जावेद अख्तर यांचे अजब तर्कट

विवेक मराठी    23-Nov-2023   
Total Views |
स्थानिक पक्षाच्या स्टेजवरून आणि त्यांच्या खांद्यावरून संघ-भाजपा यांच्यावर बार टाकण्याचा अयशस्वी, फिल्मी आणि केविलवाणा प्रयत्न उतारवयात जावेद अख्तर करत आहेत आणि विरोध करण्याच्या आवेशात ‘जय श्रीराम’ म्हणणार्‍या लोकांची रावणाशी केलेली तुलना तर पद्मश्रीप्राप्त कलावंताने पायरी सोडण्याचे लक्षण आहे. जन्माने अहिंदू असणार्‍या, स्वघोषित नास्तिक असणार्‍या आणि राजकीयदृष्ट्या हिंदू विचारकेंद्रित संघ-भाजपासारख्या संघटनेला, पक्षाला कायम पाण्यात पाहणार्‍या जावेदभाईंना ते या जन्मात समजण्याची शक्यता नाही.
 
javed
 
अगदी दिवाळीच्या सुरुवातीला, नेमके सांगायचे तर वसू-बारस असते, त्या दिवशी प्रख्यात सिने-गीतकार आणि संवादलेखक जावेद अख्तर यांनी ‘श्रीराम’ आणि ‘सियाराम’ अशा दोन शब्दांची तुलना करत श्रीराम या शब्दाबद्दल नापसंती व्यक्त करणारे काही वक्तव्य केले. मुंबईतील एका स्थानिक पक्षाच्या दिवाळी कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणे वा प्रमुख वक्ते म्हणून बोलावले होते. जावेद अख्तर यांचे म्हणणे थोडक्यात सांगायचे, तर उत्तर भारतात जय सियाराम असे एकमेकांना संबोधण्याची पद्धत होती. आता जय श्रीराम म्हणणार्‍या लोकांनी त्यातील सीतामाईचा उल्लेख असणारा ‘सिया’ हा शब्द काढून टाकला आहे. अशा प्रकारे राम आणि सीता यांना वेगळे केले आहे. इतिहासात राम आणि सीता यांना वेगळे करण्याचे कृत्य रावणाने केले होते. आता राम आणि सीता यांना वेगळे करणारे तेच करत आहेत. इतके बोलून ते थांबले नाहीत, तर समोर बसलेल्या स्थानिक पक्षाच्या श्रोत्यांना जय सियाराम म्हणा असे सांगून व तशा घोषणा देत एक प्रकारे प्रशिक्षणही करून टाकले. गेल्या चाळीस-एक वर्षांत जय श्रीराम ही घोषणा अधिक रूढ केलेल्या विचारधारेला/पक्षाला परस्पर पाहुण्यानेच सुनावले असल्याने आयोजक असलेल्या स्थानिक पक्षाला त्यात वावगे वाटण्याचे कारणच नव्हते.
 
 
सुमारे 400 वर्षांपूर्वी संत तुलसीदास यांनी लिहिलेले ‘श्री रामचंद्र कृपालु भजमन’ हे भजन, सुमारे 300+ वर्षे जुना ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा रामदासस्वामी यांच्यापासून चालत आलेला त्रयोदशाक्षरी मंत्र, तितकेच जुने रामदासस्वामी यांचे ‘येथे का उभा श्रीरामा’ हे कवन, गेल्या काही दशकांतील ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हे शांताराम नांदगावकर यांचे गीत, ‘श्रीरामा घनश्यामा’ हे पी. सावळाराम यांचे गीत, ‘श्रीरामाचे चरण धरावे’ हे यशवंत देव यांचे गीत, ‘श्रीरामाचे दर्शन घडले’ हे योगेश्वर अभ्यंकर यांचे गीत, ‘श्रीरामाच्या पूजेसाठी’ हे जगदीश खेबुडकर यांचे गीत, ‘अंतरी माझ्या श्रीराम’ हे पांडुरंग सीताराम लघाटे यांचे गीत, अगदी हल्ली आलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘जय श्रीराम’ हे गीत अशी अक्षरश: शेकडो गीते/भजने सांगता येतील, ज्यामध्ये ‘श्रीराम’ हा शब्द आला आहे आणि या सगळ्याचा अर्थातच गेल्या चाळीस-एक वर्षांत अधिक रूढ झालेल्या ‘जय श्रीराम’ घोषणेशी अर्थाअर्थी काहीही संबध नाही.
 
भारतात मात्र, कुणावरही आक्रमण न करण्याचा इतिहास असतानाही निव्वळ संरक्षणासाठी सिद्ध असणार्‍या वीरांच्या तोंडी मात्र शिवाजी महाराज की जय, रामचंद्र की जय, बजरंगबली की जय अशी देवांची, तर जय चामुंडा, दुर्गामाता की जय, ज्वाला माताकी जय अशी देवींचीही नावे असणार्‍या ललकार्‍या आहेत. त्यामुळे जावेद यांचा ‘सियाराम’चे महत्त्व भारतीयांना ‘पटवून देण्याचा’ प्रयत्न हा Carrying coal to Newcastle या प्रकारचा बाळबोध आणि त्यामुळे हास्यास्पद आहे. 
 
मुळात देवांचा उल्लेख करताना विविध नावांच्या बरोबरीने त्यांच्या पत्नीचा किंवा आईचा उल्लेख नावात करण्याची जी पद्धत आहे, ती निखळ भारतीय आहे - उदा., उमाशंकर, गौरीशंकर, लक्ष्मीनारायण, राधाकृष्ण, अंजनेय वगैरे. इतकेच काय, महाभारतात आणि नंतरच्या साहित्यात ऐतिहासिक/पौराणिक पात्रांचे तसे उल्लेख केलेले विपुलतेने दिसतात - उदा., गांगेय, कौन्तेय, राधेय वगैरे. या सर्व निखळ भारतीय परंपरा आहेत. इस्लाम, ख्रिस्ती पंथांचा उगम ज्या मातीत आणि ज्या कालखंडात झाला, तिथे अशी परंपरा दिसत नाही. पंथविचाराच्या विस्तारासाठी झालेल्या मोहिमांत/ युद्धात केवळ देवाचे नाव वा चिन्ह घेत त्यांचा इतिहास घडला आहे. त्या तुलनेत भारतात मात्र, कुणावरही आक्रमण न करण्याचा इतिहास असतानाही निव्वळ संरक्षणासाठी सिद्ध असणार्‍या वीरांच्या तोंडी मात्र शिवाजी महाराज की जय, रामचंद्र की जय, बजरंगबली की जय अशी देवांची, तर जय चामुंडा, दुर्गामाता की जय, ज्वाला माता की जय अशी देवींचीही नावे असणार्‍या ललकार्‍या आहेत. त्यामुळे जावेद यांचा ‘सियाराम’चे महत्त्व भारतीयांना ‘पटवून देण्याचा’ प्रयत्न हा Carrying coal to Newcastle या प्रकारचा बाळबोध आणि त्यामुळे हास्यास्पद आहे.
 
 
अगदी लोकवाङ्मयात, म्हणी-वाक्प्रचार यात निखळ रामाचा उल्लेख असंख्य वेळा येतो. ‘मुंह में राम बगल मे छुरी’ किंवा ‘राम नाम जपना - पराया माल अपना’ अशा काहीशा नकारात्मक छटा असलेल्या म्हणीत सीतामय्याच्या उल्लेखाशिवाय फक्त रामाचे नाव येते. महात्मा गांधींच्या रामराज्य कल्पनेतदेखील फक्त रामाचा उल्लेख आहे. राजाराम, सीताराम, बालकराम, नीजबोधाराम आदी रामाचे जोड-उल्लेख असलेली नावेही सारखीच रूढ आहेत. इतकेच काय, तर स्वदेस चित्रपटात स्वत: अख्तर यांनी लिहिलेल्या गीतात राम, श्रीराम, रघुराई, रघुनाथ, रघुपती, राजाराम, रामचंद्र, श्री रामचंद्र आणि निदान दोन डझन वेळा राम शब्द आला आहे. त्या गीतात एखादा शब्द ‘सिया-राम’ घालण्याची ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ नक्की घेता आली असती. मीटरमध्येही बसत होते! पण तसे त्यांनी केलेले दिसत नाही.
 
 
थोडक्यात सांगायचे, तर स्थानिक पक्षाच्या स्टेजवरून आणि त्यांच्या खांद्यावरून संघ-भाजपा यांच्यावर बार टाकण्याचा अयशस्वी, फिल्मी आणि केविलवाणा प्रयत्न उतारवयात जावेद अख्तर करत आहेत आणि विरोध करण्याच्या आवेशात ‘जय श्रीराम’ म्हणणार्‍या लोकांची रावणाशी केलेली तुलना तर पद्मश्रीप्राप्त कलावंताने पायरी सोडण्याचे लक्षण आहे. संत तुलसीदास म्हणतात, ‘बिनु विश्वास भगति नहीं, तेहि बिनु द्रवहिं न राम।’ - म्हणजे विश्वास असल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही आणि भक्ती असल्याशिवाय राम द्रवणार नाहीत. ‘जय श्रीराम’चा उद्घोष आत्यंतिक भक्तीतून आणि विश्वासातून उमटलेला उद्गार आहे. जन्माने अहिंदू असणार्‍या, स्वघोषित नास्तिक असणार्‍या आणि राजकीयदृष्ट्या हिंदू विचारकेंद्रित संघ-भाजपासारख्या संघटनेला, पक्षाला कायम पाण्यात पाहणार्‍या जावेदभाईंना ते या जन्मात समजण्याची शक्यता नाही.
 
9324860050 
 

शरदमणी मराठे

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक