धोरण भारताचे, पडसाद पाकिस्तानात

विवेक मराठी    24-Mar-2022   
Total Views |
इम्रान खान म्हणजे कुणी भारताबद्दल फार प्रेम असलेले नक्कीच नव्हेत. असूच शकत नाहीत, कारण ते पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. तेथील राजकारण हे भारताला दूषणे देऊनच सुरू होते. तरीही आज राजकीयदृष्ट्या संकटात असलेल्या इम्रान खान यांना भारताचे उदाहरण द्यावेसे वाटले. आज जे जे लोक इथे भारतात बसून आपल्या केंद्र सरकारला युक्रेनप्रश्नी तटस्थतेबाबत जाब विचारत आहेत, किंवा पंतप्रधान मोदींनी केलेल्या परदेश दौर्‍यांचे फलित विचारत आहेत, त्या सर्वांच्या डोळ्यात ही घटना एक झणझणीत अंजन घालणारी आहे.

modi

भारताला आजवर आपला प्रमुख शत्रू मानणार्‍या, भारताच्या कुरापती काढण्याचाच एकमेव कार्यक्रम ठरवून त्यानुसार आपले धोरण आखणार्‍या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आज जाहीर सभांमधून भारताचे, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करावे लागते आहे. जगाला आणि पाकिस्तानी जनतेला आपले महत्त्व दाखवण्यासाठी, टिकवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आज भारताची उदाहरणे देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताच्या गेल्या सात-साडेसात वर्षांच्या परराष्ट्र नीतीचे महत्त्व अशा प्रकारे पुन्हा एकदा स्पष्टपणे अधोरेखित झालेले दिसते.
 
 
नुकतेच, काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका जाहीर सभेत चक्क भारताच्या परराष्ट्र नीतीचे कौतुक केले आणि या घटनेचे पडसाद अर्थातच भारतात आणि जागतिक स्तरावरही उमटले. त्याची कारणेही तशीच आहेत. एकतर काही दिवसांपूर्वीच भारताचे एक मिसाइल पाकिस्तानच्या हद्दीत चुकून जाऊन पडले. ही एक चूक होती, असे भारताने नंतर स्पष्टीकरण दिले; मात्र पाकिस्तानने हा मुद्दा घेऊन जागतिक स्तरावर भरपूर आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे स्वत: इम्रान खान यांचे सरकारही संकटात आहे, त्यांच्या पक्षाच्या 24 संसद सदस्यांनी सरकारच्या विरोधात बंड पुकारले असून आता खान यांची खुर्ची धोक्यात आली आहे. अशा स्थितीतही भारताची स्तुती करणे, या घटनेची आपण दखल घेतली पाहिजे. “भारताने नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवले आणि यासाठी मी त्यांना दाद देतो. एकीकडे भारत क्वाडमध्ये आहे आणि दुसरीकडे अमेरिकेने रशियावर निर्बंध लादलेले असतानाही भारत रशियाकडून तेल आयात करतो आहे. हे भारत करतो, कारण त्यांचे परराष्ट्र धोरण हे भारतीय जनतेच्या हिताचे आहे” या अशा इतक्या स्पष्ट शब्दांत खान भारताचे कौतुक करत आहेत. याचबरोबर इम्रान खान जे काही बोललेत तेही तितकेच महत्त्वाचे ठरते. ‘मी कुणासमोर झुकणार नाही, माझे धोरणसुद्धा भारताप्रमाणेच स्वतंत्र आणि आपल्या जनतेच्या हिताचे असेल’ असा संदेश द्यायचा प्रयत्न इम्रान खान यांनी या निमित्ताने केला आहे.
 
 
आजवर पाकिस्तानचे जे जे सत्ताधारी झाले, त्यांनी दुसर्‍यांची, विशेषत: अमेरिकेची हांजी हांजी करत परराष्ट्र धोरण आखले. मी तसा नाही, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. यापूर्वीही युरोपियन युनियनला आणि अमेरिकेला उद्देशून त्यांनी प्रश्न विचारला होता की रशियाबरोबरच्या संबंधांवरून जी वागणूक तुम्ही आम्हाला देत आहात, जसे आम्हाला फैलावर घेताय तसे भारताबरोबर वागण्याची हिंमत तरी तुमच्यात आहे का? हे इम्रान खान म्हणजे कुणी भारताबद्दल फार प्रेम असलेले नक्कीच नव्हेत. असूच शकत नाहीत, कारण ते पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. तेथील राजकारण हे भारताला दूषणे देऊनच सुरू होते. तरीही आज राजकीयदृष्ट्या संकटात असलेल्या इम्रान खान यांना भारताचे उदाहरण द्यावेसे वाटले. आज जे जे लोक इथे भारतात बसून आपल्या केंद्र सरकारला युक्रेनप्रश्नी तटस्थतेबाबत जाब विचारत आहेत, किंवा पंतप्रधान मोदींनी केलेल्या परदेश दौर्‍यांचे फलित विचारत आहेत, त्या सर्वांच्या डोळ्यात ही घटना एक झणझणीत अंजन घालणारी आहे.
 
 
रशियाचे काय करायचे? याचे उत्तर रशियाच्या एकाही विरोधकाकडे नाही.. ना अमेरिकेकडे, ना युरोपीय युनियनकडे. युक्रेनला न झेपणारे धाडस करायला या नाटोने भाग पाडले आणि आता रशिया अंगावर आल्यानंतर सगळे गोंधळून गेलेले आहेत. भारताला अमेरिकाही महत्त्वाची आहे आणि रशियासुद्धा. त्यामुळे युक्रेनचे जे काही व्हायचे ते होईल, ती शेवटी तुमच्याच उद्योगांची फळे आहेत; पण या सगळ्यात भारत आपले राष्ट्रीय हित केंद्रस्थानी ठेवूनच आपली भूमिका ठरवेल, कुणी दबाव टाकला म्हणून झुकणार नाही, हे भारताने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले. भारताने रशियाचा निषेध केला नाही, युनोमध्ये रशियाविरोधात मतदानाला भारत अनुपस्थित राहिला, उलट अमेरिकेसह तमाम पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लावलेले असताना रशियाकडून तेल आयात करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कुणाची कुरापत काढायला घेतलेला नाही, तर तो एक संदेश आहे. अमेरिकेला, पाश्चात्त्य राष्ट्रांना दिलेला तो संदेश असा की आमचे धोरण आम्ही ठरवू, आमच्या हिताला प्राधान्य देऊन ठरवू. तुम्ही इराणवर, व्हेनेझुएलावर निर्बंध लावले, तुमच्या हितसंबंधांसाठी जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर वाढवले गेले. जर तुम्ही असे स्वहित पाहता तर आम्हीही पाहू, आम्ही रशियाकडून तेल आयात करू! विशेष म्हणजे एवढे होऊनही अमेरिका किरकोळ नाराजी वगैरे व्यक्त करण्याशिवाय काहीच करू शकलेली नाही. कारण भारताचे आज अमेरिकेसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते स्थान भारताने निर्माण केले आहे.
 
 
नरेंद्र मोदींचे हे यश बघून स्वाभाविकपणे इथले मोदी विरोधक अस्वस्थ आहेत, कारण मोदी कोणत्याही जाळ्यात अडकत नसून उलट त्यातून मार्ग काढत आहेत. दुसरीकडे भारताला प्रमुख शत्रू मानत त्यानुसार आजवरचे आपले धोरण ठरवणार्‍या पाकिस्तानचे पंतप्रधान आज म्हणताहेत की जसा भारत कुणासमोर झुकला नाही, तसा मी कुणासमोर झुकणार नाही. स्वत:ची खुर्ची, प्रतिमा, राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानालाही आज भारताचा आधार घ्यावा लागतो आहे.