शंखशक्ति नमोऽस्तु ते

विवेक मराठी    20-Nov-2023   
Total Views |
शंख हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती कुरुक्षेत्रातील शंखघोष करणार्‍या भगवान श्रीकृष्णाची तेज:पुंज मूर्ती. यापलीकडे शंख म्हणजे देव्हार्‍यातील महत्त्वाचा पूजनीय घटक किंवा एक वाद्यप्रकार, एवढीच आपल्याला माहिती असते. वास्तविक या शंखाचे असंख्य प्रकार आहेत, त्याची निर्मिती कथा अत्यंत रोमांचक आहे, त्याचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचे अनेक भौगोलिक संदर्भ आहेत आणि आरोग्यदृष्ट्याही शंख अत्यंत महत्त्वाचा आहे. ठाणे येथील आनंद भिडे हे शंखवादन व शंखांचा संग्रह तर करतातच, त्याचबरोबरीने त्यांनी शंखांवर विस्तृत संशोधन केलं असून ते आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याची बहुस्पर्शी माहिती देतात. भिडे यांच्याशी झालेल्या अत्यंत माहितीपूर्ण वार्तालापावर आधारित हा लेख साप्ताहिक विवेकच्या साक्षेपी वाचकांसाठी देत आहोत.
shankh
 
लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा।
गाव: कामदुघा सुरेश्वर गजो रम्भादि देवांगना॥
अश्व: सप्त मुख: सुधा हरिधनु: शंखो विषम् चाम्बुधे।
रत्नानीति चतुर्दश प्रतिदिनं कुर्यु: सदा मंगलम्॥
 
समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या या चौदा रत्नांना हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. लक्ष्मी, कौस्तुभ मणी, पारिजातक, धन्वंतरी, कामधेनू, ऐरावत यांच्या जोडीने या मंथनातून पांचजन्य शंखही बाहेर पडला. हा शंख नंतर श्रीविष्णूंनी धारण केला. चक्र, गदा, पद्म (कमळ) याप्रमाणेच शंखदेखील श्रीविष्णूचं आयुध आहे. कोणत्याही स्वरूपाची पूजा करताना तिथे शंख ठेवण्याची व त्याचीही पूजा करण्याची आपली परंपरा आहे. हा पूजेतला शंख आणि शंखवादनासाठी वापरला जाणारा शंख हे सर्वसामान्यांना सारखेच वाटतात. वास्तविक, शंखांचे निरनिराळे प्रकार असून त्यांची निर्मिती कथा म्हणजे जीवविज्ञानातील चमत्कार आहे. ठाणे येथील आनंद भिडे हे शंखांचे अभ्यासक असून ते शंखाच्या निर्मितीची विस्तृत माहिती देतातच, त्याचबरोबरीने त्याचं धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक महत्त्वही सोदाहरण पटवून देतात. आज 140 वेगवेगळ्या जातींचे सुमारे 350 शंख भिडे यांच्या संग्रहात आहेत.
 
shankh 
 
शंख - धर्मसंस्कृतीचा अनन्यसाधारण घटक
 
 
भगवान श्रीविष्णूंच्या आयुधांमधील एक आयुध म्हणजे हा शंख. विष्णुपुराणात, अथर्ववेदातही याचे अनेक संदर्भ आढळतात. रामायणातही याचा संदर्भ आढळतो. पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांनी चक्रवात नावाच्या पर्वतावर शंखासुर नामक राक्षसाचा वध केला आणि त्याच्याकडील पांचजन्य शंख आपल्याकडे घेतला. महर्षी वेदव्यासांनी लिहिलेल्या हरिवंश पुराणानुसार, प्रभास समुद्रातील शंखासुर नावाच्या समुद्रासुराने भगवान श्रीकृष्णाचे गुरू सांदिपनींच्या मुलाचं अपहरण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर सांदिपनींनी श्रीकृष्णांना गुरुदक्षिणा म्हणून आपला पुत्र परत मिळवून द्यावा असं सांगितलं. गुरूंच्या पुत्राच्या अपहरणाच्या वृत्ताने क्रोधित श्रीकृष्णाने शंखासुराचा वध करून गुरुदक्षिणा म्हणून सांदिपनींना त्यांचा पुत्र परत मिळवून दिला व शंखासुराचा पांचजन्य धारण केला. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर पांचजन्याचा घोष केल्यावर पांडवांमध्ये ऊर्जेचा संचार होई व कौरव भयभीत होत असत.
 
पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जय।
पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदर॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिर।
नकुल सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ॥
काश्यश्च परमेष्वास शिखण्डी च महारथ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजिता:॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते।
सौभद्रश्च महाबाहु: शंखान्दध्मु: पृथक्पृथक्॥
 
(संदर्भ - भगवद्गीता अ.1, श्लोक 15-16)
 
 
भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात पंधराव्या-सोळाव्या श्लोकात शंखाचे संदर्भ आढळतात. यातील वर्णनानुसार महाभारतकालीन प्रत्येक महापुरुषाकडे त्याचा वैशिष्ट्यपूर्ण शंख होता व कुरुक्षेत्रात तो वाजवलाही जात होता. हृषीकेशाचा (कृष्णाचा) पांचजन्य, पांडवांपैकी अर्जुनाचा देवदत्त, भीमाचा पौंड्र, धर्मराज युधिष्ठिराचा अनंतविजय, नकुलाचा सुघोष आणि सहदेवाचा मणिपुष्पक शंख होता. गीतेच्या 14व्या श्लोकातच पितामह भीष्म यांच्याही शंखाचा उल्लेख आढळतो. त्यांनी जेव्हा कुरुक्षेत्रावर शंखनाद केला, तेव्हा सिंहगर्जनेसारखा मोठा आवाज झाला असं म्हणतात. भीष्म हे गंगापुत्र होते, म्हणून त्यांच्या शंखाचं नाव ‘गंगानाद’ असं होतं. सूक्ष्मपणे पाहू गेल्यास आपल्या लक्षात येतं की या व्यक्तिमत्त्वांप्रमाणेच, स्वभावाप्रमाणेच त्यांच्या शंखांचीही नावं होती आणि त्यांच्या गर्जनाही तशाच होत्या. पंचमहाभूतांवर ज्याचं नियंत्रण अशा श्रीकृष्णाचा पांचजन्य आणि देवांकडून मिळालेला व देवगुण असलेला असा तो अर्जुनाचा देवदत्त. पौंड्र याचा अर्थ मोठ्या आकाराचा शंख, म्हणून तो भीमाचा शंख. सदैव विजयी होणार्‍या व नीतिधर्माने वागणार्‍या धर्मराजाचा अनंतविजय. धीरगंभीर आवाज करणारा नकुलाचा सुघोष आणि सदैव सत्संग घडवणार्‍या सहदेवाचा मणिपुष्पक शंख. जो सदैव विनाश करत आला अशा दुर्योधनाचा शंख त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांना शोभणारा विदारक शंख आणि सूर्यपुत्र कर्णाचा हिरण्यगर्भ शंख असे त्या त्या व्यक्तिमत्त्वांना शोभतील असे शंख महाभारतकालात होते, असं आनंद भिडे शंखाबाबत सांगतात. युद्धभूमीवर अनेक कारणांसाठी शंखध्वनी केला जात असे. पहिलं कारण म्हणजे, युद्ध हे सूर्योदयाला सुरू करून सूर्यास्ताला युद्धविराम करण्याची पद्धत होती. मोठ्या मैदानात या दोन्ही सूचना देण्यासाठी शंखनाद केला जाई. या युद्धात जेता आपला विजय घोषित करण्यासाठी शंखनाद करत असे. काही वेळेस शत्रूला भयकंपित करण्यासाठी किंवा आपल्या सैन्यात ऊर्जेचा संचार व्हावा म्हणूनही शंखवादन केलं जाई.
  
