अणुयुद्धाच्या दिशेन

विवेक मराठी    04-Mar-2022   
Total Views |
युक्रेनच्या चिवट प्रतिकारामुळे रशियाने केलेल्या आक्रमणानंतर सुरू झालेले घनघोर युद्ध आणखी चिघळणार, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. तसे झाल्यास यात अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो. रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांनी नुकतेच ‘तिसरे महायुद्ध अण्वस्त्रांसहित आणि विनाशकारक असेल’ असे विधान करत सूचक इशारा दिला आहे. तत्पूर्वी रशियाने न्यूक्लियर डेटरन्स सक्रिय करत आहोत, अशी घोषणाही केली होती. दुसर्‍या महायुद्धानंतर आजवर अण्वस्त्रे वापरली गेली नाहीत. त्यांचा वापर केवळ धाक दाखवण्यासाठी केला जात होता, पण या इतिहासाला कलाटणी मिळू शकते.

vivek

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला संघर्ष अणुयुद्धाचे रूप घेण्याच्या मार्गावर आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तेव्हा रशियासह आंतरराष्ट्रीय समुदायाला असे वाटले होते की, साधारणत: दोन ते तीन दिवसांमध्ये रशिया युक्रेनवर पूर्ण कब्जा करेल. कारण युक्रेनची लष्करी क्षमता सामरिक महासत्ता असणार्‍या रशियापुढे टिकणारी नाही. तथापि युद्धभूमीवर घडणार्‍या गोष्टी या पूर्णत: वेगळ्या दिसून आल्या. युक्रेनकडून रशियाच्या आक्रमणाचा अत्यंत चिवटपणाने प्रतिकार केला जात आहे. त्यामुळे दिवसागणिक हे युद्ध लांबत चालले आहे. रशियाने बेलारूस, क्रामिया आणि रशिया अशा तीन माध्यमांतून सैन्य घुसवून युक्रेनला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पुतिन यांनी सर्वप्रथम डोनबासधील डोनिएट आणि लुहान्स्क हे दोन्ही प्रदेश आपल्या हाताखाली घेतले. पूर्व युक्रेनमधील खारकिव हे शहरही रशियाने बळकावले आहे. यानंतर युक्रेनची राजधानी कीव हे आता रशियाचे मुख्य लक्ष्य असून या शहरांत गेल्या दोन-तीन दिवसांपासून तुफान बाँबवर्षाव, क्षेपणास्त्रांचे मारे सुरू झाले आहेत. तथापि, रशियाच्या या आक्रमणाला खारकिव आणि कीवमध्ये युक्रेनकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिकार होतो आहे. त्यामुळे त्यांना युक्रेनची राजधानी काबीज करता आलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की. दोन वर्षांपूर्वी झेलेन्स्की हे नकलाकार किंवा विनोदवीर म्हणून युक्रेनवासीयांमध्ये लोकप्रिय होते. पण पुढे ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बनले. तेव्हा कदाचित कोणी कल्पना केलीही नव्हती की, ही व्यक्ती इतक्या चिवटपणाने रशियासारख्या बलाढ्य देशाच्या नाकी नऊ आणेल! पण गेल्या सहा दिवसांतील त्यांच्या एकंदर रणनीतीमुळे जगभरातून त्यांची प्रशंसा होत आहे. सध्या झेलेन्स्की हे भूमिगत असून ते वेगवेगळे व्हिडिओ घेऊन जगापुढे येत आहेत.
 
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध लांबण्याचे एक कारण म्हणजे नाटोचे सैन्य आणि अमेरिका यांनी अप्रत्यक्षपणाने युक्रेनला अनेक स्तरांवर पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. रशियाने या आक्रमणाची सुरुवात करताना सर्वप्रथम युक्रेनच्या कम्युनिकेशन सिस्टिमवर सायबर हल्ले केले, जेणेकरून काय घडते आहे याचा जगाला थांगपत्ता लागू नये! यासाठी रशियाने युक्रेनमधील इंटरनेट सेवा खंडित केली. पण झेलेन्स्की यांनी तत्काळ ‘टेस्ला’चा प्रमुख असणार्‍या अ‍ॅलन मस्क याच्याशी संपर्क साधला. मस्क यांच्याकडून स्टारनेट ही इंटरनेट सेवा पुरवली जाते. या सेवेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ती हॅक करता येत नाही. त्यामुळे झेलेन्स्की यांनी ट्वीट करून, मस्क यांना रशियाने केलेल्या सायबर हल्ल्यांची माहिती दिली आणि मदतीची मागणी केली. दुसर्‍या क्षणाला तेथे स्टारनेटची इंटरनेट सेवा सुरू झाली. रशियाला ती हॅक करता येत नसल्याने झेलेन्स्की हे त्या माध्यमातून जगाशी संपर्क ठेवू लागले आहेत. जगातील प्रत्येक नेत्याला ते आवाहन करत आहेत. अलीकडेच त्यांनी युरोपीय संसदेमध्ये अत्यंत भावुक भाषण करतानाच आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या झुंझारपणामुळे जगभरातील जनमत त्यांच्या बाजूने आकृष्ट होत आहे. दुसरीकडे, हे युद्ध जसजसे लांबत चालले आहे तसतसा रशियाचा - म्हणजेच व्लादिमीर पुतिन यांचा संयम तुटत चालला आहे. हे युद्ध लांबू नये अशी रशियाची इच्छा आहे. कारण आता खुद्द रशियामध्येच पुतिन यांच्या विरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. याचीही अपेक्षा पुतिन यांनी केली नव्हती, कारण 72 तासांत कीव आपल्या हातामध्ये येईल आणि तिथे तत्काळ सत्तांतर घडवून आणत आपल्या इशार्‍यावर चालणारी व्यक्ती तेथे राष्ट्राध्यक्ष म्हणून बसवू, असा त्यांचा होरा होता. पण युक्रेनच्या चिवट प्रतिकारामुळे रशियाचे हे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.
 
आज युक्रेनकडून गनिमी काव्याचा वापर केला जात आहे. परिणामी, युक्रेनचे 350 सैनिक मेले असून रशियाचे 3500 सैन्य मरण पावल्याचे सांगितले जात आहे. रशियाचे अनेक रणगाडे, लढाऊ विमाने नष्ट करण्यात युक्रेनला यश आले आहे. दुसरीकडे ‘नाटो’ने युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युक्रेनची विरोधाची धार अधिक बळकट झाली आहे.
 
एकंदर पाहता, युक्रेनचा प्रतिकार, रशियामधून वाढू लागलेला विरोध, जगभरातून टाकले गेलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे बसणारा आर्थिक फटका, त्याचे सामाजिक परिणाम यामुळे पुतिन यांची अस्वस्थता वाढली आहे. आज संपूर्ण पाश्चिमात्य माध्यमे पुतिन यांना खलनायक म्हणून जगापुढे आणत आहेत. त्यामुळे जगभरातून पुतिन यांचा निषेध केला जात आहे. ‘टाइम’ या प्रसिद्ध मासिकाच्या नव्या अंकामध्ये पुतिन आणि हिटलर यांचे मिश्रण करून एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे पुतिन म्हणजे एकविसाव्या शतकातील नवा हिटलर असून तो जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या खाईत लोटतो आहे, अशा प्रकारचे चित्र तयार झाले आहे.
 
विशेष म्हणजे या सर्वांमुळे रशिया आज एकाकी पडलेला दिसत आहे. युक्रेनमधील सामान्य नागरिकांकडे, संसद सदस्यांकडे बंदुका दिल्या गेल्या असून ते प्रतिकार करत आहेत. तसेच संपूर्ण जगाला आमच्या मदतीला येण्याचे आवाहन करत आहेत. रशियाकडून यापूर्वीच्या काळात ज्या ज्या वेळी अशा प्रकारची आक्रमणे किंवा लष्करी हल्ले झाले, त्या त्या वेळी भारताने रशियाची बाजू उचलून धरली होती. संयुक्त राष्ट्रसंघात रशियाविरोधी प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी भारत तटस्थ भूमिका घ्यायचा. परंतु या वेळी भारताने सुरक्षा परिषदेमध्ये जेव्हा रशियाचा निषेध करणारा ठराव आला, तेव्हा त्या ठरावावर भारताने मतदान केलेले नसले, तरी त्या बाबतचे स्पष्टीकरण देताना भारताने रशियावर टीका केली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियन आक्रमणाबाबत भारताने नापसंती व्यक्त केली आहे. आज जागतिक समुदायातील कोणत्याही देशाने उघडपणाने रशियाला पाठिंबा दिलेला नाही. याउलट युक्रेनविषयी मात्र जगभरातून सहानुभूती व्यक्त होत आहे. इस्रायलसारख्या देशाने युक्रेनला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. जपानने, ऑस्ट्रेलियाने पश्चिमी देशांची बाजू उचलून धरली आहे. जर्मनीने गॅस पाइपलाइन खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांमुळे रशियाच्या अडचणी वाढत चालल्या आहेत आणि युद्ध संपण्याचे नावच घेत नाहीये. त्यामुळेच रशियाने आता थेट अणुयुद्धाची धमकी दिली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांनी नुकतेच ‘तिसरे महायुद्ध अण्वस्त्रांसहित आणि विनाशकारक असेल’ असे विधान करत सूचक इशारा दिला आहे. तत्पूर्वी रशियाने न्यूक्लियर डेटरन्स सक्रिय करत आहोत, अशी घोषणाही केली होती. जर नाटोने प्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू, अशी उघड धमकी रशियाकडून देण्यात आली आहे. रशिया अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, असे अमेरिकेकडूनही सांगितले जात आहे. त्यामुळे जागतिक पटलावर कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.
 
