मानसिकता आणि कार्यपद्धती बदला, परिणामकारक जलसंधारण करा!

विवेक मराठी    11-May-2022   
Total Views |
@डॉ. उमेश मुंडल्ये 9967054460

 
नदी खोलीकरण हा विचार न करता, नदीतील गाळ काढणं हे काम केलं, नदीपात्रातील डोहांमधील गाळ काढून ते स्वच्छ केले, नदीला येऊन मिळणार्‍या ओढे-नाल्यांवर छोटे छोटे साखळी बंधारे घातले, बांधबंदिस्ती नीट करून स्रोतात येणारी माती थांबवली किंवा कमी केली, मुख्य नदीपात्रात काम करण्याआधी त्या परिसरातील जमिनीवर आणि ओढे, नाले यांवर उपाय केले, हे सर्व करून स्वच्छ केलेल्या पात्रात परत गाळ भरणार नाही यासाठी काळजी घेतली, आणि मगच मुख्य नदीवर जलसंधारण उपाय करायला घेतले, तर त्याचा निश्चित फायदा होईल आणि दर वर्षी गाळाने नदी पत्र भरून जाणं टाळता येईल.

water

आपल्याकडे दर वर्षी आपण जलसंधारण महोत्सव भरवतो आणि शेवटी त्या सर्व उपक्रमांचा खेळ करून टाकतो. आपण सगळे फारच वैशिष्ट्यपूर्ण लोक आहोत. आपल्याला पाणी, पर्यावरण, शेती, राजकारण, क्रिकेट इत्यादी गोष्टींमधलं सगळं कळत असतं, असा आपला प्रामाणिक समज (बरेचदा गैरसमज) असतो. पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे तर खूप लोकांकडे रामबाण उपाय असतात. पण, सगळे प्रयत्न करूनही हे प्रश्न सुटलेला नाही, खरं तर तो आणखी क्लिष्ट होत चालला आहे असं दिसून येतं. एवढे महोत्सव, स्पर्धा, यात्रा, असे वेगवेगळे उपक्रम राबवूनही मूळ प्रश्न सुटत का नाही? याचा विचार केला तर काही गोष्टी समोर येतात. आपण त्या मांडून त्यावर अभ्यास करू या.
 
आपल्याकडे 4 वर्षांपूर्वी पाऊस कमी झाला होता. त्यातच आपल्याकडे पाणी वापरण्याचं आणि वाचवण्याचं पुरेसं नियोजन नसल्यामुळे पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली होती. 2019, 20 आणि 21चा पाऊस अनियमित झाला. पावसाने काही भाग धुऊन काढला, महापूर आला, तर काही भागात सरासरीपेक्षा कमीही झाला. पण यातून एक गोष्ट चांगली झाली की गेली 2-3 वर्षं वेगवेगळ्या संस्थांकडून, विविध पातळ्यांवर जलसंधारणाचे प्रयत्न व्हायला लागले.
पण याची अधिक माहिती घेतली तर लक्षात येतं की झालेले प्रयत्न दोन प्रकारचे होते -
 
टँकरने किंवा अन्य मार्गाने पाणीपुरवठा करणं
 
विविध नद्यांचं / जलस्रोतांचं खोलीकरण करणं.
बाकीही जलसंधारणाची कामं होत होती, पण वर सांगितलेली दोन कामं विशेष चालू होती. यातल्या पाणीपुरवठ्याच्या प्रयत्नांची गरज नक्कीच आहे. कारण लगेच पाणी देण्याचा दुसरा कोणताही परिणामकारक पर्यायी मार्ग नाहीये. नद्यांचं खोलीकरण करणं जोरात चालू होतं. नदीतला गाळ काढणं हे अतिशय योग्य आहे. ते करायलाच हवंय. पण नद्यांचं सरसकट 3 मीटर, 6 मीटर खोलीकरण करणं आणि तेही सलग 5-7 कि.मी. करणं थोडंसं धोक्याचं आहे.
 
