ही द्वेषबुद्धी ठेचायलाच हवी

विवेक मराठी    29-Sep-2022   
Total Views |
सरस्वती ही विद्येची अधिष्ठात्री देवता आहे, या विचाराला हिंदू समाजात मान्यता आहे. म्हणूनच तिची उपासना आणि सन्मान या देशात वेदकालापासून होत आला आहे. अशा देवतेविषयी - तेही शारदीय नवरात्रोत्सव देशात चालू असताना, अनुदार उद्गार काढून समाजात अस्वस्थता निर्माण करायची, हा त्यामागचा डाव आहे.
 
NCP
 
राजकीय क्षेत्रातल्या काही महाभागांना सतत चर्चेत राहण्यासाठी, मीडियाचा प्रकाशझोत स्वत:वर घेण्यासाठी बाष्कळ, वाह्यात बडबड करण्याचं व्यसन असतं. केस पांढरे झाले म्हणून प्रगल्भता, शहाणपण आलेलं असतं असं नाही. काहींचा तर जन्मजात असलेला खोडसाळपणा वाढत्या वयाबरोबर अधिकच वाढतो. त्यामुळेच, ‘पासिंग कमेंट’सारखं सहज जाताजाता बोललं गेलं आहे असं भासवत, आपल्या वक्तव्यातून समाजातला जातीय दुरावा कसा वाढेल याचाही ते विचार करत असतात. उपद्रवमूल्य असणं हाच अशा व्यक्तींचा अ‍ॅसेट असतो.
 
 
 
सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या सोहळ्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी “ज्या सरस्वतीला आपण पाहिलं नाही, त्या सरस्वतीची प्रतिमा शाळांमध्ये लावायची कशासाठी?” असा प्रश्न उपस्थित केला. “ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं, त्या फुले-शाहू-आंबेडकर यांच्या तसबिरी लावाव्यात” असं सांगत, “जिने समाजातल्या फक्त 3 टक्के लोकांना शिकवून शहाणं केलं..” अशीही जोड त्यांनी दिली. ही जोड म्हणजे हेतुपुरस्सर केलेलं विधान होतं. भुजबळांच्या भाषणातील ही दोन्ही विधानं अत्यंत आक्षेपार्ह आहेत.
 
 
 
अशी जातींमध्ये फूट पाडणारी वक्तव्यं केली, हिंदू धर्मातील देवदेवतांविषयक विचारांची टिंगलटवाळी केली की आपण पुरोगामी विचारवंत समजले जातो, असा एक भ्रम या तथाकथित नेत्यांमध्ये असतो. त्यांच्या वक्तव्याला त्यांच्या ज्येष्ठ नेत्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आशीर्वादही असतो. त्यामुळे यांच्या वाह्यातपणाला बळ येतं.
 
 
सरस्वती ही विद्येची अधिष्ठात्री देवता आहे, या विचाराला हिंदू समाजात मान्यता आहे. म्हणूनच तिची उपासना आणि सन्मान या देशात वेदकालापासून होत आला आहे. अशा देवतेविषयी - तेही शारदीय नवरात्रोत्सव देशात चालू असताना, अनुदार उद्गार काढून समाजात अस्वस्थता निर्माण करायची, हा त्यामागचा डाव आहे.
 
 
ज्या संस्थेच्या व्यासपीठावरून भुजबळ बोलत होते, त्या संस्थेची स्थापना महात्मा फुले यांनी केली. महात्मा फुले यांच्याबरोबर स्त्री शिक्षणासाठी आपलं आयुष्य दिलेल्या सावित्रीबाई फुले यांनी आपल्या ‘काव्य फुले’ या काव्यसंग्रहात, ‘शाळा म्हणजे सरस्वतीचा दरबार आहे’ अशा शब्दांत विद्यादेवतेचा सन्मान केला आहे. विद्याभ्यास करून सरस्वती देवीला प्रसन्न करून घेऊ, असं त्या मुलींना सांगतात. देवी सरस्वती तर सावित्रीबाईंनीही पाहिली नव्हती. पण त्यांची या समाजधारणेवर श्रद्धा होती. नुसती श्रद्धाच नव्हती, तर ती अनुसरण्याची, त्या माध्यमातून सरस्वती देवीविषयी आदरभाव व्यक्त करण्याची मानसिकता होती.
  
 
‘जी देवी पाहिली नाही...’ असं म्हणतानाच, तिने समाजातल्या तीन टक्क्यांना शिकवले’ असंही भुजबळ म्हणतात. हा रोख ब्राह्मण समाजाकडे आणि उच्चवर्णीयांकडे आहे. अशी बुद्धिभेद करणारी विधानं समाजातल्या जातींमध्ये असंतोष, अविश्वास निर्माण करतात याची भुजबळांना जाणीव आहे.. खरं तर तोच त्यांचा हेतू आहे. एकीकडे ‘सरस्वती कुणी पाहिली?’ असं म्हणत तिच्या अस्तित्वाभोवती प्रश्नचिन्ह उभं करायचं आणि त्याच वेळी, ‘तिने समाजातल्या फक्त उच्चवर्णीयांना शिकवलं’ हे विधानही छातीठोकपणे करायचं, समाजातल्या गटागटांत, जातीजातींमध्ये तेढ/तणाव निर्माण करायचा, ही भुजबळ ज्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या पक्षाची खासियतच आहे.
 
 
 
आणखी एक हेतू या वक्तव्यामागे आहे, तो म्हणजे मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा.. तेही जेव्हा देशभरात पीएफआय या राष्ट्रविघातक कारवायात गुंतलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक होते आहे अशा वेळी. या देशभरातल्या छापेसत्रांमुळे आणि आता या संघटनेवर पुढील 5 वर्षांसाठी बंदी घातली गेल्यामुळे, या संघटनेची कृष्णकृत्यं समाजासमोर येत असताना भुजबळांनी बिनबुडाची विधानं करत पीएफआयच्या बातम्यांवरून सर्वसामान्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मांध मुस्लीम नेत्यांच्या अप्रत्यक्ष लांगूलचालनाचाच हा प्रकार आहे.
 
 
 
या कार्यक्रमाला, विशेषत: भुजबळांच्या भाषणाला भरपूर प्रसिद्धी देऊन प्रसारमाध्यमांनी आपली दोन दिवसांची टीआरपीची भूक भागवली. त्यातून ही बातमी सर्वदूर पसरली. त्यामुळे भुजबळांना समाजमाध्यमांतून टीकेला सामोरं जावं लागलं, तसंच सरस्वतीची प्रतिमा हटवली जाणार नाही, हे विद्यमान सरकारने निक्षून सांगितलं, तेव्हा जागृत हिंदुशक्तीचा तेजोभंग यापुढे अशा वक्तव्याने करता येेणार नाही हे त्यांना समजलं. एकूणच प्रकरण अंगाशी येण्याची चिन्हं दिसताच पत्रकार परिषद घेत, साळसूदपणाचा आव आणत आपल्या बोलण्याचं विरोधकांनी कसं राजकीय भांडवल केलं असं म्हणत पुन्हा त्या विधानांचा पुनरुच्चारही केला.
 
 
 
समाजात जातीच्या मुद्द्यावरून फूट पाडणं हा राष्ट्रवादीचा एककलमी कार्यक्रम आहे. तो कृतीत आणण्यासाठी संस्थापकांपासून सर्व जण कायम प्रयत्नशील असतात. एकीकडे मुस्लिमांचं तुष्टीकरण आणि दुसरीकडे स्वधर्मात फूट पाडण्याचे उद्योग करत, त्यासाठी द्वेषमूलक विधानं करत आपली स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची, ही यांची कार्यपद्धती. एकवटत चाललेल्या हिंदू समाजामुळे आलेलं बिथरलेपण त्यांच्या अशा वक्तव्यात प्रतिबिंबित होतं, म्हणूनच त्याची गांभीर्याने दखल घेऊन सडेतोड प्रतिवाद करायलाच हवा. ही द्वेषबुद्धी वेळच्या वेळी, जागच्या जागी ठेचायलाच हवी.