 
केवळ पौराणिक वाङ्मयामध्येच नव्हे, तर संतवाङ्मयामध्येही याचे संदर्भ सापडतात, असंही ते सांगतात. एकनाथी भागवताच्या तेराव्या अध्यायात म्हटलं आहे की, ‘ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी सांदिपनींच्या पुत्राला वाचवण्यासाठी शंखासुराचा वध केला, त्या ठिकाणी अद्यापही भाग्यवंत माणसांना पूजेचे शंख मिळतात.’ महाराष्ट्राबाहेरील अन्य राज्यांमध्येही शंखाचे आध्यात्मिक संदर्भ आहेत. शंख हे जैन तीर्थंकर नेमिनाथ यांचं चिन्ह होतं. त्यांच्या मूर्तीजवळ शंख हे चिन्ह नेहमी आढळतं. जैन धर्मातील मान्यतांनुसार, भगवान श्रीकृष्णांचा जन्म आणि नेमिनाथांचा जन्म हा एकाच काळात झालेला आहे. जैन वाङ्मयात श्रीकृष्णांचा उल्लेख नेमिनाथांचे चुलतबंधू असा येतो, म्हणूनच नेमिनाथांशीही शंखाचा संबंध जोडला गेला आहे. महाराष्ट्रात जशी संतपरंपरा, तशीच तामिळनाडूत अळवार. वैष्णव पंथाच्या परंपरेच्या मान्यतांनुसार भगवान श्रीकृष्णांच्या आयुधांनी मनुष्यरूप धारण केलं असून त्यातलेच एक अळवारही आहेत. आंध्र प्रदेशातील वैष्णव परंपरेत गुरू अन्नमाचार्यांच्या परंपरेची दीक्षा घ्यायची असेल, तर शंख आणि चक्र यांची तप्त मुद्रा खांद्यावर टेकवून ही चिन्हं गोंदवून घ्यावी लागतात.
 
 
shankh
 
जिथे जिथे सागरी किनार्‍याचा भाग आहे, तिथे शंख सापडतात. त्यांची नावंही वेगवेगळी असतात. आपल्या महाग्रंथांतून महापुरुषांच्या शंखांना मिळालेली आध्यात्मिक नामाभिधानं पुढील काळात त्या त्या शंखांच्या लक्षणांनुसार भारतात वापरली गेली, आजही वापरली जातात. भारताच्या विविध प्रांतांत एकाच शंखाला वेगवेगळी नावंही दिलेली दिसून येतात. पूर्णपणे काळ्या रंगाच्या एका वैशिष्ट्यपूर्ण शंखाला आपल्याकडे शनी शंख म्हटलं जातं, तर ब्राउन रंगाच्या एका शंखाला राहू शंख नाव दिलं गेलं आहे. परदेशात मात्र आध्यात्मिक नावं नसून शंखांच्या रूपानुसार, गुणवैशिष्ट्यांनुसार नावं दिली जातात आणि त्याची शास्त्रीय नावं आणखीनच वेगळी असतात. उत्तर भारतात विष्णुशंख म्हणून ओळखला जाणारा शंख हा दक्षिण भारतात पद्मशंख म्हणून परिचित आहे. भारतात पांचजन्य म्हणून ओळखला जाणारा शंख अमेरिकेत फ्लोरिडा भागात क्वीन्स हेल्मेट नावाने ओळखला जातो. याचं कारण म्हणजे पांचजन्याच्या तळाला हेल्मेटसारखी एक वैशिष्ट्यपूर्ण कडा आहे. असं प्रत्येक शंखाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे.
 
 
शंखाची निर्मिती कथा
 
शंखाची उत्पत्ती होते ती समुद्रातील गोगलगायींपासून. समुद्री गोगलगायी, जमिनीवरील गोगलगायी आणि गोड्या पाण्यातील गोगलगायी अशा एकूण 45 हजार जातींच्या गोगलगायी अस्तित्वात असतात. जमिनीवरील गोगलगायींचे 30 हजार प्रकार आहेत, समुद्री गोगलगायींचे 10 हजार प्रकार आहेत आणि गोड्या पाण्यातील पाच हजार आहेत, अशा एकूण 45 हजार जातींच्या गोगलगायी आढळतात. पूजेसाठी वा वादनासाठी वापरल्या जाणार्‍या शंखांची उत्पत्ती ही विशिष्ट प्रकारच्या समुद्री गोगलगायींपासून होते, असं आनंद भिडे सांगतात.
 
shankh 
 
नर आणि मादी यांचं मिलन झालं की मादी गोगलगाय एका वेळेस एक लाख अंडी घालते, त्यातील एकाचंच फलन होतं व नवी गोगलगाय तयार होते. काही वेळा दोन नरही जवळ येतात, पण त्या वेळेस त्यातील एकाचं रूपांतर आपोआप मादीत होतं. गोगलगायी आपल्या संरक्षणासाठी स्वत:भोवती कवच तयार करतात. त्यासाठी शरीरातून जो स्राव सोडतात तो स्राव, पाण्यातील कॅल्शियमसारखे घटक, समुद्रातील मीठ व अन्य मिनरल्स, फायबर या सार्‍याच्या संयुगातून कवचाचा थर शंखाच्या रूपात त्यांच्या शरीरावर तयार होतो. पाण्यातील या सर्व घटकांच्या बदलत्या प्रमाणानुसार शंखाचे रंग (पिगमेंट्स), त्याची त्वचा, खरखरीतपणा निश्चित होतो. हा रंगदेखील साधारणत: वाळूच्या रंगाशी मिळताजुळता असतो. गोगलगायींचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्यांची दृष्टी मुळातच अंधुक (ब्लर) आणि कृष्णधवल आहे. त्यामुळे शत्रू खूप जवळ आल्याशिवाय त्यांना त्याची जाणीव होत नाही. त्यामुळे शत्रू जवळ आला की त्या पटकन कवचात लपतात. त्यासाठीच त्यांना निसर्गाने हे कवच तयार करण्याची क्षमता दिली आहे. गोगलगायींना आपल्यासारखा पाठीचा कणा नाही, पण हे कवच तयार होतं व ते त्यांच्या रिब्जच्या (त्वचेच्या विशिष्ट भागाच्या) मदतीने पाठीला चिकटलेलं असतं. या गोगलगायींचं चालणं इतकं संथ असतं की त्यांना अकरा किलोमीटर चालण्यासाठी तब्बल सहा वर्षं लागतात. गोगलगाय मेली की तो शंख तसाच समुद्राच्या तळाशी राहतो. हा शंख म्हणजे शुद्ध कॅल्शियम कार्बोनेट असतं. पाण्यात असताना त्याच्या पृष्ठभागावर एक वॉटरप्रूफ संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे शंख वर्षानुवर्षं सुरक्षित राहतो. त्यातही शुद्ध कॅल्शियम कार्बोनेट असल्यामुळे शंखाची टिकण्याची क्षमता मुळातच अधिक असते. त्यामुळे ते तसेच राहतात, त्यांचं विघटन होत नाही. या प्रक्रियेतून आपल्याला पूजेसाठी आणि वादनासाठी शंख उपलब्ध होतो, अशी त्यांनी विस्तृत माहिती दिली.
 
 
shankh
 
आपल्याकडे अनेकांच्या देव्हार्‍यात शंख ठेवलेला असतो. शंख आणि घंटा यांना पूजेत अग्रस्थान आहे व देवपूजेच्या वेळेस त्यांचीही पूजा केली जाते. त्याचप्रमाणे पूजा, होम-याग यांसारखे धार्मिक विधी करताना शंखध्वनी केला जातो. सध्याच्या काळात शुभकार्याच्या प्रसंगी वा एखाद्या कार्यक्रमाच्या प्रारंभीही शंखवादन केलं जातं. जाणकारांना पूजेचा शंख व वादनाचा शंख यातील फरक कळत असला, तरी तो सर्वसामान्यांच्या लक्षात येईल असं नाही. सामान्यत: रचनात्मकदृष्ट्या शंखाचे तीन प्रकार पडतात. खालची बाजू वर घेतल्यावर व शंखाचं बंद टोक आपल्याकडे ठेवल्यावर पाहिल्यास ज्याची कडा उजवीकडे उघडते तो दक्षिणावर्ती शंख. ज्याची कडा डावीकडे उघडते तो वामावर्ती शंख.
 

shankh 
 सरसकट कोणताही शंख पूजेत ठेवतो, पण शास्त्रानुसार दक्षिणावर्ती शंख हा पूजेसाठी व वामावर्ती शंख हा शंखवादनासाठी वापरला जातो.

आपण सरसकट कोणताही शंख पूजेत ठेवतो, पण शास्त्रानुसार दक्षिणावर्ती शंख हा पूजेसाठी व वामावर्ती शंख हा शंखवादनासाठी वापरला जातो. वादनासाठी या शंखाचं पुढचं टोक छाटून छिद्र तयार केलं जातं. पूजेच्या शंखाचं पुढचं टोक बंद असतं व हा शंख देवघरात ईशान्येकडे वा उत्तरेकडे तोंड करून ठेवला जातो. कडा थोडी मध्याकडे सरकलेला असलेला मध्यावर्ती शंख म्हणजे शंखाचा तिसरा प्रकार. हा शंखही पूजेसाठी वापरला जातो. पूजेत ठेवलेल्या शंखात दररोज नव्याने पाणी भरून ठेवलं जातं व दुसर्‍या दिवशी ते प्राशन केलं जातं. भिडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शंख म्हणजे शुद्ध कॅल्शिअम कार्बोनेट असल्याने शंखात भरून ठेवलेलं पाणी प्राशन केलं, तर शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कायम राखलं जाऊ शकतं. कारण कॅल्शियम कार्बोनेटचे सूक्ष्म कण या पाण्यात उतरतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे शंखनिर्मिती होत असताना समुद्रातील मीठ, कॅल्शियम अशा घटकाचंच कवच तयार होत असतं. त्यामुळे हे सर्व घटक पाण्यावरही परिणाम करतात. वर्षानुवर्षं हे पाणी प्यायल्यावर त्याचा शरीराला फायदा होतो. कदाचित आपल्याकडे शंखातील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करण्याची पद्धत पडली असावी, असंही ते म्हणाले.
 
 
खरा शंख असा ओळखावा
 
 
हल्ली कोणत्याही वस्तूच्या खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता असते, तशी ती शंखाच्या बाबतीतही होऊ शकते. खरा शंख ओळखण्याचीही एक क्लृप्ती आहे, असं ते सांगतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे गोगलगाय रिब्जच्या माध्यमातून शंखाला चिकटलेली असते. शंखाच्या आतल्या बाजूस हात फिरवल्यावर या रिब्जच्या खुणा जाणवतात. शंख अस्सल नसेल तर या रिब्ज जाणवत नाहीत. त्याचप्रमाणे शंखाची खालची पोकळ बाजू कानाला लावली, तर त्या निर्वात पोकळीतून समुद्राची गाज वाटावी
आयुर्वेदीय औषधांमध्येही शंखाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. शंखभस्म हा आयुर्वेदिक औषधांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. 
तसा ध्वनी ऐकू येतो, हीदेखील शंख ओळखण्याची खूण आहे. आयुर्वेदीय औषधांमध्येही शंखाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. शंखभस्म हा आयुर्वेदिक औषधांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. विशिष्ट प्रकारची यंत्रणा वापरून मच्छीमार समुद्रातून शंख आणतात. किनार्‍यावर आणल्यावर त्यांचं अ, ब आणि क असं दर्जात्मक विभाजन केलं जातं. अ दर्जाचे शंख औषधांसाठी वापरले जातात. ब दर्जाचे वादनासाठी, पूजेसाठी, भेटवस्तू तयार करण्यासाठी आणि दागिन्यांसाठी वापरले जातात. बंगाली परंपरेत नवविवाहितेला लाल रंगाची लाखेची व पांढरी शंखाची बांगडी वापरण्यास दिली जाते. क दर्जाच्या शंखांची पावडर करून बांधकाम व्यवसायात वापरली जाते. टाइल्स, ग्रॅनाइट, सिरॅमिकच्या वस्तू यात ही पावडर वापरतात. कारण कॅल्शियम असल्यामुळे वस्तूंना टणकपणा चांगला येतो.
 
shankh 
 
शंखाचे अंतर्गत स्वरूपानुसार शंख आणि शंखिणी असे दोन प्रकार पडतात. पैकी, शंख हा आतील मार्गात कोणताही अडथळा नसणारा प्रकार मानला जातो, तर शंखिणीला आतल्या बाजूस विशिष्ट कंगोरे किंवा काटे असतात, ज्यामुळे पाणी सहजपणे वाहून जात नाही. या क्रियेत अडथळे येतात. भिडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याकडे शंखिणी ही पूजेत किंवा वादनासाठी वापरली जात नाही. त्याचप्रमाणे त्यात अंतर्गत अडथळे असल्यामुळे वादनाकरितादेखील तिचा वापर होत नाही. शंख विकत घेताना ती शंखिणी निघण्याची शक्यता असते. त्यामुळे शंख विकत घेताना त्यात पाणी ओतून पाहावं. त्यातून पाणी सरळ बाहेर पडलं तर तो शंख. अडथळा आला व पाण्याचा प्रवाह अडकला, तर ती शंखिणी.
 
 शंख विकत घेताना त्यात पाणी ओतून पाहावं. त्यातून पाणी सरळ बाहेर पडलं तर तो शंख.
shankh
 
विश्वव्यापी शंख
 
 
भारतातल्या किंवा परदेशातील अनेक ठिकाणी शंख या चिन्हाचे भौगोलिक संदर्भही सापडतात, असं आनंद भिडे सांगतात. इसवी सन पाचव्या ते आठव्या शतकात शंखलिपी नावाची लिपी अस्तित्वात असल्याचे पुरावे उज्जैनजवळील गुंफांमध्ये सापडतात. ही चिन्हसंकेतयुक्त स्वरूपातील लिपी होती. पुढे काळाच्या ओघात तिचा वापर मागे पडला. जगन्नाथपुरी हे तीर्थक्षेत्रच शंखक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गुजरातमधील बेटद्वारकेला शंखोधर असं म्हटलं जातं, अर्थातच याचा संबंध श्रीकृष्णाशी आहे. महाराष्ट्रात वापी-डहाणू पट्ट्यात एका गावाचं नावच शंखोद्वार आहे. उत्तराखंड-झारखंड या भागात वाहणारी शंख या नावाची 240 कि.मी. लांबीची एक नदीही आहे. केरळ किनारी भागातील झेंड्यावर शंखाचं चित्र आहे. ओडिशाच्या एका राजकीय पक्षाच्या ध्वजावरही शंख आहे. याच राज्यात शंकारी पारा नावाचं गाव आहे, जिथे शंखांपासून दागिने घडवण्याची पूर्वापार परंपरा आहे व ते करणार्‍या कारागिरांना शंकारी म्हटलं जातं. भारताबाहेर शंखाचे (Conchचे) असेच भौगोलिक संदर्भ सापडतात. ‘Conch Republic’ नावाचा एक चिमुकला देश अस्तित्वात आहे. हा भाग पूर्वी अमेरिकेचा भाग होता, पण 1982 साली त्यांनी स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं. शंखाचं चिन्ह असणारी अनेक नाणीही सापडतात. भारतातही कवडी ही आपण पूर्वी चलन म्हणून वापरत होतो. कवडी हा शंखाचाच एक चिमुकला प्रकार आहे आणि त्यातही 40-45 प्रकार अस्तित्वात आहेत. अनेक देशांच्या पोस्ट स्टॅम्पवरही शंखाचं चिन्ह आढळतं. थोडक्यात सांगायचं, तर जिथे जिथे सागरी भाग आहे, तिथे तिथे विविध प्रकारे शंखसंस्कृती विस्तारलेली आढळते - कधी भौगोलिक संदर्भांतून, तर कधी आध्यात्मिक ग्रंथांतून.
 भारताबाहेर शंखाचे (Conchचे) असेच भौगोलिक संदर्भ सापडतात. ‘Conch Republic’ नावाचा एक चिमुकला देश अस्तित्वात आहे. हा भाग पूर्वी अमेरिकेचा भाग होता, पण 1982 साली त्यांनी स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं. शंखाचं चिन्ह असणारी अनेक नाणीही सापडतात.
 
shankh
 
शंखवादनाचे फायदे
 
 
भारतात शंखवादनाची प्राचीन परंपरा आहे, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे शंखवादनाचे हे केवळ आध्यात्मिक वा धार्मिक लाभ नाहीत, तर मानवी आरोग्यावरही त्याचा तितकाच सकारात्मक परिणाम होतो. मागील बारा वर्षांपासून आनंद भिडे नियमित शंखवादन करीत असून कोविड काळात आपल्याला त्याचा अतिशय उपयोग झाल्याचं ते आवर्जून नमूद करतात. कोविड काळात अनेकांना श्वसनाचा त्रास झाला, फुप्फुसांच्या क्षमतेवरही परिणाम झाला. नियमित प्राणायाम करणारे, शंखवादन करणारे यांना मात्र तुलनेने कमी त्रास झाल्याचं लक्षात आलं आहे. तोंडाद्वारे फुप्फुसात हवा पूर्ण भरून शंखाच्या छिद्राद्वारे ती पूर्ण शक्ती लावून बाहेर सोडताना शंखध्वनी होतो. शंखवादनाच्या सुरुवातीच्या काळात माणूस एका दमात सात ते आठ सेकंदांपर्यंत ही क्रिया करू शकतो. पुढे हा काळ वाढत जाऊन जास्तीत जास्त 40 ते 50 सेकंदांपर्यंत एका दमात शंखवादन करता येतं, असं डॉक्टरांनीच सांगितल्याची माहिती ते देतात. शंखवादनाची सर्वसाधारण फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्झपासून सुरू होते व जास्तीत जास्त 1000 हर्ट्झपर्यंत असू शकते. शंख जितका हलका, तितका वाजवायला सोपा जातो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात हलका आणि सात-आठ इंच लांबीचा शंख निवडावा, असं भिडे सांगतात.
 

vivek 
 
 
शंखवादनामुळे पुढील आरोग्यविषयक फायदे होतात -
 
 
1. श्वसनाची व फुप्फुसांची क्षमता वाढते.
 
2. पोटाच्या स्नायूंनाही व्यायाम होऊन पचनशक्ती सुधारते.
 
3. फुप्फुसाची व श्वसनाची क्षमता वाढल्याने रक्ताभिसरण सुधारतं.
 
 
4. चेहर्‍याचा व्यायाम होतो व त्याचा परिणाम चेहर्‍यावर दिसून येतो.
 
 
5. एकाग्रतेत वाढ होते.
 
 
6. शंखवादनाद्वारे निर्माण होणार्‍या नादामुळे जी कंपनं निर्माण होतात, त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.
 
 
 
एकूणच शंखवादनाने शरीरशुद्धी होते, असंही म्हणता येईल. शंखाचा आकार किंवा चिन्ह याचा विविध शास्त्रांमध्येही आधार घेतला जातो. योगशास्त्रात शंखमुद्रा सांगितलेली आहे. शंखप्रक्षालन नावाची शुद्धिक्रिया योगात सांगितली आहे. ज्याप्रमाणे शंखाच्या मुखातून पाणी सोडलं की ते शंखाचा अंतर्गत भाग स्वच्छ करून शेपटीकडून सरळ बाहेर पडतं, त्याप्रमाणे पचनसंस्थेचीही शुद्धी शंखप्रक्षालन पद्धतीत सांगितली आहे. ही पचनव्यवस्था किती स्वच्छ करावी, याचं शंखाच्या माध्यमातून विनासायास बाहेर पडणारं पाणी हे प्रतीक मानलं आहे. म्हणूनच या शुद्धिक्रियेला शंखप्रक्षालन म्हटलं आहे, असं भिडे सांगतात.
 
शंखांच्या नाना तर्‍हा
 
 
आकारानुसार, वैशिष्ट्यांनुसार, भौगोलिक व वातावरणीय प्रभावानुसार शंखांचे वेगवेगळे प्रकार आढळतात. पांचजन्य शंख, विष्णू शंख, हनुमान किंवा गदा शंख, गणेश शंख, शनी शंख, सूर्यमुखी शंख, त्रिधारा शंख, मोती शंख, दत्तात्रेय शंख, कामधेनू शंख, हिरा शंख/पहाडी शंख, लक्ष्मी शंख, महाकाली शंख असे शंखाचे वेगवेगळे प्रकार आज आनंद भिडे यांच्या संग्रहात आहेत. काही शंख अत्यंत गुळगुळीत पृष्ठभागाचे असतात, तर काही टोकदार आणि खरखरीत पृष्ठभागाचे असतात. काही शंख शुभ्र पांढरे, तर काही हलका पिवळसर रंग असणारे असतात. काहींच्या रिब्ज (आतल्या बाजूच्या रेषा) खूप तीक्ष्ण, तर काहींच्या घोटीव असतात. काही शंख वेगवेगळ्या रंगांतही आढळतात. या रंगवैविध्याबाबत विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, “समुद्रातील मीठ, कॅल्शियम, गोगलगायीने उत्सर्जित केलेला स्राव, किनार्‍यावरील वाळूचा रंग अशा अनेक गोष्टींवर शंखांचे रंग अवलंबून असतात. अनेकदा शत्रूला चकवण्यासाठी त्यांना भ्रमित करण्यासाठी विशिष्ट रंग तयार होईल असा स्राव या गोगलगायी सोडतात. त्यामुळे काही शंखांचे रंग गुलाबी, हिरवे असेही असतात.”
 
 
काही शंखांना त्यांच्या रूपावरून नावं पडतात. हनुमान शंख -गदा शंख हा चक्क एक ते सव्वा फूट लांब असतो. तो गदेसारखा दिसतो, म्हणून त्याचं नाव गदा शंख पडलं. शनी शंख नावाचा शंख तर काळा असतो. गणेश शंख हा मध्यावर्ती प्रकारचा असतो आणि त्याची वरची बाजू गणपतीच्या आकाराशी साधर्म्य दाखवणारी असते. हिरा शंख हा समुद्रकिनार्‍यावर न सापडता हिमालयासारख्या पहाडी क्षेत्रात सापडतो. पूर्वी हिमालयाच्या जागी समुद्र होता. भूगर्भीय घडामोडींमुळे हिमालय तयार झाला. पण त्याच्या तळाशी असणारे शंख विघटन न होता तसेच राहिले. त्यामुळे भिडे यांच्या संग्रही असणारा हिरा शंख हा सुमारे 10 हजार वर्षं आयुर्मान असलेला शंख आहे आणि तो खूपच छोटा, कवडीच्या आकाराचा आहे. त्यावर विशिष्ट प्रकारची चकचकीत पावडर असते, ज्यामुळे तो हिर्‍यासारखा चमकतो, म्हणून त्याला हिरा शंख म्हणतात. असे शंख हिमालयात, कैलास मानसरोवर परिसरात आढळतात, असं ते सांगतात.
 
 
 
आनंद भिडे यांनी शंखवादनाबरोबरच शंखांचा अभ्यास केलाच, पुढे शंखशक्ती नावाचं पुस्तक लिहून विस्तृत माहिती संकलित स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध करून दिली. सध्या त्यांच्या शंखशक्तीच्या दुसर्‍या भागाचं काम सुरू असून तेही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. आनंद भिडे हे स्वत:च्या आनंदासाठी हा संग्रह करत असले, तरी त्यामुळे शंखांचा उलगडणारा इतिहास, त्यात गवसत जाणारी भारतीय संस्कृतीची मुळं हे सारं अत्यंत मौल्यवान आहे. येथील संस्कृतीला नावं ठेवण्याऐवजी त्यामागील तर्क समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. येथील पूजापद्धतीतील शंखाचं महत्त्व, शंखवादनाशी जोडलेले व्यायामाचे प्रकार, शंखांचं जीवविविधतेतील सौंदर्य आणि त्याचा आपल्या आराध्य देवतेशी जोडला जाणारा संबंध हे सारंच अत्यंत माहितीपूर्ण असं संचित आहे. ते भावी पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी आनंद भिडेंसारख्या संशोधकाने घेतली आहे. त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.