द व्हॅक्सिन वॉर : भारताच्या आत्मनिर्भरतेची यशोगाथा

विवेक मराठी    06-Oct-2023   
Total Views |
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. भारताच्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन या लसीची यशोगाथा या सिनेमात मांडण्यात आलेली आहे. कोविडच्या कालखंडात भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या निर्मिती प्रक्रियेवर हा सिनेमा भाष्य करतोच. पण या सगळ्याबरोबरच भारतीय स्त्रीवाद, शास्त्रज्ञांची आणि त्यांच्या कुटुंबियांची समर्पित वृत्ती याकडे हा चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष वेधतो. भारत आपल्या सक्षमतेच्या बळावर किती मोठी, वैश्विकदृष्टया महत्त्वाची मजल मारू शकतो हे कोव्हॅक्सिनच्या या प्रवासाने दाखवून दिलं. म्हणूनच सिनेमा संपताना डॉ. बलराम भार्गव यांच्याप्रमाणेच आपल्याही तोंडून अभिमानाने शब्द बाहेर पडतात, ‘इंडिया कॅन डू इट’.

vivek
 
वर्ष 2020... या वर्षाच्या प्रारंभालाच कोविड नावाच्या एका महासंकटाने जगाच्या वेशीवर पाऊल ठेवलं आणि या महामारीने वेढलेल्या अन्य देशांप्रमाणेच भारताचाही सुरू झाला एक महाप्रचंड संघर्ष. कोविडचा भूमिती श्रेणीने होत असलेला वाढता प्रसार रोखणं आणि लोकांचे जीव वाचवणं यासाठी जसा हा संघर्ष होता, तसाच आणखी एक समांतर संघर्ष चालू होता तो अपुर्‍या वैद्यकीय सुविधांशी आणि कोविडला थोपवू शकणार्‍या लशीच्या उपलब्धतेशी. या आव्हानांना तोंड देत असतानाच भारताने अत्यंत आत्मविश्वासाने पूर्णपणे भारतीय बनावटीची लस तयार करण्याचा निर्णय घेतला. शास्त्रज्ञांवर, भारतीय संशोधन संस्थांवर दाखवलेला हा विश्वास या सार्‍यांनीच सार्थ ठरवला आणि त्यातून तयार झाली ती पूर्णपणे भारतीय बनावटीची लस-कोव्हॅक्सिन. ‘ओन्ली सायन्स कॅन विन धिस वॉर’ म्हणजे कोविडच्या या महायुद्धावर जर कोणी मात करू शकत असेल; तर ते आहे विज्ञान, असं प्रतिपादन भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यांचा हा विश्वास किती सार्थ होता याचा अनुभव आपण देशवासियांनी लसीकरणातून व त्याद्वारे कोविडवर केलेली मात यातून घेतला आहेच. या कोव्हॅक्सिनची निर्मितीगाथा सांगणारा सिनेमा म्हणजे पल्लवी जोशी निर्मित व विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरचे माजी महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांच्या ‘गोईंग व्हायरल’ या आत्मकथनावर हा सिनेमा आधारलेला आहे. ‘इंडिया कॅन डू इट’ या मध्यवर्ती संकल्पनेभोवती हा सिनेमा फिरतो.
 
 
कोव्हॅक्सिनच्या संशोधन आणि निर्मिती प्रक्रियेत आयसीएमआर आणि एनआयव्ही अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरोलॉजी यांची, तेथील शास्त्रज्ञांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. कोविड संसर्गासारखी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होते तेव्हा शास्त्रज्ञांसमोरील आव्हानं अधिक प्रबळ होतात. या लसनिर्मितीच्या प्रक्रियेत स्त्री वैज्ञानिकांचा सहभाग लक्षणीय म्हणजे जवळजवळ 70 टक्के इतका होता. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत या संशोधिकांनी आपली बुद्धिमत्ता, वेळ, कौटुंबिक जबाबदार्‍या हे सारं पणाला लावून संशोधनाचं हे आव्हान नुसतं पेललं नव्हे, तर ते यशस्वी करून दाखवलं. लस तयार करण्याचा निर्णय, संशोधन, प्राण्यांवरील व अंतिम मानवी चाचणीनंतर मिळालेली परवानगी, भारत बायोटेकबरोबर झालेला करार ते लसीचा थेट वापर हे सर्वच टप्पे या सिनेमात दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्या काळात लॉकडाऊन करण्यात आलं होतं आणि संसर्गापासून बचावण्यासाठी मानवाला सॅनिटेशन, मास्कचा वापर, पीपीई किटचा वापर अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागत होती. या आव्हानात्मक स्थितीत झालेली कोव्हॅक्सिनची निर्मिती हा भारताच्या वैद्यकीय आत्मनिर्भरतेतील मैलाचा दगड आहे. विवेक अग्निहोत्री यांचे ‘बुद्धा इन ट्रॅफिक जॅम’,‘द ताश्कंद फाईल’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ हे सिनेमे गाजले होते. हे दोन्ही सिनेमे सामाजिक प्रश्न मांडणारे होते. व्हॅक्सिन वॉर सिनेमा मात्र यापेक्षा वेगळा ठरतो. एका प्रचंड मोठ्या आरोग्यविषयक प्रश्नाला लसनिर्मितीतून भारताने कसं उत्तर दिलं याची प्रभावी मांडणी हा सिनेमा करतो. नाना पाटेकर यांनी यात डॉ. बलराम भार्गव यांची भूमिका केली आहे. त्यांच्या बरोबरीने अनुपम खेर(कॅबिनेट सचिव), पल्लवी जोशी(डॉ. प्रिया अब्राहम), गिरीजा ओक-गोडबोले(डॉ. निवेदिता गुप्ता), निवेदिता भट्टाचार्य(डॉ. प्रज्ञा यादव), सप्तमी गौडा(डॉ. श्रीलक्ष्मी), मोहन कपूर(डॉ. रमण गंगाखेडकर), रायमा सेन(पत्रकार) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
 
 
इंडियन वुमन कॅन डू इट
 
 
इंडिया कॅन डू इट हे जसं या चित्रपटाचं सूत्र आहे, तसंच आणखी एक महत्त्वाचं सूत्र या सिनेमाने ठाशीवपणे मांडलंय, ते म्हणजे, ‘इंडियन वुमन कॅन डू इट’. स्त्री म्हणजे समाजाचा अन्यायग्रस्त घटक, भोगवस्तू आणि स्त्रीवाद म्हणजे बंड, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात केलेला एल्गार, बंधन मुक्तता असंच चित्र आपल्यासमोर उभं केलं जातं. मनोरंजन माध्यमांनीही याच ढोबळ मांडणीचा कायम पुरस्कार केला. बाईचं आयुष्य म्हणजे एकतर सोशिकता, तडजोड किंवा थेट बंडखोरी अशी दोन टोकं गाठली जातात. या पार्श्वभूमीवर व्हॅक्सिन वॉर सिनेमा स्त्रीजीवनाचा एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून विचार करायला भाग पाडतो. कोव्हॅक्सिनच्या संशोधन प्रक्रियेतील शास्त्रज्ञांच्या चमूत 70 टक्के महिला शास्त्रज्ञांचा सहभाग होता. डॉ. निवेदिता, डॉ. प्रज्ञा, डॉ. प्रिया आणि उर्वरित सर्व चमूची कामाप्रती समर्पितता बघून आपण अक्षरशः थक्क होतो. डॉ. भार्गवांच्या एका फोनवर रात्री-अपरात्री घरच्या सगळ्या जबाबदार्‍या पतीवर सोपवून तातडीने कामासाठी धावत येणारी, महत्त्वाच्या बैठकांमध्ये आयसीएमआरची बाजू ठामपणे मांडणारी डॉ. निवेदिता, कोविड काळात लसीच्या संशोधनासाठी मुलाचं लग्न लांबणीवर टाकणारी डॉ. प्रिया अब्राहम, अखंड तीन दिवस तीन रात्री संशोधन करताना डोळ्याची पापणीही न मिटणारी डॉ. श्रीलक्ष्मी, घरच्या जबाबदार्‍या पूर्ण करत संशोधनाचं काम करणारी डॉ. प्रज्ञा, आईच्या दुधावर अवलंबून असणार्‍या बाळाला घरी ठेवता येणार नाही म्हणून ड्यूटीवर त्याला बरोबर घेऊन येणारी एक महिला या सगळ्याजणी स्त्रीशक्तीचं यथार्थ दर्शन घडवतात. यांच्यापैकी कोणीही आपल्या घरगुती जबाबदार्‍यांचा बाऊ करत नाही किंवा त्यांच्यामुळे आपण किती शोषित आहोत असे उसासे टाकत नाही. घरच्या जबाबदार्‍या आपल्याला पूर्ण करता येत नाहीत याचा गिल्ट त्यांना थोडाफार त्रास देत असला तरी त्याचा यत्किंचितही परिणाम त्यांच्या कामावर, त्याच्या गुणवत्तेवर होत नाही. या स्त्रियांना पाठबळ देण्याची त्यांच्या कुटुंबाची तयारी देखील तितकीच कौतुकास्पद आहे. मुळातच भारतीय स्त्रीवादाची संकल्पना ही व्यक्तिकेंद्रित किंवा इंडिव्हिज्युअलिझमकडे झुकणारी नाही तर ती कुटुंबव्यवस्थेभोवती फिरणारी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारच्या स्त्रीवादाची मांडणी हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे.
 
 
vivek
 
ब्रेकिंग इंडिया ब्रिगेडचा पर्दाफाश
 
सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की, देशातील एक व्यवस्था आपल्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्रोन्नतीत मोलाची भर घालत असते, आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्राचं नाव उंचावलं जावं यासाठी, लोककल्याणासाठी योगदान देत असते. या सिनेमातील लससंशोधन व निर्मिती करणारी टीमही अशीच. दुसरीकडे देशात आणखी एक समांतर व्यवस्था आपल्या मोडस ऑपरेंडीद्वारे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन करण्यासाठी सतत कार्यरत असते आणि याचे धागेदोरे अनेकदा आंतरराष्ट्रीय राजकारणाशी जोडलेले असतात. रायमाने रंगवलेलं रोहिणी धुलियाचं पात्र अशा व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करतं. या सिनेमात जेवढं कौतुक शास्त्रज्ञांची भूमिका करणार्‍या अभिनेत्रींचं होतंय तेवढंच कौतुक रोहिणीची भूमिका करणार्‍या रायमा सेनचंही व्हायला हवं इतकं प्रभावी काम तिने केलं आहे. द डेली वायरमध्ये कार्यरत रोहिणी धुलिया आपल्या वेबसाईटसाठी आंतरराष्ट्रीय संपर्क वापरून फंडिंग आणतेय व त्या बदल्यात तिच्यावर कोविड काळात भारताची, इथे तयार होऊ घातलेल्या भारतीय बनावटीच्या लसीची प्रतिमा मलीन करण्याची जबाबदारी आहे. जेणेकरून भारतात परदेशी बनावटीच्या लसीसाठी बाजारपेठ खुली होईल. त्यासाठी भारतीय लसीच्या विरोधात वेगवेगळे लेख लिहून, चर्चासत्र घडवून आणून, व्हिडिओज तयार करून, प्रसारमाध्यमाद्वारे तथाकथित फॅक्ट फाईंडिंग रिपोर्ट प्रसिद्ध करून आपल्याला हवा तो ‘नॅरेटिव्ह’ ती समाजापर्यंत पोहोचवण्याची, भारतीय लसीला ‘सबस्टँडर्ड’ ठरवण्याची आपली जबाबदारी पूर्ण करण्यात ती कुठेही कमी पडत नाही. इतकंच नव्हे तर भारतात ज्या ठिकाणी सर्वाधिक मृत्यू झाले त्या ठिकाणचे एक्सक्लुजिव फोटोज परदेशस्थ माध्यमांना काही शे डॉलर्सना विकताना तिच्या मनात यत्किंचितही अपराध भाव नाही. टूलकिट पद्धतीचा वापर करून हे काम कशा पद्धतीने केलं जातं यावर आजवर अनेक ठिकाणी लिहून आलं आहेच. अशीच टूलकिट गँगही रोहिणी बाळगून आहे. कोविड काळात अशा अनेक गँग्सनी समाजमाध्यमावर भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन करण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. या समांतरव्यवस्थेचा मुखवटा उतरवल्याबद्दल विवेक अग्निहोत्री यांचं कौतुक करायला हवं.
 

vivek 
 
प्रभावी संवाद आणि परिणामकारक प्रसंग
 
या चित्रपटाची सबळ बाजू म्हणजे परिणामकारक प्रसंग आणि प्रभावी संवाद. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. यात मोलाचा वाटा आहे तो अर्थपूर्ण संवादांचा. इंडिया कॅन डू इट सारखे नाना पाटेकरांच्या म्हणजे डॉ. बलराम भार्गव यांच्या तोंडचे संवाद...‘भारत को पहला धोखा अपनों से है; हजारो वर्षों से यही हो रहा है’ किंवा ‘पहली बार लग रहा है कि हमारे पिछे कोई खडा है’ हे निवेदिताचे संवाद, ‘हमारे राजा कि जान व्हॅक्सिन में अटकी है’, अशा सूचक संवादातून रोहिणीच्या मनातला समोर येणारा विखार, प्रियाचे आणि बलराम भार्गव यांचे सतत उडणारे खटके, प्रज्ञाचा पतीसोबतचा हलका रोमान्स हे सारं संवादांच्या आणि त्याच्या प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून वेगळ्याच उंचीवर जातं. आपल्या मालकिणीला म्हणजे रोहिणीला धीटपणे जाब विचारणारी सुहिता थत्तेंची मावशीही विशेष लक्षात राहाते. कोविडकाळात बुद्धिवंतांचं गलिच्छ राजकारण पाहून चीड येणार्‍या सर्वसामान्य जनतेची ती प्रतिनिधी वाटते. रोहिणीचं एकंदर राजकारण पाहून तिचा संपादक तिला जे ऐकवतो तेही विशेष उल्लेखनीय आहे. तो म्हणतो की,‘तुझं भांडणं सरकारशी आहे, तुझा या सरकावर राग आहे. मी ही या सरकारच्या विरोधी आहे पण लसीच्या संशोधनाचं काम हे सरकारसाठी नव्हे भारतासाठी सुरू आहे.’
 
 
त्वमेव प्रत्यक्षं कर्तासि!
त्वमेव प्रत्यक्षं धर्तासि!
 

vivek

- डॉ. अनघा संदीप पारखी

नुकतीच स्वयं Talks प्रायोजित Decoding अथर्वशीर्ष ही धनंजय गोखलेंची सिरीज ऐकत होते. अथर्वशीर्ष म्हणजे तुमच्यातील क्षमतांची तुम्हीच तुम्हाला करून दिलेली जाणीव. त्या क्षमता कोणत्या हे समजून घेत असतानाच The Vaccine War हा सिनेमा पाहिला..
India Can Do It!
आपल्या क्षमता जर पूर्णपणे ओळखल्या आणि त्यांचा शंभर टक्के कस लावला तर आपण हे करू शकतो‘च’ असा आपल्याला विश्वास देणारा हा चित्रपट. भगवद्गीता आपल्याला कर्मयोगाची शिकवण देते. हाच कर्मयोग आपण या सिनेमात पाहतो.
कुरुक्षेत्रावर युद्ध झाले...पांडवांचे कौरवांविरुद्ध...धर्माचे अधर्माविरुद्ध... सकारात्मकतेचे नकारात्मकतेविरुद्ध
कोविडकाळात तसेच युद्ध भारतीय वैज्ञानिकांसमोर होते
 
India Can Do It विरुद्ध India Can't Do It....
सिनेमात डॉ. भार्गव म्हणतात,‘तुम्ही बाहेरच्या देशात गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला भारतीय म्हणून ओळखतात. तिथे कोणी तुम्हाला तुमची जात, धर्म यावरून नाही ओळखत....’ याची यथार्थता आम्ही परदेशी वास्तव्यात अनुभवतो आहोत.
 
माणसाच्या मनाचे कसे असते की कित्येकदा सत्य समोर असूनही एखादी असत्य गोष्ट वारंवार त्याच्यासमोर आणली जाते दाखवली जाते तेव्हा त्याला तेच सत्य वाटायला लागते.
 
आंतरराष्ट्रीय आौषध उद्योगाने हेच केले. टूल किटसच्या माध्यमातून योजनाबद्ध पद्धतीने भारतीयांमध्ये आपल्याच वॅक्सिनबद्दल साशंकता निर्माण केली. ही फार्मा इंडस्ट्री भारतासारख्या संवेदनशील बाजारपेठांमध्ये किती आणि कशा प्रकारे पैसा ओतते याचे चित्रणही या चित्रपटात पहायला मिळते.
 
वॅक्सिन निर्मितीच्या प्रवासात आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट आपण या चित्रपटात पाहतो आणि ती म्हणजे या प्रोसेसमधील स्त्रीचे योगदान. स्त्रीला शक्तीचे एक रूप मानले जाते. या चित्रपटातील स्त्री वैज्ञानिक आहे, एक आई आहे, एक पत्नी आहे, एक गृहिणी आहे. अनेक संसारिक अडचणींचा सामना करत ती आपले कर्तव्य बजावते आणि अत्यंत महत्त्वाचे योगदान देते. प्रसंगी तिचे मानसिक स्वास्थ्य ढासळण्याची देखील वेळ येते पण तरीही ती न डगमगता उभी राहते. डॉ. प्रिया अब्राहिम, डॉ. निवेदिता गुप्ता, डॉ. प्रग्या, डॉ. एना डोग्रा-गुप्ता आणि इतरही अज्ञात स्त्री वैज्ञानिकांच्या अथक, निःस्वार्थी कष्टांचा प्रवास म्हणजे The Vaccine War!
 
चित्रपटात सर्वच कलाकारांनी अभिनय केलाच नाहीये तर ते ती भूमिका जगलेत.
 
हा सिनेमा आपण सर्वांनी तर पहायलाच हवा पण त्याचबरोबर ICMR, NIV आदी संस्थांच्या वैज्ञानिकांचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी असा प्रवास आपल्या पुढील पिढीलाही दाखवायला हवा.
 
- डॉ. अनघा संदीप पारखी

(सध्या बाहरीन इथे वास्तव्य. आयुर्वेदिक डॉक्टर आणि क्लिनिकल रिसर्च फील्डमध्ये कामाचा पूर्वानुभव.)
 
 
 हे आणि असे अनेक संवाद केवळ प्रेरणा जागरणाचे काम करत नाही तर ते प्रेक्षकाला विचारप्रवण करतात. शेवटच्या पत्रकार परिषदेत शास्त्रज्ञांनी संदर्भासह दिलेली उत्तरं आणि डॉ. भार्गव यांच्या समारोपाच्या बोलण्यानंतर भारतीय म्हणून ऊर भरून येतो. शास्त्रज्ञांमधील संशोधनासंबंधीचे अनेक संवाद इंग्लिशमध्ये आहेत व अनेक वैद्यकीय-संशोधकीय पारिभाषिक संज्ञा आहेत ज्या समजून घ्यायला सर्वसामान्य प्रेक्षकांना अडचणीच्या वाटू शकतात, पण ती चित्रपटाच्या विषयाची मर्यादा असावी. मुलाची कविता न ऐकताच रात्री डॉ. निवेदिताचं ऑफिस गाठणं, डॉ. प्रज्ञाचं स्वयंपाकघरात कामं करता करता संशोधनाचा विचार करणं, डॉ. श्रीलक्ष्मीचं प्रयोग यशस्वी होत नसल्याने निराश होणं, माकडाशी गप्पा मारणं, डॉ. प्रियाच्या नैराश्याच्या क्षणी घरातील छोट्या कृष्णाने शिळा गुलाब बदलून फुलदाणीत ताजा गुलाब ठेवणं, बोलण्यात कधीच ओलावा न दाखवणार्‍या डॉ. भार्गव यांनी यशस्वी झाल्याबद्दल कौतुक म्हणून सहकारी शास्त्रज्ञांना कॅडबरी देणं हे छोटे छोटे प्रसंग सिनेमाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. उत्कृष्ट संकलनामुळे सुमारे पावणेतीन तासांचा आणि नेहमीपेक्षा वेगळ्या विषयाभोवतीचा सिनेमा असूनही तो कुठेही कंटाळवाणा होत नाही. सिनेमाचं पार्श्वसंगीतही छान आणि परिणामकारक आहे.
  
 
चित्रपट परिणामकारक आहेच, तरीही....
 
 
कोव्हॅक्सिनची निर्मितीकथा सांगणारा हा चित्रपट परिणामकारक आणि प्रेरणादायी आहेच. परंतु, अनेक गोष्टी दाखवता आल्या नाहीत असं राहून राहून वाटतं. माध्यमांचं षडयंत्र दिग्दर्शकाने दाखवलं आहे. पण यात माध्यमातील मोठी धेंडं प्रातिनिधिक स्वरुपात दाखवली असली तरी टूलकिट गँग एवढीच सीमित नाही. समाजाचा एक मोठा भाग या व्यवस्थेने काबीज केला आहे ज्यावर अधिक प्रकाश टाकता आला असता. परदेशी फार्मा कंपन्यांचं लसनिर्मितीबाबतचं भारतविरोधी धोरण आणि केलेली अडवणूक केवळ शेवटच्या पत्रकार परिषदेमधील संवादातूनच समोर आली, ते अधिक विस्तारित स्वरुपात दाखवणं आवश्यक होतं. अशा प्रकारच्या वैद्यकीय क्षेत्रातील राजकारणाबाबत सर्वसामान्य जनता अनभिज्ञ असते. त्याचबरोबर भारताची व्हॅक्सिन डिप्लोमसी, ‘वसुधैव कुटुंबकम’ या ब्रीदाला जागत अनेक देशांना केलेला लस पुरवठा...त्यातही गरीब देशांना लसपुरवठा करताना दाखवलेली संवेदनशीलता, यातून आपल्या परराष्ट्र धोरणाचा मानवी चेहरा अधिक प्रभावीपणे मांडणं गरजेचं होतं. भारताने केलेल्या या मदतीमुळे जगभरात आपलं कौतुकही झालं आहे. कदाचित चित्रपटाची एकूण लांबी पाहता हे सगळं इतक्या कमी वेळेत दाखवणं कठीण झालं असेल. पूर्ण लांबीचा चित्रपट करण्यापेक्षा आठ ते दहा भागांची वेबसीरीजमधील मांडणी अधिक परिणामकारक आणि सर्वस्पर्शी झाली असती असं चित्रपट पाहताना जाणवून गेलं.
 
 
हा चित्रपट परिपूर्ण आहे असा मी दावा करणार नाही. सर्वसाधारण कोणत्याही चित्रपटात असू शकतील असे काही दोष यातही असू शकतीलही. पण या चित्रपटाने भारतीय म्हणून आपली मान गर्वाने उंचावण्याचं काम नक्कीच केलं आहे. रंजनापलिकडे विचार देणारा, डोळस देशाभिमान जागवणारा हा सिनेमा थिएटरच्या बाहेर पडल्यावरही मनात राहतो.
 
 
व्हॅक्सिन वॉरसारखा सिनेमा पाहून देशातील तरुणाई संशोधन क्षेत्रात जायला प्रेरित झाली तर तेच या चित्रपटाचं खरं यश असेल.
------------------

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.