सफर कॉर्बेट अभयारण्याची

विवेक मराठी    08-Apr-2022   
Total Views |
भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान असलेले उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट अभयारण्य हे वन्य प्रेमींसाठी आणि पर्यटकांसाठी नेहमीच पर्वणी असते. जिम कॉर्बेटला दिलेल्या भेटीत येथील निसर्गाशी जुळणारं नातं, मानवी भावनांना साद घालणारं वन्य जीवन, येथील विश्रामगृहांतील वास्तव्य, दक्ष वनकर्मचारी या सर्व अनुभवांचे कथन करणारा लेख.

Corbett Sanctuary

मुलांना आठवडाभराची सुट्टी होती, म्हणून उत्तराखंड राज्यातल्या जिम कॉर्बेट अभयारण्यात फिरायला जायचं ठरवलं. तसे घरातले आम्ही सगळेच जंगलप्रेमी. आफ्रिकेतले मसाई मारा, तामिळनाडूमधले मुदुमलाई, महाराष्ट्रातले ताडोबा, कर्नाटकमधले दांडेली ह्या सर्व जंगलांमधून आम्ही भटकून आलो होतो. पण केवळ भारतातलेच नव्हे, तर पूर्ण दक्षिण आशियामधले सर्वात जुने अभयारण्य, उत्तराखंडमधल्या रामगंगा नदीच्या खोर्‍यातले प्रसिद्ध जिम कॉर्बेट कसे कोण जाणे, राहिले होते. पण म्हणतात ना, कुठल्याही गोष्टीला योग यावा लागतो? आम्ही उत्तराखंडला जायचं ठरवलं. पुण्याहून डेहराडूनची तिकिटंही काढली.
 
 
कॉर्बेट अभयारण्याच्या बाहेर अनेक चांगली हॉटेल्स आहेत, पण आम्हाला राहायचं होतं जंगलाच्या आत असलेल्या वनविभागाच्या विश्रामगृहातच. कॉर्बेट अभयारण्याचं क्षेत्रफळ जवळजवळ तेराशेहून जास्त चौरस कि.मी. आहे आणि त्या जंगलाच्या विविध भागांत ब्रिटिशांनी बांधलेली शंभर-एक वर्षं जुनी असलेली अनेक सुंदर रेस्ट हाउसेस आहेत. तिथे राहणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो, असं माझ्या बर्‍याच वाइल्डलाइफ फोटोग्राफर मित्रांनी मला सांगितलेलं होतं.
 
 
तिथल्या वनविभागाकडे चौकशी केली, तर कळलं की जास्तीत जास्त लोकांना वन वास्तव्याचा आनंद देण्यासाठी म्हणून अभयारण्यातली गेस्ट हाउसेस एका वेळेला फक्त तीन रात्रींकरता आरक्षित होऊ शकतात. त्यातलं ढिकाला हे गेस्ट हाउस फार लोकप्रिय आहे. उन्हाळ्यात जंगलात येणार्‍यांची संख्या पाहता इथे बुकिंग मिळणं फार अवघड असतं. पण माझ्या एका उत्तराखंडी मित्राचे जवळचे स्नेही उत्तराखंडच्या वनखात्यात उच्चपदावर असल्यामुळे आम्हाला दोन रात्री ढिकालामध्ये आणि एक रात्र झिरना येथील फॉरेस्ट रेस्ट हाउसमध्ये बुकिंग मिळालं. उरलेले दिवस आम्ही हृषीकेशमध्ये राहायचं ठरवलं. पहिले तीन दिवस हृषीकेश आणि नंतरचे तीन दिवस ढिकाला असा बेत ठरला.



Corbett Sanctuary
 
व्हाइट वॉटर राफ्टिंग, देवप्रयागचं दर्शन आणि गंगेच्या किनार्‍यावर फिरणं यात हृषीकेशमधले तीन दिवस कसे निघून गेले, कळलंच नाही. चौथ्या दिवशी आम्ही सकाळी आठ वाजता हृषीकेशहून खासगी गाडीने निघालो. रामनगरपर्यंतचा रस्ता जवळजवळ पाच तासांचा आहे. मध्ये काही काळ उत्तर प्रदेशमधून जावं लागतं. एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे यूपी आणि उत्तराखंड ह्या दोन्ही राज्यांमधले रस्ते अत्यंत चांगले आहेत, महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पटीने चांगले!
 
 
रामनगरला पोहोचलो. वनविभागाकडे आधीच नोंदणी झाली होती, त्यामुळे आमचं परमिट वगैरे घेऊन आमचा सफारी वाहन चालक त्याच्या जिप्सीसह तयारच होता. कॉर्बेट अभयारण्यात खासगी वाहनं नेता येत नाहीत. खासगी गाडी रामनगरमध्ये पार्क करून वनविभागाच्या नोंदणीकृत वाहनानेच आत जाता येतं. दिवसाला दोन सफारी घेता येतात, एक पहाटे सहा ते सकाळी साडेदहा आणि दुसरी दुपारी अडीच ते साडेसहा. मधल्या वेळेत परत वन विश्रामगृहात येणं अनिवार्य असतं. वनविभागाची ही विश्रामगृहं चारही बाजूंनी इलेक्ट्रिकल कुंपण लावून सुरक्षित केलेली आहेत. अगदी आत जंगलात असल्यामुळे अगदी विश्रामगृहाच्या आवारातदेखील वन्य प्राणी सहज फिरकू शकतात, म्हणून इथली गेट्स फक्त ठरावीक वेळच उघडी ठेवतात, आणि पायी फिरायला फक्त गेस्ट हाउसच्या आवारातच परवानगी आहे. सफारीवर असताना काहीही झालं, तरी प्रवाशांनी जीपमधून खाली उतरायचं नाही, अशी सक्त सूचना सगळ्यांना देण्यात येते.


Corbett Sanctuary
 
आमच्या चालकाला तिथले इतर सर्व चालक ‘नेताजी’ म्हणायचे, म्हणून आम्हीही नेताजी म्हणायला लागलो. तो आम्हाला प्रथम घेऊन गेला झिरना विश्रामगृहात. 1908मध्ये बांधलेला हा बंगला. मुख्य बंगल्यात निवासासाठी दोन प्रशस्त खोल्या आणि त्यांना जोडणारा एक दिवाणखाना, अगदी फायरप्लेसयुक्त. बाहेर मोठा, प्रशस्त व्हरांडा. त्यात ठेवलेल्या वेताच्या खुर्च्या, वर पत्र्याचं उतरतं छप्पर, जुनी मजबूत दगडी वास्तू आणि चारही दिशांना पसरलेलं साल वृक्षांचं घनदाट जंगल. शेजारी छोटं स्वयंपाकघर आणि जेवण बनवून द्यायला तिथेच राहणारा खानसामा. कुठेही छानछोकी नाही, अत्याधुनिक सोईसुविधा नाहीत, इंटरनेट नाही, फोन सिग्नल नाही, वीज सौरउर्जेवर, त्यामुळे रात्री नऊ वाजता दिवे बंद आणि आसमंतात सर्वत्र भरून राहिलेलं जंगल, त्याचे आवाज, वास, सौंदर्य. अगदी आगळावेगळा अनुभव! आपल्यावरची शहरी संस्कृतीची आवरणं एकेक करून उतरवून ठेवणारा, आपल्याला आपल्या आदिम गाभ्याशी परत एकवार जोडणारा.
 
आम्ही विश्रामगृहात पोहोचलो, तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. सामान ठेवलं, गरमगरम चहा पिऊन फ्रेश झालो आणि सफारीसाठी सज्ज झालो लगेचच. कॉर्बेट अभयारण्याचं मूळ नाव होतं रामगंगा अभयारण्य. जिम कॉर्बेटच्या मृत्यूनंतर त्याचं नाव बदलून कॉर्बेट ठेवलं गेलं. मुळातली ही ‘पतली दून’, किंवा चिंचोळी दरी म्हणजे रामगंगा नदीचं खोरं. इथलं जंगल हे मुख्यतः साल वृक्षांचं वन आहे. चाळीस-पन्नास फूट उंचीचे, जाड खोडाचे साल वृक्ष इथे एखाद्या तपस्व्याप्रमाणे उभे असलेले आपल्याला पावलोपावली दिसतात. इथल्या रस्त्यांवरून जीपने जाताना ह्या साल वृक्षांच्या हिरव्या कमानीतून रस्त्यावर उमटलेली सूर्यकिरणांची रांगोळी मोठी सुंदर दिसते. कॉर्बेटचे वेगवेगळे भौगोलिक भाग आहेत - उंच डोंगर, घनदाट सदाहरित वनं, ग्रासलँड, उन्हाळ्यात पानं गळून शुष्क होणारं ड्राय डेसिड्युअस फॉरेस्ट, नदीकाठचं रेताड वाळवंट आदी सर्व प्रकारच्या इकोसिस्टिम्स तुम्हाला इथे दिसतात. त्यामुळेच कॉर्बेटमध्ये अगदी हत्तीपासून ते लाल मुंग्यांपर्यंतची जीवसृष्टी तुम्हाला दिसू शकते. पण इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे अर्थातच पट्टेरी वाघ, अर्थात रॉयल बंगाल टायगर, भारतीय जंगलाचा अनभिषिक्त राजा आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी, आई अंबेचं वाहन.


Corbett Sanctuary
 
कॉर्बेटमध्ये येणार्‍या सर्वच पर्यटकांना वाघ बघायचा असतो, पण वाघ हे कॉर्बेटचं केवळ एक आकर्षण आहे. कढीपत्ता, जांभूळ, हिरडा, पिंपळ, औदुंबर, आवळा, बेल, आंबा, महुआ आदी अस्सल भारतीय वृक्षांनी इथलं जंगल डवरलेलं आहे. हिरव्या रंगाच्या विविध छटांमधून लालभडक तजेलदार पानांचा एक वृक्ष सर्वांचं चित्त वेधून घेतो, तो म्हणजे कुसुम वृक्ष. कॉर्बेटमध्ये अनेक जातींची हरणं आहेत. चितळ म्हणजे स्पॉटेड डियर, सांबर, काळवीट, बार्किंग डियर, हॉग डियर आदी भक्ष्य इथे वाघांना सहज उपलब्ध आहे, त्यामुळे कॉर्बेटमध्ये वाघांची संख्या चांगली आहे. हृषीकेशजवळच्या राजाजी अभयारण्यातून कॉर्बेटपर्यंत एक अखंड एलिफंट कॉरिडॉरसुद्धा आहे, त्यामुळे इथे हत्तींचे मोठे कळपही दिसतात. शिवाय रानडुक्कर, कोल्हे, बिबटे वगैरे प्राणीही इथे मुबलक आहेत. पण कॉर्बेटचा राजा मात्र एकच - वाघ!


Corbett Sanctuary
 
सायंकाळी चार वाजता आम्ही आमच्या पहिल्या सफारीवर निघालो. जंगलातून एक चक्कर मारली. चितळ खूप दिसली, दोन हिमालयन ग्रिफॉन गिधाडंही दिसली. एक सांबर दिसलं. शेवटी एका पाणवठ्यावर गेलो. पाच वाजून गेले होते, दुपारच्या झोपेतून उठलेला एखादा वाघ पाण्यावर येईल म्हणून आम्ही पाणवठ्यावर गेलो होतो. वाघ दिसला नाही, पण दहा-बारा हत्तींचा एक कळप पाणवठ्यात डुंबत होता. हत्तींच्या त्वचेत स्वेदग्रंथी नसतात, त्यामुळे स्वतःचं शरीर थंड ठेवण्यासाठी त्यांना पाण्यात डुंबणं आवडतं. कळपात दोन-तीन अगदी लहान पिल्लं, पौगंडावस्थेतले (adolescent) एक-दोन हत्ती आणि बाकी माद्या होत्या. एकच मोठा सुळेवाला (टस्कर) होता. हत्तीच्या छोट्या, गोडुस पिल्लांना पाण्यात खेळताना बघणं हा खरोखरच एक अत्यंत आनंददायक अनुभव असतो. पाच-दहा मिनिटांनी हत्ती एकेक करून पाण्याबाहेर यायला लागले. आता त्यांना रस्ता ओलांडून पलीकडे नदीपात्रात जायचं होतं, पण दोन्ही बाजूंनी मिळून सात-आठ जिप्सी थांबलेल्या.


jim
 
एक मोठी हत्तीण आधी रस्त्यावर आली. तिने दोन्ही बाजूंना बघून अंदाज घेतला आणि सावकाश पावलं टाकत रस्ता ओलांडला. दुसर्‍या बाजूला पोहोचल्यावर तिने सोंड वर करून इशारा केला आणि नंतर टस्कर आला. त्यानंतर सर्व लेकुरवाळ्या हत्तिणी आपल्या पिल्लांना घेऊन आल्या. त्यातलं सगळ्यात इवलुसं पिल्लू रस्त्यात मध्येच एकदम पाय पसरून बसलं. बिचार्‍याचे पाय दुखले असावेत. अगदी ’आई, कडेवर घे ना’ म्हणत फुरंगटून बसल्यासारखं ते दिसत होतं. त्याच्या आईने अगदी अलगद सोंडेने आणि पायाने त्याला परत उठवलं. पण पिल्लूबाबू काही चालायच्या मूडमध्ये दिसत नव्हतं. त्यांनी लगेच यू-टर्न करून स्वतःची दिशाच बदलली. आता आईच्या मदतीला तिच्या बहिणी, काक्या, मावश्या आल्या. पाच-सहा हत्तींणींनी मिळून आईच्या पायात चालणार्‍या त्या छोटूला सर्व दिशांनी घेरलं. शेवटी सर्वांनी मिळून हळूहळू बाळाला सुरक्षित रस्ता ओलांडून नदीपात्रात नेलं आणि कळप मार्गस्थ झाला. हत्ती आपल्या पिल्लांची किती निगुतीने काळजी घेतात, ते आम्हाला बघायला मिळालं होतं.


Corbett Sanctuary
 
त्या दिवशी काही आम्हाला वाघ दिसला नाही, पण हत्तींचं ते दर्शनच इतकं लोभसवाणं होतं की मी भरून पावले होते. रात्री जेवणानंतर रेस्ट हाउसबाहेर पटांगणात खुर्च्या टाकून बसलो. झिरना रेस्ट हाउसमध्ये मुक्कामाला त्या रात्री आम्हीच होतो. रातकिडे किरकिरत होते, दूर झाडांवर कितीतरी काजवे चमचमत होते आणि वर आकाशात तार्‍यांचा खच पडला होता. मानवी निर्मितीचे कसलेही आवाज इथे नव्हते, न वाहनांचे आवाज, न संगीत, न संभाषण. एक प्रगाढ शांतता आणि तिला अधूनमधून छेद देणारे जंगलचे आवाज. अगदी अविस्मरणीय अनुभव.
 
 
दुसर्‍या दिवशी पहाटे उठून, गरमगरम चहा घेऊन परत जीपमध्ये बसलो. हवेत चांगलीच थंडी होती. अजून दिवस उजाडायचा होता, पूर्वेकडे नुकत्याच कुठे लाल-नारंगी रंगांच्या छटा दिसायला लागल्या होत्या. बाकी सर्व स्वप्नवत, राखाडी रंगात बुडालेलं. परत एकवार नेताजीने गाडी कालच्याच पाणवठ्यावर नेली. आमचं नशीब जोरावर असावं. पाणवठ्याच्या बाजूला शांतपणे पहुडलेला वाघ दिसला. रंग एकदम काळपट नारंगी. पाणवठ्याच्या पलीकडे वाघ होता, त्यामुळे दर्शन झालं, पण पंढरीच्या विठोबाचं होतं तसं. खूप दुरून! थोडा वेळ तिथेच थांबलो. तोपर्यंत जीप चालकाचं नेटवर्क कार्यान्वित झालं होतं. भराभरा जीप येत होत्या. हा हा म्हणता दहाएक जीप्स तिथे आल्या. वाघ महाराज चिडले असावेत, कारण त्यांनी उठून एक झकासपैकी आळस दिला आणि शेपटी अस्वस्थपणे हलवली. मग तो सावकाश चालायला लागला. मध्येच थांबून त्याने ऐटीत मान वळवून सर्व जीप्सकडे एक भेदक नजर टाकली आणि शांतपणे शेजारच्या झाडीत शिरला.


Corbett Sanctuary
 
वनखात्यातले माझे एक ज्येष्ठ स्नेही आहेत, ते वाघाला नेहमी ‘स्ट्राइप्ड माँक’ म्हणजे ‘पट्टेवाला योगी’ म्हणतात. वाघ हा मांजराच्या वंशातला सर्वात भव्य आणि शक्तिशाली, तरीही अतिशय बुजरा आणि एकांतप्रिय असलेला प्राणी. समूहात राहणं त्याला आवडत नाही. आपला परिसर मार्क करून त्यात तो एकटाच राजासारखा राहतो. भूक लागलेली असेल तेव्हाच तो शिकार करतो आणि तीही हवी तेवढीच. सहज शिकार होतील अशी चार हरणं समोर दिसत असली, तरी हा एकच मारणार आणि ओढत झाडीत घेऊन जाणार. पोटभर खाणार आणि उरलीसुरली शिकार दडवून ठेवणार. वाघ सहसा रात्री शिकार करतो किंवा अगदी पहाटे. दुपारी तो एकतर झोपलेला तरी असतो, नाहीतर कुठेतरी पाण्यात डुंबत तरी असतो. असा हा जंगलचा लाजाळू राजा आम्हाला सकाळच्या पहिल्याच सफारीत दिसला, म्हणून आम्ही खूप खूश होतो.
 
 
परत विश्रामगृहात येऊन नाश्ता केला आणि झिरनाहून निघालो. आता आम्हाला ढिकालाला जायचं होतं. झिरनाहून ढिकालाला जायला जवळजवळ तीन तास लागले. कॉर्बेटमधल्या सर्व वनविश्रामगृहांमधले ढिकाला हे सर्वात मोठं आणि लोकप्रिय ठिकाण. ढिकालाला जाताना जे गेट लागतं, त्याचं नाव धनगढी गेट. तिथे वनखात्याने एक छोटं म्युझियम उभारलंय. तिथे प्रत्येक वाहनाची एंट्री करावी लागते. तेव्हा 60 रुपये प्रवेश शुल्क घेऊन तुम्हाला गोणपाटाची एक थैली देतात. ढिकालामध्ये निवास करताना पाण्याच्या बाटल्या, चॉकलेटची वेष्टनं, चिप्सची रिकामी पाकिटं वगैरे जो सुका कचरा तुम्ही कराल, तो या पिशवीत भरून परत आणायचा आणि गेटवर द्यायचा. तिथले सर्व कर्मचारी हा नियम काटेकोरपणे पाळतात आणि पर्यटकांकडूनही तीच अपेक्षा केली जाते. त्यामुळे कॉर्बेटचे ट्रेल्स कमालीचे स्वच्छ आहेत, वाटेवर किंवा जंगलात कुठेही प्लास्टिकचा एक कपटा तुम्हाला दिसणार नाही. प्लास्टिकचं पिशाच्च कॉर्बेटमध्ये अजूनतरी बोकाळलेलं नाही. कॉर्बेटच्या वनकर्मचार्‍यांचं मला खूप कौतुक वाटलं. अगदी मन लावून ते त्यांचे काम करत होते, मग ते रस्त्यावरचा पाला-पाचोळा झाडून रस्ते मोकळे करणारे कर्मचारी असोत, जेवण बनवणारे खानसामे असोत की जंगलात हत्तीवरून पॅट्रोलिंगला जाणारे रेंजर असोत.
 
 
ढिकालाच्या आमच्या वास्तव्यात आम्ही प्रत्येक सफारीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वाघ बघितले, पण एक भेट अशी अविस्मरणीय होती की मला पुरतंच पटलं माझे स्नेही वाघाला ‘पट्टेवाला योगी’ का म्हणतात ते. संध्याकाळची सफारी होती. आम्ही एका रस्त्यावरून चाललो होतो, तर दोन जीप पुढे थांबलेल्या दिसल्या. आमच्या नेताजींनीही भरधाव गाडी दौडवत तिथे नेली. आमच्यापासून जेमतेम शंभरेक मीटरवर रस्त्याच्या एका बाजूला गुडघाभर गवतात आपल्या पुढच्या पंजावर डोकं टेकवून वाघोबा शांत झोपलेले होते आणि त्याच रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला दहा-बारा चितळं चरत होती. दोघांमध्ये जेमतेम 25-30 फुटांचं अंतर असेल. इंजीन बंद करून सर्व जीप्स उभ्या होत्या. आमच्या गाड्या बघून आणखी जीप्स आल्या. बघता बघता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मिळून वीसेक तरी जीप्स झाल्या असतील आणि दोन्हीकडच्या जीपच्या रंगांच्या बरोबर मध्ये जंगलच्या रंगमंचावर वाघ आणि चितळं यांचा नाट्यप्रयोग सुरू होता. बर्‍याच जीप्समध्ये आपली भलीमोठी लेन्स घेतलेले व्यावसायिक आणि हौशी फोटोग्राफर होते. त्यांच्या कॅमेरा शटरचे आवाज त्या शांततेत मशीनगनच्या फैरींसारखे भासत होते. वाघ आणि चितळं दोघांनीही जीप्सकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. वाघ तर झोपलाच होता, चितळं चरत होती, पण मधूनच नाकपुड्या थरथरवून वाघाचा अंदाज घेत होती.
 
 
आम्ही सर्व अक्षरशः श्वास रोखून बघत होतो की पुढे काय होईल. जवळजवळ अर्धा तास तसाच गेला. शेवटी एकदाचे वाघोबांनी डोळे उघडून एक दीर्घ जांभई दिली आणि शेपटी जमिनीवर फटकारली. त्याबरोबर इतका वेळ शांतपणे चरत असलेल्या चितळांच्या कळपात एकदम हलकल्लोळ माजला. एक-दोन चितळं आर्त ओरडली, एक-दोन उड्या मारून गवतात नाहीशी झाली, बाकीची कुठे जावं हे न कळून गोंधळात पडली. वाघ आता उठून उभा राहिला होता. आमच्याकडे त्याची पाठ होती. त्याच्या काळ्या कानांवरचे पांढरे ठिपके उठून दिसत होते. वाघ उभा राहिल्याबरोबर चितळं परत उधळली. चितळं इतकी जवळ होती की वाघाने मनात आणलं असतं तर सहज एखादं पकडू शकला असता. पण वाघ भुकेलेला नव्हता, त्यामुळे त्याने फक्त चितळांकडे एक तुच्छ नजर टाकली आणि शांतपणे, सावकाश, डौलात एकेक पाऊल टाकीत तो बाजूच्या झाडीत नाहीसा झाला.
गरज नसेल तर शिकार करायची नाही, संग्रह करायचा नाही हेच जणू शिकवून गेला होता तो पट्टेवाला योगी आम्हाला!