पोपट बोलू लागले

विवेक मराठी    03-Feb-2022   
Total Views |
महाराष्ट्रात अनैतिक आघाडी करून सत्ता काबीज केल्यावर निलंबित सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेतले आणि विशेष जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा दबाव होता, असे परमवीर सिंग यांनी याआधीच सांगीतले आहे. मात्र मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यावर कुणाचा दबाव होता? ही सुपर पॉवर कोण? याचा शोध घेतला पाहिजे.
 
2

जहाज बुडू लागले की त्या जहाजातील उंदरांना सर्वात आधी त्याची चाहूल लागले आणि स्वत:ला वाचवण्यासाठी ते शर्थीने प्रयत्न करू लागतात. या शर्थीच्या प्रयत्नात ते भान हरवून बसतात, भर समुद्रात उडी मारतात आणि बुडून मरतात. अर्थात हे उंदीर जहाजाचे सहप्रवासी नसतात, विनासायास मुबलक खाद्य मिळावे म्हणून ते अनैतिक मार्गाने जहाजात शिरलेले असतात. महाराष्ट्रात सध्या अशीच परिस्थिती दिसून येत आहे. विशेषत: जागतिक पातळीवर गौरवांकित झालेल्या पोलीस दलात व प्रशासकीय यंत्रणेत मागील तीन वर्षे घोटाळे झाले, ते आता उघड झाले असून प्रत्येक जण स्वत:ला वाचवण्यासाठी दुसर्याचे नाव पुढे करत आहे. महाराष्ट्र पोलीस दलात मोक्याच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बोली लागते आणि त्यामागे कोण सूत्रधार आहे, हे आता हळूहळू उघड होताना दिसत आहे आणि महाराष्ट्र पोलीस दलाला कोण नियंत्रित करते, हेही स्पष्ट होऊ लागले आहे. नुकतेच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना सांगितले की, “कोणत्या पोलीस अधिकार्याच्या बदल्या करायच्या, याची यादी मला परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून मिळत असे.” पोलीस दल आणि त्यातील बदल्या हा गृहमंत्र्याच्या अखत्यारीत येणारा विषय आहे, तर मग अनिल परब कुणासाठी आणि कशासाठी हस्तक्षेप करत होते?
 
महाराष्ट्रात अनैतिक आघाडी करून सत्ता काबीज केल्यावर निलंबित सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेतले आणि विशेष जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा दबाव होता, असे परमवीर सिंग यांनी याआधीच सांगीतले आहे. मात्र मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यावर कुणाचा दबाव होता? ही सुपर पॉवर कोण? याचा शोध घेतला पाहिजे. पोलीस दलाला दर महिना शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश कोणाच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले होते? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस बदली घोटाळ्यात साक्ष देताना महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की “रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते, पण त्यावर जयस्वाल यांनी अंमलबजावणी केली नाही.” मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशालाही केराची टोपली दाखवण्याचे बळ जयस्वाल यांना कोणी दिले? सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव होण्याआधी राज्याचे गृहसचिव म्हणून काम करीत होते, त्या काळातील अनुभवाच्या आधारे शंभर कोटी वसुली प्रकरणात ईडीला साक्ष देताना म्हणाले होते की, “देशमुख मला पोलीस बदल्यांची अनाधिकृत यादी पाठवायचे आणि कोणत्या ठिकाणी कोणाची बदली करायची हे त्यात लिहिलेले असे.” सीताराम कुंटे यांची साक्ष लक्षात घेता कोणतातरी अदृश्य हात या प्रकरणात कार्यरत आहे, हे सहज लक्षात येते. मात्र त्याचे उघडपणे नाव घेण्याची, त्याच्याकडे अंगुलिनिर्देश करण्याची कुणाची हिंमत होत नाही. त्यामुळे मोठ्या माशांच्या पोटातील छोटे मासे आता एकमेकांच्या दिशेने बोट दाखवू लागले आहेत. अंगभर तेल लावलेला पहिलवान जसा प्रतिस्पर्ध्याच्या पकडीतून सुटतो, त्याप्रमाणे ही मंडळी ईडीच्या पकडीतून सुटू पाहत आहेत. वाझे म्हणजे काय लादेन आहे का? असा उर्मट प्रश्न विचारणारे या सार्या घटनाक्रमाकडे त्रयस्थपणे पाहण्याचे नाटक करत असले, तरी सुरुंगाच्या वाती आपल्या बुडाशी पुरलेल्या आहेत, याची त्यांना नक्कीच जाणीव असणार. ईडीची जबरदस्त पकड दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे आणि म्हणूनच आता पोपट बोलू लागले आहेत.
 
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत आली आणि सर्वस्तरीय भ्रष्टाचार सुरू झाला. पोलीस बदल्यांतील घोटाळा आणि दरमहिना शंभर कोटी रुपयांची वसुली हे हिमनगाचे टोक आहे. पोलीस दलाला वसुलीचे टार्गेट दिले जाऊ लागले. टार्गेट पूर्ण करण्याची शाश्वती देणार्या अधिकार्यांना बढत्या दिल्या. मोक्याच्या ठिकाणी बदल्या दिल्या. सत्तेचा उपयोग वसुलीसाठी करताना पोलीस यंत्रणेला गैरमार्गावर घेऊन जाण्याचे पाप महाविकास आघाडीने केले आहे. असे असले, तरी या पापाचा बाप कोण? सीताराम कुंटे यांची साक्ष अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढवणारी असली, तरी केवळ अनिल देशमुख हेच एकमेव दोषी किंवा या घोटाळ्याचे सूत्रधार नाहीत. एकूणच हे प्रकरण आता आपल्या अंगाशी येणार, हे लक्षात घेऊन अनिल देशमुख अनिल परबांकडे बोट दाखवत आहेत. उद्या अनिल परब कुणाकडे बोट दाखवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा उघड संघर्ष पुढील काळात पाहण्यास मिळेल काय? देशमुख परबांकडे बोट दाखवून मोकळे झाले आहेत. आता परब कोणाचे नाव घेणार? देशमुखांनी नामावली वाचायला सुरुवात केली आहेच, आता वाझे, पालांडे, परमबीर सिंग या मंडळींची बारी आहे, हळूहळू सर्वच पोपट बोलू लागतील आणि महाराष्ट्राला या घोटाळ्यातील सुपर पॉवर कळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.