विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं

विवेक मराठी    16-Dec-2023   
Total Views |
@रमा गर्गे 9922902552
 
खरिपाचा हंगाम संपल्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून प्रत्येक गावातील ग्रामदैवतांच्या नावाने यात्रा-जत्रा भरवल्या जातात. काबाडकष्टाची कामे करुन थकला-भागला जीव धनधान्याच्या समृद्धीने आलेल्या आर्थिक सुबत्तेने आनंदी होतो. हा आनंद सगळ्यांसोबत वाटावा आणि संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी या हेतूने यात्रा-जत्रा भरविण्याचा घाट घातला गेला आणि या परंपरेचे संस्कृतीत रूपांतर झाले. अशाच गावोगावी होणार्‍या यात्रा-जात्रांची आढावा घेणारी ही लेखमाला.
 
vivek

भारतामध्ये लोकदैवतांच्या यात्रा अनेक शतकांपासून प्रचलित आहेत. या लोकयात्रांमधून वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा जपल्या जातात. एका प्रदेशातून दुसर्‍या प्रदेशात लोक नियमित पायी प्रवास करतात. यात्रा मार्गावर त्या त्या भागातील ग्रामस्थ या यात्रेकरूंची अन्नपाण्याची सोय, निवासव्यवस्था करतात.
 
दळणवळणाची साधने फारशी उपलब्ध नसताना या यात्रांद्वारे समाजातील सर्व घटक एकमेकांशी जोडले जात. भौगोलिकदृष्ट्या दूर असलो, तरी सांस्कृतिक दृष्टीने आपण एक आहोत हा भाव या यात्रा जपतात. पारंपरिक ओव्या, भजने, नृत्याचे प्रकार, धार्मिक विधी, प्रसादाचे भोजन यांची रेलचेल असलेल्या या यात्रा म्हणजे आपले सांस्कृतिक धन आहे! अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण यात्रा म्हणजे श्रीविठ्ठल बिरदेव यात्रा - पट्टणकोडोली ही होय. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातल्या पट्टणकोडोली येथे आश्विन महिन्यात ही यात्रा भरते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांतील अनेक भाविक या यात्रेला हजेरी लावतात. ‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं!’ म्हणत भाविक भक्त पायी चालत फरांदे बाबांची भाकणूक ऐकण्यासाठी पट्टणकोडोलीला जमा होतात. भंडारा उधळला जातो, हेडाम नृत्य केले जाते, भाकणूक सांगितली जाते.
 
 
ज्या देवांच्या भेटीसाठी हे भाविक भक्त जमतात, ते देव कोणते? त्यांची अवतार कथा काय आहे? हे थोडक्यात जाणून घेऊ.
 
विठ्ठल आणि बिरदेव ही देवांची जोडगोळी आहे. फार फार वर्षांपूर्वी सत्ययुगात नारदपूर येथे राजकन्या गंगासुरवंती हिला तपश्चर्येनंतर सूर्यनारायणाच्या आशीर्वादाने अयोनिसंभव बिरदेव - बिरोबा या पुत्राची प्राप्ती झाली. मात्र तो पुत्र मातेजवळ राहू शकला नाही. नदीच्या शापामुळे त्याला वनात एका पाळण्यात घालून ठेवावे लागले. नदीने सुरवंतीला शाप का दिला, याची एक कहाणी आहे. आपली कन्या विवाह न होता गर्भवती राहिली आहे, या कारणाने गंगासुरवंतीच्या पित्याने - राजा ध्रुवाइत याने मुलीच्या जेवणात विष कालवले. गर्भात असलेल्या बिरदेवांनी मातेला विषापासून वाचवले. पण उरलेले अन्न सुरवंतीच्या दासीने नदीत टाकले, त्यामुळे जलचर मृत झाले. माझी मुले तू मारलीस, म्हणून तुझा मुलगा जन्माला आला की तुझ्यापासून दूर राहील असा नदीने शाप दिला. त्यामुळे बिरदेवाला अरण्यात पाळण्यात ठेवले गेले. तेथे एकव्वा आणि तिच्या धाकट्या बहिणीने त्या बाळाला आपला भाऊ मानले व चिंचली येथे नेऊन त्याचा सांभाळ केला. अक्का म्हणजे बहीण, ती आई झाली म्हणून एकव्वाला मायक्का असे नाव पडले. बेळगावजवळ चिंचली येथे तिचे मंदिर आहे. बिरदेव दिसामाजी मोठा झाला, त्याने आपल्या मामाच्या मुलीशी लग्न केले. पण तो संसारात रमला नाही. त्याने तपश्चर्या केली व विठ्ठलाला भावाच्या रूपात बोलावले. श्रीविठ्ठल बिरदेवांचा भाऊ म्हणून सोबतीला आले, त्यांनी मुंडासे, काठी व घोंगडी असा वेष केला. धनगरांना त्रास देणार्‍या दैत्यांचा दोघांनी मिळून नाश केला. विठ्ठल म्हणजे विष्णूचे रूप, तर बिरोबा हा शिवाचा अवतार, हे हरिहर ऐक्य या जोडदेवतांमध्ये आहे.

vivek
 
त्यानंतर हे दोघे जेथे जेथे गेले, ते स्थान तीर्थक्षेत्र झाले. एनापूर येथून ते हुक्केरीला आले. तेथे त्यांना धनगरांनी मेंढीचे दूध दिले. देव म्हणाले, “तुम्ही आता दरसाली आम्ही वसणार तिथे यायचे व मेंढीचे दूध आम्हाला द्यायचे, ही परंपरा ठेवा.” ‘हेगडी भक्त’ म्हणून हे भक्त ओळखले जातात. ते दूध वाहायला येतात, तेव्हा गावकरी त्यांच्यासाठी पुरणपोळीचे जेवण घालतात. विठ्ठल बिरदेव मेंढ्यांचे अदृश्य शक्तींपासून रक्षण करतात, धनगरांना माळावर सोबत करतात अशी श्रद्धा आहे.

 
हुक्केरीवरून वढंगोल, सदलगा, दोनेवाडी, रेंदाळ, हुपरी, तळंदगे, वसगडे या वाटेवर मुक्काम करीत करीत देव पट्टणकोडोली येथे थांबले. येथे त्यांनी खडकाळ माळावर वस्ती केली. ज्योतिर्लिंग यात्रा बघून आपल्या भक्तांनीही असे सालाबादप्रमाणे भेटले पाहिजे, यासाठी यात्रेचे नियोजन करावे असे देवांना वाटले. पण भक्त असे पाहिजेत की चंद्रसूर्य असेपर्यंत यात्रा निभावली पाहिजे. भक्ताला शोधायला देव निघाले. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथे त्यांचा शोध संपला. माता नागव्वाचा मुलगा खेलोबा याला भक्तशिरोमणी म्हणून स्वत: देवांनी पट्टणकोडोली येथे यात्रेला येण्यासाठी निमंत्रण दिले.

 
त्यानुसार खेलोबा आपले पाच कुळातील शिष्यगण घेऊन आश्विन शुद्ध सप्तमीला चालत चालत निघाले. पट्टणकोडोली येथे माळावर आले. देवाने भक्ताची परीक्षा घ्यायचे ठरवले. ते मंदिरासह अदृश्य झाले. खेलोबा हाका मारू लागला, पण देव काही दिसेनात! शेवटी त्याने तलवार घेतली व स्वत:वर सपासप वार करून घेतले, त्या वेळी इतरांनी त्याच्यावर हळदीचा भंडारा उधळला. एवढे वार होऊनही त्याला इजा झाली नाही. शेवटी देव प्रकटले आणि त्यांना पहाताच खेलोबांच्या मुखातून भावश्विनी निघाली. काय काय होऊ घातले आहे, कसे करावे काय वागावे हे तो भावावेशात बोलू लागला. देवांनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितले की तुझ्या कुळातील सदस्य या यात्रेचा मानकरी असेल, तलवारीचे वार, हेडाम नृत्य आणि भाकणूक (भविष्यबोल) सांगेल. चंद्र-सूर्य असेपर्यंत ही प्रथा सुरू राहील.


vivek 

आजही ही प्रथा कायम आहे. खेलोबा व शिष्यांच्या परिवारातील भक्त येतात, तळंदगे, वसगडे व पट्टणकोडोली या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे स्वागत, भोजन याची व्यवस्था केली जाते. खेलोबाच्या कुळातील एक जण मुख्य असतो, ज्याला फरांदे बाबा म्हटले जाते. तो काचेचे पाणी चढवलेली तलवार अंगावर मारून घेतो. पाऊस, पिके, राजकीय नेते, राजकारण, समाजव्यवस्था यावर भाकणूक करतो.
 
यात्रेत मेवा-मिठाईची दुकाने थाटली जातात. आकाशपाळणे असतात, जादूच्या करामती करणारे लोक असतात, शेव-चिवड्याची दुकाने, खेळणी, कापडचोपड असे सारे विक्रीसाठी ठेवलेले असते. भंडार्‍याची उधळण होऊन सगळीकडे पिवळीधम्म छटा उमटते. ‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’ म्हणत आबालवृद्ध, महिला-पुरुष या यात्रेचा लाभ घेतात.
 
 
या यात्रेला भागू बहिणीची बोळवण, दातात जोडे धरणे, मांसाहारी लोकांनी पालखीला न शिवणे अशी अनेक उपकथाही जोडलेल्या आहेत. या कथा धनगरी ओव्यांमधून येतात. विठल बिरदेवांनी जरी धनगरी वेष केला असला, तरी ते सर्व अठरापगड जातीच्या लोकांचे श्रद्धस्थान आहेत. यलो फेस्टिव्हल म्हणून स्वदेशी-परदेशी वाहिन्यांनी पट्टणकोडोली यात्रेला सर्वांपर्यंत आज पोहोचवले आहे. व्हिडिओ पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष एकदा तरी ही यात्रा, त्यातील हेडाम नृत्य, तलवारीचे वार आणि नंतरची भविष्यवाणी (भाकणूक) अनुभवायला हवी, हे नक्की!

रमा दत्तात्रय गर्गे

डॉ.रमा दत्तात्रय गर्गे

शिक्षण:M.A.(हिस्ट्री)Ph.D.(योगशास्त्र)...वैचारिक /साहित्य /तत्वज्ञान/इतिहास विषयक लेखन..

6 पुस्तके प्रकाशित। महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या पूलं गौरव विशेषांक,व बाळशास्त्री हरदास गौरव विशेषांकात लेखन।
कालिदास विद्यापीठ विस्तार मंडळ प.महाराष्ट्र समन्वयक।
समरसता साहित्य परिषद,महाराष्ट्र प्रांत सदस्य
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण पुर्नविलोकन समिती सदस्य