गेल्या वर्षी प्रत्यक्ष काम करायला वेळ फारच कमी मिळाला. एकतर पावसाळा नोव्हेंबरपर्यंत चालला आणि फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोना साथ जगभर पसरायला सुरुवात झाली आणि मार्चपासून तर सगळेच गृहबंदी झाले. मे महिना अर्धा संपल्यानंतर ग्रामीण भागात जिथे कोरोना साथीची लागण नव्हती किंवा अगदी कमी होती, तिथे जलसंधारण कामं हातात घेणं शक्य झालं. हातात वेळ कमी असल्याने आणि काही अटी पाळाव्या लागल्याने, प्राथमिकता ठरवून कामं करावी लागली.
दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर आता जलव्यवस्थापनाची कामं पुन्हा सुरू तर झाली आहेत, पण त्यांनी वेग पकडला नाही अजून. आणि, नक्की काय केलं पाहिजे यात तज्ज्ञ, सरकारी यंत्रणा आणि सामान्य लोक यांचामध्ये मतभेद असल्याने हा प्रश्न चिघळत चालला आहे. दुर्दैवाने हे अजूनही बहुसंख्य लोकांच्या लक्षात आलेलं नाही आणि त्यामुळे हे प्रश्न सुटावे यासाठी नक्की काय काय करायला हवं आणि ते कोणी करायला आणि सांगायला हवं, याबाबत गोंधळ आहे. आपण कोणाचं ऐकावं, प्रथितयश कलाकारांचं की त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचं, याबाबत लोकांना संभ्रम आहे. त्याचा परिणाम कामावर, यशावर सहज दिसून येतो आहे, पण त्याकडेही बहुसंख्य लोक गांभीर्याने बघायला तयार नाहीत, असं दिसत आहे.

water
 
पाऊस चांगला असो वा मध्यम वा कमी, आपल्याला योग्य जलसंधारण उपाय तर करावे लागणार आहेतच. प्रचलित उपाय म्हणजे पाझर तलाव, बंधारे (कच्चे, दगडी, सिमेंट), नदी, नाले यांचं खोलीकरण, समतल चर वगैरे पुरेसे नाहीत किंवा हे सगळे उपाय सरसकट करण्यासारखेही नाहीत, हे लक्षात घेऊन, प्रत्येक गावाचा, पाणलोटाचा, गावाच्या स्रोतांच्या क्षमतेचा, गावकरी मंडळींच्या सहभागाचा, योग्य तज्ज्ञाच्या सल्ल्याचा विचार करून योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे, योग्य उपाय झाले तर पडणारं पाणी आपल्याला जास्त काळ साठवून पावसाळ्यानंतर वापरासाठी उपलब्ध करून ठेवणं शक्य होईल.

 
नदी खोलीकरण करताना, नदी ही एक परिसंस्था (ecosystem) आहे. आपण जास्तीत जास्त पाणी अडवण्यासाठी तिथे मोठी टाकी किंवा डोह तयार करतोय का, याचा विचार काम करणार्‍या माणसांनी करायला हवा. आपण फक्त माणसाची गरज बघून पाणी साठवण्याचा विचार करतोय, निसर्गाच्या संतुलनाचा करत नाहीये. आज पाणी साठवून ठेवताना नदीचा नैसर्गिक उतार संपतोय, प्रवाहावर त्याचा परिणाम होणार आहे. नदी वाहती राहिली नाही, तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.
त्याचबरोबर, आपल्याकडे बहुतेक सर्व गावांमध्ये सांडपाणी नदीत सोडलं जातं. आता ते सांडपाणी प्रवाहाबरोबर निघून जातं. तिथे खोलीकरण करून पाणी साठवलं तर सर्व साठा प्रदूषित होण्याची भीती आहे. यावर ठोस उपाय होत नाही, तोपर्यंत हा धोका कायमच आहे. यामुळे साठवलेलं सर्व पाणी आणि भूगर्भातील पाणी प्रदूषित होईल.


