महात्मा शंकरदेव

विवेक मराठी    20-Apr-2022   
Total Views |
श्री शंकरदेवांनी आसाममध्ये वैष्णवभक्तीला एक नवे परिवर्तित आणि विशुद्ध असे स्वरूप प्रदान केले. त्यांच्या मनावर महात्मा कबीरांचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी मूर्तिपूजेचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु त्याचबरोबर मूर्तिपूजेवर अकारण टीकासुद्धा केली नाही. त्यांचा द्वेष करणार्‍या लोकांनी शंकरदेव हे मूर्तिपूजेच्या विरोधात आहेत असा अपप्रचार चालविला होता. पण त्यांना त्यात यश आले नाही. शंकरदेवांनी ईश्वर उपासनेत अनेक क्रांतिकारक बदल केले. त्यामुळे हिंदूच काय, मुसलमानही आपणहोऊन त्यांचे अनुयायी बनले. शंकरदेवांना यात मुळीच गैर वाटले नाही.

DEV
सहिष्णुता म्हणजे काय आणि असहिष्णुता म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल, तर आपण आसामातील शंकरदेव यांचे चरित्र अभ्यासायला हवे. शंकरदेवांनी आपल्या आचरणातून अनेक महत्त्वाची सूत्रे आपल्यासमोर ठेवली आहेत. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांची हातमिळवणी होणे उचित की अनुचित? हे महत्त्वाचे सूत्रसुद्धा शंकरदेव यांच्या आचरणातून आपल्याला पाहायला मिळते.
शंकरदेव यांच्या जीवनातील तो घटनाप्रसंग पाहण्याच्या आधी आपण शंकरदेवांच्या काळाची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. शंकरदेव यांचा काळ म्हणजे इ.स. 1449 ते 1568 असा मानला जातो. शंकरदेवांच्या काळात आसाममध्ये बौद्ध मतात तांत्रिकांचे प्राबल्य खूपच वाढले होते आणि शाक्तमताने नुसता धुमाकूळ घातला होता. बलीप्रथा, कर्मकांड आणि तंत्रमंत्र करणारे पुजारी जनतेला खूपच उपद्रव देत होते. अनेक विकृती आणि कुप्रथा यांनी धर्मतेजाला झाकोळून टाकले होते.
शंकरदेव यांचे घराणे मूळचे बंगालचे. तेथील भूइयां म्हणजे कायस्थ परिवार आसाममधील नौगाव येथे जाऊन वसला होता. शंकरदेव 1481 साली तीर्थभ्रमण करण्यास निघाले आणि 1493 साली आसाममध्ये परतले. देशाटन करीत ते काशी क्षेत्री आले होते आणि तेथे त्यांना महात्मा कबीरांचे दर्शन घडले. संत कबीरांच्या विचारांनी ते खूप प्रभावित झाले होते. आसाममध्ये परतल्यावर त्यांनी सर्व प्रकारच्या कर्मकांडांवर कठोर प्रहार केला.
त्या वेळेस कुचबिहारचे राजे होते श्री नरनारायण आणि त्यांचे सेनापती होते चिलाराय. राजाला विष्णूचा अवतार मानले जाते आणि धर्मरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावरच असते. जनता शंकरदेवांच्या उपदेशामुळे धार्मिक अवडंबरातून मुक्त झाली आणि भगवंताची खरी उपासना करू लागली. ज्या पुरोहितवर्गाला आणि पुजार्‍यांना जनतेची मनसोक्त लूटमार करता येत होती, त्यांचा धंदा पूर्णपणे बसला. पण त्यांचे शासनदरबारी वजन टिकून होते. याच वजनाचा दुरुपयोग करून त्यांनी शंकरदेवांच्या विरोधात राजा नरनारायण यांचे कान भरले. आता केवळ आपणच या जगात धर्माचे रक्षण करू शकतो, असा राजाचा पूर्ण समज झाला व तो संतापून म्हणाला, “शंकरदेवाला अटक करून आणा. मृत्यू हीच त्याला योग्य शिक्षा ठरणार आहे. त्याची चामडी सोलून ढोल बनवा. त्याच्या हाडांनी मी तो ढोल वाजवणार आहे.”
शंकरदेवांच्या अनुयायांनी ही गोष्ट त्यांच्या कानावर घातल्यावर ते भूमिगत झाले. बराच काळ लोटला. शंकरदेव यांचा मुलगा रामानंद हा सेनापती चिलाराय यांच्याच सेवेत होता. त्याने चिलाराय यांची शंकरदेवांशी भेट घडवून दिली. शेवटी असे ठरले की, शंकरदेवांनी राजा नरनारायण यांच्या राजदरबारात हजर व्हावे. त्यांचा पक्ष पूर्णपणे समजून घेतल्यानंतर राजा योग्य तो निर्णय घेणार. असे आश्वासन मिळाल्यानंतर शंकरदेव राजसभेत हजर झाले.
शंकरदेव त्या वेळेस अतिशय तल्लीन होऊन ‘मधु-दानव-दारण-देव-वरम्’ हे भजन गात होते. हे मधुर भजन ऐकून आणि त्यांचे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व पाहून राजा अत्यंत प्रभावित झाला. त्याने शंकरदेव यांना बसण्यास आसन दिले व त्यांचा सन्मान केला. त्यानंतर शंकरदेवांनी ‘नारायण काहे भक्ती करू तेरा’ हे भजन गाण्यास सुरुवात केली. त्या दैवी आवाजाने राजाच्या मनात भक्तिभाव जागृत झाला. नंतर राजा व शंकरदेव यांच्यात प्रश्नोत्तरे झाली. शंकरदेवांच्या उत्तराने राजाचे पूर्णपणे समाधान झाले व त्याला आपल्या आचरणाची खूप लाज वाटू लागली. त्याने हात जोडून क्षमायाचना केली व आपणास काय हवे ते मागा असेही शंकरदेवांना सांगितले. तेव्हा शंकरदेव म्हणाले, “महाराज, मला काहीच नको. मला केवळ माझ्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांचे खंडन करायचे आहे. तेवढी परवानगी आपण द्यावी.”
एका अर्थाने राजाच्या राजसभेत त्या दिवसापासून धर्मकीर्तनच सुरू झाले. शंकरदेव तेथे आपली तत्त्वे सांगण्याच्या मिषाने उपदेशच करू लागले. शंकरदेवांना वैष्णव धर्माची उदार परंपराच सांगायची होती. उच्च-नीच हा भेदभाव देव मुळीच करत नाही, त्यामुळे कोणत्याही जातीतील अथवा कुळातील व्यक्ती भगवंताचे भजनपूजन करू शकतो, आपल्या धर्माचे धर्मग्रंथ वाचू शकतो आणि सर्व प्रकारचे पौरोहित्यही करू शकतो, अशी शंकरदेवांची समान व्यवहाराची आणि समान अधिकाराची भूमिका होती. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला काय उपदेश करतात हे शंकरदेव आपल्या लोकप्रिय पदातून सांगतात -
तप जप परम संन्यास महादाने।
न पावे आमाके सांख्य योग तत्त्वज्ञाने।
केवल भक्ति मात्र भोक करे वश्य।
कहिलो उद्धव इटो तोमात रहस्य॥
संत तुकाराम महाराज हाच भाव सांगतात -
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव।
मी भक्त तू देव ऐसे करी॥
म्हणजे, हा भगवंत केवळ भक्तीनेच प्रसन्न होतो, अन्य कोणत्याच अवडंबराची त्याला गरज नाही.
शंकरदेव सांगतात -
 
कृष्ण किंकर शंकर कह भज गोविंद पाय।
सोहि पण्डित सोहि मण्डित जो हरिगुण गाय ॥
 
राजा नरनारायण यांना ही भक्तीची सोपी व्याख्या अतिशय भावली. ते स्वतः आणि त्यांचे बंधू सेनापती चिलाराय हे शंकरदेवांचेच अनुयायी बनले. शंकरदेवांची निंदा करणार्‍या पुरोहितांवर आणि पुजार्‍यांवर ते खूपच संतापले. दोन्हीकडून पेचात सापडलेल्या पोटभरू पुजार्‍यांनी राजासमोर लोटांगण घातले व आपल्या प्राणाची भीक मागितली. शंकरदेवांच्या उपदेशामुळे राजा नरनारायण अंतर्बाह्य बदलून गेला होता. त्यांना गयावया करणार्‍या पुरोहितांची कणव आली व सहिष्णू वृत्तीने त्याने सर्वांना क्षमा केली व कोणतीही शिक्षा दिली नाही. राजा व सेनापती शंकरदेवांच्या भजनी लागल्यामुळे या सर्वांचा जळफळाट झाला होता, पण राजसत्तेसमोर आपले काही चालणार नाही, यामुळे हे सर्व जण हात चोळत गप्प बसले होते.
गुरुदेव, आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा, अशी राजा नरनारायण यांनी शंकरदेवांना विनंती केली. राजसत्तेच्या लहरीपणाचा पूर्ण अनुभव घेतलेल्या शंकरदेवांना प्रत्यक्ष राजाला आपला शिष्य बनविणे मान्य झाले नाही, पण त्यांनी उघडपणे नकार दिला नाही. योग्य वेळ आल्यावर आपण अवश्य दीक्षा देऊ, असेच त्यांनी राजा नरनारायण यांना सांगितले. अर्थात, ही योग्य वेळ कधीच आली नाही. प्रजेने राजाच्या भयाने आणि राजदंडाच्या भयाने धर्माचरण करावे असे शंकरदेवांना कधीच वाटत नव्हते. धर्माचे रहस्य म्हणजे ईश्वरभक्ती आहे व प्रजेने प्रेम व कर्तव्य मानून भक्ती करावी, असेच शंकरदेवांना वाटत होते. एका हातात पवित्र पुस्तक आणि दुसर्‍या हातात तलवार घेऊन आपल्या धर्माचा विस्तार व्हावा, असे शंकरदेवांना मुळीच वाटले नाही. अशा पद्धतीने विस्तार करणारा खरा धर्मच नाही, असे त्यांचे मत होते.
 
शंकरदेवांनी ईश्वर उपासनेत अनेक क्रांतिकारक बदल केले. त्यामुळे हिंदूच काय, मुसलमानही आपणहोऊन त्यांचे अनुयायी बनले. शंकरदेवांना यात मुळीच गैर वाटले नाही.
श्री शंकरदेवांनी आसाममध्ये वैष्णवभक्तीला एक नवे परिवर्तित आणि विशुद्ध असे स्वरूप प्रदान केले. त्यांच्या मनावर महात्मा कबीरांचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी मूर्तिपूजेचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु त्याचबरोबर मूर्तिपूजेवर अकारण टीकासुद्धा केली नाही. त्यांचा द्वेष करणार्‍या लोकांनी शंकरदेव हे मूर्तिपूजेच्या विरोधात आहेत असा अपप्रचार चालविला होता. पण त्यांना त्यात यश आले नाही.
 
शंकरदेवांनी जे पहिले मंदिर बांधले होते, त्यात त्यांनी लाकडाच्या श्रीकृष्णमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. त्या वेळी समाजातील स्वयंघोषित पुरोहितांनी असा अपप्रचार सुरू केला की, आता पहा, एक शूद्र मनुष्य भगवंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू लागला आहे. त्यांने तर देवच बाटविला आहे. या अपप्रचाराने शंकरदेव व्यथित झाले आणि त्यांनी भगवंताच्या मूर्तीऐवजी मंदिरात धर्मग्रंंथ मूर्तीच्या जागी ठेवण्याची पद्धत सुरू केली. आता कोणीही मनुष्य या ग्रंंथाची प्रतिष्ठापना करू शकत होता. पण यामुळे पुरोहित वर्ग शांत झाला नाही. त्यांनी शंकरदेव हे मूर्तिभंजक आहे आणि त्यांना मूर्तिपूजा मान्य नाही अशी अफवा पसरवायला सुरुवात केली. शंकरदेवांना सर्व ब्राह्मण वर्गाचा मुळीच विरोध नव्हता. तेसुद्धा शंकरदेवांची दीक्षा घेण्यास उत्सुक होते. मात्र जुनाट व बुरसटलेले विचार ठेवणारी मंडळी आपल्या कोणत्याही कृतीचा केवळ विरोधच करतात, हे शंकरदेवांना माहीत होते. तेव्हा त्यांनी ब्राह्मणवर्गाला दीक्षा देण्यासाठी ब्राह्मण समाजातील दामोदर देवांना नियुक्त केले. अशा तर्‍हेने योग्य ती दक्षता घेतली, तरी पाखंडी लोकांनी शंकरदेवांवर हल्ला करणे सुरूच ठेवले. गमतीची गोष्ट अशी की, मुळात स्वत:च पाखंडी असलेले लोक शंकरदेवांसारख्या महान ईश्वरभक्ताला पाखंडी ठरवून त्याचा छळ करू पाहत होते. शंकरदेवांनी शक्य तितकी सहिष्णुता आचरणात आणूनही मुळात असहिष्णू असलेल्या मंडळींनी शंकरदेवांविरुद्ध गवगवा सुरू केला होता. याचाच परिणाम म्हणून कुचबिहारचे राजे नरनारायण शंकरदेवांवर संतापले होते. या प्रसंगाचा उल्लेख लेखाच्या सुरुवातीला केलेला आहे.
 
या पाखंडी मंडळींनी आहोम राजा सहुम्मुंग याच्याकडेही शंकरदेवांविरोधात तक्रार केली होती व शंकरदेव धर्मविरोधी कार्य करत असल्याचे सांगितले होते. राजाने शंकरदेवांना दरबारात बोलावले व आपले धर्मविरोधी कार्य थांबविण्याची तंबी दिली. त्या वेळेस शंकरदेवांनी आपले कार्य आणि कार्यामागची भूमिका राजाला विशद करून सांगितली. शंकरदेवांचा उपदेश ऐकून राजा खूपच प्रभावित झाला. शंकरदेव हे एक महान संत आहेत हे त्या राजाला मनोमन पटले. मग तक्रारदारांनी शंकरदेवांना त्रास देऊ नये अशी त्याने तंबी दिली.
 
त्यांनी प्रमाण ग्रंथ म्हणून श्रीमद्भागवत याच ग्रंथाचा स्वीकार केला होता. त्यांनी आयुष्यभर केवळ ईश्वरभक्तीचा प्रसार आणि प्रचार केला. संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात -
एक हरी आत्मा जीव-शिव सम
वाया तू दुर्गमी न घाली मन॥
संत तुकोबाराय हेच सांगतात -
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम अमंगळ॥
कोणाही जिवाचा न घडो मत्सर
वर्म सर्वेश्वर पूजनाचे॥
त्याचप्रमाणे गोस्वामी संत तुलसीदास असे म्हणतात -
सियाराम मय सब जग-जानी,
करऊँ प्रणाम जोरि जुग पानी॥
हाच उपदेश करताना शंकरदेव म्हणतात -
कुक्कुर, चाण्डाल, गर्दभरो आत्मा राम
जानीया सबाको परि करिबा प्रणाम्॥
(महापुरुष श्रीमंत शंकरदेव, पृ. 58.)
म्हणजे कुत्रा, चांडाळ, गाढव, सर्वांमध्ये एकच आत्मा म्हणजेच भगवंताचा वास आहे, तो म्हणजे राम हे जाणून सर्वांना नमस्कार.
शंकरदेवांनी जातिभेदाला मुळीच थारा दिला नाही. श्रीमाधवदेव (कायस्थ), श्रीदामोदरदेव (ब्राह्मण), श्रीगोविंद (गारो), श्रीजयराम (भूटिया), श्रीपरमानंद (मिशिंग), श्रीनरहरी (अहोम), श्रीमुरारी आणि श्रीचिलारी (कोच), श्रीचांदखान (मुस्लीम) हे त्यांच्या अनुयायांपैकी प्रमुख होते. अनेक जमातीतील लाखो लोक श्री शंकरदेवांच्या शिष्यांच्या माध्यमातून वैष्णव धर्माचे अनुयायी झाले. श्री शंकरदेव म्हणतात की “प्रत्येकाला भगवंताच्या भक्तीच्या मार्गावर चालण्याचा अधिकार आहे आणि त्याचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत.”
 
किरात कछारी खासी गारो मिरि,
यवन कंक गोवाल असम मुलुक रजक तुरुक,
कोवाच मलेच्छ चांडाल
आनो यत नर कृष्ण सेव कर संगत पवित्र हय
भकति लभिया संसार तरिया बैकुण्ठे सुखे चलय
(महापुरुष श्रीमंत शंकरदेव, पृ0 49)
म्हणजे किरात, कचारी, खासी, गारो, मिरी, यवन, कंका, ग्वाल, आसामचे लोक (अहोम राज्य), रजक, तुर्क, कोवच (कोच), म्लेच्छा, चांडाळ असे खालच्या जातीतले अथवा दलित मानले गेलेले सर्व लोक हरिदासांच्या संगतीत पवित्र होऊन जातात. भगवंताची भक्ती केल्यामुळे ते संसारसागर तरून जातात. त्यांचा उद्धार होतो. मुसलमान समाजातील अनेक लोक शंकरदेवांचे शिष्य बनले. रामानंदांनी काशी क्षेत्रामध्ये अनेक मुसलमांनाचे शुद्धीकरण करून त्यांना वैष्णव धर्माची दीक्षा दिली होती, हे शंकरदेव जाणत होते. त्यामुळे आसाममध्ये त्यांनीही असाच प्रयत्न चालविला.
शंकरदेवांनी ‘एक देव वासुदेव’, ‘एक जाती मनुष्य जाती’ असा उद्घोष केला. त्यांच्या ‘श्रीकृष्णेर-वैकुण्ठ-प्रयाण’ कीर्तनात त्यांनी स्पष्टपणे भगवान श्रीकृष्णाने आपल्या महाप्रयाणापूर्वी अनन्यसखा उद्धव याला केलेला उपदेश सांगून असा संदेश दिला आहे की -
 
शुनियो उद्धव तुमि रहस्य भकति
करिबा अभ्यास तुमि थिर करि मति॥
समस्ते भूतते व्यापि आछो मइ हरि
सबाको मानिबा तुमि विष्णु-बुद्धि करि॥
- उद्धवा, मी तुला भक्तीचे रहस्य सांगतो. त्याचा तू स्थिर मतीने अभ्यास कर. मी सर्व प्राणिमात्रांमध्ये व्याप्त आहे. त्यामुळे तू सर्वांना विष्णू मानून त्या सर्वांचा आदर कर. 
ब्राह्मणर चाण्डाल निविचारि कुल
दातात चोरत येन दृष्टि एकतुल॥
नीचत साधुत यार भैल एक ज्ञान
ताहाके से पण्डित बुलिय सर्वजान॥
- जो ब्राह्मण आणि चांडाल यांच्यात भेद समजत नाही, जो दाता आणि चोर यांच्याकडे समदृष्टीने पाहतो, जो नीच आणि साधू यांच्याकडे समान भावाने पाहतो, तोच खरा पंडित आणि सर्वज्ञ आहे.
विशेषते मनुष्यगण यिटो नरे
विष्णु-बुद्धि सर्वदाय मोके मान्य करे॥
ईरषा असूया अहंकार तिरस्कार
सवे नष्ट होवे तेवे तावक्षणे तार॥
- जो सर्व प्राणिमात्रांना विष्णुरूप मानून तशी श्रद्धा मनात धारण करतो, त्याच्या मनातून ईर्ष्या, असूया, अहंकार आणि तिरस्कार पूर्णपणे नष्ट होतो.
समस्त भूतत विष्णू-बुद्धि नोहे यावे
काय वाक्य मने अभ्यासिबा एहि भावे
विष्णुमय देखे यिटो समस्ते जगते
जीवन्ते मुकुत होवे अचिरकालते॥
- सर्व प्राणिमात्र विष्णुरूप आहे हा भाव तन, मन आणि वचनपूर्वक निर्माण होत नाही, तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. जेव्हा संपूर्ण जगतात भगवंत व्यापून आहे असा भाव निर्माण होतो, तेव्हाच तत्काळ मुक्ती मिळते.
 
सकल प्राणीक देखिवेक आत्म-सम
उपाय मध्यत इटो अति मुख्यतम॥
मोर इटो धर्मर अल्परो नाहि हानि
यिहुते सम्यके मइ कैलो तत्त्व-वाणी॥
- सर्व प्राणिमात्रांना समान दृष्टीने पाहणे हाच मला प्राप्त करण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय आहे अशी भावना अल्पांशानेही व्यर्थ जात नाही.
भकतेसे मोर हृदि जानिबा निश्चय
भक्त जनर जाना आमिसि हृदय॥
मइ विना भकते निचिन्ते किछु आन
भकतत परे मइ नेदेखोहो आन॥
- उद्धवा, भक्त हाच माझे हृदय आहे, माझा प्राण आहे आणि मी भक्तांचे हृदय आहे आणि भक्तांचा प्राण आहे. भक्तांना माझ्याशिवाय अन्य कोणतेही प्रयोजन नाही आणि मीसुद्धा दिवसरात्र माझ्याच भक्तांची काळजी वाहत असतो.
 
शंकरदेवांनी आपल्या 120 वर्षाच्या दीर्घायुष्यात विपुल साहित्यरचना केली. आपल्याला हा उपदेश ‘महापुरुष शंकरदेव वज्रबुली-ग्रन्थावली’ या ग्रंथांमध्ये संकलितरूपाने पाहायला मिळतो.