जयजयाजी गणपति

विवेक मराठी    29-Aug-2022   
Total Views |
प्रत्येक मंगल कार्यारंभी पूजनीय असलेल्या गणेशाला संतवाङ्मयातही अग्रस्थान असल्याचे दिसते. वारकरी संतमंडळींच्या अभंगांत गणेशस्तवन असतेच, त्यातील बहुतेक आपल्या नियमित प्रार्थनांचा भाग बनले आहेत. संतवाङ्मयातील अशाच काही परिचित-अपरिचित गणेशस्तवनांच्या रचना उलगडणारा लेख.

ganpati bappa
श्री गणेशाचे नावच मुळात मंगलमूर्ती असे आहे आणि कोणत्याही कार्याचा आरंभ मंगलाचरणाने होतो. त्यामुळे ज्यांची इष्टदेवता गणेशाशिवाय अन्य आहे, अशा सर्व भक्तांनी आणि संतांनीही गणेशालाच प्रथम वंदन करून नंतर मग आपल्या इष्टदेवतेचे स्तवन केले आहे. तसे पाहता भारतीय संस्कृतीत विद्येची देवता सरस्वती मानली गेली असली, तरी बुद्धी देणारा श्रीगणेश असल्यामुळे या दोघांचेही प्रारंभी सर्वच जण नमन करतात. त्यांच्या जोडीला आपले गुरुदेव आणि आचार्य व मातापिता यांना वंदन करणे शिष्टसंमत मानले जाते. त्यामुळेच गुरुदेवांचे स्तवन करतानाही संत तुकाराम महाराज असे म्हणतात -
 
 
नमिला गणपति माउली शारदा।
आता गुरुराजा दंडवत॥
गुरुराया चरणी मस्तक ठेविला।
आपल्या स्तुतीला द्यावी मती॥
गुरुराया तुज ऐसा नाही सखा।
कृपा करी रंका धरी हाता॥
असे म्हटल्यानंतर संत तुकाराम महाराज असे आळवितात -
तुका म्हणे माता पिता गुरू बंधु।
तूची कृपासिंधु गणपति॥
 
 
यामुळे आपणही लेखाच्या आरंभी हाच उत्तम अभंग घेतला आहे. संत तुकाराम महाराज यांचा आणखी एक लोकप्रिय अभंग आहे -
तो गणराज गणपती। आधी मन घेई हाती॥
मन इंद्रियांचा राजा। त्याची सर्व भावे पूजा॥
मन जीवीचा प्रधान। मन माझे नारायण॥
तुका म्हणे मन चंचल। हाती येईल गुरूचे बळ॥
 
 
मन हे सर्व इंद्रियांत मुख्य असल्यामुळे आणि त्याचबरोबर चंचल असल्यामुळे आधी त्या मनावर नियंत्रण म्हणजे ताबा मिळविणे पारमार्थिक लोकांसाठी अत्यंत आवश्यक असते. हे कार्य गुरुकृपेमुळे होऊ शकते, असे संत तुकाराम महाराज श्रीगणेशाचे स्मरण करून सांगतात.
 
 
 
श्री देविदास विरचित व्यंकटेश स्तोत्रात तर प्रारंभीच गणेशाचे स्मरण केले आहे. ते म्हणतात -
ॐ नमोजी हेरंबा। सकळादि तू प्रारंभा।
आठवुनि तुझी स्वरूप शोभा। वंदन भावे करितसे॥
 
 
अशा प्रकारे गणेशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वारकरी पंथाचा पाया रचणारे संत माउली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पाया रचताना आद्य देवता म्हणून आपल्या इष्टाबरोबर श्रीगणेशाकडेच निर्देश केला आहे, हे नाकारता येणार नाही. माउली म्हणतात -
 
 
ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या।
जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा॥
देवा तूंचि गणेशु। सकलार्थमतिप्रकाशु।
म्हणे निवृत्तिदासु। अवधारि जो जी॥
 
 
अशा रितीने आपल्या गुरुरायांचे स्मरण करतानाही माउली ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीलाच पहिला मान दिलेला आहे. माउलींप्रमाणे संत नामदेव महाराजांनीही आपल्या अभंगातून गणेशाचीच आळवणी केली आहे. ते म्हणतात -
 
लंबोदरा तुज शोभे शुंडादंड।
करतसे खंड दुश्चिन्हांचा॥
 
 
तसा आणखी एक तुकाराम महाराजांचा मानला गेलेला अभंग लोकप्रिय असला, तरी त्या अभंगाचा कर्ता तुकाराम महाराज नाही असे समजले जाते, तो अभंग असा आहे -
 
ॐकार प्रधान रूप गणेशाचे।
ते तिन्ही देवांचे जन्मस्थान॥
 
ॐकारस्वरूप असलेला गणपती सर्वांनीच पूज्य मानला आहे. त्यामुळेच रामभक्त असलेले समर्थ रामदासदेखील श्रीगणेशाचेच स्मरण करतात -
 
ॐ नमो जी गणनायका। सर्वसिद्धिफळदायका।
अज्ञान भ्रांतिच्छेदका। बोधरूपा॥
तसेच ते आपल्या मनाच्या श्लोकातही सुरुवातीचा श्लोक असा नमूद करतात -
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।
नमू शारदा मूळ चत्वार वाचा।
गमू पंथ आनंत या राघवाचा॥
 
 
काही लोकप्रिय झालेल्या गणेशवंदनाही गणपतीसमोर नित्य म्हटल्या जातात. बर्‍याच ठिकाणी आरतीला आरंभ करताना खालील दोन श्लोक नित्यच म्हटले जातात -
 
 
प्रारंभी विनंती करू गणपति विद्या दया सागरा।
अज्ञानत्व हरोनि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा॥
चिंता क्लेश दारिद्य्र दु:ख अवघे देशांतरा पाठवि।
हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवि॥
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे।
माथा शेंदूर झरे वरी बरे दुर्वांकुरांचे तुरे।
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे।
गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे॥
 
 
त्याचबरोबर बर्‍याचशा घरांत देवाजवळ दिवा लावताना सायंकाळी रामरक्षा आणि दिवाकररचित खालील गणपतीस्तोत्र पूर्वी म्हटले जात असे, त्यातील महत्त्वाचा भाग असा आहे -
 
 
जयजयाजी गणपति, मज द्यावी विपुल मति।
करावया तुमची स्तुती, स्फूर्ति द्यावी मज अपार॥
गजवदना श्री लंबोदरा, सिद्धिविनायका भालचंद्रा।
हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधु॥
भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना।
परशुहस्ता सिंदूरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती॥
नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता।
नमन माझे गिरिजासुता, तुज स्वामिया नमन माझे॥
 
 
संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग लोकांना खूपच आवडतो -
 
 
धरोनिया परशु करी। भक्तजनांची विघ्ने वारी॥
ऐसा गजानन महाराजा। त्याच चरणी लाहो माझा॥
 
 
आपण जर प्राकृत भाषेतील कोणताही ग्रंथ उघडून पाहिला, तर त्या ओवीबद्ध रचनेत सर्वप्रथम गणेशालाच वंदन केलेले आपल्याला आढळते, इतका श्रीगणेशाचा महिमा थोर आहे.