water
त्याऐवजी, नदी खोलीकरण हा विचार न करता, नदीतील गाळ काढणं हे काम केलं, नदीपात्रातील डोहांमधील गाळ काढून ते स्वच्छ केले, नदीला येऊन मिळणार्‍या ओढे-नाल्यांवर छोटे छोटे साखळी बंधारे घातले, बांधबंदिस्ती नीट करून स्रोतात येणारी माती थांबवली किंवा कमी केली, मुख्य नदीपात्रात काम करण्याआधी त्या परिसरातील जमिनीवर आणि ओढे, नाले यांवर उपाय केले, हे सर्व करून स्वच्छ केलेल्या पात्रात परत गाळ भरणार नाही यासाठी काळजी घेतली, आणि मगच मुख्य नदीवर जलसंधारण उपाय करायला घेतले, तर त्याचा निश्चित फायदा होईल आणि दर वर्षी गाळाने नदी पत्र भरून जाणं टाळता येईल.
तोच प्रकार आहे नदीत सोडलं जाणार्‍या सांडपाण्याबद्दल. सांडपाणी स्रोतात जाण्याचे सर्व मार्ग बंद केले किंवा त्या पाण्यावर प्रक्रिया करून मग ते पाणी जमिनीत मुरून स्रोतात जाईल अशी व्यवस्था केली, तर सांडपाण्यामुळे स्रोत खराब होऊन वाया जाण्याचा प्रकारही बंद/कमी होईल.

आणखी एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, ज्याकडे बहुसंख्य लोकांनी दुर्लक्ष केलंय, तो म्हणजे, जलसंधारणाचे दीर्घकालीन फायदे हवे असतील तर आजपर्यंत जी बेसुमार वृक्षतोड झालीय त्यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडं लावून (फक्त वृक्ष प्रजाती नव्हे, तर गवतापासून वृक्षांपर्यंत प्रजाती लावून जंगल पट्टे तयार करणं) ती जगवण्याचे सर्व प्रयत्न करावे लागतील. जर झाडं लावली आणि वाढवली गेली नाहीत, तर माती वाहून येऊन पुन्हा 2-3 वर्षांत बंधारे गाळाने परत भरून जातील. झाडं लावणं आणि जगवणं ही खूप कठीण गोष्ट येत्या 2-3 वर्षांत परिणामकारकरित्या करावी लागणार आहे. त्यामुळे मातीची धूपही कमी होईल आणि पाणी धरून ठेवण्याची मातीची क्षमता वाढेल. आणि हे दोन्ही उपाय एकाच वेळी करण्याची गरज आहे.
कोकणात आणि सह्याद्री रांगांमध्ये ग्रामीण भागात जलसंधारणाची काय परिस्थिती आहे?

 
गाळाने भरलेला बंधारा. लोकांनी त्यात भात लावलाय कंटाळून. गाळाने भरलेला आणि गळती होणारा बंधारा.
आपल्याकडे पॉलिसी ठरवताना सर्व राज्यासाठी एकाच प्रकारची कामं सुचवली आणि केली गेली आहेत. पडणारा पाऊस, भौगोलिक परिस्थिती, माती आणि एकूणच भूगर्भरचना इत्यादी बाबींकडे दुर्लक्ष झालं आहे, असं चित्र आहे. यापैकी कोणत्याही बाबीचा विचार झाला आहे असं किमान कामं बघून तरी वाटत नाही.
 
 
कोल्हापूरटाइप बंधारे हे कमी आणि मध्यम प्रमाणात पाऊस असेल आणि पाणी धरून ठेवण्याची मातीची क्षमता चांगली असेल तर उपयोगी पडतात. कोकणात पाऊसही भरपूर आहे आणि पाणी धरून ठेवण्याची मातीची क्षमताही खूप कमी आहे. त्यामुळे, हे बंधारे गाळाने भरून जातात. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या बंधार्‍यांच्या प्लेट्स चोरीला जातात किंवा आळस अथवा अन्य काही कारणाने योग्य प्रकारे लावल्या जात नाहीत आणि परिणामी त्यातून गळती सुरू राहते आणि मूळ हेतू पूर्ण होत नाही. या सर्व कामात स्थानिक लोकांना सहभागी करून घेतलं जात नाही आणि त्यामुळे ही कामं चालू असताना आणि नंतरही त्याकडे लोकांचं लक्ष राहत नाही.

 
शेततळी बांधतानाही हाच प्रश्न येतो. सरकारी पातळीवर काम सोपं व्हावं म्हणून किंवा अन्य अनाकलनीय कारणाने शेततळ्यांचं आकारमान निश्चित केलं जातं. त्यामुळे कोकणात तर अशी परिस्थिती निर्माण होते की चांगली माती काढून तळ्याच्या बांधावर घातली जाते आणि तळ खरवडून मुरुम शिल्लक राहतो. त्यामुळे पावसात चांगली माती वाहून जाते आणि मुरुम असल्याने पाणी टिकत नाही, आणि ज्या कारणासाठी हे केलं जातं, ते होतंच नाही. यात पाणी, माती, शेत, पैसा, श्रम, इत्यादी अक्षरशः वाया जातं.
 
चुकीच्या पद्धतीने बांधलेले आणि गाळाने भरलेले बंधारे
(उपयोग शून्य)
Check dams हे आणखी एक उदाहरण आहे सरकारच्या पॉलिसीचं. जिथे पाणी धारण मातीची क्षमता चांगली आहे (काळी माती), तिथे आणि पाऊस कमी आणि मध्यम स्वरूपाचा आहे तिथे हे उपयोगी पडतात, कारण पाण्याबरोबर माती वाहून येत नाही.


water
 
 
कोकणात एकदम विरुद्ध परिस्थिती आहे. कोकणात पाऊसही जास्त आहे आणि पाणी धरून ठेवण्याची मातीची क्षमताही कमी आहे, त्यामुळे माती पाण्याबरोबर वाहून येते आणि वर्ष-दोन वर्षात बंधारा गाळाने भरून जातो. इतका की पाणी साठवण्याच्या जागी भातशेती करता येते.
 
लहान, मध्यम आकाराची धरणं आहेत, त्यापैकी बहुतांश धरणांतून पाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कालवे काढले नाहीयेत किंवा आहेत ते इतके वाईट आहेत की पाणी लगेच मुरून जातं आणि पुढच्या गावापर्यंत पोहोचत नाही. त्या धरणावर झालेला खर्च फुकट जातो.
 
 
परिस्थिती सुधारावी यासाठी काय केलं पाहिजे?
 
 
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठी धरणं न बांधता गाव पातळीवर स्थळानुरूप (site specific) आणि लोकसहभागातून जलसंधारणाची कामं व्हायला हवीत. इथे पडणार्‍या पावसाचा विचार करून योग्य ठिकाणी योग्य प्रकारचे उपाय योजायला हवेत. डोंगरातून वेगाने येणारं पाणी ठरावीक अंतरावर लहान वेंटचे बंधारे बांधून आणि त्यात काही काळ अडवून त्याचा वेग कमी करावा लागेल. मग ते पाणी आजूबाजूला जिरवण्यासाठी Check dams, शेततळी, पाझर तलाव एवढ्याच उपायांवर न थांबता, वेंट असलेले बंधारे, Gabion bunds, झर्‍याचं मुख बांधणं, साठवण तलाव, भूमिगत बंधारे, विहिरींचं पुनर्भरण इत्यादी उपाय योग्य जागा निवडून तिथे योजण्याची गरज आहे. वेंट असलेले बंधारे, ज्यामुळे गाळ साठत नाही आणि पाणी जास्त काळ टिकतं. जुने कोल्हापूर टाइप बंधारे आणि गाळाने भरलेले Check dams दुरुस्त करून, गाळ काढून परत उपयोगात आणले पाहिजेत. हे करताना त्यात वेंट टाकून मग दुरुस्ती केली, तर त्याचाही परत उपयोग होऊ शकतो. विहिरींच्या खालच्या पातळीवर भूमिगत बंधारे योग्य प्रकार बांधले, तर विहिरीतील पाणी तीन महिने जास्त टिकून राहतं असा अनुभव आहे.
 
 
साठवलेलं आणि जिरवलेलं पाणी वापरून जेव्हा गावातील शेतकरी दुसरं पीक घेतील, तेव्हाच गावात समृद्धी येईल. त्यामुळे, केवळ पाणी साठवणं आणि जिरवणं इथेच न थांबता त्या पाण्यापासून पुढे शाश्वत विकास कसा होईल, ते पाहिलं पाहिजे.
 
 
पाण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता लोकसहभागातून जलसंधारण आणि नियोजन केलं आणि स्थलानुरूप उपाय योजले, तर निश्चित फायदा होतो.
 
 
गाव पातळीवर जलसंधारण आणि नियोजन केलं आणि त्यात लोकसहभाग असला, तर गाव सुजल आणि सुफल होतं हा अनुभव आहे. फ़क्त यात कोणतंही राजकारण न येणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे.
 
 
जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ राबवायचं असेल, तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक असतो. गावाला लागणारं पाणी त्याच परिसरात अडवणं, जिरवणं आणि साठवणं यातून गावाच्या पाण्याच्या गरजेची पूर्तता होऊ शकते.
 
 
जलसंधारणाची कामं स्थलानुरूप (site specific) असणं आवश्यक आहे, म्हणजे शेजारच्या दोन गावांमध्ये कदाचित वेगळे उपाय करणं योग्य असू शकेल. त्यामुळे सरसकट सर्वत्र एकाच प्रकारचं काम न करता, लोकसंख्या, पाणी साठवण्याची क्षमता, नदीच्या पात्राची रुंदी, खोली, आजूबाजूच्या परिसरातील शेतजमिनी आणि वस्त्यांचं प्रमाण इत्यादी बाबींचा अभ्यास करून मग कामं केली, तर कोणाचंच नुकसान न होता सर्वांचा फायदा होऊ शकतो.
 
 
 
शहरांतही खूप कमी लोक प्रत्यक्ष काम करून घेताना दिसतायत. लोकांचा भर पाण्याबद्दलची चर्चा एकमेकांत, माध्यमांत आणि सोशल मीडियावरच जास्त दिसतेय. शहरातल्या लोकांनीही हे लक्षात ठेवायला हवं की आपल्या परिसरात पडणारं पााणी आपण जमिनीत जिरवून नंतर वापरू शकतो, आणि जिथे बोर वेल्स आहेत तिथे त्यांचं पुनर्भरण योग्य मार्गाने करू शकतो. त्यामुळे महापालिकेवर जास्त अवलंबून राहावं लागणार नाही आणि प्रशासनावर जास्त भार पडणार नाही. फक्त त्यासाठी केवळ चर्चा करून चालणार नाही, योग्य तज्ज्ञ व्यक्तींकडून योग्य ठिकाणी योग्य प्रकारे काम करावं लागेल.
 
 
वर सांगितलेल्या गोष्टी प्राथमिकता ठरवून केल्या, तर याच नव्हे तर अनेक वर्षं जलसंधारण करणं शक्य, सोपं आणि परिणामकारक ठरेल, यात काही शंका नाही.
 
 

डॉ. उमेश मुंडल्ये

डॉ. उमेश मुंडल्ये हे निसर्गाचा वारसा सांगणाऱ्या देवरायांचे अभ्यासक. त्यांनी महाराष्ट्रातल्या ३,७८३ देवरायांची नोंद करताना १,४५० देवरायांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. ह्या भटकंतीदरम्यान त्यांनी १,०६८ वनस्पतींची ओळख पटवली आहे. वनस्पतिशास्त्रात Ph.D. असलेले डॉ. मुंडल्ये, पुस्तकी शिक्षणापेक्षा निसर्गातल्या शिक्षणावर भर देतात आणि त्यातच रमतात. म्हणूनच ‘फील्डवरचा बॉटनिस्ट’ अशीच त्यांची ओळख सांगितली जाते. महाराष्ट्रात पाणी विषयावर अभ्यासपूर्ण काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. मुंडल्ये देवराईतज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात.