महाराष्ट्र, बिहार आणि 'युतीधर्म'!

विवेक मराठी    11-Aug-2022   
Total Views |
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाबरोबरची युती पुन्हा एकदा तोडत लालूंच्या राजदशी घरोबा केला. महाराष्ट्रात सत्तेत येत अग्रेसर झालेला भाजपा बिहारमधील सत्ता गेल्याने एक पाऊल मागे गेला, असेही आपल्याला वाटू शकते. मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र आणि बिहार या दोन्ही सत्तांतरांकडे पाहिल्यास या घटनांचा अन्वयार्थ आपल्याला लावता येईल. कारण एकीकडे महाराष्ट्रात शिवसेनेअंतर्गत उठावामुळे उद्धव ठाकरे सत्तेबाहेर फेकले गेले व राज्याच्या राजकारणाची सूत्रे पूर्णपणे भाजपाच्या हाती आली. दुसरीकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी केवळ 4-5 वर्षांत पुन्हा एकदा कोलांटीउडी मारत भाजपाची साथ सोडली आणि आपल्या विश्वासार्हतेवर अखेरचा निर्णायक धोंडा मारून घेतला. स्वत:ला लालू, मुलायम, मायावती आदी बेभरवशी नेत्यांच्या रांगेत आणून बसवले.

bjp

थोडीशी जरी राजकीय असुरक्षितता वा अस्वस्थता निर्माण झाली की नितीश कुमार बाजू पलटतात, हा त्यांचा 20-25 वर्षांचा इतिहास. ज्या लालूंच्या विरोधात नितीश कुमारांनी आयुष्याची दोन-तीन दशके घालवली, त्याच लालूंच्या पुढच्या पिढीच्या - अर्थात तेजस्वी यादवांच्या मांडीला मांडी लावून पुन्हा एकदा बसणे नितीश यांची विश्वासार्हता संपण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. वास्तविक, नितीश व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समवयस्क. मात्र निवडणुकीच्या राजकारणात नितीश हे मोदींना बर्‍यापैकी सिनिअर. 2014पर्यंत मोदी व नितीश, दोघेही आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री होते. 2013मध्ये भाजपबरोबरची युती तोडल्यानंतर नितीश हे अचानक पुरोगामी, सेक्युलर मंडळींचे चॉकलेटबॉय झाले होते. या मंडळींना असे कुणी ना कुणी लागतेच. मुलायम, लालू, ममता.. अलीकडे चक्क उद्धव ठाकरे हेदेखील अधूनमधून सेक्युलर भारताचे तारणहार वगैरे असायचेच, तसेच नितीशदेखील होते. शिवाय, स्वच्छ प्रतिमा, कुशल प्रशासक म्हणूनही बर्‍यापैकी प्रसिद्धी होतीच. तिसरी आघाडी वगैरे झाल्यास आपल्याला पंतप्रधानपदाची लॉटरी लागेल, अशी आशा बाळगणार्‍यांत नितीशदेखील होतेच. परंतु भारताच्या राजकारणात मोदी नावाच्या फिनॉमिनाचा उदय झाला आणि त्यात सगळ्याच प्रादेशिक नेत्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा उद्ध्वस्त झाल्या. नितीश हे त्यातलेच एक. आणि एकेकाळच्या या तथाकथित भावी पंतप्रधानास आज आपल्या राज्यातील अस्तित्व टिकवण्यासाठीही धडपडावे लागते आहे. हेदेखील महाराष्ट्राशी बर्‍यापैकी साधर्म्य दाखवणारे!
 
 
बिहारमधील सत्तांतर घडले आणि त्याच्या एक महिना आधी महाराष्ट्रात. आता या दोन घटनांचा एकमेकांशी संबंध काय, असा स्वाभाविक प्रश्न आपल्याला पडू शकतो. घराणेशाहीवर आधारित प्रादेशिक पक्ष संपत चालले असून पुढील काळात केवळ भाजपा हाच एकमेव पक्ष असेल, अशा आशयाचे वक्तव्य नड्डा यांनी नुकतेच केले आणि तेही योगायोगाने बिहारमध्येच. त्यानंतर काही दिवसांतच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाबरोबरची युती पुन्हा एकदा तोडत लालूंच्या राजदशी घरोबा केला. महाराष्ट्रात सत्तेत येत अग्रेसर झालेला भाजपा बिहारमधील सत्ता गेल्याने एक पाऊल मागे गेला, असेही आपल्याला वाटू शकते. मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र आणि बिहार या दोन्ही सत्तांतरांकडे पाहिल्यास या घटनांचा अन्वयार्थ आपल्याला लावता येईल. कारण एकीकडे महाराष्ट्रात शिवसेनेअंतर्गत उठावामुळे उद्धव ठाकरे सत्तेबाहेर फेकले गेले व राज्याच्या राजकारणाची सूत्रे पूर्णपणे भाजपाच्या हाती आली. दुसरीकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी केवळ 4-5 वर्षांत पुन्हा एकदा कोलांटीउडी मारत भाजपाची साथ सोडली आणि आपल्या विश्वासार्हतेवर अखेरचा निर्णायक धोंडा मारून घेतला. स्वत:ला लालू, मुलायम, मायावती आदी बेभरवशी नेत्यांच्या रांगेत आणून बसवले. पर्यायाने येत्या काळात बिहारमध्येही स्वबळावर सत्तेत येण्याचा भाजपाचा मार्ग नितीश यांनी मोकळा करून दिला.
 
 
 
गेल्या महिन्यात महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना भाजपाने कमालीची सावध पावले टाकली. भाजपाने शिवसेनेतून फोडाफोडी केली नाही, तर खुद्द शिवसेनेतूनच बंड होत उद्धव ठाकरे यांना आव्हान उभे राहिले. शिवाय मुख्यमंत्रिपदही शिवसेनेच्या शिंदे गटाला बहाल करत भाजपाने या बंडाला एक प्रकारे अधिकृत मान्यताच दिली. यामुळे आज शिवसेना नावाची पक्षसंघटना, तिचे चिन्ह वगैरे गोष्टीदेखील उद्धव ठाकरे व कुटुंबाकडे राहतील की नाही, याची शाश्वती उरलेली नाही. तीन वेगळ्या विचारसरणींच्या पक्षांची अभद्र आघाडी अशा प्रकारे मोडून काढत भाजपाने महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे पुन्हा एकदा आपल्या हाती घेतली. त्यासाठी मुख्यमंत्रिपदालाही तिलांजली देण्यास भाजपाने मागेपुढे पाहिले नाही. वास्तविक 2014मध्ये युती तुटल्यानंतरही भाजपाने शिवसेनेला सत्तेत सामील करत पक्षफुटीपासून वाचवले. 2019 साली भाजपा स्पष्ट बहुमतात सत्तेत येऊ शकत असतानाही सेनेशी युती कायम ठेवली गेली. याची परतफेड म्हणून सेनानेतृत्वाने काय केले, हे आपण पाहिलेच.
 
 
 
भाजपाने बिहारमध्येही असाच युतीधर्म पाळला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढताना मोदी लाटेत जेडीयूचा धुव्वा उडाला होता. तरीही 2019 मध्ये युतीत लढण्यासाठी म्हणून भाजपाने आपल्या पदरच्या जिंकलेल्या वा जिंकू शकणार्‍या जागा जेडीयूला बहाल केल्या. इतकेच काय, तर पुढील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूपेक्षा कितीतरी जागा अधिक निवडून आलेल्या असतानाही मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांनाच देण्यात आले. का? तर दिलेला शब्द पाळण्यासाठी, युतीधर्म पाळण्यासाठी.. आणि आज नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाची साथ सोडत आपले कट्टर प्रतिस्पर्धी लालूंच्या आश्रयास गेले आहेत.
 
 
मागील विधानसभा निवडणुकीत ’ही माझी अखेरची निवडणूक आहे’ असे सांगत, ’अंत भला तो सब भला’ असे भावनिक आवाहन करत नितीश कुमारांनी मते मागितली. मात्र कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात अशा कोलांट्याउड्या मारून नितीश कुमार यांनी एक प्रकारे भाजपाचाच मार्ग मोकळा करून दिला. उद्या बिहारमध्येही महाराष्ट्राप्रमाणे एखादे बंड / उठाव घडल्यास आणि त्याही पुढील काळात भाजपा स्वबळावर सत्तेत आल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यामुळेच लेखाच्या आरंभी उल्लेखलेल्या दोन घटनांचा परस्पर संबंध लक्षात घेतल्यास भारतीय राजकारणाची आगामी वाटचाल पुरेशी स्पष्ट होते.