ख्रिसमस - आणखी एक संक्रांत!

विवेक मराठी    22-Dec-2023   
Total Views |
जसे भारतात देशभर संक्रांत वा त्यासारखे उत्सव आहेत, तसेच जगभर सूर्याचे उत्तरायण साजरे करण्याच्या परंपरा आणि उत्सव आहेत. इसवी सनाच्या तिसर्‍या शतकात नव्याने ख्रिस्ती झालेल्या रोम परिसरातील ख्रिस्ती धर्मगुरूंनी ख्रिस्ती उत्सवाच्या स्वरूपात रोमन परंपरेतील अशाच उत्सवांचा आणि चालीरितींचा अंतर्भाव केला. त्याचे ‘ख्रिसमस’ असे नामकरण 10व्या किंवा 11व्या शतकात झाले. त्यामुळेच ख्रिसमसला ‘आणखी एक संक्रांत’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
vivek
 
ख्रिसमस हा ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण आहे, हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. भारतीय समाज हा विविधतांना केवळ स्वीकारणाराच नव्हे, तर त्या साजरे करणारा समाज आहे. त्यामुळे भारतात ख्रिसमस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यातील ‘ख्रिसमस मास’ व आनुषंगिक धार्मिक गोष्टींत जरी ख्रिस्ती समाज सहभागी होत असला, तरी ख्रिसमस साजरा करणारे अनेक जण आहेत. मुंबईसारख्या महानगरात तर साधारण श्रावणातील गोपाळकाल्यापासून जे उत्सवी वातावरण सुरू होते, ते गणपती, नवरात्र, दिवाळी, याच सुमारास येणार्‍या कोजागिरी-त्रिपुरी असे टप्पे घेत घेत ख्रिसमसपर्यंत येऊन ठेपते. अरे! वर्ष संपत आले की.. याची जाणीव व्हायला लागते आणि अखेर नववर्ष उजाडते.
 
 
वरील सारा क्रम जरी आपल्या परिचयाचा असला, तरी ख्रिसमसच्या परंपरेचा संबंध जानेवारीत येणार्‍या संक्रांतीशी आहे, हे वाचून कदाचित धक्का बसेल. लेखाच्या शीर्षकात ते सूचितही केले आहे. काय संबंध आहे संक्रांतीचा आणि ख्रिसमसचा? ते समजून घेण्यासाठी आपल्याला आधी संक्रांत म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. म्हणजे बहुतांश जणांना ते माहीत असतेच, पण उजळणीसाठी सांगायचे, तर मकर संक्रांत हा सण सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्याचे सांगणारा आणि साजरे करणारा सण आहे. साधारणपणे हिवाळ्याच्या मध्यावर येणारा हा सण. विज्ञानाच्या दृष्टीने सांगायचे, तर सूर्याचे उत्तरायण 22 डिसेंबर रोजी सुरू होते. पण सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तो बिंदू साजरा करण्याची भारतात पद्धत आहे. ती देशभर आहे. बिहारमध्ये ‘तिला संक्रांत’, तामिळनाडूमध्ये ‘पोंगल’ किंवा ‘उझवर तिरुनल’, जम्मू परिसरात ‘माघी संगरांत’, काश्मीर खोर्‍यात ‘शिशुर सेंक्रांत’, हिमाचल-पंजाब-हरयाणामध्ये ‘माघी’, आसाममध्ये ‘भोगाली बिहू’, उत्तर प्रदेशमध्ये ‘खिचडी’ अशा विविध नावांनी संक्रांत साजरी केली जाते.
 
vivek 
इंग्लंडमधील ‘स्टोन हेंज’ परिसरात आजही साजरा होणारा उत्तरायण उत्सव. उत्तरायणातील पहिला सूर्योदय. चित्र साभार - अर्थ स्काय डॉट कॉम
 
गंमत म्हणजे जगभरदेखील विविध ठिकाणी सूर्याचे उत्तरायण साजरे केले जाते. उदा., ‘याल्डा’ नावाचा सण जुन्या पर्शियामध्ये साजरा होत होता. पर्शियाचे इस्लामीकरण होऊन आता तो प्रदेश इराण झाला आहे, तरीही आसपासच्या प्रदेशात - इराकी कुर्दिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तानातील बलुचिस्तान, अझरबैजान, तुर्कस्तान या देशांतील काही भागात आजही 21 डिसेंबर रोजी ‘शब ए याल्डा’ साजरा करतात. ‘डोंगझी’ नावाचा सण जपान, चीन, कोरियामध्ये साजरा केला जातो. तोही 21 ते 23 डिसेंबरदरम्यान साजरा केला जातो. दीर्घ रात्र संपून आता हळूहळू दिवस मोठा होत जाईल, ते पर्व साजरे करणारा हा उत्सव आहे. इंग्लंडमध्ये ‘स्टोनहेंज’ नावाची जागा आहे. दगडांच्या विशालकाय शिळांनी बनलेली ती प्राचीन रचना आहे. तिथे 21 डिसेंबरच्या आसपास येणार्‍या दीर्घ रात्री हजारो लोक येऊन जमा होतात. रात्र तिथेच काढतात आणि नव्या सूर्याचे स्वागत करतात. अमेरिकेतील नॉर्थ अ‍ॅरिझोनामध्ये ‘सोयाल’ उत्सव, दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये ‘इंती रायमी’ उत्सव या नावांनी असेच स्थानिक उत्सव साजरे होतात. थोडक्यात सांगायचे, तर सूर्याचे उत्तरायण जपानपासून दक्षिण अमेरिकेपर्यंत देशोदेशी साजरे होत आले आहे. आजही साजरे होत आहेत.
 
vivek 
सॅटर्नीलिया उत्सवाचे 17व्या शतकातील एका फ्रेंच चित्रकाराने रंगवलेले चित्र
 
सूर्याचे उत्तरायण साजरे करण्यासाठी प्राचीन रोममध्ये 17 ते 23 डिसेंबरदरम्यान ‘सॅटर्नीलिया’ नावाचा सण साजरा होत असे. ‘अजिंक्य सूर्य’ (Sol Invictus)चा हा उत्सव होता आणि इसवीसन 350पर्यंत रोमन लोक हा सण साजरा करत होते. सध्याच्या ख्रिसमसमधील अनेक गोष्टी या परंपरेतून घेतल्या गेल्या आहेत, हे लक्षात येते - उदा., मेणबत्त्या लावणे, भेटवस्तू देणे, मेजवानी करणे, फुला-पानांनी चक्राकार रचना करणे (रीथ), संपूर्ण उत्सवाचा काळ काम न करता सुटी घेणे वगैरे.
 
सुमारे तिसर्‍या शतकानंतर रोमन साम्राज्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. जरी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, तरी लोकांनी त्याआधीच्या लोकपरंपरांचा त्याग केला नाही. त्यामुळे हिवाळ्यातील सर्वात दीर्घ रात्रीनंतर सूर्याचे उत्तरायण साजरे करण्याची लोकप्रिय परंपरा रोमन नव-ख्रिश्चनांनी स्वीकारली आणि त्यानंतर कधीतरी धर्मगुरू पोप ज्युलियस यांनी 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा करावा असे जाहीर केले आणि तेव्हापासून ख्रिसमस साजरा होऊ लागला. अर्थात ‘ख्रिसमस’ हे सणाचे नाव पडायला मात्र दहावे दशक उजाडले. शिवाय ग्रेगरियन कॅलेंडर न मानणारे आणि आधीच्या जुलियन कॅलेंडरवर विश्वास असणारी ‘ईस्टर्न ख्रिश्चन चर्च’पैकी काही चर्चेस आजही 25 डिसेंबरऐवजी 7 जानेवारीला ख्रिसमस’ साजरा करतात. जॉर्जिया, रशिया, युक्रेन इत्यादी भागात त्या चर्चेसचा प्रभाव आहे. अशा प्रकारे 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा करणार्‍या ख्रिस्ती लोकांची संख्या तब्बल 2.5 कोटी इतकी आहे.
 
जसे भारतात देशभर संक्रांत वा त्यासारखे उत्सव आहेत, तसेच जगभर सूर्याचे उत्तरायण साजरे करण्याच्या परंपरा आणि उत्सव आहेत. इसवी सनाच्या तिसर्‍या शतकात नव्याने ख्रिस्ती झालेल्या रोम परिसरातील ख्रिस्ती धर्मगुरूंनी ख्रिस्ती उत्सवाच्या स्वरूपात रोमन परंपरेतील अशाच उत्सवांचा आणि चालीरितींचा अंतर्भाव केला. त्याचे ‘ख्रिसमस’ असे नामकरण 10व्या किंवा 11व्या शतकात झाले. आजच्या दिनदर्शिकेनुसार सूर्याचे उत्तरायण 21-22 डिसेंबरच्या सुमारास होते. या दिवसापासून 15 जानेवारीपर्यंतच्या तीन आठवड्यात हा संक्रमण उत्सव जगभर साजरा होतो. त्यामुळेच मी ख्रिसमसला ‘आणखी एक संक्रांत’ असे म्हटले आहे. केवळ याच नव्हे, तर अशा अनेक ठिकाणच्या लोकपरंपरा ख्रिस्ती धर्माने स्वीकारल्या आहेत.
उत्तरायणाव्यतिरिक्तही अनेक परंपरांबद्दल लिहिता येईल. पण तो निराळ्या आणि सविस्तर लेखाचा विषय आहे.

शरदमणी मराठे

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक