नव‘चैतन्य’दायक महाप्रभू!

विवेक मराठी    30-May-2022   
Total Views |
 चैतन्य महाप्रभूंनी केवळ बंगालमधीलच नव्हे, तर ओरिसामधील लोकांना आणि त्याचबरोबर भारताच्या अन्य भागातीलही एका विशाल जनसमूहाला - म्हणजेच जे कोणी महाप्रभूंच्या संपर्कात आले, त्या सर्वांना एकाच सार्वजनिक मंचावर एकत्र आणले. त्यांचे हे व्यासपीठ उच्चनीच, गरीब-श्रीमंत, हिंदू आणि मुसलमान या सर्वांसाठी मोकळे होते. महाप्रभूंनी जातिप्रथेचा बहिष्कार करण्यासाठी कोणताही दिखाऊ प्रयास केला नाही. यापेक्षा त्यांनी जातिप्रथेचा दुष्प्रभाव समाजातून कसा नष्ट होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
 
sant
‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर ना व्हावा’ हा संत तुकाराम महाराजांचा मागणीपर अभंग प्रसिद्ध आहे. खर्‍या भागवत भक्ताला कोणत्याही गोष्टीची आकांक्षा असते, ते वरील अभंगावरून आपल्या लक्षात येते. अगदी हीच भावना बंगालमधील सुप्रसिद्ध संत चैतन्य महाप्रभू यांनी आपल्या रचनेतून व्यक्त केली आहे. चैतन्य महाप्रभू हे संस्कृत भाषेचे महापंडित होते. मात्र त्यांनी अन्य आचार्याप्रमाणे कोणत्याही संस्कृत भाष्य ग्रंथाची रचना केलेली नाही. ‘शिक्षाष्टक’ ही त्यांची एकमेव रचना प्रसिद्ध आहे. यामध्ये आठ श्लोक असून त्यातील चौथा श्लोक वरील भावना व्यक्त करतो. महाप्रभू सांगतात,
 
 
न धनं न जनं न सुन्दरीं कविता वा जगदीश कामये।
 
मम जन्मनि जन्मनीश्वरे भवताद् भक्तिरहैतुकी त्वयि।
 
 
महाप्रभू जगदीशाकडे ते केवळ एकच कामना व्यक्त करतात की, ‘हे भगवंता, तुझी अहेतुक भक्ती मला जन्मोजन्मी लाभू दे. याशिवाय मला धनसंपदा, लोकप्रियता, सुंदरी अथवा काव्य अशी कशाचीच कामना नाही.’ संत तुकाराम महाराजसुद्धा भगवंताच्या भक्तीसाठीच वारंवार गर्भवास भोगून जन्माला येण्याची कामना करतात.
 
 
स्वामी विवेकानंदांनी ‘भारतीय महापुरुष’ या विषयावर एक व्याख्यान दिले आहे. या व्याख्यानात चैतन्य महाप्रभू यांच्याविषयी ते असे सांगतात की, ‘जगामध्ये भक्ती चळवळीत जे मोठमोठे आचार्य होऊन गेले आहेत, त्यामधील एक श्रेष्ठ आचार्य म्हणजे चैतन्य महाप्रभू. त्यांनी भक्तीच्या लाटेमध्ये संपूर्ण बंगाल प्रांत सामील करून टाकला. सर्वांच्या हृदयामध्ये शांतीची प्रस्थापना केली. त्यांच्या प्रेमभावाला कोणतीच सीमा नव्हती. साधू, असाधू, हिंदू, मुसलमान, पवित्र, अपवित्र, वेश्या इत्यादी सर्वांवर सारखेच प्रेम केले. सर्वांबद्दल त्यांच्या मनात दयाभाव वसत असे. काळाच्या ओघात त्यांच्या संप्रदायाला जरी उतरती कळा लागली असली, तरी आजसुद्धा तो दरिद्री, दुर्बल, जातिच्युत, पतित आणि समाजात ज्यांना कोणतेच स्थान मिळालेले नाही अशा सर्व लोकांसाठी आश्रयस्थान आहे.’
 
 
स्वामी विवेकानंदांनी अत्यंत थोडक्या शब्दांत चैतन्य महाप्रभूंचे कार्य उलगडून दाखविले आहे. श्री चैतन्य महाप्रभूंचा काळ इ.स. 1485 ते 1533 असा मानला जातो. पश्चिम बंगालमधील नवद्वीप नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ मिश्र आणि आईचे नाव सचिदेवी असे होते. त्यांचे बाळपणीचे नाव विश्वंभर असे होते आणि पुढे त्यांना गौरांग असे नाव पडले. महाप्रभू भगवान श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. त्यांचे श्रीकृष्णाबद्दलचे प्रेम पाहून लोक त्यांना श्री राधेचे अवतार मानत असत. बंगालमधील वैष्णव त्यांना साक्षात पूर्णब्रह्म मानतात.
 
 
पंधरावे शतक हे भारतीय इतिहासात आगळेवेगळे मानायला हवे. या काळात संत कबीर आणि संत रैदास यांनी निर्गुण भक्ती प्रतिपादन केली, तर संत तुलसीदास यांनी रामचरितमानस या ग्रंथाच्या माध्यमातून सगुण भक्तीचे महत्त्व वाढविले. श्री गुरूनानक देव यांनी पश्चिमेकडील भागात सामाजिक समरसता दृढ करण्यासाठी भक्ती चळवळ उभारली आणि पूर्व भागात महाप्रभूंनी हरिनाम संकीर्तनाच्या माध्यमातून विशाल जनसंघटन उभारले. तसे पाहिले, तर या संतांनी अलौकिक आणि पारलौकिक परमार्थ सांगितला, पण ऐहिक म्हणा की भौतिक म्हणा, क्षेत्रावर ही त्यांचा पुसून न टाकता येणारा ठळक ठसा उमटलेला दिसतो.
 
 
या काळात हिंदू धर्म विदेशी आक्रमकांच्या वावटळीमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना, समाज गलितगात्र झालेला असताना या सर्व संतांनी भक्ती चळवळीच्या माध्यमातून त्यात नवचैतन्य फुंकले. जातीपातीत वाटला गेलेला हिंदू समाज या आक्रमकांचे सहजपणे भक्ष बनू शकला असता, मात्र संत चळवळीने प्रत्येकाच्या हृदयात विराजमान असलेल्या जनार्दनाला साद घातली आणि सर्वांभूति परमेश्वर मानून, एकतेची व समानतेची भावना बुलंद केली. या बुलंद शिखराला टकरा मारून विदेशी आक्रमकांच्या लाटा माघारी परतल्या. मात्र या टकरांच्या खाणाखुणा ‘ज्ञानवापी’ मशिदीसारख्या वास्तूतून आजही आपल्याला सहजपणे दृष्टिगोचर होतात. तेथील नंदीला आपल्या मालकाची - म्हणजे भगवान शिवशंकराची प्रतीक्षा आहे आणि तो मालक पुन्हा आपल्या नंदीसमोर त्याला आश्वस्त करत विराजमान होणार असेल, तर यामागे या सर्व संताची फार मोठी पुण्याई आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
 
 
sant
आक्रमकांच्या भयापोटी जनता अत्याचारांची मूक दर्शक बनली होती. पण संतांनी या जनतेच्या वाणीत परमेश्वराचे बळ पेरले आणि संपूर्ण बंगाल प्रांत ‘हरी बोल हरि बोल’ या ध्वनीने झंकारून उठला. केवळ भगवंताच्या नावाने लोकांना आपला ढासळत चालेला आत्मविश्वास पुन्हा मिळाला. अत्याचाराचा विरोध करण्यासाठी आपला प्रभू आपल्या सोबत आहे ही भावना बलवान झाली. या भावनेच्या बळापुढे आक्रमकांची वावटळ काही प्रमाणात का होईना, निश्चेष्ट झाली.
 
 
प्रसिद्ध बंगाल समीक्षक सुकुमार सेन यांनी बांगला साहित्याचा इतिहास लिहिलेला आहे. आपल्या या ग्रंथात सेन असे म्हणतात, ‘लहानातील लहान माणसाला ईश्वरभक्त बनविणे हेच चैतन्य महाप्रभू यांचे कर्तव्य अथवा लक्ष्य होते. जनतेला सर्व प्रकारच्या सामाजिक बंधनातून, राजकीय गुलामीतून आणि जातीय तसेच सैद्धान्तिक अंतर्बाधांच्या जोखडातून मुक्त करण्याची त्यांची इच्छा होती. तथाकथित उच्चवर्णीय ब्राह्मण पुरोहित असो अथवा हलक्या वर्णाचे मानले गेलेले सफाई कर्मचारी असो - महाप्रभूंच्या दृष्टीने एक मनुष्य म्हणून यांच्यात काहीच फरक नव्हता. कारण ईश्वरांच्या भक्तांचा प्रत्यक्ष ईश्वराच्या कृपात निवास असतो आणि ईश्वर हा आपल्या भक्तांमध्ये निवास करतो.’
 
 
 
चैतन्य महाप्रभूंनी केवळ बंगालमधीलच नव्हे, तर ओरिसामधील लोकांना आणि त्याचबरोबर भारताच्या अन्य भागातीलही एका विशाल जनसमूहाला - म्हणजेच जे कोणी महाप्रभूंच्या संपर्कात आले, त्या सर्वांना एकाच सार्वजनिक मंचावर एकत्र आणले. त्यांचे हे व्यासपीठ उच्चनीच, गरीब-श्रीमंत, हिंदू आणि मुसलमान या सर्वांसाठी मोकळे होते. येथे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाप्रभूंसमोर असलेला मुसलमान समाज हा अरबस्तानातून अथवा तुर्कस्तानातून भारतात आलेला नव्हता. तो इथल्याच मातीत जन्मलेला आणि विदेशी आक्रमकांच्या अत्याचारामुळे वेगळ्या उपासना पद्धतीचा स्वीकार केलेला आपलाच धर्मबांधव होता. महाप्रभूंनी जातिप्रथेचा बहिष्कार करण्यासाठी कोणताही दिखाऊ प्रयास केला नाही. यापेक्षा त्यांनी जातिप्रथेचा दुष्प्रभाव समाजातून कसा नष्ट होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
 
 
एखाद्या विशिष्ट जातीत जन्मल्यामुळे कुणीही उच्च ठरत नाही अथवा नीच ठरत नाही, हाच चैतन्य महाप्रभू यांचा सिद्धान्त होता. आपल्याला ‘चैतन्य चरित्रामृत’ या ग्रंथामध्ये हा सिद्धान्त खालीलप्रमाणे मांडलेला आढळतो -
 
कुबुद्धि छाडिया कर श्रवण-कीर्तन।
अचिरात् पावे तवे कृष्ण-प्रेमधन॥
नीच जाति नहे कृष्ण-भजन अयोग्य।
सकुल विप्र नहे भजनेर योग्य॥
येई भजे येई बड, अभक्त हीन छार।
कृष्ण भजन नाहि जाति कुलादि विचार॥
दीनेरे अधिक दया करे भगवान।
कुलीन पण्डित धनीर बड अभिमान॥
भजनेर मध्ये श्रेष्ठ नवविधा भक्ति।
कृष्ण-प्रेम कृष्ण दिते घरे महाशक्ति॥
तार मध्ये सर्वश्रेष्ठ नाम-संकीर्तन।
निरपराधे नाम लले पाय प्रेमघन॥
 
 
अन्य संतांप्रमाणे चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनातही चमत्काराने भारलेल्या घटना आणि प्रसंग घडल्याची वर्णने आपल्याला आढळतात. मात्र तो आपल्या चर्चेचा विषय नाही. श्री चैतन्य चरित्रामृत या ग्रंथांत पुढीलप्रमाणे एक प्रसंग आढळतो -
 
 

 
ते भक्त नरहरी ठाकूर यांचे गाव श्रीखंड येथे गेले होते. त्या वेळेस त्यांचे अनुयायी नित्यानंद प्रभू यांना मधाची गरज भासली. चैतन्य महाप्रभूंच्या कृपादृष्टीने तेथील एक सरोवर तत्काळ मधाने भरून गेले. आजही ‘मधुपुष्करिणी’ या नावाने ते सरोवर प्रसिद्ध आहे. यातील चमत्काराचा भाग आपण सोडून देऊ, पण ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे की, धर्मग्लानीमुळे कडूजहर बनलेल्या तेव्हाच्या वातावरणात चैतन्य महाप्रभूंनी आपल्या भक्तिमाधुर्याने एक अविट गोडी नक्कीच निर्माण केली होती.
 
 
चैतन्य महाप्रभू ‘हरिबोल, हरिबोल’ असे म्हणून सर्वांना आपल्या पोटाशी धरत असत. त्यांना जर असे कोणी म्हणाले की, “महाराज, मी हीन कुळात जन्माला आलेलो आहे, मी स्पर्श करण्यास योग्य नाही.” तेव्हा ते हसून म्हणत, “भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त हे प्रत्येक जातीमध्ये विद्यमान आहेत. आपल्याला वेगवेगळ्या रूपांत तेच भेटत असतात. तेव्हा त्यांना स्पर्श करण्यामध्ये काही दोष आहे असे कोणते धर्मशास्त्र आपल्याला सांगते? पतितांवर तर परमेश्वराची अधिक कृपा असते. उच्च कुळात जन्मलेल्यांना आणि महापंडितांना आपले कुळ आणि आपली विद्या याचा फार मोठा अहंकार असतो. पण जो दुसर्‍याला मान देऊन आणि सहनशीलपणे परमेश्वराचे भजन करतो, त्यालाच परमेश्वर भेटतो.” 
यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही.