देश राममय.. अस्वस्थ विरोधक

विवेक मराठी    28-Dec-2023   
Total Views |
 
 
vivek
याच देशात जन्माला आलेली, मात्र इथल्या शक्ती-भक्ती परंपरेवर टीका करण्यात धन्यता मानणारी आणि हिंदुद्वेषाने (पर्यायाने भाजपा-संघाचाही द्वेष करणारी) पछाडलेली फळी राममय झालेल्या वातावरणाने खूप अस्वस्थ आहे. दु:खात आहे. समूहातल्या प्रत्येकाची आणि समूहाची भावना, श्रद्धा ओळखण्यात, त्याचा उचित मान राखण्यात कमी पडलेले हे विरोधक देशभरातल्या उत्साही वातावरणाने अस्वस्थही आहेत आणि भयभीतही. त्यातूनच ते मोदी-शहांवर टीका करण्याची नेहमीची चुकीची खेळी खेळत आहेत, तर राहुल गांधींसारखे अपरिपक्व, बालबुद्धीचे नेते अगदी चुकीच्या मुहूर्तावर भारत न्याय यात्रा सुरू करत आहेत. ज्या पूर्वांचलातून ते ही यात्रा सुरू करणार आहेत, त्या पूर्वांचलाच्या लोकसंस्कृतीतही राम भरून राहिला असल्याचे अनेक संशोधनसिद्ध पुरावे उपलब्ध आहेत, हे त्यांच्या खिजगणतीतही नाही. या घोडचुकीचे परिणाम त्यांना लवकरच दिसतील. 
अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाची तारीख जसजशी जवळ येते आहे, तसा अवघा देश राममय होतो आहे. आपापल्या गावातही सर्वांना याची प्रचिती येत असणार, याची खात्री आहे. अगदी अलीकडचीच गोष्ट. कार्यालयाच्या दिशेने येत असताना रस्त्यावर चहा विकणार्‍या एका व्यक्तीने गिर्‍हाइकाला चहा देताना खणखणीत आवाजात ‘जय सियाराम’ म्हटले आणि त्यावर ‘जय श्रीराम’ असा अतिशय उत्साहवर्धक आवाजात प्रतिसाद मिळाला. रामनामाचा हा उच्चार कानावर पडला आणि आजूबाजूच्या चालत असलेल्या लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणेे ‘जय सियाराम’, ‘जय श्रीराम’ असे मोठ्याने म्हणत आपले सूर त्यात मिसळले. अगदी सर्वसामान्यांकडून घडलेली ही उत्स्फूर्त कृती. पण त्याने वातावण उजळून निघाले.
अयोध्येतील राम मंदिरासाठी हिंदूंनी दिलेल्या पाचशे वर्षांच्या लढ्याची आता यशस्वी सांगता होते आहे आणि आपण सारे त्याचे साक्षीदार आहोत, ही आपल्या सर्वांसाठीच अतिशय भाग्याची गोष्ट आहे. ऐंशीच्या दशकात संघपरिवारातील विहिंप-भाजपाने साधुसंतांच्या साथीने राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा पुढचा अध्याय सुरू केला. त्या आंदोलनादरम्यान झालेल्या बाबरीच्या पतनाने इतिहास घडवला. या आंदोलनाने हिंदूंमधील सामूहिक शक्ती-भक्तीचा दिसलेला आविष्कार आणि वज्रनिर्धार असेल तर काही अशक्य नाही हा विश्वास, तसेच आंदोलन शेवटच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याची भावना कोट्यवधी हिंदूंच्या मनात निर्माण केली. तरीही हा शेवटचा टप्पा नेमक्या किती कालावधीचा असेल याची खात्री 2014पर्यंत कोणालाच देता येत नव्हती.
2014मध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत सरकार केंद्रात सत्तेवर आले. त्यानंतर अल्पावधीत उत्तर प्रदेशाच्या राज्यकारभाराची सूत्रे धडाकेबाज आणि कर्तव्यकठोर अशा योगी आदित्यनाथांच्या हाती गेली आणि केंद्र-राज्याने जनहिताची अनेक कामे करत असतानाच राम मंदिराचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्याला प्राधान्य दिले. न्यायालयीन लढाईत निर्णायक विजय मिळायला 2019 साल उजाडले असले, तरी विहिंपने त्याआधीच ’श्री राम जन्मभूमी ट्रस्ट’च्या माध्यमातून राम मंदिराच्या उभारणीच्या दृष्टीने काम सुरू केले होतेच. न्यायालयाच्या निकालानंतर त्याला वेग आला. वातावरणात आलेला उत्साह आणि या कामासाठी सर्व दिशांनी जुळून आलेली अनुकूलता याने राम मंदिराची निर्मिती हे शेकडो वर्षांचे स्वप्न आज सत्यात आकार घेते आहे.
22 जानेवारीला पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि रा.स्व.संघाचे सरसंघचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत बालरामाची विधिवत प्राणप्रतिष्ठा होईल आणि त्या दिवसापासून रामदर्शन सर्वांसाठी खुले होईल. राम मंदिराची उभारणी होत असतानाच अयोध्यानगरीही सजते आहे. रामभक्तांचा ओघ प्रदीर्घकाळ चालू राहील, हे लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या सुविधा नव्याने उभ्या केल्या जाताहेत. खरे तर लोकांमध्ये इतका उत्साह आहे की आताच प्रतिदिनी हजारोंच्या संख्येने लोक अयोध्येत जात आहेत. त्यांच्या परमप्रिय प्रभू रामांचे मंदिर उभारताना दुरून पाहतानाही धन्यता अनुभवताहेत. प्रत्यक्ष मंदिर खुले झाल्यावर दर्शनार्थींची रोजची संख्या लाखाचा उंबरा ओलांडेल, असे चित्र आहे.
या लढ्याला अंतिम टप्प्यापर्यंत नेणारे राम जन्मभूमी मुक्तीचे आंदोलन आणि या माध्यमातून सर्वस्वाचे बलिदान देणारे असंख्य हिंदू कारसेवक यांच्या स्मृती प्रत्येकाच्या मनात चिरंतन राहाव्यात, यासाठी अयोध्येत भव्य स्मारकाचेही निर्माण होणार आहे. हिंदूंमधील जाग्या झालेल्या आत्मतेजाची साक्ष म्हणजे हे स्मारक असेल. त्यातून पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल.
श्रीरामजन्मभूमी न्यासाच्या माध्यमातून हे मंदिर उभारले जात असले, तरी त्यासाठी या देशातल्या प्रत्येक रामभक्ताने समर्पण निधीच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे. या माध्यमातून जितक्या निधीची अपेक्षा होती, त्यापेक्षा कितीतरी मोठा निधी उभारला गेला आहे. त्यामुळे हे मंदिर सर्व रामभक्तांनी मिळून उभारले आहे असा भाव सर्वत्र आहे. काही रामभक्तांनी तर आपली आयुष्यभराची कमाई, जमीनजुमला विकून प्राप्त झालेली धनसंपदा प्रभू रामांच्या मंदिरासाठी अर्पण केली आहे. लोकांच्या या मन:पूर्वक सहभागामुळेच प्रत्येक रामभक्ताला मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी अक्षता घेऊन जाण्याची कल्पना पुढे आली. देशाच्या प्रत्येक प्रांतात हे अक्षता कलश पोहोचले असून रामभक्तांकडून त्यांचे अतिशय उत्स्फूर्त स्वागत होत असल्याच्या सचित्र बातम्या प्रकाशित होत आहेत. या अक्षता त्या दिवशी आपल्या गावातल्या मुख्य मंदिरांमधील राममूर्तीवर वाहिल्या जाणार आहेत. 22 जानेवारी रोजी देशभर होणार्‍या दीपोत्सवामुळे मंगलमय दिव्यांच्या प्रकाशात अवघा देश न्हाऊन निघणार आहे. देशभरातले कोट्यवधी रामभक्त अयोध्येतील सोहळ्यात मनाने सहभागी असणार आहेत.
लोकार्पणाच्या दिवशी नियोजित तीन टप्प्यांपैकी पहिला टप्पा पूर्ण व्हावा, यासाठी देशभरातले सुमारे चार हजार कारागीर रात्रंदिवस खपत आहेत. त्यांच्यावर देखरेख करणारी मोठी टीम गेले वर्ष-दीड वर्ष अयोध्येतच मुक्काम ठोकून आहे. अयोध्येतून मंदिर निर्माणासंबंधी रोज येणार्‍या नव्या वार्ता लोकांच्या मनातला आनंद, उत्साह वाढवीत आहेत. या सगळ्यातून हिंदूंच्या मनात पिढ्यानपिढ्या वसत असलेल्या प्रभू रामाविषयीच्या असीम श्रद्धेचे घडणारे दर्शन जगाला स्तिमित करते आहे. अशी श्रद्धा केवढे मोठे बलस्थान असते, याची प्रचिती देते आहे.
त्याच वेळी याच देशात जन्माला आलेली, मात्र इथल्या शक्ती-भक्ती परंपरेवर टीका करण्यात धन्यता मानणारी आणि हिंदुद्वेषाने (पर्यायाने भाजपा-संघाचाही द्वेष करणारी) पछाडलेली फळी राममय झालेल्या वातावरणाने खूप अस्वस्थ आहे. दु:खात आहे. समूहातल्या प्रत्येकाची आणि समूहाची भावना, श्रद्धा ओळखण्यात, त्याचा उचित मान राखण्यात कमी पडलेले हे विरोधक देशभरातल्या उत्साही वातावरणाने अस्वस्थही आहेत आणि भयभीतही. त्यातूनच ते मोदी-शहांवर टीका करण्याची नेहमीची चुकीची खेळी खेळत आहेत, तर राहुल गांधींसारखे अपरिपक्व, बालबुद्धीचे नेते अगदी चुकीच्या मुहूर्तावर भारत न्याय यात्रा सुरू करत आहेत. ज्या पूर्वांचलातून ते ही यात्रा सुरू करणार आहेत, त्या पूर्वांचलाच्या लोकसंस्कृतीतही राम भरून राहिला असल्याचे अनेक संशोधनसिद्ध पुरावे उपलब्ध आहेत, हे त्यांच्या खिजगणतीतही नाही. या घोडचुकीचे परिणाम त्यांना लवकरच दिसतील. घोडामैदान जवळच आहे.