सावध करणारे युद्ध

विवेक मराठी    12-Oct-2023   
Total Views |

vivek
टोळीयुद्धाची मानसिकता असलेला धोकादायक शेजार असण्याची इस्रायलला सवय आहे. त्यातूनच सुरक्षासज्जता आणि कणखर नेतृत्वाचे मोल त्या देशाला, तिथल्या देशवासीयांना उमगले आहे. आपणही ते जाणायला हवे. म्हणूनच, दहशतवाद्यांचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा आपला शेजारी पाकिस्तान जेव्हा हमासची पाठराखण करतो, तेव्हा आपण सावध व्हायला हवे. कफल्लक असला, तरी पाकिस्तानचे उपद्रवमूल्य दुर्लक्षिता येण्याजोगे नाही.

योम किप्पूरच्या युद्धाला पन्नास वर्षे पूर्ण होत असतानाच, 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्री गाझा पट्टीवर हुकमत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने दक्षिण इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात सामान्य नागरिकांवर केलेल्या अमानुष अत्याचारांचा, त्यांच्या झालेल्या दुर्दैवी हत्यांचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून भारतानेही या संकटकाळात आपण इस्रायलच्या पाठीशी आहोत असे जाहीर केले आहे. जगाच्या इतिहासातला सर्वात भीषण हल्ला म्हणून ज्याची नोंद आहे, त्या 9/11च्या ट्विन टॉवर हल्ल्याइतका हा हल्ला गंभीर आहे.

या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम आशियात संघर्षाचा भडका उडाला आहे. ‘ही केवळ दहशतवादाविरोधातली कारवाई नाही, तर हे युद्ध आहे आणि ते त्याच पद्धतीने लढले जाईल’ असे नेतान्याहू यांनी जाहीरपणे म्हटले आहे आणि इस्रायलचे नेतृत्व ते प्रत्यक्षात आणेल अशी जगात सर्वांनाच खात्री आहे. इस्रायलच्या हमाससारख्या इस्लामी दहशतवादी संघटनेबरोबर सुरू झालेल्या या युद्धाची झळ जगाला लागणार आहे. ती किती बसेल याचा आत्ताच अंदाज बांधणे अवघड आहे. तरीही या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा दहशतवादाची भीषणता आणि त्यापासून संपूर्ण जगाला असलेला धोका अधोरेखित झाला आहे.
 
अंगभूत हुशारी, जिद्द, उद्दिष्टपूर्तीसाठी कष्ट घेण्याची तयारी यांच्या बळावर, स्वधर्मावर अपरंपार श्रद्धा असलेल्या ज्यूंनी इस्रायलसारखा अल्पावधीत जगात स्वत:चे स्थान निर्माण करणारा विकसित देश निर्माण केला. ज्यूंचा इतिहास संघर्षाने भरलेला, कडव्या झुंजीचा इतिहास आहे. कडवी झुंज देणारे इस्रायली सैन्य आणि मोसाद ही जगात अव्वल दर्जाची असलेली गुप्तचर संघटना ही इस्रायलची बलस्थाने आहेत. त्यांना चकवा देत, इस्रायलाची अभेद्य सीमा भेदत 5 हजार रॉकेट्सचा मारा करत हमासने हा आकांत घडवून आणला. शत्रूकडून डागल्या जाणार्‍या रॉकेटचा हवेतल्या हवेत वेध घेऊन नष्ट करणारी आयर्न डोम ही यंत्रणा इस्रायलकडे असल्याने आणि तिचा अनेकदा अनुभव घेतल्याने, हमासने या वेळी रॉकेट हल्ल्यांच्या बरोबरीने समुद्री मार्गाने आणि रस्त्याच्या मार्गाने आपले दहशतवादी इस्रायलच्या हद्दीत घुसवले. इस्रायलवर झालेला हा सुनियोजित हल्ला होता आणि त्याची तयारी बराच काळ चालू होती, हे समोर येत असलेल्या बातम्यांमधून लक्षात येते. अशा हल्ल्याची आणि अशा प्रकारच्या घुसखोरीची मोसादसारख्या जगप्रसिद्ध गुप्तचर संघटनेला गंधवार्ताही लागू नये याबद्दल जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
हमास ही इस्लामिक ब्रदरहूड या संघटनेतून 1987 साली जन्माला आलेली दहशतवादी संघटना आहे. तिला इस्रायलचे अस्तित्वच मान्य नाही. इस्रायलचा विनाश करून या संपूर्ण भूभागावर इस्लामचे राज्य स्थापित करणे हे हमासच्या ध्येयधोरणातच आहे. आपण पॅलेस्टाइनसाठी लढतो आहोत असा जागतिक स्तरावर आभास निर्माण करत असली, तरी प्रत्यक्षात हमासला 30 टक्के पॅलेस्टिनींचा पाठिंबा आहे. अशा हमाससाठी इस्रायलचे संयुक्त अरब अमिरात, जॉर्डन, कतार, इजिप्त आणि आता सौदी अरेबिया यांच्याबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित होणे हे अडचणीचे होते. सौदी अरेबिया-इस्रायल यांच्यादरम्यान शांतता कराराची बोलणी शेवटच्या टप्प्यापर्यंत आली होती. जागतिक स्तरावर इस्रायलसंदर्भात घडत असलेल्या या महत्त्वपूर्ण घडामोडी हमासइतक्याच इराणसाठीही अडचणीच्या होत्या. एक दहशतवादी संघटना जेव्हा इस्रायलसारख्या बलाढ्य राष्ट्रावर हल्ला करते, तेव्हा ते फक्त त्या संघटनेचे बळ असू शकत नाही. तिच्याबरोबर इराणसारखे समविचारी देश असू शकतात. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे इराणने समर्थन केले आहे. इतकेच नव्हे, तर ‘इस्रायलचा नाश होवो’ असे इराणच्या संसदेत उघडपणे म्हटले गेले आहे. इराणसारखा देश आणि हिजबोलासारखी हमासपेक्षा कैक पटींनी बलवान असलेली मूलतत्त्ववादी - धमार्र्ंध दहशतवादी संघटना हे हमासचे पाठीराखे आहेत, हे लक्षात घेतले की या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात येते आणि हा धोका फक्त इस्रायलपुरता मर्यादित नाही, याचीही जाणीव होते.
 
टोळीयुद्धाची मानसिकता असलेला धोकादायक शेजार असण्याची इस्रायलला सवय आहे. त्यातूनच सुरक्षासज्जता आणि कणखर नेतृत्वाचे मोल त्या देशाला, तिथल्या देशवासीयांना उमगले आहे. आपणही ते जाणायला हवे. म्हणूनच, दहशतवाद्यांचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा आपला शेजारी पाकिस्तान जेव्हा हमासची पाठराखण करतो, तेव्हा आपण सावध व्हायला हवे. कफल्लक असला, तरी पाकिस्तानचे उपद्रवमूल्य दुर्लक्षिता येण्याजोगे नाही.
 
हा हल्ला देशाच्या सरकारवर झालेला हल्ला नसून तो देशावर झालेला हल्ला आहे, हे लक्षात घेऊन इस्रायलमधल्या विरोधी पक्षनेत्यांनी ‘आपण एकत्र मुकाबला करू, त्यासाठी आपत्कालीन सरकार स्थापन करू’ असे सांगत नेतान्याहूंसमोर सहकार्याचा हात पुढे केला. ही त्या देशाची परंपरा आहे. आणि त्याच वेळी भारतात काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने, पॅलेस्टिनींच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काला पाठिंबा देण्याचा ठराव संमत करून, या युद्धात आपण दहशतवादी संघटनेबरोबर असल्याचे सांगितले आहे. प्रसंग कोणताही असो, मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात कुचराई न करण्याच्या या काँग्रेसी वृत्तीचा निषेध करावा तितका कमीच. दहशतवाद्यांबरोबर राहण्याची ही त्यांची जुनीच परंपरा आहे. हमासचे हे दहशतवादी पॅलेस्टिनींच्या हक्कांसाठी लढत असल्याचे भासवत निरपराध नागरिकांच्या हत्या करतात, महिलांवर अत्याचार करतात हे एकतर काँग्रेसच्या गावीही नसावे वा त्यांना त्यांचे सोयरसुतक नसावे. मुस्लीम अलिगढ विद्यापीठातील विद्यार्थीही या युद्धाचे निमित्त करून पॅलेस्टिनींच्या म्हणजेच हमासच्या समर्थनार्थ रॅली काढून ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देतात. इस्रायलवर आलेल्या संकटाच्या निमित्ताने भारतातल्या या देशद्रोही मानसिकतेचे झालेले दर्शन हे डोळे उघडणारे आहे. वाळवंटात स्वर्ग निर्माण करणारी संस्कृती आणि त्या वाळवंटाचे स्मशान करू पाहणारी संस्कृती या दोन संस्कृतींमधला संघर्ष आहे. या दोहोंपैकी कोणाच्या बाजूने आपण उभे राहतो त्यावरून आपली संस्कृती समजते. विद्यमान भारत सरकारने झुंजार, देशनिष्ठ इस्रायलची केलेली पाठराखण आणि काँग्रेसी जनांनी केलेला ठराव, दोन्ही आपल्या समोर आहे. सार्वत्रिक निवडणुका येत आहेत. सावध रहायला हवे.