अपेक्षा सर्वसमावेशक, सकस संमेलनाची!

विवेक मराठी    30-Mar-2022   
Total Views |
मराठवाड्यातील उदगीर या तालुक्याच्या ठिकाणी 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे साहित्य संमेलन लोकजीवनातील सर्व प्रवाहांचे चित्रण करणारे, त्याची दखल घेणारे तर असावे, पण ते अनावश्यक राजकीय विवादांपासून दूर राहावे. हे संमेलन ‘सर्वसमावेशक, सकस आणि सार्थक’ व्हावे, याच शुभेच्छा!

 sammelan
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे 22-24 एप्रिल दरम्यान 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या निमित्ताने मराठवाड्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी साहित्य चर्चांची पर्वणी लाभणार आहे. मराठी विश्वातील सर्वात मोठा साहित्योत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे पाहिले जाते. मराठी भाषा, तिच्या अंगाने वाढणारी मराठी संस्कृती याची सांगोपांग चर्चा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणे अपेक्षित असते. साहित्य हा समाजजीवनाचा आरसा असल्याने साहित्य संमेलनातही मराठी माणसांच्या जगण्याचे विविध पैलू प्रतिबिंबित होऊन या जीवनप्रवाहाला आणखी सकस करता आले पाहिजे. मराठी साहित्यविश्वाकडून साधारण वाचकाची ही अपेक्षा आहे. मात्र गेली काही वर्षे सातत्याने साहित्यबाह्य गोष्टींमुळे, त्यांवर घेतलेल्या भूमिकांमुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनावश्यक विवाद होताना दिसतात आणि त्याचीच चर्चा पुढे गाजत राहते.
 
 
यजमान शहराला आणि संस्थेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारखे मोठे आयोजन करायला वर्षभर तरी तयारी करावी लागते. गेल्या दोन वर्षांतील कोरोना स्थितीमुळे उदगीरची या संमेलनाची आयोजक संस्था महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी - उदयगिरी महाविद्यालय यांना जेमतेम तीन महिने यासाठी मिळाले. तरी या मंडळींनी जिद्दीने तयारी पूर्ण करत आणली आहे, हे विशेष!
 
 
 
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेजवळ असलेल्या उदगीर शहराला मोठा इतिहास आहे. इथला किल्ला त्याचा साक्षीदार आहे. धार्मिक-सामाजिक चळवळी हे इथले वैशिष्ट्य होते. मराठवाड्यातील उपेक्षित भागातील विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र होते. या भागात शिक्षणाचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी अनेक ध्येयवादी मंडळींनी अपार कष्ट केले व त्याची परिणती म्हणजे इथल्या शिक्षण संस्था. संमेलनाची आयोजक संस्था ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’चे हे हीरकमहोत्सवी वर्षदेखील आहे, हे विशेष! या 95व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह जर आपण पाहिले, तर त्यात विविध लिपींमधून ‘म’ लिहिले आहे. मराठीच्या सन्मानाबरोबरच बहुभाषिकतेचा आदर छान व्यक्त केला आहे. या बोधचिन्हात अनेक गोष्टी आहेत, पण त्यात एक सर्वात लक्षवेधी गोष्ट आहे, ती म्हणजे कापसाचे बोंड. उदगीर पूर्वी कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध होते. आजूबाजूचे शेतकरी त्यांचा कापूस विक्रीसाठी उदगीरच्या बाजारात आणायचे. त्यावर प्रतिक्विंटल पाच पैसे अधिभार लावून त्यातून या संस्थेची आणि महाविद्यालयाची उभारणी झाली, याची नम्र आठवण आयोजकांनी ठेवली आहे. पुढे गौरवशाली शिक्षण परंपरा निर्माण केलेल्या आणि उदगीरशेजारच्याच अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात मी शिकलो. त्या महाविद्यालयाचा इतिहास आम्हाला सांगितला जायचा की विद्यार्थ्यांना कॉलेजची आणि वसतिगृहाची फी रोख देता यायची नाही, म्हणून तिथे पिकणारी हायब्रीड ज्वारीदेखील फीच्या स्वरूपात स्वीकारली जायची. ज्ञानार्जनासाठीची अशी धडपड हे मराठवाड्याचे वैशिष्ट्य होते. प्रतिकूल निसर्गाच्या आणि न परवडणार्‍या शेतीच्या दुष्टचक्रात अडकलेले कृषिजीवन, पायाभूत सुविधांचा आणि औद्योगिक विकासाचा अभाव या सगळ्या विजोड वाटणार्‍या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील साहित्यजीवन मात्र तरारून फुललेले आहे.
 

