाठी गेला असाल, तर ठिकाणं कमी करून निवडक ठिकाणं शांतपणे पाहा. उदाहरणार्थ - चारच दिवसांची ट्रिप असेल आणि गप्पा मारत निवांतपणा अनुभवायचा हेच ठरवलं असेल, तर सिमला, कुलू, मनाली अशा तीन ठिकाणांऐवजी चारही दिवस फक्त मनालीचा पर्याय निवडा. गोव्यामध्ये सगळे बीचेच बघण्याऐवजी दोन-तीनच बीचेस, पण निवांतपणे पाहा. त्या त्या ठिकाणची खाद्यसंस्कृती अनुभवा, आपण जिथे राहतो तेथील अन्नपदार्थांची मागणी करण्याऐवजी त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या, असंही ते आवर्जून सांगतात.
चार-पाच दिवसांसाठी मिनी हनिमूनला जाण्याचा विचार करणार्‍यांनी शक्यतो जवळचं आणि कमी ठिकाणं असणार्‍या सहलीला प्राधान्य द्यावं. तसंच तुम्हाला अ‍ॅडव्हेंचरस सहलींची सवय असेल, यापूर्वी केली असेल तरच त्या पर्यायाचा विचार करा. मधुचंद्र हा तुम्हा दोघांचा खास अनुभव आहे. शांतपणे, जोडीदाराच्या आवडीनिवडीचा विचार करून त्या ट्रिपचं आयोजन करणं योग्य ठरेल. मुंबई/पुण्याला जवळ, राज्यातल्या अशा काही ठिकाणांचाही विचार या सहलींसाठी करता येईल. लोणावळा, महाबळेश्वर, खंडाळा, भंडारदरा, कास पठार, औरंगाबाद येथील अजिंठा-वेरूळ लेणी, कोकणातील नागावपासून पुढे सिंधुदुर्गापर्यंत प्रसिद्ध समुद्रकिनारे यांचाही विचार मिनी मधुचंद्रासाठी करता येईल.
आज मिनी मधुचंद्रासाठी देश-विदेशातील अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या बजेटनुसार उत्तम प्रकारे आयोजन करून देणार्‍या आणि तुमचा मिनी मधुचंद्र अविस्मरणीय करणार्‍या अनेक पर्यटन संस्थाही आहेत. सुट्टी नाही किंवा बजेट नाही म्हणून अजिबात निराश होण्याची गरज नाही. मिनी मधुचंद्राच्या छोट्या छोट्या क्षणांमधून सहजीवनासाठी मोठ्या मोठ्या आठवणींचं संचित नक्की गोळा करता येईल.
 

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.