अमेरिकेने यापूर्वीच जर्मनीसह आणखी काही पश्चिमी देशांमध्ये अण्वस्त्रे ठेवलेली आहेत. अशा स्थितीत रशियाने अण्वस्त्रांचा वापर केल्यास त्यातून अणुयुद्धाचा भडका उडून अख्खा युरोप उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. युरोपीय देशांना याची झळ बसणार आहे. आज कोरोनामुळे युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या आहेत. अशा स्थितीत तेथे अण्वस्त्रांचा वापर केला गेला, तर महाभीषण परिणामांना सामोरे जावे लागू शकते आणि जगाचा संपूर्ण इतिहास बदलू शकतो.
 
आता प्रश्न उरतो तो रशिया खरोखरीच अण्वस्त्रांचा वापर करेल का? हे युद्ध किती काळ लांबते आणि ते केवळ दोन राष्ट्रांपुरतेच राहते का, यावर याचे उत्तर अवलंबून आहे. आज अमेरिका आणि नाटो यामध्ये थेटपणाने सहभागी नसला, तरी त्यांची शस्त्रास्त्रे युक्रेनला दिली जात आहेत. दुसरीकडे झेलेन्स्की शरणागती पत्करण्यास तयार नाहीयेत. रशियाकडून तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत. पहिली म्हणजे झेलेन्स्की यांनी शरण यावे, दुसरी म्हणजे क्रामिया हा रशियाचाच भाग आहे याला जगाने कायदेशीर अधिमान्यता द्यावी आणि तिसरी अट म्हणजे युक्रेनने आम्ही नाटो संघटनेचा सदस्य बनणार नाही, हे लिखित स्वरूपात रशियाला सुपुर्द करावे. या तिन्ही अटींसाठी झेलेन्स्की तयार नाहीयेत.
 
यामध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. युरोपीय महासंघाने रशियाला धडा शिकवण्यासाठी युक्रेनला युरोपीय महासंघाचा सदस्य बनवून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वास्तविक, याबाबतचा अर्ज युक्रेनने यापूर्वीच दिला होता, पण युरोपीय देश यासाठी तयार नव्हते. त्यांच्यात मतभेद होते, पण आता त्यांनी तत्काळ या बाबतची कार्यवाही सुरू केली आहे. ती पूर्ण झाल्यास रशिया आणखी चवताळणार आहे. युरोपीय महासंघाने ही घाई करण्याचे कारण म्हणजे झेलेन्स्की किती काळ राहतील याची शाश्वती नाहीये. उद्या जर रशियाने युक्रेनवर कब्जा मिळवला आणि तेथे पुतिनसमर्थक व्यक्ती राष्ट्राध्यक्ष बनवली गेली, तर तो हा प्रस्ताव तत्काळ मागे घेऊ शकतो. ते टाळण्यासाठी युरोपीय महासंघाला युक्रेनला सहभागी करून घ्यायचे आहे. पण यामुळे रशियाचा जळफळाट झाला आहे.
 
हा संघर्ष आणखी वाढत गेला आणि निर्बंधांचे परिणाम प्रत्यक्षात जाणवू लागतील, तेव्हा रशियाकडून अधिक आक्रमक भूमिका घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. युद्धामध्ये तोफांचा वापर हा प्रतिकार मोडण्यासाठी केला जातो. रशियाकडून आता तोफांचा मारा केला जात आहे. युक्रेनमधील नागरी वस्त्यांवर हल्ले केले जात आहे. यामध्येच एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. युक्रेन सामान्य नागरिकांना पुढे करून त्यांची ढाल बनवत आहे. कारण रशियाच्या हल्ल्यामध्ये नागरिकांची जीवितहानी झाल्यास आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करता येतो. किंबहुना, याच आधारावर युक्रेन आंतरराष्ट्रीय न्यायालयातही गेला असून रशियाविरुद्ध दाद मागितली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने, तसेच फिफाने रशियाला बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्हीही अ-राजकीय संघटना आहेत, पण त्यांनीही राजकीय निर्णय घेत रशियाचा निषेध केला आहे. यामुळे रशिया अधिक पेटून उठणार आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये चर्चेची एक फेरी मध्यंतरी झाली, पण ती निष्फळ ठरली. कारण दोघेही आपापल्या मागण्यांवर अडून आहेत. सारांशाने, हे युद्ध आणखी चिघळणार ही बाब आता स्पष्ट झाली आहे. तसे झाल्यास यात अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो. 1962च्या क्युबन आण्विक पेचप्रसंगासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. दुसर्‍या महायुद्धानंतर आजवर अण्वस्त्रे वापरली गेली नाहीत. केवळ धाक दाखवण्यासाठी त्यांचा वापर केला जात होता, पण या इतिहासाला कलाटणी मिळू शकते.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक