नृसिंहशिल्पांचे विविध भावाविष्कार

विवेक मराठी    02-Nov-2023   
Total Views |
नृसिंह किंवा नरसिंह म्हणजे श्रीविष्णूच्या दहा अवतारांपैकी चौथा अवतार. श्रीराम आणि श्रीकृष्ण ह्या विष्णूंच्या दोन सर्वाधिक लोकप्रिय अवतारांनंतर क्रमांक लागतो तो नृसिंहाचा. भारतभर आणि भारताबाहेरही नृसिंहाची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. भगवान नरसिंह हे अनेक हिंदू राजघराण्यांचे कुलदैवत असल्यामुळे त्या राजघराण्यांतील राजांनी देशभरात अनेक नरसिंह मंदिरे बांधली, जी आजही पूजेत आहेत. ह्या मंदिरांमधून आपल्याला नृसिंहमूर्तींचे अनेक आविष्कार दिसतात. मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने पाहिले, तर नृसिंहांची विविध प्रकारची शिल्पे वा मूर्ती भारतात ठिकठिकाणी आढळून येतात. त्यातल्याच काही सुंदर नृसिंहमूर्तींची ओळख आपण ह्या लेखातून करून घेणार आहोत.

vivek
 
नृसिंह अवताराची कथा आपल्या परिचयाची आहे. अगदी लहानपणापासून आपण सर्वच जण भक्त प्रह्लादाच्या विष्णुभक्तीची आणि त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन खांबातून अवतार घेणार्‍या नरसिंहाची कथा ऐकत लहानाचे मोठे झालेलो आहोत.
 
 
महाभारत, हरिवंश, लिंगपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण, ब्रह्मांडपुराण, वायुपुराण व देवी भागवत आदी अनेक ग्रंथांमधून नृसिंह अवताराची कथा सांगितलेली आहे. त्याआधीच्या काळात तैत्तिरीय आरण्यकात नृसिंह गायत्री मंत्र सांगितलेला आहे, तर अथर्ववेदाशी संबंधित नृसिंहपूर्व तापनीय व नृसिंहोत्तर तापनीय अशी दोन उपनिषदे व नरसिंह पुराण या नावाचे एक उपपुराण या ग्रंथांमधूनही नृसिंहाचे उल्लेख आहेत. पण भागवत पुराणात नृसिंह अवताराची कथा अतिशय विस्ताराने सांगितलेली आहे.
 
 
श्रीनृसिंह अवतार कथा
 
भागवत पुराणात सांगितलेली कथा अशी - हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू हे दोघे भाऊ. त्यांच्या स्वत:च्या सामर्थ्यावरील अहंकारामुळे दोघेही मदांध होऊन पृथ्वीवरील सर्व जिवांना त्रास देत होते. भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन, त्यातल्या हिरण्याक्षाने त्रास दिलेल्या भूमातेचा उद्धार केला व हिरण्याक्षाला ठार मारले.
 
 
आपल्या लहान भावाच्या मृत्यूमुळे संतापलेल्या हिरण्यकशिपूने अत्यंत खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून एखाद्या निष्णात वकिलालाही लाजवेल अशा भाषेत, सर्व शक्यतांचा विचार करून वर मागून घेतला - ‘न घरात किंवा बाहेर, न दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, ना भूमीवर ना आकाशात, ना प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, किंवा मृग, महानाग, यांच्याकडून, ना ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या कोणा जिवाकडून हिरण्यकशिपूला मृत्यू प्राप्त होऊ नये’ हा तो वर होता.
 
 
पुढे हिरण्यकशिपू आणि कयाधू नावाच्या त्याच्या राणीला प्रह्लाद नावाचा मुलगा झाला. आपल्या सर्व भावंडांमध्ये लहान असलेला प्रह्लाद नारदांच्या प्रभावामुळे परम विष्णुभक्त बनला. मुलाच्या विष्णुभक्तीमुळे खवळलेल्या हिरण्यकशिपूने प्रह्लादाला समजवायचे अनेक प्रयत्न केले, पण तो ऐकेना. शेवटी हिरण्यकशिपूने प्रह्लादाला मारायचेही प्रयत्न केले, पण श्रीविष्णूंच्या कृपेने प्रह्लादाला काहीही झाले नाही, तेव्हा संतापलेल्या हिरण्यकशिपूने प्रह्लादाला साखळदंडात बांधून भर राजसभेत उभे केले आणि त्याला विचारले, “तू ज्या विष्णूच्या नावाचा रात्रंदिवस जप करतोस, तो विष्णू आहे तरी कुठे?”
 

vivek 
 
विष्णूभक्तीत सदैव लीन असलेल्या प्रह्लादाने उत्तर दिले की “विष्णू सर्वत्र आहे.” त्याच्या या उत्तराने चिडलेला हिरण्यकशिपू एका खांबाकडे बोट दाखवत गरजला, “ह्या खांबामध्ये आहे का तुझा नारायण?” प्रह्लादाने होकारार्थी उत्तर देताच हिरण्यकशिपूने आपल्या गदेने त्या खांबावर प्रहार केला आणि त्या खांबातून मोठा आवाज करत श्रीनृसिंह प्रकट झाले. ब्रह्मदेवाच्या वराचा मान राखण्यासाठी न मनुष्य, न प्राणी, न देव, ना दानव असे सिंहाचे मुख आणि मनुष्याचा देह असे अत्यंत रौद्र रूप धारण करून श्रीविष्णू त्या खांबातून प्रकट झाले.
 
 
श्रीविष्णूंनी घेतलेले हे रूप फारच भयानक होते. भागवतात त्याचे वर्णन आहे की ’त्यांचे धड मनुष्याचे व तोंड सिंहाचे होते, त्यांचे डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणे लाल होते, त्यांच्या मानेवरील केस विजेप्रमाणे तळपत होते. त्यांच्या दाढा भयंकर होत्या, जिव्हा तलवारीप्रमाणे चंचल व तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण होती. चढविलेल्या भुवयांमुळे त्यांचे मुख उग्र दिसत होते, कान शंकूप्रमाणे ताठ उभारलेले होते, त्यांचे तोंड व नाकपुड्या पर्वताच्या गुहेप्रमाणे विस्तृत असून जबडा पसरल्यामुळे त्या भयंकर दिसत होत्या. त्यांचे मस्तक व वक्षस्थळ विशाल असून उदर कृश होते. चंद्रकिरणांप्रमाणे गौरवर्ण केस त्यांच्या अंगावर विखुरले होते. नखे जणू त्यांची आयुधे होती. त्यांच्या जवळ जाणे अशक्यच होते, तरीसुद्धा हिरण्यकशिपूने त्या नरसिंहाकडे धाव घेतली, परंतु अग्नीमध्ये पडलेला पतंग जसा दिसेनासा होतो, तसा तो दैत्य निस्तेज झाला.’
 
 
श्रीनृसिंहांनी हिरण्यकशिपूला त्याच्या गदेसहित वर उचलले व ब्रह्मदेवाच्या वरातल्या एकाही अटीचे उल्लंघन न करता, न दिवसा न रात्री अशा संध्याकाळच्या वेळी, न घरात, न बाहेर असे उंबर्‍यावर बसून, न भूमीवर न आकाशात, असे आपल्या मांडीवर उताणा पाडून, न शस्त्रांनी न अस्त्राने अशा आपल्या अणकुचीदार नखांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडून त्याची आतडी बाहेर काढली व त्याचे हृदय विदीर्ण करून त्याला ठार मारले.
 
 
हिरण्यकशिपूला मारल्यानंतरही नृसिंहांचा क्रोध शांत झाला नाही. त्यांच्या मानेवरचे केस रक्ताने माखल्यामुळे ज्वालांसमान भासत होते. रागाने तप्त झालेल्या नरसिंहांच्या मुखातून आग बाहेर पडू लागली, तेव्हा सर्वांनी प्रह्लादाला देवांना शांत करण्याची विनंती केली. प्रह्लादाने हात जोडून नृसिंहांची विनवणी केली की “हे प्रभू, आता शांत व्हा. ह्यापुढे भयनिवृत्तीकरिता लोक ह्या नृसिंह अवताराचे स्मरण करतील.” त्यानंतर काहीसे शांत झालेले श्रीनृसिंह प्रह्लादाला राज्यावर बसवून आपला क्रोधाग्नी पूर्णपणे शमवण्यासाठी योगपट्ट बांधून तप करायला निघून गेले. त्यांच्याबरोबर देवी लक्ष्मीही होत्या.
 
 
नृसिंहशिल्पांचे विविध आविष्कार
 
 
ही नृसिंह अवताराची कथा इतक्या विस्ताराने सांगायचे कारण म्हणजे ह्या कथेतल्या विविध घटनांचा आधार घेत भारतीय मूर्तिकारांनी, शिल्पकारांनी अत्यंत सुंदर अशी श्रीनृसिंहशिल्पे घडवली, जी आपल्याला आजही भारतभर आणि भारताबाहेरही दिसतात. श्रीविष्णूंच्या दशावतारांपैकी नरसिंहाच्या मूर्तींमध्ये जे वैविध्य दिसते, तितके दुसर्‍या कुठल्याच अवताराच्या मूर्तिरूप आविष्कारामध्ये दिसत नाही.
 
श्रीनरसिंहमूर्तींचे केवलनरसिंह, गिरीजनरसिंह, स्थौणनरसिंह, स्थानकनरसिंह, योगनरसिंह, विदरणनरसिंह, लक्ष्मीनरसिंह, यानकनरसिंह आदी अनेक प्रकार भारतभर पूजेत आहेत. नृसिंहांची मंदिरेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. कधी गुहेत, कधी डोंगरावर, कधी घनदाट जंगलात अशा अनवट ठिकाणी पूजिला जाणारा हा देव आहे. 
 
श्रीनरसिंहमूर्तींचे केवलनरसिंह, गिरीजनरसिंह, स्थौणनरसिंह, स्थानकनरसिंह, योगनरसिंह, विदरणनरसिंह, लक्ष्मीनरसिंह, यानकनरसिंह आदी अनेक प्रकार भारतभर पूजेत आहेत. नृसिंहांची मंदिरेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. कधी गुहेत, कधी डोंगरावर, कधी घनदाट जंगलात अशा अनवट ठिकाणी पूजिला जाणारा हा देव आहे. किंबहुना प्राचीन काळात पायी प्रवास करताना लोकांना जंगलातून जावे लागायचे. अशा जंगलप्रवासात असलेल्या भक्तांना नरसिंहरूपाने संरक्षण देतो, असा भाविकांना विश्वास आहे. म्हणूनच विष्णुद्वादशनामस्तोत्रात ’काननेनारसिंहश्च’ असे नृसिंहाचे वर्णन केले आहे.
 
 
स्थौणनरसिंह
 
हिरण्यकशिपूने खांबावर गदेचा प्रहार केल्यानंतर खांब किंवा स्तंभ दुभंगून बाहेर येताना दाखवलेली श्रीनृसिंहाची मूर्ती म्हणजे स्थौणनरसिंह किंवा स्थाणूनरसिंह. ही मूर्ती सहसा अत्यंत उग्र आणि रौद्र स्वरूपात दाखवली जाते. आंध्र प्रदेशमधल्या अहोबिलम इथल्या प्रसिद्ध नृसिंहमंदिरातल्या कल्याण मंडपाच्या खांबावर अतिशय सुंदर अशा अनेक स्थौणनृसिंहमूर्ती कोरलेल्या आहेत, त्यातली पृष्ठ क्रमांक 167वरील मूर्ती ही नेहमीच्या स्थौणमूर्तीच्या आविष्कारापेक्षा थोडी वेगळी आहे. खांब मधोमध दुभंगलेला आहे आणि श्रीनृसिंह त्यातून प्रकट होत आहेत. चतुर्भुज मूर्तीच्या वरच्या दोन हातांमध्ये श्रीविष्णूंची लक्षणे म्हणून चक्र आणि शंख आहेत. श्रीनृसिंहांच्या डोक्यावर उंच मुकुट आहे आणि आयाळ नीट विंचरलेली आहे. चेहर्‍यावरचे भाव शांत आहेत. नृसिंहमूर्तीची लक्षणे असलेले शंकूसारखे कान, मोठे बटबटीत डोळे आणि अणकुचीदार दात ह्याही मूर्तीत दिसतात, पण एकूण मूर्तीकडे पाहिले की शांतरसाची अनुभूती येते. हिरण्यकशिपू वधापूर्वीचा एक शांत क्षण हे शिल्प घडवणार्‍या शिल्पकाराला अपेक्षित असावा.
 
 
vivek
 
विदरणनृसिंह
 
 
नृसिंहमूर्तीचा हा आविष्कार आपल्यापैकी बहुतेकांच्या परिचयाचा आहे. आपल्या मांडीवर हिरण्यकशिपूला बळे झोपवून आपल्या नखांनी त्याचे पोट फाडताना दाखवलेली मूर्ती म्हणजे विदरणनरसिंह. ह्या प्रकारच्या मूर्तीमध्ये श्रीनृसिंहाच्या चेहर्‍यावर अत्यंत उग्र आणि रौद्र भाव दाखवलेले असतात. विदरणनृसिंहाची एक अत्यंत सुंदर मूर्ती महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील कोळे नरसिंहपूर येथील मंदिराच्या गर्भगृहात आहे. संपूर्णपणे गंडकी नदीच्या कृष्णपाषाण शिळेतून घडवलेली ही मूर्ती म्हणजे भारतीय मूर्तिशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. षोडशहस्त म्हणजे मूळ सोळा हातांच्या ह्या मूर्तीच्या चार भुजा सध्या भंगलेल्या आहेत. खालच्या दोन हातांनी देवांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडलेले आहे. त्याहून वरच्या एका हाताने हिरण्यकशिपूचा तडफडणारा पाय धरून ठेवलेला आहे, तर दुसर्‍या बाजूच्या हाताने नृसिंहांनी हिरण्यकशिपूचे डोके दाबून ठेवलेले आहे. हिरण्यकशिपूच्या चेहर्‍यावरची वेदना आणि मृत्युभय शिल्पामधूनदेखील जाणवते आहे. देवांच्या वरच्या हातांमध्ये विविध आयुधे आहेत. श्रीनृसिंहांचा चेहरा अत्यंत उग्र आहे. मानेभोवती तीन वलयांमध्ये आयाळ रुळते आहे, विस्फारलेले मोठे डोळे, रागाने वर उचललेल्या भिवया, बाहेर आलेली जीभ, शंकूसारखे टोकदार कान आणि तीक्ष्ण दात हे भागवत पुराणात वर्णन केल्याबरहुकूम मूर्तिकारांनी पाषाणात उतरवले आहेत. अत्यंत देखणी आणि तरीही भीतिदायक अशी ही मूर्ती आहे. मूर्तीच्या पायाशी प्रह्लाद आहे, तर मूर्तीमागच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत, मधोमध कीर्तिमुख आहे. कर्नाटकी चालुक्य आणि होयसळकालीन शिल्पकलेचा प्रभाव असलेली ही विदरणनृसिंहाची मूर्ती आहे.
 
 
विदरणनृसिंहांच्या अशाच दोन रौद्र पण कमालीच्या सुंदर मूर्ती कर्नाटकमधल्या बेलूर आणि हळेबिडू ह्या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतात. होयसळकालीन शिल्पकलेचा समृद्ध वारसा जपणार्‍या ह्या दोन्ही विदरणनृसिंहमूर्तींमध्ये श्रीनृसिंह आपल्या अनेक हातांपैकी दोन हातांनी हिरण्यकशिपूची आतडी बाहेर काढून ती एखाद्या हाराप्रमाणे आपल्या गळ्याभोवती धरताना दिसत आहेत. शिल्पकाराने कसब इतके मोठे आहे की एकाच पाषाणातून घडवलेल्या ह्या शिल्पातून मोठ्या आतड्याचा दुपेडी पीळ स्पष्ट दिसतोय.
 

vivek 
 
केवलनरसिंह
 
केवलनृसिंह म्हणजे एकटेच श्रीनृसिंह. सामान्यत: आपल्याला नृसिंहप्रतिमा म्हटली की नृसिंह भगवान आपल्या मांडीवर हिरण्यकशिपूला झोपवून आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचे पोट फाडत आहेत, असे दिसतात, तर कधी श्रीनृसिंह आणि त्यांच्या मांडीवर बसलेल्या देवी लक्ष्मी आपल्याला दिसतात, तर कधी त्यांच्या बाजूला प्रह्लादतरी असतात. पण केवलनृसिंहमूर्तीमध्ये श्रीनृसिंह एकटेच असतात. केवलनृसिंहाची एक प्रसिद्ध प्रतिमा महाराष्ट्रातल्या विदर्भात नागपूरजवळ रामटेकला आहे. वाकाटक राजवंशाच्या प्रभावतीगुप्त ह्या राणीने 1500 वर्षांपूर्वी बांधलेल्या ह्या मंदिरातली नृसिंहाची मूर्ती अत्यंत साधी आणि अनलंकृत, तरीही अतिशय भव्य आणि सुंदर आहे. केवलनृसिंहाची ही विशाल प्रतिमा एकाच लाल पाषाणाच्या शिळेमधून कोरलेली आहे. जवळजवळ 8 फुटांची ही मूर्ती द्विभुज आहे. मूर्तीच्या चेहर्‍यावरील भाव अत्यंत सौम्य आहेत व इतकी मोठी मूर्ती असूनही मूर्ती प्रमाणबद्ध व सुंदर आहे. श्रीनृसिंह एक पाय दुमडलेला आणि एक पाय जमिनीवर असे बसलेले आहेत. डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवलेला आहे, तर उजवा हात मोठ्या चक्रावर विसावलेला आहे. दुसरे कुठलेही शस्त्र किंवा लक्षण मूर्तीवर कोरलेले नाही. अत्यंत वेगळी अशी ही श्रीकेवलनृसिंहमूर्ती आहे.
 
 
vivek
 
हंपीचा महाकाय योगनृसिंह
 
विजयनगर हे शिवशाही उदयाला येण्यापूर्वीचे भारतातले शेवटचे सार्वभौम हिंदू साम्राज्य. उत्तर कर्नाटकातल्या तुंगभद्रेच्या तिरावर वसलेली विजयनगरची राजधानी - हंपी - आज पाच दशकांनंतर आणि धर्मांध मुसलमानी आक्रमकांनी केलेल्या भीषण विध्वंसानंतरही गतवैभवाची साक्ष देत उभी आहे. हंपीची ओळख म्हणजे इथली योगनृसिंहाची महाकाय मूर्ती. ओडिशामधल्या बलाढ्य गजपती राजाला युद्धात हरवल्यानंतर ह्या विजयाचे प्रतीक म्हणून विजयनगरच्या कृष्णदेवराय ह्या गुणग्राहक सम्राटाने तब्बल बावीस फूट उंचीची ही एकपाषाणी मूर्ती ओडिशामधल्याच एका प्रसिद्ध ब्राह्मण शिल्पकाराकडून घडवून घेतली. कलिंग शिल्पकलेचा अप्रतिम आविष्कार असलेली ही मूर्ती अतिशय प्रमाणबद्ध आणि सुंदर आहे. मूर्तीच्या माथ्यावर करंड मुकुट आहे आणि त्यावर सप्तफण्यांच्या नागाचे छायाछत्र आहे. त्यावर मोठे कीर्तिमुख आहे. श्रीनृसिंहांच्या गुडघ्यात वाकलेल्या पायांवर योगपट्ट आहे. चेहर्‍यावर मंद स्मित आहे.
 
 
एकेकाळी ह्या नृसिंहमूर्तीच्या मांडीवर देवी लक्ष्मी होती, पण तालीकोटाच्या लढाईत दक्षिणेतल्या सर्व मुसलमानशाह्यांनी एकत्र येऊन विजयनगर साम्राज्याचा पराभव केला आणि राजधानी बेचिराख केली. हंपी सहा महिने जळत होते, लुटले जात होते, इथली देवळे आणि मूर्ती घणाचे घाव घालून उद्ध्वस्त केल्या जात होत्या. त्यातच देवी लक्ष्मीचीही मूर्ती तोडली गेली. आज त्या लक्ष्मीच्या सुबक, कंकणयुक्त हाताचा अवशेष तितका शिल्लक आहे. श्रीनृसिंहमूर्तीचे हात, हातातली आयुधे, पावले, पावलांची बोटे सर्व धर्मांध मुसलमानी आक्रमकांच्या घणांच्या घावाखाली तुटलेले आहेत आणि तरीही ही प्रमाणबद्ध, सुंदर अशी विशालयोग नृसिंहमूर्ती आजही हिंदूंना प्रेरणा देत बसलेली आहे.
 

vivek
 
स्थानकनरसिंह
 
 
स्थानकनृसिंह म्हणजे उभा नृसिंह. कधीकधी श्रीनृसिंहाच्या मूर्ती उभ्यादेखील दाखवतात. त्यामध्ये कधी श्रीनृसिंह उभ्यानेच आलीढ मुद्रेत असताना एका पायावर हिरण्यकशिपूला आडवा टाकून त्याचे पोट फाडताना दाखवतात, ज्या आविष्काराला स्थानक विदरण नृसिंह असे म्हणतात, तर कधी तो भक्तांना दर्शन देत प्रसन्न मुद्रेने शांत उभा असतो.
 
 
 
ह्यातले पहिल्या प्रकारचे अतिशय दुर्मीळ असे शिल्प उत्तर प्रदेशमधल्या झाशीजवळच्या ललितपूर जिल्ह्यातल्या दुधई ह्या गावाबाहेर डोंगरात कोरलेले आहे. ही प्रतिमा तीस फुटांहून अधिक उंच आणि भव्य अशी आहे. एका महाकाय दगडी कड्यामधल्या नैसर्गिक घळीचा आणि दगडामधल्या नैसर्गिक रेषांचा फायदा घेऊन शिल्पकारांनी हे अद्भुत शिल्प कोरलेले आहे. श्रीनृसिंह आलीढ मुद्रेत - म्हणजे एक पाय सरळ आणि दुसरा पाय गुडघ्यात दुमडून तो पाय एका दगडी घडवंचीवर ठेवून उभे आहेत. हिरण्यकशिपू त्या दुमडलेल्या पायावर आडवा पसरलेला आहे. श्रीनृसिंहांच्या दोन्ही पायांमधून त्यांच्या कटिवस्त्राचा सोगा लहरतोय, त्यांच्या उघड्या मुखामधून त्यांचे अकराळविकराळ दात दिसत आहेत. अशी ही रौद्रभीषण मूर्ती आहे. दुर्दैवाने हजारो वर्षे ऊन-पाऊस झेलत उभी असल्यामुळे दगडाची झीज होऊन मूर्तीतले बारकावे आता कळत नाहीत, पण अशा अनवट ठिकाणी, दगडाच्या नैसर्गिक स्वरूपाचा फायदा घेऊन बनवलेले हे विशाल शिल्प बघताना त्या अनाम शिल्पकारांच्या कलेचे आणि कल्पकतेचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.
 
 
स्थानकनरसिंहाची दुसरी मला अत्यंत आवडणारी मूर्ती म्हणजे कर्नाटकातल्या बदामी येथील तीन नंबरच्या लेण्यांमधली अतिशय सुंदर अशी उभी नृसिंहमूर्ती. प्रसन्न, सौम्य भाव असलेली ही मूर्ती म्हणजे खरे तर लाल वालुकाश्मात कोरलेले एक विशाल उठावशिल्प (बास रिलीफ) आहे. श्रीनृसिंह सालंकृत आहेत, त्रिभंगात उभे आहेत. खाली एका बाजूला प्रह्लाद आणि दुसर्‍या बाजूला गरुड उभा आहे. नृसिंहांचा एक हात गदेवर विसावलेला आहे. देहबोली प्रसन्न आणि कुठलाही ताण वा आवेश नसलेली अशी आहे. हिरण्यकशिपूचा वध झालेला आहे, नृसिंहांचा क्रोधही आता शांत झालेला आहे. त्यांचा विजय साजरा करण्यासाठी स्वर्गलोकांतून देवता आलेल्या आहेत, ते वर कोरलेले आहेत. दोन गंधर्व दोन्ही बाजूंनी पुष्पमाला घेऊन उभे आहेत. नृसिंहांची भरगच्च आयाळ मानेवर, छातीवर रुळते आहे. डोईवर मुकुट नाही, पण शांतीचे आणि शुचितेचे प्रतीक असलेले कमळ कोरलेले आहे. अत्यंत देखणी आणि आश्वासक अशी ही मूर्ती आहे.


vivek 
 
उग्र नृसिंहमूर्ती
 
उग्र नृसिंहमूर्ती म्हणजे चेहर्‍यावर राग दाखवणार्‍या, हिरण्यकशिपूशी युद्ध करीत असताना दर्शवलेल्या श्रीनृसिंहाच्या मूर्ती. ह्यातल्या बर्‍याचशा मूर्ती ह्या श्रीनृसिंह हिरण्यकशिपूचे पोट फाडताना दाखवलेल्या असतात. पण शिल्पकारांच्या प्रतिभेला आणि कल्पकतेला बंधन नसते, त्यामुळे काही ठिकाणी श्रीनृसिंहांना खांबातून बाहेर पडून हिरण्यकशिपूशी द्वंद्वयुद्ध करतानाही आपल्या कल्पक शिल्पकारांनी दाखवलेले आहे.
 
 
ह्या प्रकारातली एक अप्रतिम मूर्ती कर्नाटकमधल्या पट्टडक्कल येथील विरुपाक्ष मंदिराच्या देवकोष्ठात आहे. श्रीनृसिंह व हिरण्यकशिपू युद्धाचे हे देखणे शिल्प अगदी हटके आहे. नृसिंह आणि हिरण्यकशिपू हे दोघेही उभ्या अवस्थेत आहेत. प्राणभयाने पळू पाहणार्‍या हिरण्यकशिपूला नृसिंहांनी दोन हातांनी त्याचे खांदे धरून त्याला थांबवलेले आहे, तर खालचा एक हात त्याच्या पोटात एका बाजूने खुपसलेला आहे. हिरण्यकशिपूच्या देहबोलीतून त्याची विवशता कळून येतेय. त्याची तलवार काहीही कामाची नाही, प्राणभयाने पळण्याचा प्रयत्न करताना त्याचे अलंकार खाली गळून पडलेत, तरीही पळण्याचा निष्फळ प्रयत्न करत असल्यामुळे दैत्याचा एक पाय वर उचललेला आहे. दगडात गतिमानता दाखवणे कठीण असते, पण इथे शिल्पकार ही गतिमानता दाखवण्यात यशस्वी झालेला आहे.
 
 
ह्याच प्रकारचे दुसरे एक अतिशय सुंदर शिल्प आहे, ते वेरूळच्या लेणी क्रमांक पंधरामधले नृसिंह आणि हिरण्यकशिपू यांच्यामधल्या युद्धाचे शिल्प. मूर्तिशास्त्र ह्या विषयातले माझे गुरू डॉ. गो.बं. देगलूरकर यांचे हे अत्यंत आवडते शिल्प. ह्या शिल्पाचे वर्णन करताना देगलूरकरसर आपल्या वेरूळवरच्या पुस्तकात म्हणतात, ’हा काय करणार ह्या भावनेने विकट हास्य करणार्‍या हिरण्यकशिपूला नृसिंहांनी आपल्या विलक्षण ताकदीच्या पकडीत घेतले आहे. तलवार उगारणारा त्याचा हात वरचे वर वज्रमुठीने पकडला आहे, शिवाय त्याला थप्पड मारण्यासाठी देवांनी एक हात हवेत उगारला आहे. आवेगाने पुढे झेपावल्यामुळे नृसिंहाचे नेसूचे वस्त्र मागे फडफडत आहे.’ अत्यंत वीररसपूर्ण असे हे शिल्प आहे.
 
 
असे हे नृसिंहमूर्तींचे विविध भावाविष्कार. केवळ भारतातच नाही, भारताबाहेरही विविध प्रकारच्या नृसिंहमूर्ती पाहायला मिळतात. माझ्या प्रवासात नरसिंहांची ही देशाच्या विविध भागांतली मंदिरे व अत्यंत देखण्या प्राचीन मूर्ती पाहताना भारतात नृसिंहभक्ती किती खोलवर रुजलेली आहे, ह्याचा वारंवार प्रत्यय आला आणि आपल्या कलासक्त पूर्वजांचे मूर्तिकौशल्य पाहून मन अभिमानाने भरून आले. फक्त एका लेखातच काय, एका पुस्तकातही न मावणारी अशी ही नृसिंहशिल्पे. हा लेख म्हणजे नृसिंहमूर्तींची फक्त एक जुजबी तोंडओळख आहे.