 sammelan
 
गेल्या महिन्यात उदगीरला प्रवास झाला व आयोजकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ज्या उत्साहाने उदगीरकर मंडळी तयारीला लागली आहेत, तो अपूर्व आहे. आपल्या गावात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक येणार, काहीतरी मंगल घडणार ही त्यापाठीमागची भावना आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन तेथील ग्रामस्थांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यातून ग्रामीण-शहरी साहित्यरसिकांना जोडण्याचे काम उदगीरकर करत आहेत. स्वागताध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, त्यांचे सहकारी रामभाऊ तिरुके, मनोहर पटवारी यांनी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका सविस्तरपणे सांगितली. ‘सर्वसमावेशक’ आणि ‘मराठी साहित्याचे अर्थपूर्ण चिंतन करणारे संमेलन व्हावे’ ही त्यांची भूमिका आणि त्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे दोन्ही स्वागतार्ह आहे. मराठवाडा साहित्य मंच या साहित्य क्षेत्रातील संघटनेने आयोजन समितीला सर्वतोपरी मदत करण्यासाठी मराठवाड्यात ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळावे घेतले आहेत. कुठल्याही श्रेयाची अपेक्षा न ठेवता मराठवाडा साहित्य मंचाचे शेकडो स्वयंसेवक संमेलन यशस्वी करण्यासाठी पडेल ते काम करतील, असा विश्वास मंचाचे संयोजक प्रवीण सरदेशमुख यांनी आयोजकांना दिला. त्यांचा, तसेच मंचाचे मार्गदर्शक प्रमोद बापट, हरीश कुलकर्णी, संतोष तिवारी यांचा संमेलन संयोजन समितीने सत्कार केला. मराठी साहित्य संमेलनातील एक सशक्त प्रवाह असलेल्या आणि 18 वैशिष्ट्यपूर्ण ‘समरसता साहित्य संमेलने’ आयोजित करणार्‍या समरसता साहित्य परिषदेनेदेखील 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. परिषदेचा महाराष्ट्र कार्यवाह म्हणून मी संयोजकांच्या सत्काराचा स्वीकार केला.
 
 
 
महानगरांच्या तुलनेने उदगीरसारख्या लहान गावातील आणि परिसरातील लोकांची साहित्य संमेलन यशस्वी करण्याची ही धडपड पाहिली की साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला सोईस्कर राजकीय विमर्शासाठी वापरणार्‍यांपासून जपायला हवे, असे वाटते. गेल्या दोन साहित्य संमेलनांत झालेल्या विवादांसारखे कुठलेही विवाद न होता मराठी भाषेच्या विकासाचे आणि मराठी समाजाच्या वैचारिक समृद्धीचे शुद्ध प्रयत्न उदगीरला होतील, ही अपेक्षा आहे. प्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांनी या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर झालेल्या सत्काराला उत्तर देताना, “समाजाची सांस्कृतिक भूक, गरज ओळखून काम करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. साहित्य संमेलनात इतर विषय चर्चिले जातात, पण संमेलनाच्या व्यासपीठावरून साहित्यविषयक विचारच प्रकट व्हावेत ही अपेक्षा अध्यक्षपदाच्या मर्यादेत राहून पूर्ण करीन” असा मनोदय व्यक्त केला होता. त्यांच्या कारकिर्दीत साहित्याच्या विविध प्रवाहांना बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.
 
 
अंबरनाथ येथील कामगार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी मांडलेली सुंदर भूमिका ही साहित्यिकांसाठी आणि साहित्यप्रसारक व्यक्तींसाठी व संस्थांसाठी सदैव मार्गदर्शक अशी आहे -
 
 
“आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्य हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या थोर परंपरेचा अभिमान आहे. कारण मराठी साहित्याची नांदी आमच्याच जीवनसंघर्षाने झडली आहे. जेव्हा दलितांची सावली असह्य होती, तेव्हा महानुभावपंथीय साहित्यिकांनी, सर्वांना ज्ञान मिळाले पाहिजे, ज्ञान हे मोक्ष असे समजून बंड केले. ते आमचे साहित्यिक. माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे असा दावा मांडून ज्यांनी दलितांच्या भाषेत महाराष्ट्राला सुंदर ज्ञानेश्वरी दिली, ते आमचे साहित्यिक आणि चुकलेले महाराचे मूल कडेवर घेऊन जाणारे ते एकनाथ, ते आमचे साहित्यिक..”
 
 
उदगीरचे अखिल भारतीय साहित्य संमेलन लोकजीवनातील सर्व प्रवाहांचे चित्रण करणारे, त्याची दखल घेणारे तर असावे, पण ते अनावश्यक राजकीय विवादांपासून दूर राहावे. हे संमेलन ‘सर्वसमावेशक, सकस आणि सार्थक’ व्हावे. मराठवाड्यातील लोकांच्या साहित्यिकांकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करणारे - अण्णाभाऊंच्या शब्दांत ‘मांगल्या’ची अनुभूती देणारे व्हावे, याच या निमित्ताने शुभेच्छा!
 
 

डॉ. प्रसन्न पाटील

डॉ. प्रसन्न पाटील हे औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात डॉक्टर आहेत.